Saturday, 10 August 2019

-- माझी डिजिटल क्रांती १ --




-- माझी डिजिटल क्रांती १ --


"काय डोक्याला ताप आहे हो या ऍडमिनिस्ट्रेशनचा ? आमच्या बँकेत कॉम्प्युटर ट्रेनिंग आणि वापर सक्तीचा होतोय म्हणे ! ... मीच काय आमचा सगळा स्टाफ अक्षरशः पिसाळलाय !"
"अहो काका काय करणार ? पुढचा सगळा जमानाच कॉम्प्युटरचा आहे, म्हणतात ! ... मग शिकायला आणि वापरायला नको ?"
"अहो, पण आता या वयात काय शिकणार आणि कसं ते यंत्र हाताळणार ? ... सगळी लेजर्स, कॉरस्पॉन्डन्स एवढंच काय, लोकांची पासबुकं सुद्धा कॉम्प्युटरनी भरायची ... कामाची सगळी बसलेली घडी पूर्ण बिघडणार ... त्यात शेकड्यानी चुका होणार ... म्हणजे वरिष्ठांच्या आणि पब्लिकच्या लाथा आम्हीच खायच्या ... रात्र रात्र थांबून त्या चुका निस्तरायच्या ... नोकरी म्हणजे अगदी नको होणारे आता ..."
"काय करणार काका ! ... आलिया भोगासी असावे सादर दुसरं काय ?"


गॅलरीत उभ्याउभ्या शेजारच्या बँकर काकांच्या घरचा संवाद कानावर पडत होता ... असेल साधारण १९९८-९९ सालची गोष्ट ... मीही नोकरी करत होतोच पण ती महानगरपालिकेत; म्हणजे निमसरकारी ... त्यामुळे आमच्या हेडऑफिसमध्ये कॉम्प्युटर आहे आमच्या सॅलरी स्लिपा कॉम्प्युटरवर तयार होतात; एवढं सोडलं तर त्या दिशेची काहीच बातमी आमच्यापर्यंत तरी नव्हती ... तेव्हा, आमच्या विभाग कार्यालयात तरी कॉम्प्युटर नामक प्रकार यायचा होता ... त्यामुळे कुठेकुठे चित्रं तेवढी बघितल्यामुळे तो टी.व्ही.सारखाच वाटायचा ... मला टेपरेकॉर्डर, टी.व्ही.सारख्या ऑडियो व्हिडियो यंत्रांचं मात्र फार फॅसिनेशन होतं ... त्यामुळे टी.व्ही.सारखा दिसणारा हा कॉम्प्युटर म्हणजे काय भानगड आहे, ते वापरून बघायला हवं असं एक सुप्त आकर्षण होतंच; मात्र हे आपल्या आर्थिक ताकदीपलिकडचं असणार याचीही खात्री वाटत होती.


काही काळातच - आमच्या टायपिस्ट बाईंना ट्रेनिंग देणार, स्पेशल पे देणार आणि त्यांना कॉम्प्युटरवर टायपिंग, कॉरस्पॉन्डन्सचं काम करावं लागणार, हा फतवा आला आणि ऑफिसात पहिला कॉम्प्युटर आलाही ... त्यामुळे दुरून का असेना, कॉम्प्युटरवर टाईप कसं होतं आणि मग प्रिंटरवर ते प्रिंट कसं होतं, हे बघितलं ... पूर्वी टायपिंग क्लास केल्यामुळे टायपिंग मलाही येत होतंच ... त्यामुळे बघूनच मस्त वाटलं ...


त्याहीनंतर दोनतीन वर्ष गेली असावीत ... नवीन सहस्रकाचं आगमन होऊन गेलेलं होतं ... सीडी प्लेयर्स आले ... मी एक छोटा सीडी प्लेयर घेतला सुद्धा ... बरोबर दोनचार ऑडियो व्हिडियो सीडीज होत्याच ! ... हळूहळू मुलंही मोठी होत होती, तेव्हा आता काळाबरोबर आवश्यकच आहे ... निदान मुलांना तरी सवयीचा होऊ दे, अशा विचारांमुळे घरी कॉम्प्युटर घ्यावासा वाटायला लागला ... तोवर डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू, इंटरनेट, ऑनलाईन असलेही काही शब्द कानावर येतच होते ... त्याहीआधी काही भाग्यवंत अगोदर पेजर आणि काही काळात मोबाईल कमरेच्या पट्ट्याला लावून फिरत असत आणि अगदी जवळचे मित्रसुद्धा आपला मोबाईल नंबर देत नसत ... सरळ 'परवडत नाही रे,' असंही सांगत असत. ( सगळ्या कॉल्सना दणकून पैसे मोजावे लागायचे म्हणून - ) ... शेवटी 'मोबाईलची काही आपल्याला गरज नाहीये पण कॉम्प्युटर तरी घेऊ या,' असं बायकोला पटवून मनात जुळवाजुळव करायला लागलो ... कॉलनीत एक प्रॅक्टिसिंग सी..आणि जवळचा मित्र होता ... त्याच्याकडे विषय काढला ...


"किती पैसे पडतील रे चांगल्याशा कॉम्प्युटरला"
"काय कॉन्फिगरेशनचा हवाय तुला ?"
"बोंबला ! ...  हे काय असतं ? मला घरच्यासाठी कॉम्प्युटर घ्यायचाय"... 'कॉम्प्युटर' या शब्दावर शक्य तितका जोर देऊन मी सांगितलं ... तो जरासा हताश झाल्यासारखा दिसला, पण त्याला अंदाज आला असावा ...
"तुला काय कामं करायचीयत त्याच्यावर ?"
"काही विशेष नाही ... टायपिंगवर हात साफ करून घेईन ... घरातल्या दोन-चार ऑडियो सीडीज ऐकता आल्या तर त्यावर ऐकीन."
"सीडीज कशाला हव्यात त्यासाठी ... भरपूर गाणी हार्डडिस्कवर सेव्ह केलीस की ऐकू शकशील" ...
"सीडीज शिवाय ?"
"म्हणजे ? ... अर्थातच ... तुला माहिती नाही ? ... धन्य आहेस तू" ...
"अरे; माझ्या घरी टेपरेकॉर्डर आहे आणि त्यावर कॅसेट्स लावून भरपूर संगीत ऐकता येतं, यात धन्यता मानणारा मी; मला हे कुठून माहिती होणार ? कॉम्प्युटर घ्यायचाय म्हणजे एवढ्यासाठी की थोडाफार मी शिकून घेईन आणि मुलांनाही पुढे प्रॉब्लेम यायला नको यासाठी ... तोही परवडला तरच घेणार" ...
"समजलं ... साधारण वीस-पंचवीस हजारच्या आतबाहेर लागतील" ...
"बापरे ! ... ठीक आहे ... जमवाजमव करून काही महिन्यात बघू."


दुसऱ्या दिवशी संघ्याकाळी लँडलाईनवर त्या मित्राचा फोन ...


"उद्या संध्याकाळी एक पोरगा तुझ्या घरी कॉम्प्युटर आणून टाकेल, तो ठेवून घे ... सगळे मिळून अठरा हजार ... पैशांची काहीही घाई नाही ... डोन्ट वरी ... माझ्या एकदम खास ओळखीतला मामला आहे ...  बाकीचं नंतर बोलू" ... 
"काय ? ... अरे मी नुसतं प्रिलिमिनरी बोललो तर" ...


पण माझं काही ऐकून घ्यायच्या आधीच त्यानी फोन कट केला ... नंतर फोन करून किंवा भेटायचा प्रयत्न करूनही त्याचा कॉन्टॅक्ट नाही ... माझा हा मित्र म्हणजे (चांगल्या अर्थाने आणि मित्रांच्या भल्यासाठी) जरा सणकीच आहे ... मला आठवतंय - शेजारच्या तीनचार घरात नवीन टेपरेकॉर्डर आल्यानंतर गायिका, संगीत-शिक्षिका असलेल्या माझ्या आईनी, दादानी आणि मी टेपरेकॉर्डरसाठी बेताबेताने मूड बघून, एकत्रितपणे आणि प्रेमळ तगादा लावल्यावरबघूयाअशा एका शब्दात बाबा विचार करायला तरी तयार झाले ... मग दोन चार महिन्यांनी बहुदा आर्थिक तयारी झाल्यानंतर चौकशी करून, ओळखी काढायचा प्रयत्न करून, कुठला घेतला तर चांगला आणि बऱ्यापैकी स्वस्त पडेल, याची आईशी मामुली चर्चा केली गेली ... निर्णय मात्र स्वतःच घेतला ... आणि सहा-सात महिन्यांनी एकदाचा - १९७७ साली वट्ट सोळाशे तीस रुपयांचा - बुशचा इंडियन टु इन वन घरी आला ... आणि इथे काल त्याच्याशी जस्ट माहिती काढण्यासाठी प्रिलिमिनरी बोलल्यानंतर आज एकदम अठरा हजारांचा कॉम्प्युटर घरात ! ... खरंतर मी सर्दच झालो पण मित्रापुढे अपील नव्हतं ... ओळखीत मिळालाय आणि पैशांची कुठे घाई आहे ? असं तो म्हणणार याची खात्रीच होती ...

ठरल्याप्रमाणे तो कॉम्प्युटर घरी आला ... बायको प्रायव्हेटमध्ये नोकरीला असल्यामुळे तिला तशी माहिती होती ... माझ्यापेक्षा तर खूपच ... तिनी घरातल्या टीपॉयवर ते सगळं यंत्र मांडलं ... अजून एक आडवा छोटा खोका उघडला तर त्यात काहीसं छोट्या ढोलकसारखं यंत्र होतं ... वरची hp ही अक्षरं तेवढी कळली ... तेवढ्यात बायको ओरडली ... "अहो हा प्रिंटर पण आहे !" ... बायकोनी त्या सगळ्याची जोडणी केली; पण तेवढ्यात मी तिला म्हटलं "पहिल्यांदा मी वापरणार ! ... तू फक्त मला मागे उभी राहून इंस्ट्रक्शन्स दे" ... मग तिच्या सांगण्यानुसार मी तो चालू केला ... त्याच्या टीव्हीवर welcome to windows 98 ही अक्षरं आणि मग डाव्या बाजूला काही चौकोनी तुकडे दिसायला लागले ...
कीबोर्डवर बोटं आपटत मी ओरडलो ...


"हे काय टायपिंग कुठे होतंय ?"
"त्यासाठी आधी वर्ड उघडायला लागेल ... माऊस हलवा" ... मागून कमांड आली.


मला माऊस म्हणजे काय ते नेमकं माहीत होतं ... औषधांच्या बाटल्या तर अनेकवेळा हलवल्या होत्या ... त्यामुळे मागून "अहो ... अहो" ... असा आवाज यायच्या आतच  मी माऊस माझ्या कानाजवळ आणून गदागदा हलवला ... आणि मागून हास्यकल्लोळ उठला ... आता टीपॉय च्या टीपॉयवर ठेवूनच माऊस हलवायचा असतो, हे म्या पामराला कसं कळावं ? ...


तर अशा चित्तथरारक सुरुवातीनंतर मी सुखरूपपणे shri ganeshay namah ही ओळ इंग्रजीत टाईप केली आणि माझ्यातल्या क्रांतीला सुरुवात झाली ...
दोनचार दिवसातच मित्राला पैसे देऊन टाकले ... कॉम्प्युटर ट्रॉलीही घेऊन टाकली ... मित्राला मी म्हटलं,


"अरे प्रिंटरचं मी काही बोललो नव्हतो" ...
"जाऊ दे रे ... त्यानी कॉम्प्युटरबरोबरच मला प्रिंटरही दिलाय ... बरं आहे ना ! वाटलं तर प्रिंटही करता येईल."
"ठीक आहे ! ... टायपिंग मला येतंच पण कॉम्प्युटरवर मराठीही टाईप करता आलं असतं तर मी नक्कीच उत्साहानी शिकून घेतलं असतं !"
"अरे मुर्खा, मराठी फॉन्ट्स लोड करून घेतलेस तर मराठीही टाईप करू शकतोस" ...
'मराठी फॉन्ट्स' ही भानगड काय आहे हे मला काही कळलं नाही; पण मुळात 'लोड' ही वस्तूच प्रिय असल्यामुळे काहीतरी लोड करायचंय हे कळल्यावर मनात म्हटलं, प्रयत्न करून बघितलंच पाहिजे ... तेवढ्यात तो म्हणाला,


"तुला मराठीमध्ये लिहून प्रिंट करायलाही बरं पडेल" ...


कॉम्प्युटरवर मराठी भाषा सुद्धा टाईप होते, एवढंच काय; प्रिंटरवर ते मराठी टायपिंग मराठीमध्ये प्रिंटही होऊ शकतं; हे कळल्यावर तर मला कॉम्प्युटरबद्दल फारच जवळीक वाटायला लागली ...


माझ्या ऍडव्हान्स्ड ट्रेनिंगबद्दलही (?) सांगायचंय पण ते असंच पुढे कधीतरी ...


@प्रसन्न सोमण.
०८/०८/२०१९.

No comments:

Post a Comment