---
पहला नशा, पहिली निराशा ---
अरेबियन नाईट्स मधल्या त्या कोण्या एका शहराझादनी
आपल्या धाकट्या बहिणीला - दुनियाझादला - मध्यरात्री एकहजार एक गोष्टी सांगितल्या होत्या ..... मीही तुम्हाला माझ्या, अगदी एकहजार एक नाही
तरी, आत्ता सांगतोय त्या गोष्टीसारख्या बऱ्याच
मनोरंजक गोष्टी नक्कीच सांगू शकतो ... पण त्यातल्या मुख्य अडचणी दोन ... पहिली अडचण
अशी आहे की या सगळ्या गोष्टींमध्ये ज्यांचे उल्लेख येऊ शकतात ती सगळी पात्रे आणि अर्थात
मी स्वतः; आजही या पृथ्वीतलावर अस्तित्वात आहोत व मजेत जगतोही आहोत ... पण या गोष्टी
मी अशा खुल्ला जाहीर करून टाकल्या तर निदान मी स्वतः तरी मजेत जगत राहू शकेन अशी सुतराम
शक्यता मला वाटत नाहीये ... कारण लेखक काही फिक्शन लिहू शकतो; स्वतःची कल्पनाशक्ती
वापरून काही वर्णनं करू शकतो, याची गंधवार्ताही नसलेले काही सज्जन माझ्या आजूबाजूला
असल्यामुळे; भले कितीही नावं आणि वर्णनं बदलून बदलून लिहिलं तरीही शक की छुई हमेशा
मेरे ऊपर मंडराती रहेगी ये बात तो तय है। ...
सगळ्या गोष्टी सांगण्यात दुसरी मुख्य अडचण अशी
आहे की शेवटी सगळ्या गोष्टींचं तात्पर्य 'माझी निराशा’ हेच आहे ... त्यामुळे उगाच एकाच
तात्पर्याच्या अनेक गोष्टी सांगत बसून; सांगणाऱ्या माझा आणि वाचणाऱ्या तुमचा वेळ वाया
का घालवा ? ... त्यामुळे ही एकच गोष्ट वाचून बाकीच्या इतर गोष्टी कशा कशा घडत गेल्या
असतील हे जाणून घ्यायला ज्यानेत्याने आपापली कल्पनाशक्ती झेपेल तेवढी ताणावी ... या
पहिल्या नशेसाठी माझ्या आयुष्याचं थोडं सिंहावलोकन करीन म्हणतो ... (एवढ्या एका शब्दापुरतं
तरी प्लिज मला सिंह होऊद्या हो !) ...
शाळेत नववीत होतो मी. आमची शाळा आठवी ते दहावी
मध्ये दुपारी सव्वाबाराची असे. त्यामुळे सकाळी थोडा आराम असे. जरा आरामशीर उठून, दात
घासून, दूध पिऊन झाल्यावर तासभर अभ्यासाचं काहीतरी वाचलंच पाहिजे असा दंडक आईनी घालून
दिला होता. नववीची शाळा सुरु झाल्या झाल्या जून महिन्यातच मराठीच्या बाईंनी 'बालभारती’तली
एक कविता पाठ करायला दिली होती; ती पाठ करायचा प्रयत्न करत मी आमच्या चाळीच्या दुसऱ्या
मजल्यावरच्या आमच्या ग्यालरीत येरझाऱ्या घालत होतो. आमची चाळ एल टाईपची असल्यामुळे
ग्यालरीतून आमच्या काटकोनातली बिऱ्हाडं आणि त्यांच्या ग्यालऱ्या लख्ख दिसायच्या
... तर कविता पाठ करता करता, मुळातच मन अचपळ आणि नजर शोधक असल्यामुळे, मला अचानकच एक
मनाला गुदगुल्या करणारा शोध लागला ... समोरच्या तिसऱ्या मजल्यावरील बिऱ्हाडातली 'ती'
मी पाहिली ... आता हे फक्त माझ्याच कल्पनेतलं असल्यामुळे मी 'ती'ला 'कल्पना'च म्हणतो
झालं ... त्याच वर्षी आठवीत आलेली 'ती' कल्पना आपल्या भरगच्च लांबसडक केसांना बांधलेला
टॉवेल सोडून तो टॉवेल केसांवर फटाफटा आपटत उभी होती ... पाठोपाठ ती फणीनं केस विंचरू
लागली ... कसली कविता अन काय ! माझ्या डोळ्यांसमोर एकदम एक 'कल्पना’च
चकाकली ... ही एकुलती एक कल्पना मनाला फारच छळू लागली ...
फार नाही, पण किंचित घारेपणाकडे झुकणारे टप्पोरे
भावुक (घाऊक नव्हे - हे आज मला कळतंय ... त्या वयात मी घाऊक असंच वाचलं होतं ...) डोळे,
सरळ धारदार नाक, भरगोस केशसंभार, निमगोरा वर्ण, पाठीला मात्र किंचितसं पोक: असं तिचं
वर्णन होतं. वर्णन माझं नसलं तरी भावना मात्र नक्की माझी होती ... वर्णन 'चांदोबा’
किंवा
'किशोर’मध्ये, एका राजकन्येचं म्हणून
वाचलेलं होतं ... फक्त पाठीचं पोक सोडून ... पाठीचं पोक ही माझी काकदृष्टी ... काय
असेल ते असो, पहिल्यापासून माझी नजर वैगुण्य शोधणारीच; पण तरीही पुढे ऑडिटर काही झालो
नाही ...
झालं ... त्या दिवसापासून हा, वेळ साधून बघण्याचा,
छंद मला किमान नववी-दहावी ही दोन वर्ष जडला ... आजूबाजूचं भान न ठेवता, आपल्याच स्वप्नात
रमून गेल्यासारखी ती केस विंचरत असे ... खाली आमचं बिऱ्हाड नसल्यामुळे गुंतवळाचा त्रास
आम्हाला तर झाला नाहीच, पण तसलं काही भांडण वगैरे झाल्याचंही ऐकिवात नाही ... काय सांगावं
? ... कदाचित तिचे गुंतवळ माझ्या हाती लागले असते तर बहुदा ते 'तिचे' म्हणून मी जपूनच
ठेवले असते ... पण तशातला काही प्रकार तेव्हा घडला नाही, हे खरं ... नजरेनी ती स्वप्नाळू असली तरी, तिचे गाल आरक्त
होऊन उठायचे का नाही, हे मात्र मला तेव्हा कधी जाणवलं नव्हतं ... कारण त्या वेळपर्यंत
मी कधी 'चंद्रकांत काकोडकर’ वाचले
नव्हते ...
पुढे ? ... दहावीनंतर बरे मार्क्स (?) पडून माझं
कॉलेज - आर्ट्स बाजू - सुरु झालं ... मी सुरळीत कॉलेजला जातो अशी घरच्यांची समजूत करून
देण्यात मी बऱ्यापैकी यशस्वी झालो होतो ... या सगळ्या भानगडीत बघण्याच्या वेळा, वेळवखत
येईल तशा, बदलाव्या लागल्या ... साधारण याच दरम्यान ते 'कल्पना'वालं कुटुंब, तिच्या
बापाची बदली झाली म्हणून, कॉलनी सोडून पुण्याला शिफ्ट झालं ... पहिल्या भावनांचं खळ्ळखटॅक
झालं ... थोडा त्रासही झाला; पण ... तोवर दृष्टिकोन, नजर, इत्यादी गोष्टी आणखी आणखी
विस्तृत होत गेल्या ... बाहेरची दुनियाही साद घालत होती ... साद कसली, किंचाळतच होती
... मीही चेकाळून जाऊन मनातल्या मनात खुल्ली दाद द्यायला शिकलो होतो ... मनात मैत्रिणी
होत्या पण कॉलनीतल्या मित्रांच्या घोळक्यात रमू लागलो होतो ... तिथे मात्र सगळ्यांच्याच
वाणीच्या आणि मनाच्या बेड्या खळाखळ तुटत होत्या ...
याच साताठ मित्रांच्या अड्ड्यामध्ये एकदा कधीतरी
मनाचा बांध फुटून मी 'कल्पना-क्रश' पचकून गेलो.
"येडाच आहेस तू ! अरे
तेव्हाच कधीतरी बिन्धास बोलायचं ना आमच्याजवळ तरी ! ... कुछ तो किया होता तेरे खातीर
!" - खंड्या ओरडला
"अब भी कुछ नही बिगडा
यार !" - इति नाऱ्या
"आता काय उपयोग ? ती फॅमिली
गेली कॉलनी सोडून !"
"अरे गेली तरी पुण्यालाच
गेलीय ना ! पत्ता काय मिळवता येईल !"
"अरे पण या मठ्ठानी तेव्हाच
हिम्मत करायची ना ? ... अगदीच हिम्मत होत नव्हती तर रंगपंचमीला तेव्हा बिनधास्त वातावरण
असायचं ! तेव्हा तरी तिच्या थोबाडाला यानं रंग फासायचा ना ! ... निदान आपल्याला तरी
काही क्लू लागला असता" ... "कदाचित
तिला पण समजलं असतं !"
"आणि तिनं माझ्या कानाखाली
पेटवून माझं थोबाड रंगवलं असतं तर ?" ... बहुदा दोस्तांना माझ्या चेहऱ्यावरचे
भीतीदायक भाव दिसले असावेत.
"तू साल्या असाच शेपूटघाल्या
! ... हिम्मत केली असतीस तर कदाचित तिनं तुझ्या अंदरकी बात ओळखून स्वतःहून 'हो' म्हटलं
असतं" ...
"ते विसर तू." -
गंभीरपणे राजन बोलला.
"मग काय खरंच तिनी याच्या
कानाखाली पेटवली असती ?"
"नाही कानाखाली नसती पेटवली,
पण ती तशी शायच होती; त्यामुळे 'हो' वगैरे काही म्हणाली नसती ... अगदीच तिलाही इंटरेस्ट
असता तर ‘वेळप्रसंग बघून घरच्यांशी बोलून सांगते’ बोलली असती"
"मग ठीक आहे ना ! पुण्याचा
पत्ता आम्ही शोधून देऊ तुला ... जा पुण्याला आणि बिन्धास गाठ तिला एकटी" - माझ्या
प्रेमकहानीत नाऱ्याच जास्त एक्साईट झाला होता.
"अरे पण शाळेत असतांना
ती हुशार होती यार ! चांगलं काहीतरी शिकेल, करियर करेल, मग माझ्यात कशाला इंटरेस्ट
वाटेल तिला ?" - माझा कॉम्प्लेक्स आज आहे तसाच तेव्हाही होता.
"तू कशाला स्वतःला एवढा
मच्छर समजतो ? तू पण शिकतोच आहेस ना ! ... होशील मस्त सीए-बीए" - हा चिंगट्या.
मी हुशार नव्हतो पण तरीही सीए होण्यासाठी कॉलेज
शिक्षणात आर्ट्स बाजू चालत नाही, तर कॉमर्स बाजू असावी लागते; इतपत ज्ञान मला तेव्हा
झालेलं होतं ... पण आमचा चिंगट्या म्हणजे 'निर्बुद्धतेचा महत्तम साधारण विभाज्य' हे
माहित असल्यानं आम्ही दुर्लक्ष केलं एवढंच !
"अरे पण ती बडी फॅमिली
आहे यार ! पुण्याला मस्त मोठ्ठ्या वाड्याबिड्यात राहत असेल" - माझा रड्या स्वभाव
कुठे जाणार ?
"अरे कसली बडी माणसं
? बाप रेल्वेत आहे तिचा ... रेल्वे क्वार्टर्सच्या चाळीबिळीत राहत असतील" - नाऱ्याची
माहिती जशी काही अपडेटेडच होती.
तात्पर्य हेच की मी पुण्याला जाऊन बिनधास्तमध्ये
तिला एकटीला गाठून प्रपोज मारावं हे फायनल आणि परस्पर ठरवलं गेलं.
---------
आणि आजचं दाहक वास्तव ?
ऑफिसमधून दमून घरी आलो होतो ... चहापाणी होऊन
जरा रिलॅक्स होतोय तोच मोबाईल खणखणला ... बऱ्याच वर्षांनी राजनशी डायलॉग होत होता
...
"अरे यार कसा आहेस ? आज
तुझी भारी आठवण आली" - राजन
"अरे मी मस्त ... मजेत
... बोल तू कसा आहेस ? आपली कॉलनी कशी आहे ? आणि आज एकदम माझी आठवण ? काही विशेष
?" - माझी उत्सुकता जागी झाली.
"अरे आज तुझी कल्पना कॉलनीत
येऊन गेली."
माझी कल्पना ? ... धुंद विचारांनी आत्ताही माझी
छाती धडधडली ... तशाही अवस्थेत मी न राहवून किचनकडे नजर टाकली ... जणू माझ्या मोबाईलवरचं
राजनचं बोलणं सौ.ला आत किचनमध्ये ऐकू जाणार होतं ...
"काय म्हणतोस काय ? एवढ्या
वर्षांनी ? कशी आहे रे ती ? अजून लांबसडक केस आहेत का रे तिचे ?" - माझ्या छातीतली
कळ जरा दबक्या आवाजातच बोलकी झाली.
"अरे मी कुठे पाहिलं तिला
? मला नाऱ्यानं फोन केला होता. तो तुझ्याच जुन्या चाळीत राहतो ना ! ... तिच्या जुन्या
शेजाऱ्यांना तिच्या मुलीच्या लग्नाचं आमंत्रण द्यायला आली होती म्हणे ! ... नाऱ्यालाही
तुझी स्ट्रॉंग आठवण आली म्हणाला ... काही म्हण हं ! यु शुअरली मिस्ड अ चान्स यार"
"जाने दो भाई ! ... तुम्ही
सगळे मजेत ना ?"
एकदम मजेत ... लग्नातले, पण
कल्पनाचे काही खास फोटो चुकूनमाकून मिळालेच तर, शेअर करीन तुला ... तेवढाच उतारवयात
तुला 'जीनेका सहारा’ ... चल बाय ... टेक केअर ..."
केअर तर घ्यायलाच हवी ... बाय चान्स सिक्रेटली
तिचे फोटो मिळाले तर आवडतीलच; पण उतार वयातला खरा 'जीनेका सहारा’ आत किचनमध्ये काम करतोय
... त्याच्याकडे दुर्लक्ष करून आणि हातचं सोडून पळत्याच्या पाठी जाऊन कसं चालेल बाबा
!
@प्रसन्न सोमण
१५/०४/२०१९.
No comments:
Post a Comment