--- पाल्या द वात्रटेस्ट फेलो ---
मॅट्रिकपर्यंतचं आयुष्य मस्त बेबंदपणे कृष्णाकाठच्या सांगलीत घालवलेला पाळंदे उर्फ पाल्या कुठल्या पूर्वसुकृतामुळे मुंबई म्युन्सिपाल्टीच्या बांद्रा ऑफिसमध्ये क्लार्क म्हणून चिकटला असावा ? ... कोणास ठाऊक ? ... बहुदा पाल्या, मी आणि वाकनीस अशा आमच्या त्रिकुटानं, एकमेकांचे जानी दोस्त म्हणून, पुढचा काही काळ धमाल मजेत घालवावा, याच दैवयोगामुळे असणार ! ... तसंही त्या १९८५-८६ या काळी आमचं ऑफिस तसं एकदम मोकळं ढाकळं होतं. वेस्टर्न सबर्ब्सचं हेड ऑफिस असणाऱ्या आमच्या या ऑफिसात तसे इतरही साताठ जण जेन्टस होते; पण आम्ही तिघं ऐन पंचविशीच्या आगेमागे असलेले होतो ... बाकी तसं सारं स्त्रीराज्यच होतं; पण त्या सगळ्या आमच्या 'ताया' होत्या आणि आम्ही ऑफिसभर साऱ्यांचे लाडके होतो ... अर्थात ऑफिसच्या कामात नक्कीच आम्ही चोख होतो, हे मीच कसं म्हणावं; पण साहेब लोकांच्या सुद्धा आम्ही विश्वासातले होतो, हे अगदी खरं.
आम्हा त्रिकुटापैकी मी आणि वाकनीस पक्के मुंबईकर होतो त्यामुळे दोस्तीतही जरासे शहरी, जरासा आपपरभाव मानणारे, असे होतो; पण पाल्यामध्ये मात्र - अस्सल कृष्णाकाठच्या मातीतला असल्यामुळे की काय कोण जाणे, पण - एक लोभसवाणा निःसंग निर्लज्जपणा ठासून भरलेला होता ... शिवाय त्याच्या बोलण्याचं टायमिंगही एखाद्या कसलेल्या अभिनेत्यासारखं झक्कास असायचं ... त्यातही त्याच्या बोलण्यातला टोन असा काही असायचा की ते बोलणं वरकरणी गंभीर वाटावं; पण तेच बोलणं अंतर्यामी मात्र हमखास समोरच्याची टोपी उडवणारं असायचं.
क्लार्क म्हणून पाल्या ऑफिसात नवीन नवीन आला होता त्याच दरम्यानचा किस्सा असावा ... शनिवारी अर्धा दिवस असल्यामुळे सकाळी आठ ते साडेअकरा अशी ऑफिसची वेळ असे, तेव्हाची गोष्ट ... शनिवार असल्यामुळे असेल कदाचित, पण त्या दिवशी पाल्या नेव्ही ब्लु किंवा ब्लॅकीश कलरचा जरा डिझाईनवाला टीशर्ट घालून ऑफिसात आलेला होता ... आमच्या ओ.एस.म्हणजे ऑफिस सुप्रीटेंडेन्ट साहेबांनी केबिनच्या काचेतून पाल्याकडे पाहून त्याला आत बोलावलं. चष्म्यातून पाल्याकडे
आरपार पाहत ते म्हणाले
...
"मिस्टर पाळंदे, हे ऑफिस आहे; तुमच्या घराजवळचा नाका नव्हे ... हे असले चिवटे बावटे टीशर्ट घालून ऑफिसात आलेलं चालणार नाही."
साहेबांचं दुर्दैव असं की त्याच वेळेस नेमकी केबिनच्या काचेसमोर आमची एक सहकारी सिंधी बाई काळ्या निळ्या रंगाचा स्लिव्हलेस टॉप घालून आलेली पाल्यानी
पाहिली ... ताड्कन पाल्या म्हणाला, "साहेब, ही पार्शलिटी आहे हं ! मी चांगला व्यवस्थित हात असलेला टीशर्ट घातलाय तरी तुम्ही मला बोलताय, मग त्या दंड आणि काखा उघड्या टाकून आलेल्या बाईला सुद्धा हेच सांगा ना ! ... बोलावू तिला आत ?" ...
बिचाऱ्या साहेबांनी पुढे एकही अक्षर न बोलता पाल्याला केबिनबाहेर पाठवलं.
मध्येच कधीतरी आम्हाला आमच्या टेबलच्या काही कामासाठी शेजारच्या अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये जायला लागायचं ... तसा एक दिवस सकाळी पंधरावीस मिनिटं मी जाऊन आलो होतो ... दुपारी दीडला अर्थातच तिघंही जवळच्याच कॅंटीनमध्ये जाऊन एकत्र जेवायचो ... त्यादिवशी पाहतो तर एका डब्यातली भाजी बरोबर होती पण पोळीच्या डब्यात तीन ऐवजी दोनच पोळ्या दिसल्या ... 'अरे, आईनी एक पोळी चुकून कमी भरली की काय ?' असा विचार डोक्यात येतोय तेवढ्यात गंभीरपणे पाल्यानी विचारलं, "काय रे सोमण्या, डब्यात एक पोळी कमी आहे का रे ?"
मी चमकलो. मी काही बोलायच्या आधी आणि डब्यातल्या पोळ्या बाहेर काढण्याआधी याला कसं कळलं ?
तरी यांत्रिकपणे बोलून गेलो, "हो रे, आईनी चुकून एक पोळी कमी भरली वाटतं."
"छ्या ! तुझ्या आईची काही चूक नाही ... मीच तुझ्या डब्यातली एक पोळी सकाळच्या चहाबरोबर खाल्ली. अरे, सकाळी जाम भूक लागली होती."
नकळत माझ्या चेहऱ्यावर संताप दिसला असावा ...
"अरे पण तू तुझ्या डब्यातली खायची ना !"
"अरे पण माझ्या घरच्या पोळीपेक्षा तुझ्या आईच्या हातच्या पोळ्या जरा जास्त मऊसूत असतात ना, म्हणून तुझ्या डब्यातून घेऊन खाल्ली ... तू तेव्हा अकाउंट्स ऑफिसला गेला होतास."
"अरे पण आता मला कमी पडेल ना गाढवा."
"जाऊदे, मरूदे ! ... अरे चार घास कमीच खावेत; नाहीतर वजन वाढतं ... तुला काय ? ... तुझं वजन वाढू दिलं तर तुझी होणारी बायको उद्या माझ्या नावानी खडे फोडेल."
मधूनच कधीतरी आमचे काही सिनियर असलेले आणि आता आऊटडोअरला असलेले मित्र यायचे आणि आग्रहाने प्रेमापोटी आम्हाला एडीज मध्ये पावभाजीची ट्रीट द्यायचे ... एडीज हे आमच्या बांद्र्याला बऱ्यापैकी लोकप्रिय असलेलं फास्ट फूड हॉटेल ... तिथली पावभाजी आणि केसर लस्सी छान असायची ... विशेषतः पाव खूप छान लुसलुशीत असायचे ... एकदा दुपारचं लंच झाल्यावर चारच्या सुमारास असाच एक आउटडोअरवाला दोस्त आला आणि एडीजची पावभाजी, विशेषतः पाव जास्त खाण्याबद्दल विषय निघाला ... बोलता बोलता त्या दोस्तानी आम्हा तिघांना आव्हान फेकलं, "मी
आत्ता पार्टी देतो: पण पाव जास्तीत जास्त किती खाता बघुया" ... पाल्या पटकन म्हणाला, "त्यातल्या भाजीनी पोट फार भरतं रे ! मग पाव जास्त कितीसे खाणार ?"
मग पार्टी दात्या दोस्तानी अट ठरवली की, "भाजी कमीत कमी एक तरी खायची, पण मोजून पैज लावायची ती फक्त पावांच्या संख्येची. माझ्या मते तुमच्यापैकी
कोणीही खवैय्या असला तरी फार फार तर पंधरा पाव खाऊ शकेल ... त्यामुळे त्यापेक्षा जास्त
खाईल त्याला शंभर रुपये"
... मी आणि वाकनीस लगेचच पांढरं निशाण दाखवून आव्हानातून बाद झालो; पण पाल्यानी मात्र त्या दोस्ताला डिवचलं, "बघ हं ! ... पस्तावशील."
"मुळीच नाही ... आत्ता साडेपाचला ऑफिस सुटल्यानंतर चलो एडीज !" …
मग काय ! ... आम्ही बघतोय ... पाल्या गिळतोय ... बघता बघता त्या राक्षसानी दीड भाजी आणि मोजून अठरा पाव फस्त केले आणि मग मात्र दमून थांबला ...
त्यावेळेस आम्हाला पगार ते काय असणार ? अर्थात आम्ही आमचे खर्च सुद्धा शक्य तितके कमीच ठेवायचो ... त्यामुळे माझ्या रोजच्या पाकिटात रेल्वे पासाबरोबर अगदी मोजकेच पैसे असायचे ... तरी अगदीच अडीनडीला काही इमर्जन्सी आली तर असावेत म्हणून माझ्या बॅगेच्या चोर कप्प्यात एक शंभराची नोट घडी करून कायमची ठेवलेली असे आणि त्याबाबत माझ्याकडून तरी पूर्ण गुप्तता होती ... कारण एकदा त्या नोटेबाबत समजलं तर दोस्त कंपनी कुठलं निमित्त करून ती खर्च करायच्या मागे लागेल, हे काही सांगता येण्याजोगं नव्हतं … माझ्यासाठी तरी तेव्हा ते शंभर रुपये मोठ्या इस्टेटीसारखे होते ...
त्या दिवशी संध्याकाळी, का कोण जाणे पण, पाल्या एकदम खुशीत दिसत होता ... अचानक ऑफिस सुटता सुटता आम्हा दोघांना म्हणाला, "आज संध्याकाळी तुम्हाला माझ्याकडून पार्टी म्हणून एडीज मधली केसर लस्सी !"
मी त्याला म्हटलं, "का रे आज काही विशेष ? ... तू पोरगी बिरगी पटवलीस की काय लेका ?"
"कारण तुला काय करायचंय ? … पार्टी हवीय की नकोय ?"
आम्हाला काय ? आम्ही गेलो ... त्यावेळची केसर लस्सी विशेष गोड लागली खरी !
पंचाहत्तर रुपये बिल आल्यावर पाल्यानी काऊंटरवर शंभरची नोट दिली ... त्या नोटेची घडी पाहिली तेव्हाच माझ्या मनात पाल चुकचुकली; तेवढ्यात परत आलेले पंचवीस रुपये माझ्या हातात सरकवत तो स्मित करत म्हणाला, "हे घे तुझे उरलेले पंचवीस रुपये."
"साल्या तू माझ्याच बॅगेतली नोट चोरलीस ना ?"
"चोरली कसली अरे ! ... हे काय उघड उघड तुलाच सांगतोय आणि उरलेले पैसेही तुलाच परत देतोय ना ! ... आजची केसर लस्सीची पार्टी तुझ्याकडून ... असा संतापून बघू नकोस ... तुझे आमच्यासाठी फक्त पन्नासच रुपये गेलेत ... पंचवीस रुपयाची केसर लस्सी तर तूच प्यायलास ना !" ... पाल्याचं कॅल्क्युलेशन त्याच्या हिशोबानी चोख होतं ...
कितीही संतापलो तरी कृष्णाकाठच्या या गुटगुटीत पेहेलवानाला मी डब्लू डब्लू एफ प्रमाणे उचलून आपटू शकणार होतो थोडाच ? ... पण आजच्यासारखी जर त्याही वेळेला माझ्या तोंडात कवळी असती तर, संतापाच्या अतिरेकानी दातओठ खाताखाता माझ्या तोंडातली कवळी नक्कीच खाली पडली असती.
असाच एकदा पाल्या त्याच्या लहानपणीचे किस्से सांगण्याच्या मूडमध्ये होता तेव्हा त्यानं कृष्णेत पोहोण्याचे किस्से सांगितले. हा विषय निघाला त्यावेळी वाकनीस म्हणाला, "ही एक इच्छा मनात राहिलीय रे ! ... माणसाला पोहोता आलं पाहिजे, पण मला अजिबात येत नाही ... खरंतर माझ्या घराजवळच माझ्या ओळखीच्या एका ट्रस्टची मस्त मोठ्ठी विहीर आहे; पण तरीही कधी कोणी शिकवणारा भेटला नाही आणि त्यामुळे शिकता आलंच नाही ... पट्टीचा पोहोणारा नाही झालो तरी, निदान पाण्यावर तरंगता तरी यायला पाहिजे यार" ...
क्षणांत पाल्या म्हणाला, "तुला तरंगायचंच आहे ना ? हात्तिच्या ... मी शिकवतो, अगदीच सोप्पं आहे ... एक काम कर ... माझ्या शिकवणीचे शंभर रुपये आत्ता मला दे आणि संध्याकाळी घरी गेलास की अर्धी चड्डी घालून बिनधास्त विहिरीत उडी ठोक ... उद्यापर्यंत वर येऊन तरंगायला लागशील ... आहे काय त्यात !"
पाल्याच्या बोलण्याचा अर्थ डोक्यात शिरायला वाकनीसला काही क्षण लागले ... मग मात्र खवळून तो म्हणाला, "साल्या, यु आर द खवचटेस्ट फेलो इन द वर्ल्ड ... माझ्या जीवावर उठतोस काय रे भाड्या !"
पाल्याचे काही, इथे लिहून सांगण्यासारखे, किस्से मी सांगितलेत खरे; पण त्या वेळची आमची वयं लक्षात घेता त्याचे, आणि खरंतर तिघांचेही, न लिहिण्याजोगे नॉनव्हेज किस्से आहेतच ... पण त्यातही पाल्याची फटकन शब्दयोजना करतांना विशेष क्रिएटिव्ह डोकॅलिटी दिसायचीच ... कुजबुजणं वगैरे नाजूक
प्रकार त्याच्यासाठी अस्तित्वातच नसल्यामुळे त्याची ती उघडपणे वापरलेली विशेष शब्दयोजना
एकतर आमच्या सहकारी तायांना उमगत तरी नसावी किंवा, हा आमचा दोष नसून आमच्या वयाचा दोष आहे, असं मानून त्या दुर्लक्ष तरी करत असाव्यात ...
दरम्यान एकदा, एरव्ही बिनधास्त आणि मोकळ्या ढाकळ्या असणाऱ्या मनस्वी पाल्याचं एका दुर्दैवी प्रसंगात ढासळलेलं घायाळ रूपही दिसलं ... एक दिवस ऑफिस सुरु झाल्या झाल्या सकाळी आमचा एक सिनियर शिपाई छातीत दुखतंय म्हणून तक्रार करू लागला ... नेमके जरा जाणते असलेले साहेब आउटडोअरला बाहेर गेलेले असल्यामुळे त्यांना इतर शिपायांच्या मदतीने खुर्चीत बसवून आम्ही तिघांनी तळालाच असलेल्या भाभा हॉस्पिटलमध्ये नेलं ... नर्स त्यांना कडेच्या खिडकीशेजारच्या कॉटवर झोपवून आणि आम्हाला बाहेर थांबायला सांगून डॉक्टरना बोलवायला धावली ... खोलीत कॉटवर वेदना होत असलेले शिपाई दादा आणि बाजूला उभ्या दुसऱ्या एक नर्स बाई ... गॅंगवेच्या खिडकीतून आम्ही पाहत होतो एवढ्यात डॉक्टर खोलीत येता येता, कॉटवर जीवाची जोरदार तडफड होऊन शिपाई दादांनी प्राण सोडला ... अगदी डोळ्यांसमोर तडफडून जीव जातांना पाहून आम्ही सुन्न तर झालोच; पण पाल्या अक्षरशः हमसून हमसून रडायला लागला ... पंधरावीस मिनिटांत साहेबांनी बाहेरून येऊन सूत्र हातात घेतली तेव्हा त्या दरम्यान पाल्याचं रडणं मोठ्या मुश्किलीनी थांबलं ... नंतरही तीनचार दिवस तो त्याच उदास मनःस्थितीत होता. असो ... ईश्वरेच्छा बलियसी; दुसरं काय ... तीनचार दिवसांनंतर नॉर्मलला येऊन नेहमीचा पाल्या आम्हाला दिसायला लागला.
पाल्याप्रमाणेच, सदा हसतमुख
आणि रंगील्या असणाऱ्या वाकनीस
सरकारांचे सुद्धा अनेक किस्से आहेतच; पण ते तंत्रच जरा निराळं आहे ... त्याचे किस्से, हे लिहून-वाचून समजण्याजोगे नाहीत तर त्यासाठी, 'जामके साथ सुनेहरी रंगीन शाम' असायला हवी आणि हरएक जाम बरोबर चढत जाणारे किस्से त्याच्या स्वतःच्याच तोंडून साभिनय ऐकायला हवेत; तर तो मस्त व्हिडियो
अनुभव होईल. ... उतनी ताकद मेरी मायूस कलममें कहाँ ? ... एवढंच कशाला ? ... मी स्वतःकडे त्रयस्थाच्या नजरेतून पाहू शकत नसल्यामुळे त्यांच्यापाशी माझेही अनेक किस्से असणारच आहेत; पण ते बापडे लिहीत वगैरे नाहीत; नुसतंच बेबंदपणे जगतात ... आज पाल्याचे किस्से, प्रसंग लिहितांना मला मात्र; 'बटाट्याच्या चाळीतला' - प्रसंगांना पाचपाच रुपये आणि पात्रांना दहादहा रुपये रेट घेऊन, त्या त्या गोष्टी ‘स्वतःच्या वाङ्मयात अजरामर' करून टाकण्याचा संकल्प सोडणारा आणि तशी जाहिरात करणारा धमाल ‘स्वयंघोषित साहित्यिक’ पोंबुर्पेकर आठवतोय ...
क्लार्क म्हणून आमची एकाच ऑफिसमधली सहासात वर्ष संपल्यावर अर्थातच आम्ही बढत्या-बदल्यांनुसार वेगवेगळ्या ठिकाणी पांगलो; पण तरीही आम्ही, नैमित्तिक का असेना पण, भेटत गेलो ... दोनतीन ठिकाणी ट्रिप्स सुद्धा काढल्या ...
शेवटी वाटेत लागणाऱ्या घाटांमधून प्रत्येकाला आपापल्या आयुष्याची गाडी स्वतःच ड्राईव्ह करावी लागते; ती आम्हीही केलीच आहे ... आज साठीच्या उंबरठ्यावर आमचा तसा मोजकाच, ख्यालीखुशाली जाणून घेण्याइतपत, जरूर संपर्क आहे; पण त्या फोनवर आम्ही तसे फार रमत नाही, कारण तिघांनाही एकच वाटतं की … 'जो मज़ा मिलनमे है, वो कम्बख्त बेजान फोनमें कहाँ।' ...
अनेक कौटुम्बिक अडीअडचणींतून ईश्वरकृपेने सुखरूपपणे बाहेर येऊन, आजही आम्ही दिलों जानसे म्हणतो आहोतच ... 'ये दोस्ती हम नही तोडेंगे."
@प्रसन्न सोमण.
२९/०९/२०२१.
No comments:
Post a Comment