-- माझी डिजिटल क्रांती २ --
२००२ अखेरीला नवीन कॉम्प्युटर घरी आला आणि मी थोडाबहुत झपाटलाच गेलो ... लगेचच एका मित्राच्या मदतीने कृती देव नावाचे मराठी फॉन्ट्स 'लोड' करून घेतले ... आमची कॉलनी तशी चाळपद्धतीची मोकळीढाकळी आहे, त्यामुळे मित्रांना आणि मित्रांच्या मदतीला सुदैवाने तोटा नव्हता ... फक्त "मेल्या, मोठ्ठा कॉम्प्युटर शिकून काय म्युन्सिपाल्टीचा बिल गेट्स होणारेस ?" असल्या स्वरूपाची चेष्टा तेवढी ऐकायला लागायची ... पण मग मीही "झालोच बिल गेट्स तरी तुला प्रायव्हेटवाल्याला काय फरक पडणार आहे ... तुला काय कणभर येतंय ते शिकव मला ... काय करणार हरी झाला तरी तो सुद्धा अडतोच ना !" अशी चेष्टेची परतफेडही करायचो ... पण तरीही एक खरंच की, आपल्याला काही शिकायचंय, काही माहिती करून घ्यायचीय म्हटल्यावर, ... "आमी अडानी है जी ! आमास्नी काय कळतंय ? ... तुमीच आमास्नी बराबर रस्त्यावर सोडा सरकार !" ... छापाचा भाव मुद्रेवर असलेलाच बरा ! भले समोरच्याला टाईमपासला संधी मिळाली तरी ठीक आहे; पण आपला कार्यभाग मात्र साधला जातो ... तर ... की बोर्डवर मराठी अक्षरं माहिती करून घेऊन मी गोगलगाईच्या गतीने मराठी टायपिंग करू लागलो ... ही गती लवकरच कासवाच्या गतीएवढी वाढली ... दिवसेंदिवस गतीत प्रगतीही होत राहिली ... माझीच एक रूपांतरित छोटेखानी एकांकिका टाईप केली ... मग माझ्या बाबांनी त्यांच्या रिटायरमेंटनंतर मोठ्या चोपड्यांवर, त्यांचे जीवनानुभव सांगणारं मोठ्ठ पुस्तक लिहिलं होतं; ते मी जिद्दीनी टायपिंगला घेतलं आणि ते पुस्तक मी पाचसहा महिन्यांत पूर्ण करून, प्रिंटिंग-बाइंडिंग करून बाबांच्याच हस्ते प्रकाशित केलं ... या वेळपर्यंत मी
केबल इंटरनेटचं कनेक्शन घेतलं होतं आणि मित्रकृपेनेच माझा मेल अकाउंट उघडून माफकशी मेल मुशाफिरीही सुरु केली होती. बाबांच्या पुस्तकाच्या प्रेझेंटेबल मुखपृष्ठ व मलपृष्ठाच्या डिझायनिंगसाठीही मी एका मित्राचीच मदत घेतली.
दोन एकांकिका, काही लेख आणि बाबांचं पुस्तक, एवढ्या मराठी 'मॅटर'चं टायपिंग झाल्यानंतर कॉम्प्युटरवर मराठीची झाली एवढी साहित्यसेवा (?) भरपूर झाली; आता काहीतरी वेगळं करावं, असा विचार करतो न करतो तोच दोन वेगळेच आणि कॉम्प्युटर-व्यसनाला भलतेच उपकारक असे योगायोग घडले ... एक म्हणजे माझी बढती होऊन मी जवळच्याच ऑफिसात काऊंटर सेक्शनचा हेड झालो ... हे टायमिंग ऑफिशिअली सकाळचं ८ ते ४ असं होतं; पण दोन नंतर काउंटरची कॅश टॅली होऊन डे एन्ड झाला की अडीचतीन पर्यंत सटकता यायला लागलं ... दुसरा योगायोग म्हणजे कॉलनीतला कॉम्प्युटर इंजिनियर असलेला दोस्त, असलेली नोकरी बेटरमेंटसाठी सोडून दुसरी चांगली नोकरी मिळेपर्यंतच्या सहासात महिन्यांच्या काळात टेम्पररी घरी बसला ... त्यामुळे कॉम्प्युटरवर दुपारनंतर उपद्व्याप करण्यासाठी - आमच्या भाषेत 'किडे करण्यासाठी' - आम्हाला भरपूर वेळ मिळू लागला ... त्यानंतर किडे करून त्या इंजिनियर मित्रानी आधी शिकायचं आणि मग मला शिकवायचं असा क्रम आपोआपच ठरून गेला ...
हा माझा मित्रही तसा कलाप्रेमी आणि ऑडियो-व्हिडियो प्रेमी होता ... त्यामुळे मध्येच आमच्या किडे सेशन्समध्ये एका गोल्डवेव नावाच्या ऑडियो सॉफवेअरचा छडा लागला आणि त्याद्वारे सर्व प्रकारचे ऑडीयोज प्रोसेस करता येतील, हे समजलं आणि त्यामागे लागलो ... हळूहळू टेपरेकॉर्डरवर कॅसेट वाजवून त्याचं गोल्डवेव्हमध्ये डिजिटल रेकॉर्डिंग, प्रॉपर साउंड एडिटिंग आणि सेव्हिंग शिकलो ... एकदा सॉफ्टवेअरशी जानपछान झाल्यावर मल्टिपल साउंड ट्रॅक्सच्या मिक्सिंगशीही परिचय करून घेतला ...
पाठोपाठ माईक रेकॉर्डिंग शिकून स्वतःचे ऑडियो ट्रॅकस व घरच्याघरी स्वतःची गाणी करायलाही शिकलो ... इतपत प्रगती होता होता मानसिक समाधानही मिळत होतं; आनंदही वाढत होता.
याच दरम्यान आणि याच उत्साहात कधीतरी स्कॅनरची आणि व्हिडियो कॅप्चर कार्डची खरेदी झाली ... जुना व्हीसीआर व चांगल्या रेकॉर्डिंग क्वालिटीच्या काही व्हिडियो कॅसेट्स घरी होत्याच ... त्यामुळे त्याच धडाक्यात फोटो स्कॅनिंग, थोडंफार फोटो एडिटिंगही आत्मसात झालं ... व्हिडियो कॅप्चारिंग कार्ड आल्यामुळे ओघानेच व्हिडियो कॅप्चरिंग, कटिंग, मर्जिंग, एडिटिंग, हेही शिकलोच ...
आमच्या म्युन्सिपाल्टीच्या फ्रंटवरही कॉम्प्युटर; थोड्याफार आळसाने का होईना पण; हातपाय पसरत होताच ... मात्र ज्युनिअर्स पासून ते साहेब लोकांपर्यंत कॉम्प्युटरचा धसकाच अधिक होता ... टायपिंग पत्रव्यवहार तर कॉम्प्युटरवर होत होताच; पण हळूहळू प्रत्येक कर्मचाऱ्याच्या टेबलवर कॉम्प्युटर महाराज बसणार आणि सर्वांना कॉम्प्युटर शिकावाच लागणार, ही ती अनामिक भीती होती ... तशी कागदोपत्री महानगरपालिकेची पत्रव्यवहाराची भाषा मराठी होतीच; पण त्यात बरीच चालढकलही होत असे ... पण नेमकं याच दरम्यान अधिकृत पत्रव्यवहारासाठी मराठीची सक्ती केल्याचा आदेश आणि तसं परिपत्रक आलं; त्यानिमित्ताने अस्वस्थता आणखीनच वाढली. शिवाय कर्मचाऱ्यांनी एमएससीआयटी परीक्षा उत्तीर्ण केली पाहिजे, हाही आदेश आला आणि आमच्याकडे जो तो ज्याला त्याला विचारू लागला “तुला कॉम्प्युटर येतो का रे ?” ... आता खरंतर कॉम्प्युटर येतो का, या प्रश्नाला काही अर्थ नाही ... कॉम्प्युटरवर हजारो कामं होतात त्यापैकी कुठलं काम येतं का, असा प्रश्न असायला हवा ... पण त्या काळात, कॉम्प्युटरला हात तरी लावता येतो का; असा प्रश्न त्यांना अभिप्रेत असावा ... मला मराठी टायपिंग येत असल्यामुळे ऑफिसात माझा भाव मात्र जरा वधारला ... साहेब लोकं सुद्धा माझ्याकडे जरा कौतुकाच्या आणि प्रेमाच्या नजरेने बघायला लागले ... आता त्यात; हा पोरगा कामं सांगायला बरा आहे; अशा विचाराचा संधीसाधूपणा किती होता आणि प्रेम किती होतं हा मुद्दा अलाहिदा !
होता होता साधारण २००५-०६ मध्ये आमच्याच काउंटर सेक्शनमध्ये नवीन कॉम्प्युटर्स येऊन संबंधित सर्व कामं कॉम्प्युटरवरच करण्याची सक्ती केली गेली आणि मुंबई महानगरपालिकेच्या सर्व विभाग कार्यालयांमध्ये कॅश काउंटर्सचं रूपांतर नागरिक सुविधा केंद्रांमध्ये झालं ... मुळात कॉप्युटर हाताळण्याच्या बाबतीत सगळा स्टाफ नवशिका होताच त्यात कॉप्युटर प्रोग्रॅमिंगसुद्धा नवंकोरं असल्यामुळे किमान सुरुवातीचे वीसेक दिवस तरी प्रचंड अडचणी आल्या आणि बऱ्याच उशिरापर्यंत त्या निस्तरत थांबावं लागत होतं ... शिवाय साधनांच्या आणि कामांच्या नाविन्यामुळे साहजिकच स्टाफची मनःस्थिती पूर्णतः निगेटिव्ह होती ... "कसला बोडक्याचा कॉम्प्युटर हा ! ... आम्ही मॅन्युअली ज्या लेजर्सचा तासाभरात फडशा पाडत होतो ती कामं व्हायला आता अख्खा दिवस अपुरा पडायला लागला आणि तरीही त्यात असंख्य चुकाच राहतायत" ... असले संवाद किती दिवस ऐकतच होतो; पण सक्ती असल्यामुळे नाइलाजही होताच ... हळूहळू कामं सवयीची होऊन काउंटर सेक्शनपुरता कॉम्प्युटर्सचा जम बसला.
अजूनही दोनतीन वर्ष गेली आणि २००७-०८ मध्ये, शिपाई वगळता अगदी प्रत्येक कर्मचाऱ्याच्या टेबलवर कॉप्युटर यायचा, आणि सर्वच्या सर्व कामं कम्प्लसरीली कॉम्प्युटरवरच करावी लागण्याचा, काळ आलाच ... आणि "हरहर ! कसले हे दिवस आलेत ! मॅन्युअली कामं किती मस्त व्हायची" ... छापाचे संवाद फक्त काउंटर सेक्शनपुरते न राहता टेबलो-टेबली ऐकू यायला लागले ... हळूहळू जुनी माणसं रिटायर व्हायला लागली आणि निदान एक यंत्र म्हणून कॉम्प्युटर जरा सवयीचा व्हायला लागला ... कामं जरा सवयीची होतायत तोच प्रॉपर्टी टॅक्सची नवी भांडवली मूल्याधारित सिस्टीम येऊन पूर्ण कार्यपद्धतीच बदलली ... त्यात कॉम्प्युटर प्रोग्रामिंग सुद्धा असं होतं की; व्हेंडरला एक चूक सुधारायला सांगितली तरी दुरुस्ती व्हायच्या मधल्या काळात प्रोग्रॅमिंगच्या चार नवीन चुका आढळायला लागल्या ... मी रिटायर झालो तेव्हापर्यंत म्हणजे २०१४-१५ पर्यंत अनेक गोंधळ चालूच होते आणि मला वाटतं अजूनही थोड्याफार प्रमाणात चालू आहेतच.
या निमित्ताने फक्त वैयक्तिकदृष्ट्या कॉम्प्युटरचा विचार करता करता माझीही एक त्या काळाची सफर करून झाली ... काळ धावतो आहेच आणि धावणारच आहे.
@प्रसन्न सोमण.
३०/०८/२०१९.