Monday, 29 July 2024

--- शास्त्रीय संगीत कलाकार व फिल्म इंडस्ट्री --- २) पंडित भीमसेन जोशी

 


#शास्त्रीयसंगीतकलाकारवफिल्मइंडस्ट्री

 

--- शास्त्रीय संगीत कलाकार फिल्म इंडस्ट्री ---

 

[वास्तविक सगळ्यांविषयी एकच लेख लिहावा की अनेक छोट्या मोठ्या लेखांचा गुलदस्ता बांधावा या बद्दल माझ्या मनात संभ्रमच होता ... मी शास्त्रीय संगीताचा निःसीम चाहता तर आहेच पण कदाचित तितक्याच इंटेन्सिटीनी मला सिनेसंगीतही (हिंदी मराठी) आवडतं - विशेषतः जुनं ... सिनेमाच्या दुनियेचा आणि अर्थात त्यातल्या संगीताचा आपल्यामधल्या कलेशी ऋणानुबंध जोडावा असं अगदी हिराबाई बडोदेकर, मास्तर कृष्णराव इथपासून ते आजच्या बेगम परवीन सुलताना, पं.अजय चक्रवर्ती पर्यंतच्या अनेक शास्त्रीय संगीत कलाकारांना वाटत आलेलं आहे आणि हिंदी, मराठी सिनेसृष्टीलाही या दिग्गज कलाकारांना आपल्या प्रवाहात सामावून घ्यावं असं वाटलेलं आहे. यातल्या काहींचं सिनेसृष्टीतलं कर्तृत्व जरा छोटेखानी आहे तर काहींचं बऱ्यापैकी मोठं आहे ... या कलाकारांबद्दलच्या माझ्या मनातल्याही आवडी थोड्याफार डाव्या उजव्या आहेतच ... त्यामुळे सगळं एकाच मोठ्ठ्या लेखात व्यक्त करणं कठीण होतं ... त्यामुळे छोटे किंवा मोठे पण वेगवेगळे लेख लिहिलेत ... या सगळ्याच कलाकारांचं मुख्य कर्तृत्व शास्त्रीय संगीताच्या त्यांच्या स्वतंत्र मैफिलींमधून प्रकट झालंय ... थोडक्यात फिल्मी दुनिया हे त्यांचं मुख्य करियर नसून पूरक करियर आहे किंवा होतं ... हे लेख लिहितांना काही मला असणारी माहिती तर बरीचशी इंटरनेटवर मिळणारी माहिती यांची सांगड घालून जमतील तसे लेख लिहिलेत ... आपल्याला आवडतील अशी आशा करतो.]

 

#२)पंडितभीमसेनजोशी

 

२) पंडित भीमसेन जोशी

 

'तानसेनानंतर भारतभर प्रसिद्धी मिळवणारा एकमेव गायक,' या शब्दांत 'पंडित जसराज' यांनी भीमेसनजींची स्तुती केली होती ...भीमसेनजी आपल्यात नाहीत या गोष्टीला आज एवढी वर्ष होऊन गेली तरीही; भीमसेनजींच्या शास्त्रीय संगीताच्या अनेक मैफिलींची गोडी विसरू म्हणता विसरता येणं शक्य नाही ... आपल्या गायनरुपी अत्तराचा सुगंध भारतभर पसरवत फिरणाऱ्या या अवलिया गायकाकडे फिल्म इंडस्ट्रीचं पूर्णपणे दुर्लक्ष होईल; ही गोष्ट अशक्यप्राय होती ... त्यामुळे भीमसेनजींची उपस्थिती फिल्मी संगीतात अगदी मोजक्या गाण्यांपुरती असली तरीही त्यांचा आवाज अवघी चित्रपटसृष्टी व्यापून दशांगुळं वर उरला आहे, ही गोष्ट अगदी नक्कीच खरी आहे ...

 

विशेषतः ज्याठिकाणी शास्त्रीय पद्धतीच्या गाण्याची किंवा अभंगांची जरुरी वाटली त्याठिकाणी दिग्दर्शक/संगीत दिग्दर्शकांना जरूर भीमसेनजींची आठवण झालेली आहे. फक्त मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीचा विचार करून; थोडं इंटरनेटच्या मदतीने थोडा माझ्या स्मरणशक्तीला ताण देऊन गाण्यांची जंत्री काढायला बसलो तर मला तरी भीमसेनजींनी गायिलेली आठ गाणी आढळली ...

 

) रम्य ही स्वर्गाहून लंका (चित्रपट-स्वयंवर झाले सीतेचे / संगीतकार-वसंत देसाई)

) केतकी गुलाब जुही चंपकबन फुले (सहगायक मन्नाडे बरोबर बसंतबहार रागातली जुगलबंदी/ चित्रपट-बसंतबहार/ संगीतकार-शंकर - जयकिशन)

) आज मोरे मन लागो लंगरवा (चित्रपट-सुवासिनी / सहगायिका-ललिता फडके संगीतकार-सुधीर फडके) - सुवासिनी चित्रपटाचे संगीतकार सुधीर फडके असल्यामुळे संगीतकार-सुधीर फडके असा उल्लेख केला तरीही ही भीमसेनजींची एक गुजरी तोडी रागातली चीज आहे ... चित्रपटामध्ये हिरोईन सीमा हिचे वडील सीमा हिला संगीत शिकवत असतात असा प्रसंग आहे त्या प्रसंगासाठी ही चीज वापरली आहे.

) इंद्रायणी काठी देवाची आळंदी (चित्रपट-गुळाचा गणपती / संगीतकार - पु..देशपांडे) - मूळ चित्रपटामध्ये या गाण्याच्या वेळेस भीमसेनजींचा आवाज अत्यंत कोवळा जास्त फिरक असलेला आहे ... आणि मूळ चित्रपटामध्ये गाणं थोडं वेगळं सुद्धा आहे ... रेकॉर्डिंग बहुदा नंतर वेगळं झालं असावं रेकॉर्ड मध्ये ऐकायला मिळणारं गाणं थोडं वेगळं आहे ... या रेकॉर्डिंगच्या वेळेस गाण्याला ऑर्गन वसंतराव देशपांडे यांनी वाजवला आहे, असं कुठेसं वाचनात आलंय ...

) टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संगं (चित्रपट-भोळीभाबडी / सहगायक - पं.वसंतराव देशपांडे / संगीतकार - राम कदम)

) संपले जीवन संपली ही गाथा (चित्रपट-पतिव्रता / संगीतकार-राम कदम

) रघुवीर तुमको मेरी लाज (चित्रपट-अनकही / संगीतकार-प्रीतम)

) ठुमक ठुमक पग (चित्रपट-अनकही / संगीतकार-प्रीतम)

 

भीमसेनजींच्या या चित्रपटसृष्टीतल्या कर्तृत्वाची आठवण काढली तरीही त्याव्यतिरिक्त अजूनही एक उल्लेख करण्याजोगं योगदान भीमसेनजींचं मराठी नाट्यसृष्टीला आहे; ते म्हणजे संगीत 'धन्य ते गायनी कळा,' या नाटकाला त्यांनी दिलेला अविस्मरणीय संगीतसाज ... हे नाटक श्रेष्ठ गायक तानसेन याच्या जीवनप्रवासावर आधारित असल्यामुळे या नाटकामध्ये शास्त्रीय संगीताची लयलूट आहे ... विशेषतः भीमसेनजींच्या शास्त्रीय संगीताच्या सर्वतोपरी ज्ञानाची झलक या नाटकाच्या संगीतरचनामुळे आपल्याला दिसू शकते ... भीमसेनजींनी स्वतः निर्मिती केलेले 'राग कलाश्री' ' राग ललत-भटियार,' हे राग या नाटकात वापरले गेलेत ... गोव्याच्या मंडळींनी सादर केलेलं हे नाटक आपल्याला यु ट्यूबवर बघायला उपलब्ध आहे ... त्यावरून भीमसेनजींच्या अफलातून संगीत रचनांची आपल्याला नक्कीच कल्पना येऊ शकते.

याच नाटकातल्या तीन पदांच्या रामदास कामत यांच्या आवाजात ज्या रेकॉर्डस् निघालेल्या आहेत, त्या आहेत ...

) चिरंजीव राहो जगी नाम राम (राग ललत-भटियार / ताल झपताल)

) दान करी रे गुरुधन अतिपावन (राग बागेश्री / ताल एकताल)

) हे करुणाकरा ईश्वरा कृपादान मज दे (राग मारवा / ताल - आध्दा)

 

बालपणापासून संपूर्ण आयुष्य संगीतसेवेत उधळून टाकणाऱ्या या वेड्या गायकाच्या मधुर आठवणींना माझा सादर नमस्कार ...

 

@प्रसन्न सोमण / २१-०६-२०२४.