#दहादिवसदहामराठीसंगीतकार
#२)वसंत पवार
एकदा त्यांचं सतार वादन ऐकल्यावर पंडित रविशंकर म्हणाले होते - नशीब आमचं की हा माणूस
मराठी चित्रपट जगतात
फुल टाईम संगीतकार झाला. सतार वादक
झाला असता तर आमची सतार कोणी
ऐकली असती ? - संगीतकार वसंत पवार यांच्या झुळझुळणाऱ्या सतार वादनाबद्दल, त्यांच्या कलंदरपणाबद्दल आणि 'ना खंत ना खेद'
अशा प्रकारच्या वृत्तीबद्दल पु.लं.नी सुद्धा भरभरून लिहिलं आहे.
तमाशापट सम्राट अनंत मानेंच्या 'मल्हारी मार्तंड'
चित्रपटाला लावणी-तमाशा बाजाचं फर्मास संगीत वसंत पवारांनी दिलं. चित्रपट बेफाट यशस्वी
झाला. त्यावेळी लावणी-तमाशा प्रधान चित्रपटांचा सुकाळच होता. त्यातल्या बऱ्याच चित्रपटांना
पवारांनी खुमासदार संगीत दिलं आणि ते तुफान गाजलंही. गण, गवळण, लावणी हे सगळे प्रकार
तर पवारांनी उत्कृष्टरित्या हाताळलेच पण विशेषतः तमाशापटातील सवाल-जबाबांचं संगीत तर
पवारांनी अत्यंत बेहेतरीन दिलंय. महाराष्ट्रातील ग्रामीण लोकसंगीताचे हे सगळे प्रकार
अतिशय अप्रतिमरित्या हाताळण्याचा पाया पवारांनी घातला आणि पुढे कळस म्हणून रसिकप्रिय
झाले ते 'संगीतकार राम कदम'. राम कदम त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात वसंत
पवारांकडे सहाय्यक म्हणून काम करत होते. त्याकाळात राम कदमांनी बांधलेल्या 'बुगडी माझी
सांडली गं' या लावणीवर पवार बेहद्द खुश झाले. सर्वसाधारणपणे सहाय्यकाने बांधलेली चाल
अधिकृतरित्या मुख्य संगीतकाराच्या नावावर जमा होण्याच्या त्या काळामध्ये 'सांगत्ये
ऐका' हा चित्रपट संगीतकार वसंत पवारांच्या नावावर असला तरीही या अतिप्रसिद्ध 'बुगडी'चं
श्रेय नेहमीच राम कदमांना दिलं गेलंय... (या संदर्भात एक प्रश्न माझ्या मनात आहे.
'सांगत्ये ऐका' हा चित्रपट श्रेयनामावलीनुसार निर्विवादपणे संगीतकार वसंत पवारांच्या
नावावर आहे. पण त्यातल्या 'बुगडी माझी सांडली गं' या अतिप्रसिद्ध लावणीचं श्रेय नेहमीच
राम कदम यांना दिलं गेलंय, हेही खरं आहे. पण याचा आधार काय आहे, राम कदम हे वसंत पवारांकडे
सहाय्यक म्हणून काम करत होते का, किंवा हा किस्सा काय आहे याची माहिती मला इंटरनेटवर
तरी कुठेही आढळली नाही. तरीही किंवा म्हणूनच हा किस्सा मी या पद्धतीनं लिहिलाय. कदाचित
ही माहिती खरी असेल किंवा कदाचित हा माझा कल्पना विलास असेल...)
मला आठवतंय, माझी पिढी पौगंडावस्थेत असतांना टी.व्ही. -दूरदर्शन- वर शनिवारी संध्याकाळी ब्लॅक अँड व्हाईट जमान्यातले तमाशापट दाखवायचे तेव्हा ढोलकीच्या तोड्या-तुकड्यांवर आणि फडकत्या लावण्यांवर उसळता उसळता
संगीतकार वसंत पवार
हे नाव जरा परिचयाचं झालं. 'मल्हारी मार्तंड,' 'सवाल माझा ऐका,' 'वैजयंता,' 'सांगत्ये ऐका' इत्यादी सिनेमातली गाणी खूपच
गाजली. लावणी हा प्रकार तर पवारांनी इतक्या वैविध्यपूर्ण प्रकारांनी पेश केलाय की पुछो
मत ! वेगवेगळ्या ढंगाच्या, वेगवेगळ्या रागरागिण्यातल्या, वेगवेगळ्या ठेक्याच्या, अशा अनेक
लावण्या त्यांनी सुनावल्या. अगदी पाश्चात्य पद्धतीचा ढंग सुद्धा त्यांनी लावणीतून सादर केलाय. कसं काय पाटील बरं हाय का (सुलोचना चव्हाण / चित्रपट सवाल माझा
ऐका) या लावणीचे इंट्रो-इंटरल्युड्स (सुरुवातीचा व मधले म्युझिक पीसेस)
आणि ढोलकीचा अफलातून ठेका आठवतोय ना ?
मात्र याचा
एक परिणाम थोडासा असा झाला की वसंत पवारांचं संगीत म्हणजे तमाशापटांमधलं ग्रामीण बाजातलं ठराविक संगीत असा काही रसिकांचा, संगीतप्रेमींचा ठोकळेबाज समज झाला. पण ज्या गाण्यांमध्ये पवार तमाशा बाजातल्या संगीताला शिवलेले सुद्धा नाहीयेत अशी अनेक
मधाळ, आणि प्रसिद्ध सुद्धा, गाणी आहेत.
सहज आठवतायत आणि भुरळ घालतायत ती गाणी म्हणजे - एकवार
पंखावरुनी फिरो (सुधीर
/ चित्रपट वरदक्षिणा), उघडले एक चंदनी दार
(सुमन / चित्रपट मल्हारी मार्तंड), घन घन माला नभी दाटल्या (मन्नाडे / चित्रपट वरदक्षिणा), झुकुझुकू झुकुझुकू अगीनगाडी (आशा
/ चित्रपट तु सुखी
रहा), आज मी आळविते केदार (मधुबाला झवेरी / चित्रपट अवघाची संसार),
उमा म्हणे यज्ञी
माझे जळाले माहेर
(सुमन / चित्रपट मानिनी), बहरून
ये अणू अणू
(आशा / चित्रपट अवघाची संसार).
गायिका 'सुलोचना चव्हाण'ची कारकीर्द 'लावणी सम्राज्ञी' म्हणून बहरण्यामध्ये पवारांचा सिंहाचा वाटा
आहे. जरा संगीतकार वसंत पवार / गायिका सुलोचना चव्हाण या जोडगोळीच्या या लावण्या गुणगुणून तर बघा
- पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा (चित्रपट मल्हारी मार्तंड), फड सांभाळ तुऱ्याला गं आला (चित्रपट मल्हारी मार्तंड), कसं काय पाटील बरं हाय का (चित्रपट सवाल माझा ऐका),
सोळावं वरीस धोक्याचं (चित्रपट सवाल माझा
ऐका), तुमचा नि माझा एक काढा
फोटु (चित्रपट रंगल्या रात्री अशा), मला हो म्हणतात लवंगी
मिरची (चित्रपट रंगल्या रात्री अशा), कुणी
माझ्या रायाला शानपन
शिकवा (गैरफिल्मी लावणी)
बहिणाबाईंच्या अद्वितीय कवितांना चाली
लावून ती गाणी
पडद्यावर साकार करण्याचा पहिला मान सुद्धा पवारांना मिळालेला आहे. पवारांनी संगीतबद्ध केलेल्या बहिणाबाईंच्या कविता
आहेत - अरे खोप्यामधी खोपा
(आशा / चित्रपट मानिनी), अरे संसार संसार (सुमन
/ चित्रपट मानिनी), धरित्रीच्या कुशीमधे (सुमन / चित्रपट मानिनी) आणि मन वढाळ वढाळ (आशा
/ चित्रपट मानिनी)
संगीतकार वसंत प्रभूंच्या प्रमाणेच वसंत पवार सुद्धा अवघ्या ४६ व्या वर्षी
वारले. मराठी संगीतामधले हे दोन्हीही वसंत, गाण्यांच्या संख्येच्या दृष्टीने विचार
करता, पुरेसे बहरू
शकले नाहीत हे आपलं दुर्दैव. मात्र
त्यांच्या कर्तृत्वाने त्यांनी मराठी
मनांमध्ये जो चंदनासारखा संगीत सुगंध पसरवला तो कायमच राहील.
माझ्या पसंतीची दहा गाणी --
१) आली सखी आली, प्रियामीलना (वसंतराव देशपांडे / चित्रपट अवघाची संसार)
२) चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा (माणिक वर्मा / भावगीत)
३) जे वेड मजला लागले
(सुधीर व आशा
/ चित्रपट अवघाची संसार)
४) रूपास
भाळलो मी (सुधीर
व आशा / चित्रपट अवघाची संसार)
५) नवीन
आले साल आजला
उजेड पडला नवा दिवा लाविते दिवा
(आशा / चित्रपट तू सुखी
रहा)
६) काल रात सारी मजसी
झोप नाही आली
(मधुबाला झवेरी / चित्रपट सांगत्ये ऐका)
७) दिलवरा दिल माझे ओळखा (आशा / चित्रपट सांगत्ये ऐका)
८) कुणी
माझ्या रायाला शानपन
शिकवा (सुलोचना चव्हाण / गैरफिल्मी लावणी)
९) वनवास
हा सुखाचा (आशा
/ चित्रपट मानिनी)
१०) सप्रेम नमस्कार विनंती विशेष
(वसंतराव देशपांडे व मधुबाला झवेरी / चित्रपट वैजयंता)
--- भाग २. वसंत पवार
- स मा प्त
-
क्रमशः - - #भाग३)वसंतदेसाई
ता क - १) प्रयत्नपूर्वक थोडीफार माहिती
मिळवून
लेख
लिहिलेत.
२) माहिती मुख्यतः गुगल,
विकिपीडिया
व
इतर
काही
इंटरनेट
साईट्स
वरून
साभार
घेतलीय आणि थोडीशी माहिती मी ऐकलेली, वाचलेली
आहे.
३) लेखात व्यक्त झालेली मतं पूर्णतः वैयक्तिक
आहेत,
अर्थात
मी
सोडून
इतर
कोणीही
त्यासाठी जबाबदार
नाही.
४) मी लहानच माणूस आहे पण तरीही कलाकारांचे एकेरी
उल्लेख
केलेले
आहेत
ते
त्या
कलाकारांवरील अतीव
प्रेमापोटीच.
५) निवडलेली दहा
गाणी
ही
संगीतकाराच्या
'अनेक
सर्वोत्कृष्ट
गाण्यांपैकी
दहा'
आहेत.
'दहा दिवस दहा मराठी संगीतकार,' या संकल्पनेप्रमाणे
गाणीही
दहा
घेतलीयत
एवढंच.
६) मी उल्लेखिलेली गाणी
आठवणीतली
गाणी
डॉट
कॉम
या
साईट
वर
माहिती
व
लिरिक्स सहित ऐकायला उपलब्ध आहेत.