Thursday, 23 December 2021

--- मराठी ती मराठीच ---

  

--- मराठी ती मराठीच ---

 

 

माझा एक मित्र. अगदी मुंबईकर मराठीच; पण तो जेव्हा प्रथम भेटला तेव्हापासूनच्या त्याच्याबरोबरच्या संवादात एक वेगळी - म्हणजे माझ्यापेक्षा वेगळी - गोष्ट प्रकर्षानं मला जाणवली ... ती म्हणजे एखाद्या प्रश्नाला 'हो' असं उत्तर देत असतांना तो साधं तोंडानी 'हो' असं कधीच म्हणत नसे, तर अगदी कटाक्षाने प्रत्येकवेळेस तो तोंडानी 'होय' असं; म्हणजे 'हो' च्या पुढे '' लावूनच हो म्हणत असे ... शिवाय ते 'होय' म्हणतांना एकदा होकारार्थी मान हलवलीच पाहिजे, असाही त्याचा दंडक होता ... म्हणजे तो '' लावता चुकून नुसतं 'हो' म्हणाला, किंवा होकारार्थी मान नाही हलली; तर मला ते 'नाही' असं वाटणार; अशी जणू त्याची खात्रीच होती ... बरं, मित्र ऑफिसमधला होता त्यामुळे ऑफिसात रोज तो भेटतच होता ... त्या प्रभावामुळे की काय कोण जाणे, पण त्याच्या रोजच्या संपर्कात असेस्तोवर माझ्याच नकळत मीही तसंच '' लावूनच 'हो' म्हणायला लागलो होतो ... मात्र माझी मान मी होकारार्थी वगैरे अजिबात हलवली नाही ... कारणं दोन ... एक म्हणजे पहिल्यापासूनच माझा हालचाली किंवा खाणाखुणांपेक्षा लिहिल्या किंवा बोलल्या जाणऱ्या शब्दांवर ठाम विश्वास होता आणि आहे; आणि दुसरं कारण म्हणजे कंटाळा ... विनाकारण मानेची आणि एकूण शरीराची सुद्धा हालचाल कोण करत बसतो हो !

 

 

आत्ता एकदम कुठून अचानक हा 'हो' आणि 'होय' चा किस्सा आठवला बघा ! ... हा असा स्वतःपेक्षा वेगळेपणा, अगणित ठिकाणी अस्तित्वात असणारच, फक्त त्याची मेंदूत नोंद होतेच असं नाही ... मुद्दा एकाच मराठी भाषेबद्दल; पण रूपं, लकबी, टोन किंवा ऍक्सेंट केवढे वेगवेगळे असू शकतात ! मुद्राभिनय, ऍक्शन्स वगैरे सगळं बाजूला ठेवलं तरी फक्त श्राव्य (ऑडीयो) अनुभवात किती विविधता !

 

 

आता खरंतर मुंबईत ब्राह्मणी वस्तीत मोठ्या झालेल्या मुलाला साधारणतः एकाच प्रकारची भाषा ऐकायला मिळणार ना; पण नाही ... आमच्या शेजाऱ्यांच्यात एक कारवारी, कोकणी कुटुंबंही होतं त्यामुळे मधून मधून "हाव वोत्ता," "चा घिऊन वच गो," "हांगा यो;" (चूकभूल द्यावी घ्यावी) अशांसारखे काही संवाद तुरळकपणे कानांवर पडायचे, पण त्यांचा अर्थातच आमच्या कुणाशी संवाद होतांना व्यवस्थित मराठीत असे ... जरा नंतर मराठी मीडियमच्या शाळेतही बहुसंख्य ब्राह्मणी किंवा किमान शहरी मराठीत बोलणारीच दोस्त कंपनी होती ...

 

 

शाळा संपता संपता आवड उत्पन्न झाली ती वाचनाची ... यासाठी विरोध तर नव्हताच पण बऱ्यापैकी प्रोत्साहन होतं ... शिवाय उत्कृष्ट लायब्ररी जवळच होती ... त्यावेळी माझ्या लेखी मोठे असलेले जवळपास सगळेच लेखक लिहिते होते ... पु.., .पु., शन्ना, श्री.ना., वगैरे वाचता वाचता, मला 'लेकुरे उदंड झाली,' हे नाटक दाखवलं गेलं; त्यामुळे नाटकांच्या पुस्तकांकडेही मोर्चा वळला ... कानेटकरांच्या नाटकांत "तेवढं बरिक मला सांगू नकोस," वगैरे संवाद वाचतांना 'बरिक' हा अजिबातच अपरिचित शब्द सापडला; गो.नि.दां.च्या पुस्तकात 'ओरडणं' ऐवजी 'आरडणं' हे क्रियापद सापडलं; .मां.च्या लिखाणात 'गाबड्या,' 'निव्वळ हेन्द्रट,' 'चाबऱ्या तोंडाचा,' 'साडंशिटलीचा,' असले दूरदूर तक सुद्धा परिचयाचे नसलेले शब्द सापडले ... वाचतांना असल्या कितीतरी शब्दांच्या, संवादांच्या सुरकुत्या मनावर पडत होत्या ... पण का कोण जाणे, काही अत्यंत गाजत असलेली पुस्तकं असूनही त्यांच्या वाटेला जावं असं मला वाटलं नाही; उदाहरणार्थ दया पवार लिखित पुस्तक 'बलुतं;' पण असाच काहीही संबंध नसतांना जयवंत दळवी लिखित 'चक्र' ही कादंबरी मात्र वाचली गेली ... का, ते सांगता येणार नाही ...

 

 

.मा.मिरासदारांच्या बाबतीत एक सांगण्यासारखी गम्मत घडलीय ... पु.लं.चं भाषाप्रभू राम गणेश गडकऱ्यांबद्दलचं लिखाण वाचून, 'बघूया तर खरं' असा विचार करत मी 'भावबंधन' नाटकाचं पुस्तक घरी आणलं ... एकीकडे घनःश्याम, धुंडिराज, प्रभाकर, लतिका, इंदू-बिंदू, या पात्रांचे संवाद रोचक आणि गंमतीदार वाटत असतांना दुसरीकडे भृधनुर्भन्ग, भृकुटी, काकदृष्टी, अशांसारखे जागोजाग पेरणी केले गेलेले ते शब्द, ती लांबलचक वाक्यरचना आणि ते भाषाप्रभूंचं भाषा सौंदर्य समजून घेत घेत, पचवायचा प्रयत्न करतांना भारी दमछाक होत होती ... आणि हे पुस्तक परत केल्यानंतर माझ्या हाती कोणतं पुस्तक लागलं असेल ? ... ते होतं .मां.चं 'मिरासदारी' ... दोन्ही पुस्तकं वाचून पूर्ण केल्यानंतर मी मनोमन हात जोडले ते; हे भन्नाट कॉम्बिनेशन जमवून आणणाऱ्या परमेश्वरी योजनेला ...

 

 

प्रत्यक्षात अनुभवताना भाषेतला जाणवण्याजोगा वेगळेपणा अनुभवायला मिळाला तो मुंबई महापालिकेत नोकरीला लागल्यावरच ! ... महापालिकेतही भाषा मराठीच होती पण ती मात्र बऱ्यापैकी अठरापगड होती ... महापालिकेत मराठीच बोलणाऱ्या माझ्या दोस्त कंपनीमध्ये कानडी दोस्त होता, मियाभाई होता, वसईकर ख्रिश्चन होता, अस्सल घाटी पद्धतीनेच बोलणारा घाटावरचा होता, यु.पी.वाला भय्या होता, अस्सल मालवणी टोनमध्ये, आणि मध्येच मालवणी शब्दही आणत, मराठी बोलणारा मुणगे मुक्कामचा सिंधुदुर्गीय सुद्धा होता ... त्यामानाने अहिराणी, खानदेशीय, नागपुरीय, वऱ्हाडी, वगैरे भाषेच्या ढंगाचा मात्र फारच कमी संबंध आला ...

 

 

आमच्या महापालिकेच्या अंतर्गत स्पर्धेत 'अथ मानूस जगन हं,' नावाचं नाटक, नावामुळेच; सहकाऱ्यांच्या बरोबर म्हणून सुद्धा, (आणि हाफ डे सुट्टी मिळणार असून सुद्धा) बघायला जावंसं वाटलं नाही ... मात्र एका खूप इन्डायरेक्ट परिचयामध्ये आणि तेही थोडाफार फोर्सच झाला म्हणून, 'योनीच्या मनीच्या गुजगोष्टी' या माझ्यालेखी तरी महाभयंकर नावाच्या नाटकाला हजर राहण्याचा महादुर्धर प्रसंग माझ्यावर एकदा ओढवलेला आहे ... असतं कधीकधी दैव खूप खडतर ...

 

 

बरेचंच नंतरचे, म्हणजे अगदी आत्ताआत्ताचे, सिंधुदुर्ग भागातले काही सांगण्यासारखे अनुभव आहेत ... अगदी अलीकडे रिटायर होताहोता आमच्या वडिलार्जित सिंधुदुर्ग भागातल्या ओसाड जमिनीवर हौसेनं मी व थोरल्या भावानी मिळून घर बांधलं; त्यामुळे तिथे वारंवार फेऱ्या व वास्तव्य व्हायला लागलं ... खरंतर मालवणी बोलीशी आमचा त्यापूर्वी जवळजवळ संबंध नव्हताच ... आमचं थोडंफार वाचीव मालवणी ज्ञान जेमतेम 'वस्त्रहरण' नाटकाचा टेकू घेऊन डगमगत उभं होतं, एवढंच ... त्या नाटकात मच्छिन्द्र कांबळींनी एक म्हण वापरली होती - "ह्या म्हंजे असा झाला की, आगासली ती मागासली आणि पाठसून इली ती गुरवार रवली" ... ही म्हण पूर्णतः डोक्यावरून शेकडो फुटांवरून गेली होती ... पुढे नाटकवेड्या मोठ्या भावानी सोसायटीकरता हे नाटक बसवायचं ठरवल्यावर शोध घेतला, तेव्हा अर्थ कळला - शब्दशः अर्थ, ‘मोठीच्या पोटी मुलबाळ नाही, पण धाकटी मात्र गर्भार राहिली’ ... थोडक्यात 'कानामागून आली नि तिखट झाली,' या म्हणीचा मालवणी बोली अवतार ...              

 

 

वर मी 'हो' किंवा 'होय'चा किस्सा सांगितलाय; पण आमच्या सिंधुदुर्गात 'हो' किंवा 'होय'चं नाणं अजिबात चालतच नाही ... तिथे 'होय तर !' म्हटल्याशिवाय बिलकुल भागत नाही ... हा 'होय तर !'चा टिपिकल ऍक्सेंट त्या कोकण्यांनाच जमतो ... मालवणी बोलणं ऐकतांना अगदी हैराण होण्याचा एक बेहेतरीन अनुभव माझ्याच बाबतीत घडलाय; तो सांगावा तर माझाच भोटमपणा जाहीर होईल, पण तरीही सांगतोच झालं ...

 

 

गावात घर बांधून भावानी आणि मी फुलबाग, फळबाग थोडीफार सजवली व घराच्या कंपाउंड जवळ - लोकल भाषेत गडग्याजवळ - लायनीनं माड लावून घेतले; त्यानंतर काही काळातली गोष्ट ... मी गडग्याजवळ उभा होतो व झाडामाडांची (उगाचच) पाहणी करत होतो; जणू त्यांच्या वाढीबद्दलचं पूर्ण ज्ञान माझ्यापाशी असल्यासारखी ... तेवढ्यात थोड्या अंतरावरच्या सावंतवाडीतला (सावंतवाडी नावाची एक छोटी वाडी; प्रसिद्ध सावंतवाडी नव्हे) कोणीएक मध्यमवयीन थोडंसं लांबून माझ्याशी बोलायला लागला -

"काकानु मुम्बैतसून कवा इलात ?"

"कालच आलो; तीन दिवस मुक्काम आहे." 

"ह्या तुमी आता छान केलात ... झाडामाडा लावली, परडं सजवलं हत, आता येत ऱ्हावा."

"हो हो, नक्कीच" ...

"तुमका शेळी आवडतंत की न्हय ?"

खरंतर या प्रश्नाचा अर्थ मला बिलकुलच कळला नव्हता ... खाण्याबद्दल असेल असं वाटलं, पण नॉनव्हेज मध्ये कोणकोण कायकाय खातात; मला काहीच माहित नव्हतं, तरीही उगाच आपलं अनमान धपक्यानं मी बिन्धास उत्तर दिलं,

"नाही, खाऊन बघितली नाही मी कधी; पण चिकन, मटण मात्र मला चालतं आणि आवडतंही."

तो माणूस थोडं हसून म्हणाला,

"अहो ते खयसून काढलात ... शेळी आवडतंत का, ह्या विचारतोय ... पियायला ... ह्ये एवडे माड लावले हत ना तुमी !"

आत्ता कुठे प्रकाश पडला ...

"हां हां, शहाळी !"

"तेंका आमी शेळीच म्हणतंव" ... 

"हो ... आवडतात तर ! ... बरंय, भेटूच." (कशाला ? … अजून बुचकळ्यात पडायला ?)

भाषा समजतांना कितपत वांदे होणार आहेत, हे लक्षात आल्याक्षणी तडकाफडकी मी ही ग्रेट भेट बंदच करून टाकली ... थोडक्यात काय; तर 'ती झाडांची पाना उरबाडता ती सिंगल शेळी न्हय; त्याचा म्हणणा होता की माडांका लागतंत ती शेळी,' हा गृहपाठ आता माझा पक्का झालाय ... पूर्वी मुंबईमध्ये कोणी काही गावंढळपणा केला की, "काय रे, अलिबागवरून आलायस की काय ?", असं विचारण्याची पद्धत फार लोकप्रिय होती ... आता या किश्श्यानंतर आमच्या गावच्या भागात "मुम्बैतसून कवा इलात ?" असं विचारण्याची पद्धत पडली नसेल, अशी मी आशा बाळगून आहे ...

 

 

ह्या किश्श्याला आता आठनऊ तरी वर्ष झाली ... तरीही ‘चिकन मटण मात्र मला आवडतं,’ असं बेधडक उत्तर देतांना माझा चेहरा नक्की कसा दिसला असेल, याचा उगीचच अंदाज बांधून मी आजही बुचकळ्यात पडतोच ... शेळी म्हणजे शहाळी, हे मला कळलं नाही तेव्हा; वाचन वगैरे फुकट असल्याचा एवढा न्यूनगंड मला आला की ज्याचं नाव ते ...

 

 

पण आता हा परिसर आणि ही माणसं बऱ्यापैकी जिव्हाळ्याची झालीयत ...

 

 

गावात वाघ दिसण्याचा विषय निघाला होता तेव्हा "वाघाक काय भियाचं ? वाघ हे एक नंबरचं भित्रं जनावर," ही अद्भुत माहिती मला इथल्याच एका माणसानं, इतक्या प्लेन चेहऱ्यानं सांगितली होती की त्याचं पुढचं वाक्य, "वाघाक धरून कोन नांगराक जुपत न्हय, म्हणून त्याची ही गावातलो कोम्बो, कुत्रो उचलून न्यायची टुरटुर चालता" असंच काहीसं असेल याची मी वाट बघत थांबलो होतो ... पण नशीब तसं काही तो बोलला नाही ... उगाच त्या जिम कार्बेटच्या रसभरीत शिकार कथा भान हरपून वाचल्या ...

 

 

एवढंच काय पण, मळकट आणि भोकं असलेला पंचा कसातरी नेसलेल्या इथल्या नेहमीच्या गिऱ्हाईक म्हाताऱ्याला खाणावळवल्यानं; "आजोबा मिसळीचा रेट वाढला आता," असं सांगितल्यावर तो म्हातारा ठणकावून बोलता झाला - "हे माझे पाच रुपये; ह्यात जेवढी मिसळ बसेल तेवढीच मला द्यायची," … हा डोळ्यांसमोर बघितलेला किस्सा इथलाच.

 

 

मात्र हळूहळू पण निश्चितपणे इथली आणि एकूण सुद्धा मराठी भाषा बदलत्येय, असं कुठेतरी जाणवतंय खरं ! ... बहुदा मालिकांचा प्रभाव, हिंदीचंही थोडंथोडं अनुकरण, २४ तास उपलब्ध असणारा टीव्ही, या गोष्टी तर झाल्याच पण इंटरनेट आणि ओटीटीची लोकप्रियता यामुळेही असेल, पण लक्षात येण्याजोगे बदल दिसतात ...

 

 

मला किंवा एखाद्याला मदत न करता माझी किंवा एखाद्याची मदत करणे, हे तर आता खूपच कॉमन झालेलं दिसतंच आहे ... एकट्यानेच काहीतरी करतोय हे सूचित करतांना तुझातुझा किंवा माझीमाझी असं दोनदा म्हटलं की झालं काम ... करूया, जाऊया, बसुया, यासारख्या प्रत्येक क्रियापदाला पुढे 'त' हे अक्षर कशासाठी चिकटवलं गेलंय कोण जाणे, पण तेही रुजलंय ... 'केलं गेलेलं' किंवा 'सांगितलं गेलेलं' ऐवजी 'केल्या गेलेलं' किंवा 'सांगितल्या गेलेलं' सुद्धा बऱ्यापैकी रूढ झालंय ... प्रसंगी मिळण्याऐवजी भेटणं सुद्धा पचवावंच लागलंय ... अगदी परवाच मी कॉलनीतल्या एका कुटुंबातल्या मुलीला, "आई ती गुलाबी रंगाची पिशवी दे ना माझीवाली," असं सांगतांनाही ऐकलं ... माझीवाली ? ... ही म्हणजे कलमी गुलाब किंवा कलमी आंब्याप्रमाणे हिंदीचं कलम केलेली भाषा दिसत्येय ...

 

 

ठीक आहे; हे बदल पसंत नसणाऱ्यांनी खुशाल नाकं मुरडावीत; पण बदल होतच राहिलेत आणि राहणार ... त्यामुळे भाषा प्रवाही सुद्धा राहते ... नाहीतरी ज्ञानेश्वरच कशाला; गडकरी मास्तरांच्या काळची भाषा तरी कुठे उरलीय ? ... वादविवादच घातले तर ते न संपणारे असतील ... अगदी काही काळ खटकलं तरीही; त्वचेवर पडलेला ओरखडा बरा होतांना काहीसा काळ डाग दिसतो, पण मग त्यावर आलेली नवी त्वचा एकरूप होऊन सर्व ठीकठाक होतं त्यानुसार; मला तरी वाटतं की जरी कुठे काही खटकत असेल तरीही आपण दुर्लक्ष करूया(त) ...

 

 

@प्रसन्न सोमण.

१९/१२/२०२१.