Tuesday, 23 July 2024

--- शास्त्रीय संगीत कलाकार व फिल्म इंडस्ट्री --- १) उ.बिस्मिल्ला खांसाहेब


#शास्त्रीयसंगीतकलाकारवफिल्मइंडस्ट्री

 

--- शास्त्रीय संगीत कलाकार फिल्म इंडस्ट्री ---

 

[वास्तविक सगळ्यांविषयी एकच लेख लिहावा की अनेक छोट्या मोठ्या लेखांचा गुलदस्ता बांधावा या बद्दल माझ्या मनात संभ्रमच होता ... मी शास्त्रीय संगीताचा निःसीम चाहता तर आहेच पण कदाचित तितक्याच इंटेन्सिटीनी मला सिनेसंगीतही (हिंदी मराठी) आवडतं - विशेषतः जुनं ... सिनेमाच्या दुनियेचा आणि अर्थात त्यातल्या संगीताचा आपल्यामधल्या कलेशी ऋणानुबंध जोडावा असं अगदी हिराबाई बडोदेकर, मास्तर कृष्णराव इथपासून ते आजच्या बेगम परवीन सुलताना, पं.अजय चक्रवर्ती पर्यंतच्या अनेक शास्त्रीय संगीत कलाकारांना वाटत आलेलं आहे आणि हिंदी, मराठी सिनेसृष्टीलाही या दिग्गज कलाकारांना आपल्या प्रवाहात सामावून घ्यावं असं वाटलेलं आहे. यातल्या काहींचं सिनेसृष्टीतलं कर्तृत्व जरा छोटेखानी आहे तर काहींचं बऱ्यापैकी मोठं आहे ... या कलाकारांबद्दलच्या माझ्या मनातल्याही आवडी थोड्याफार डाव्या उजव्या आहेतच ... त्यामुळे सगळं एकाच मोठ्ठ्या लेखात व्यक्त करणं कठीण होतं ... त्यामुळे छोटे किंवा मोठे पण वेगवेगळे लेख लिहिलेत ... या सगळ्याच कलाकारांचं मुख्य कर्तृत्व शास्त्रीय संगीताच्या त्यांच्या स्वतंत्र मैफिलींमधून प्रकट झालंय ... थोडक्यात फिल्मी दुनिया हे त्यांचं मुख्य करियर नसून पूरक करियर आहे किंवा होतं ... हे लेख लिहितांना काही मला असणारी माहिती तर बरीचशी इंटरनेटवर मिळणारी माहिती यांची सांगड घालून जमतील तसे लेख लिहिलेत ... आपल्याला आवडतील अशी आशा करतो.]

 

#१)उ.बिस्मिल्लाखांसाहेब

 

१) उ.बिस्मिल्ला खांसाहेब

 

शहनाई नवाझ, भारतरत्न .बिस्मिल्ला खान यांच्या शहनाईविषयी ज्याला काहीच माहिती नाही किंवा ज्याने त्यांची शहनाई अजिबात ऐकलेलीच नाही, असा माणूस हा भारतीय संगीतप्रेमी नक्कीच नाही. २००६ साली खासाहेबांचं निधन झालं त्यानंतर आता बराच कालावधी लोटलेला असला तरीही त्यांच्या फुंकेतली अफलातून ताकद सांगणाऱ्या रेकॉर्डिंग्जमुळे आणि शिवाय शहनाईची मंगलतेशी ['मांगल्ल्याशी' असा शब्द लिहिणं योग्य वाटत नाही आणि 'मांगल्याशी' असा शब्द लिहिला तर, तो योग्य पद्धतीने वाचला जाईल याची खात्री वाटत नसल्यामुळे मी 'सेफेस्ट' विचार करून 'मंगलतेशी' असा शब्द लिहिलाय ...] सांगड असल्यामुळे आजही, निदान मंगल समारंभाच्या निमित्ताने का असेना पण, खांसाहेबांची शहनाई नक्कीच ऐकली जाते. पूर्वी लोकसंगीताचं वाद्य म्हणून गणल्या जाणाऱ्या शहनाईला त्यांनी स्वतःच्या अचाट मेहेनतीच्या, फुंकेच्या जोरावर शास्त्रीय संगीताचं नाणावलेलं वाद्य म्हणून मानाच्या जागेवर आणून बसवलं ... हा बहुमान एवढ्या उच्च पातळीवरचा होता की त्यांना सर्वश्रेष्ठ वादक म्हणून पहिल्या १९४७ सालच्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर पंडित नेहरूंच्या उपस्थितीत मैफिल सादर करायला मिळाली.

 

खांसाहेबांचा पूर्वी फिल्मी संगीताशी फिल्मी दुनियेशी अजिबात संबंध आला नव्हता .. ते वाराणसीला आपल्या वाद्याचा रियाझ करण्यात जाहीर मैफिली करण्यात मग्न होते ... इतर काही समकालीन शास्त्रीय संगीत कलाकार कोणत्या ना कोणत्या नात्याने फिल्मी संगीतात करियर करत असूनही त्यांना फिल्मी दुनियेची दुनियेचं अजिबात आकर्षण वाटलं नव्हतं ... मात्र कशी कोण जाणे पण; गुणाढ्य निर्माता दिग्दर्शकसत्यजित रे’ यांच्या १९५८ सालच्या 'जलसा घर' या बंगाली सिनेमात खानसाहेबांची शहनाई प्रथम वाजली होती ... बाय वे, या 'जलसा घर'चे संगीतकार सितारनवाझ . विलायत खांसाहेब होते ...

 

संपूर्ण शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी ज्यामध्ये होती असा; नौशादमियां यांच्या संगीताने नटलेला,बैजू बावरा’ सिनेमा आणि त्यातलं संगीत गाजल्यावर त्याचे निर्माता दिग्दर्शकविजय भट’ यांना आपल्या आगामी हिंदी चित्रपटातही शास्त्रीय संगीताचा मोठा वाटा असावा; अशी मनीषा होती ... आस्ते आस्तेगुंज उठी शहनाई’ची कथा - पटकथा तयार होत होती ... नौशादमियां इतर चित्रपटांमध्ये बिझी असल्यामुळे वसंत देसाई हे संगीतकार असणार होते ... हा चित्रपट पूर्णतः शहनाई वाजवणाऱ्या हिरोवर असल्याकारणाने अर्थातच खांसाहेबांना या सिनेमातल्या शहनाईवादनाबद्दल विचारणा करण्यात आली ... सुरुवातीला खांसाहेबांनी नकारच दिला होता; पण पूर्ण कथा ऐकून झाल्यानंतर मात्र ते वादनासाठी तयार झाले ... अशा रीतीने १९५९ साली शास्त्रीय संगीत चित्रपट संगीतप्रेमींसाठी मेजवानी ठरणारागुंज उठी शहनाई,’ हा चित्रपट आला ... या चित्रपटातली अविस्मरणीय गाणी आहेत ---

 

तेरे सूर और मेरे गीत (लता)

हौले हौले घुंगट पट खोले (लता, रफी कोरस)

आखियां भूल गयी है सोना (गीता दत्त, लता कोरस)

तेरी शहनाई बोले (लता व रफी)

जीवनमे पिया तेरा साथ रहे (लता रफी)

दिलका खिलौना हाय टूट गया (लता)

कहेंदो कोई ना करे यहा प्यार (रफी)

मैने पीना सिख लिया (रफी)

 

ही सगळी गाणी अत्यंत सुंदर तर आहेतच, पण गाण्यांच्या यादीपेक्षाही महत्वाची असेल तर ती पूर्ण सिनेमात निमित्तानिमित्ताने वाजत राहणारी खानसाहेबांची शहनाई ... रागांच्या वादनाबरोबरचतेरे सूर और मेरे गीत,’ ‘जीवनमे पिया तेरा साथ रहे’ आणिदिलका खिलौना हाय टूट गया,’ ही गाणी जेव्हा शहनाईवर वाजतात तेव्हा ती शास्त्रीय वादनातल्या धून, चैती, कजरी यांचं बहारदार रूप घेऊन येतात ...

 

बिस्मिल्ला खांसाहेबांच्या पोटभर शहनाईवादनाबरोबरच या सिनेमात खांसाहेबांची भारतीय कीर्तीचे नावाजलेले गायक . आमिरखान साहेबांबरोबरची जुगलबंदी खास उल्लेखनीय आहे ... त्याचप्रमाणे त्यांची सतारवादक .अब्दुल हलीम जाफरखान साहेबांबरोबर सुद्धा एककेदार’ रागातली ऐकण्याजोगी जुगलबंदी आहे.

.आमिरखान साहेबांबरोबर (सिनेमातले) गुरु-शिष्य या नात्याने खानसाहेबांची जी जुगलबंदी आहे त्यात रागभटियार,’ ‘रामकली,’ ‘देसी,’ ‘शुद्धसारंग,’ ‘मुलतानी,’ ‘यमन,’ ‘बागेश्री’ चंद्रकौंस’ रागातला तराणा; या क्रमाने बेहेतरीन संगीताची मेजवानी आहे ... विशेषतःचंद्रकौंस’मधल्या तराण्यात शहनाईवरची खानसाहेबांची द्रुत लय इतकी जलद होते की अक्षरशः श्वास रोखला जातो ... हिरोईनअमिता’च्या लग्नप्रसंगी खांसाहेबांच्या शहनाईवरजीवनमे पिया तेरा साथ रहे.’ वरची धून वाजते तोही प्रसंग लक्षात राहण्याजोगा आहे ... 'तेरी शहनाई बोले,’ या गाण्यातला शहनाईचा फिलरही लक्षणीय आहे ...

 

चित्रपट संगीतप्रेमी रसिकांची आवडती गाणी तसं पाहिलं तर असंख्य असतील; पण फक्त एकाच चित्रपटात गाणी म्हणून असणाऱ्या / गाण्यांव्यतिरिक्त; सतार वादनाची, दर्जेदार शास्त्रीय गायकाच्या गाण्याची आणि बेमिसाल शहनाई वादनाची भूक पुरेपूर भागवणाऱ्या या चित्रपटाची स्तुती करावी तितकी कमीच आहे ...

 

आणि . बिस्मिल्ला खांसाहेब ? ... या चित्रपटात शहनाई वादन करण्याचं मान्य करून चित्रपट संगीतप्रेमींसाठी त्यांनी एक सोनेरी संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल; त्यांचं स्मरण करण्याव्यतिरिक्त आणि मनोमन त्यांचं ऋण मान्य करण्याव्यतिरिक्त आपल्या हातात काहीच नाही.

 

 

@प्रसन्न सोमण / १२-०६-२०२४.


प्रसिद्धी - अभूतपूर्व (सप्टेंबर २०२४)


No comments:

Post a Comment