Wednesday, 27 July 2022

--- तुकडा तुकडा जगणं ---

                       --- तुकडा तुकडा जगणं ---

 

कोकणातल्या आमच्या गावात एका आठवडी बाजाराच्या वेळी मी बायकोबरोबर फेरी मारायला गेलो होतो ... एका टपरीमध्ये कढई टाकून एक म्हातारा जिलब्यांचे घाणे काढत होता ... बाजूलाच परातीत, आधी झालेल्या पाकात निथळणाऱ्या राजस जिलब्या दिसत होत्या ... न राहवून "अर्धा किलो बांधा हो काका," अशी ऑर्डर मी जेमतेम सोडली असेल नसेल तोच, शेजारून बाजार दणाणून सोडणारा आवाज आला ... "अहो, तुम्हाला डायबिटीस आहे आणि अर्धा अर्धा किलो जिलब्या कसल्या हाणताय ? फक्त शंभर ग्रॅम घ्या," ... 'हे कोण बोलले बोला,' हे अर्थात अख्ख्या बाजारात कुणालाही सांगावं लागलं नाहीच ... (ठीक आहे ... 'मुझे मेरे हालपे छोड दो' म्हणतो; दुसरं काय ?) … शांतपणे काकांनी दोनतीन जिलब्यांची कडी एका वर्तमानपत्रामध्ये घालून माझ्यासमोर धरली आणि म्हणाले "दोघांनी मिळून संपवा ... आणखी जिलबी तुमका मिळूची न्हय" ... खाऊन झाल्यावर पैसे विचारले तर ते म्हणाले, "दोनतीन कड्यांचे कसले पैसे ? … ऱ्हाऊन्द्या."

 

कोकणातलाच दुसरा एक किस्सा ... झाली बरीच वर्ष ... कोकणात एका टपरीवजा हॉटेलमध्ये नाश्ता करत होतो ... पलीकडे प्रचंड कळकट फाटक्या धोतरातला, पाय वाकडे झालेला आणि पाठ वाकलेला म्हातारा; सोटा बाजूला ठेवून मिसळ संपवत होता ... आता ह्या कोकणातल्या टपरी हॉटेल्समध्ये रेट्स बेताचेच असतात, मुंबईसारखे महागडे नसतात ... पण तरीही मिसळ संपल्यावर म्हाताऱ्याने काउंटरवर पाचचं नाणं ठेवून सांगितलं, "सुरेश, ह्ये माझे पैशे," आणि तो जाण्यासाठी वळला ...

"आजोबा, मिसळीचा रेट दहा होऊन गेलाय ... आता पाचात परवडत नाही हो !" ... हॉटेलवाला सुरेश म्हणाला ...

"त्ये माका काई सांगुचा न्हय ... उद्यापास्न पाचात बसते तेवढीच मिसळ माका ताटलीत वाढुची, ह्या लक्षात ठेय," असं खणखणीतपणे बजावून सोटा आपटीत फेंगड्या पायांनी म्हातारा निघून सुद्धा गेला.

"काकानु, मोप पैसा कमावला हां ह्या म्हाताऱ्यान; पण पोरगा नि सून त्येका पैसा देतच न्हयत ... आपलो गावचो म्हातारो म्हणून त्येका मिसळ दितंय मी." हॉटेलवाल्या सुरेशनी मला सांगितलं ...

 

'मोठे अजब नमुने बघितले बुवा,' असा विचार करत मी बाहेर पडलो ...

 

आज मी थोडा खोलात जाऊन विचार करतो, तर असं लक्षात येतं की एक वेळची जिलबी खाणारा मी काय किंवा पाच रुपयात थोडीशीच मिसळ खाऊ पाहणारे ते आजोबा काय; असेच असंख्य नमुने पूर्वीही होते आजही आहेत आणि पुढेही असणार आहेतच ... शेवटी परिस्थितीच त्या नुसार बदलत जाते ... खूप लहान होतो त्यावेळी - म्हणजे वडापाव, पावभाजी वगैरे फेमस होण्याआधी - मला आठवतंय स्लाइस पाव हा त्यामानानी नवीन नवीन प्रकार, संपूर्ण मिळायचा तसा आणला, तर तो घरात संपत नसे ... 'कधीतरी गंमत म्हणून ठीक आहे एरव्ही कसला तो मैद्याचा; पोटाची वाट लावणारा पाव !' असलीच तेव्हा साधारण विचारसरणी असायची ... त्यामुळे अगदीच कधीतरी आई मला दुकानात पाव आणायला पाठवायची ... दुकान ठरलेलं असायचं, कारण आमच्या जवळचा एक दुकानदार अर्धा पाव देत असे ... अर्धा पाव मागितला की दुकानदार तो ब्रिटानिया किंवा मॉडर्नचा लांबडा पाव, सुरी घेऊन मधून बरोब्बर अर्धा कापत असे व उघड्या भागांना पेपरनी पॅक करून देत असे ... घरोघरी अशीच परिस्थिती असणार त्यामुळे त्याचे ते अर्धे अर्धे कापलेले पाव संपतही असणार ... काळ पुढे पुढे सरकत चालला तशा अनेक वस्तू वेगवेगळ्या साइझेस मधेही मिळायला लागल्या ......

 

आता खरंतर किराणा आणणं किंवा दुकानदारी करणं या गोष्टींशी माझा अगदीच प्रचंड माफक संबंध आहे; पण तरीही इच्छा असो वा नसो, काही गोष्टी आपोआप कळतातच ... तसं तर बायकांनी रिठा किंवा शिकेकाई लावण्याचा काळ मला काहीसा परिचित; तिथे शाम्पू वगैरे मिळायला लागले हीच माझ्यासाठी नवलाची गोष्ट होती ... शाम्पूचे वन टाइम युजचे सॅशे का काय ते, मिळतात; एवढंच काय तर शाम्पू पुरुषही वापरतात ही माहिती मला (जबरदस्तीने) मिळाली तेव्हा मला झीटच यायची बाकी राहिली होती ... या एवढ्या हज्जारोंच्या संख्येनी नवनवीन गोष्टी निर्माण होतायत, त्या माझं अज्ञान वाढवण्यासाठीच, याबद्दल मला आता खात्री वाटायला लागलीय ... त्यामुळे भर पावसाळ्यात पूररेषा वाढती असते, तसं माझं अज्ञान दिसामासांनी एवढं वाढतं आहे की त्याची किती व्हरायटी दाखवू नि किती नको दाखवू; असं मला अलीकडे वाटत राहतं ... अंगाचा साबण आणि कपड्याचा साबण, एवढंच बराच काळ माहिती होतं ... नाही म्हणायला दाढीचा तो राउंड साबण बाबांमुळे माहिती होता आणि कपड्याचा म्हणून बीएल साबणचुरा सुद्धा माहिती होता (रीन वगैरे वड्या नंतरच्या) ... पण आजकाल दुकानात गेलो तर ? … अबब ! ... वाचा बसायची पाळी येते ... बरं, वस्तू दुकानात भले दिसल्या तरी त्या वस्तूला काय म्हणतात, हे कुठे माहिती होणार ? ... नाही म्हटलं तरी लाज असतेच, त्यामुळे कोचरेकर गुरुजींची चौकस बुद्धी ठेवून माहिती गोळा करता येतेच, असं नाही ... साबणांचा विषय निघाला होता तर फक्त एक उदाहरण म्हणून सांगतो - समोर भरलेल्या बाटलीत काही दिसलं आणि अगदी मोठ्या अक्षरातलं कंपनीचं नावही दिसलं तरी तो हँडवॉश आहे, की बॉडीवॉश आहे, की फेसवॉश आहे, की आणखी भलतंच काहीतरी लोशन-बिशन आहे, हे कळावं कसं ? ... एकूण काय, तर किंमत राहिली बाजुला, पण मुळात हे आहे काय आणि याचा आपल्याला काय उपयोग होण्यासारखा आहे; हेच उमगत नाही ... अर्थात ते काहीही असो; पण ते आपल्यासाठी नाही हे मला चटकन उमगतं ... वस्तूंचे निरनिराळे आकार तर चक्रावूनच टाकणारे झालेत ... हल्लीच जेमतेम दोन दिवसांच्या ट्रीपला पुरेल एवढीच टीचभर टूथपेस्ट पाहून धन्य झालो ... अशावेळी माझ्या बायकोचा व मुलाचा मला मोठ्ठाच आधार असतो ... पिचको सॉस हा सुद्धा तत्समच प्रकार ... वन टाइम किंवा शॉर्ट युज ... आणि अर्थातच युज अँड थ्रो सुद्धा ...

 

वस्तूंमध्ये हा प्रकार ठीक आहे, पण खाण्याच्या पदार्थांमध्ये सुद्धा 'साईझ कटौती'चा हा प्रकार कसा, याचं मला त्या म्हाताऱ्याच्या मिसळीच्या किश्श्याच्या वेळी नवल वाटलं होतं; पण मग विचार केल्यावर लक्षात आलं की नाहीतरी हाफराईस हे काय आहे ? ... काही ठिकाणी हाफ बटर चिकन वगैरे सुद्धा मिळतंच की !किंवा इतर डिशेस सुद्धा हाफ स्वरूपात मिळतात की ! ... एक वेळची तहान भागेल एवढंच बिसलेरी; तेवढीच सॉफ्ट ड्रिंक्स; वगैरे आता माहितीची झालीयत ... चहाचं कटिंग तर जणू अनादि काळापासून अस्तित्वात आहेच ... तोच प्रकार क्वार्टरचाही ...

 

प्रचंड मोठ्ठ्या वृक्षांची कुंडीत लागवड करून मुद्दाम खुरटवलं की त्यांना बोन्साय म्हणतात म्हणे ... तसे आता जागोजागी वस्तूंचे बारीक बारीक तुकडे दिसतायत ... कदाचित एव्हाना तो कोकणातला हॉटेलवाला सुद्धा 'पाव' मिसळ - या ठिकाणी पाव याचा अर्थ वन फोर्थ असा घ्यावा - ठेवायला लागला असेल ... बरोबर एक पाव (खाण्याचा) दिला की झालं ! ... नाहीतरी कोकणात मिळणारा पाव हा गोडीळ आणि मुंबईच्या तुलनेत वन फोर्थ या अर्थाचाच पाव असतो ...   

 

सगळं काही शॉर्ट ... सगळं काही तुकडा तुकडा ... हा विचार आता कला साहित्यातही रुळलाय ...  चारोळ्या आणि अलक या साहित्यप्रकारांची लोकप्रियता हे कशाचं द्योतक आहे ? ... सिनेमांचे दोनतीन मिनिटांचे ट्रेलर्स हे पूर्वी होते आणि आजही आहेतच (आज त्याला बहुदा टिझर असं नाव आहे, असं वाटतंयकदाचित प्रोमो सुद्धा असेल बुवा ... सत्यदेव काय नि सत्यनारायण काय) ... पण आज ऑडियॊव्हिडियोमध्ये फक्त तीसचाळीस सेकंद्स चालणारी रील्स (?) लोकप्रिय होतायत, असं दिसतंय ... होतायत कसली लोकप्रिय झालीच आहेत ... त्यांना लक्षावधी व्ह्यूज मिळतायत म्हणे ...

 

ज्यांना आपल्या कलेचं हे असं बोन्साय करता येत नाही, ते कलाकार काळाच्या रेसमध्ये मागे पडतायत की काय; असं वाटतंय ... तासतास पिसलेला दरबारी नाहीतर मियामल्हार ऐकून तृप्ती अनुभवलेला आणि त्या आठवणींनी आजही भावुक होणारा मी ... आणि आता ? ... शेवटी कालाय तस्मै नमः ... दुसरं काय ? …  

 

अर्थात मला प्रॉब्लेम कसलाच नाहीये ... फक्त एक अनामिक भीती अलीकडे अलीकडे वाटायला लागलीय ...

 

'आपल्याला स्वतःला आज वटवृक्षाच्या आधारासारखी वाटणारी आपलीच आभाळाएवढी मोठी माणसं; कालांतराने कदाचित बोन्सायसारखी वाटायला लागतील की काय !,' ...

 

 

@प्रसन्न सोमण. / २५-०७-२०२२.                              

Monday, 25 July 2022

--- हाय रे कंबख्त ---

--- हाय रे कंबख्त ---

 

घरात पाव, जॅम, वगैरे होतंच ... चालता चालता सहज स्लाइस चीज सुद्धा घ्यावं, असा विचार मनात आला ... डोक्यात लताची मधाळ गजल 'अगर मुझसे मुहब्बत हैवाजत होती ... विचारांच्या तंद्रीतच मी दुकानात शिरलो आणि स्लाइस चीज मागितलं ...

"पांचवाला या दसवाला ?" ... दुकानदारानी विचारलं

"पांचवाला बस्स होगा" ... नकळत मी उत्तरलो.

दुकानदारानी दिलेलं पाकीट पिशवीत टाकलं आणि खिशातलं पाचचं नाणं काउंटरवर ठेवलं ...

क्षणभर दुकानदारानी ऑ वासल्यासारखी जबड्याची हालचाल केली ... आणि मग म्हणाला ... "चाचा, पांचवाला मतलब उसमे पांच चीज स्लाइस होते है ... इसका किंमत पचाहत्तर रुपया है" ... (मला फक्त दुकानदार त्या फेव्हिक्विकला 'पांचवाला' म्हणतात आणि ते खरोखर पाच रुपयाचंच असतं; हे जाहिरातींमुळे माहिती होतं) ...

भानावर येऊन मी योग्य पैसे देऊन बाहेर पडलो आणि मग पुन्हा विचारात पडलो की पांचचं नाणं काउंटरवर ठेवून मी माझं अज्ञान दाखवलं की विनोदबुद्धी ? ... नाईलाजानी डोक्यातली गजल अकाली बंद पडली ...

ही व्यवहारी दुनिया; हाय रे कंबख्त ...

 

@प्रसन्न सोमण. २५/०७/२०२२.