--- अक्रॉस द सेम रोड ---
मी फक्त एक गृहिणी ... खरं सांगायचं तर आत्तापर्यंत मी जेमतेम वर्तमानपत्राची वाचिका आणि फक्त टाईमपास म्हणून थोडीफार फेसबुक वाचिका आहे ... आज प्रथमच लिहायचा तोडकामोडका प्रयत्न करत्येय ... तेही कशामुळे ? ... तर अगदी परवाच फेसबुकवर, मी एक मस्त कथा वाचली म्हणून ... ही कथा मात्र मला खरंच अगदी आतपर्यंत भिडली आणि अगदी लिहावंसंच वाटलं ... जमलंय का, ते तुम्हीच बघा ! ....
निबंधाची, कल्पनाविस्ताराची, कथेची सुरुवात आकर्षक असावी; वगैरे थिअरी तशी शालेय वयात मी सुद्धा शिकलेली आहेच; पण म्हणजे प्रॅक्टिकली कशी, हे मात्र मला मुळीच उमगत नाहीये ... मुळात, मला सांगायचंय ते वास्तव आहे ... कल्पना विस्तार किंवा कथाकल्पना नव्हे ... तसं पाहिलं तर आज मी अगदी म्हातारी नसले तरी, 'संध्याछाया भिवविती हृदया' या तांब्यांच्या ओळीनी भीतीची भावना मनाला चाटून जाण्याच्या वयात आल्येय ... त्यामुळे
आता इतक्या वर्षांनी सांगायचंय ते वास्तव आहे असं सांगून मुक्तपणे सांगून टाकलं; तरीही रमेशला - माझ्या नवऱ्याला - जरासुद्धा काही 'जे' वगैरे फील होणार नाहीये; उलट तो टिंगलच करणारे, हेही मला माहित्येय ... हे नमन जरा जास्तच 'तेलकट' होतंय का ? ...
माझ्या लहानपणी आमच्या चाळींच्या कॉलनीत मस्त मोकळं मैदान आणि त्याहीपेक्षा खूपच मोकळंढाकळं वातावरण होतं ... त्यामुळे खेळायलाही भरपूर मैत्रिणी होत्या ... तसे पत्ते, कॅरम वगैरे खेळतांना मित्र सुद्धा होतेच, पण माझ्या लहानपणच्या त्या जमान्यात मुलींनी मुलांशी सहजगत्या दिलखुलास मैत्री वगैरे करण्याइतका काळ सोशल नव्हता ... त्यामुळे मला तरी 'तसे दिलखुलास' मित्र नव्हते ... मी नववीत असतानाची होळी .... 'पुढचं दहावीचं वर्ष असल्यामुळे होळी साजरी करायला मिळणार नाहीच त्यामुळे यंदा तरी परवानगी द्या,' अशा युक्तिवादाच्या बळावर आईबाबांची परवानगी घेऊन मी फक्त रात्री एक वाजेपर्यंत जागण्याच्या बोलीवर होळी साजरी करायला मैत्रिणींच्या घोळक्यात ... होळी मस्त धडाधडा पेटली ... आम्ही सगळ्या जणी होळीला नमस्कार करून बाजूलाच कोंडाळं करून टिवल्याबावल्या करत उभ्या होतो ... आमच्या जवळच कॉलनीतल्या सगळ्या पोरांचा; ढीगभर गुलाल-रंग फासून 'बैलाला ढोल, नानाची टांग'चा जल्लोष चालू होता ... मध्येच पालथी मूठ तोंडावर आपटून अबबबब करीत बोंब ठोकणंही चालू होतंच ...
त्या बेभान मुलांकडे बघता बघता अचानकच नजर हेमंतवर खिळली ... चारचौघांपेक्षा वेगळं वागत असलेल्या व्यक्तीकडे नजर गेली की नजरबंदी होतेच ... तसंच झालं ... तसं पाहिलं तर विशेष काय होतं त्याच्यात ? गुलालाचे शिंतोडे उडालेली खाकी मळखाऊ रंगाची हाफ चड्डी आणि गुलाल आणि रंगाच्या मिश्रणानी माखलेला काळपट हाफ बुशर्ट ... घारे, पाणीदार डोळे, मूळचा गोरा असावासा वाटणारा पण मैदानात खेळून खेळून उन्हानी रापलेला वर्ण ... वेगळेपण एवढंच होतं की बाकीची मुलं बेभान बोंबलत होती त्याच वेळेला हा मुलगा चम्यासारखा आपल्याच नादातला 'खोया खोया चाँद' होता ... त्यामुळे तो 'अपनी धून में रहता हूँ' टाईप आणि खरंच 'चम्या'च दिसत होता ... अर्थात नंतर मी भेळेच्या नादात आणि हास्यविनोदात मश्गुल होते; तरीही नाही म्हटलं तरी तो चम्या लक्षात राहिला ...
शाळेच्या हिशोबात माझ्या पुढच्या यत्तेत होता चम्या ... आमच्याच चाळीत खालच्या मजल्यावर राहायचा ... त्याची आणि आमची ग्यालरी तशी समोरासमोरच ... त्यावेळी सगळ्यांच्याच घराची दारं उघडी आणि समोरची ग्यालरी हक्काची होती ... त्यामुळे टाईमपास करतांना, अभ्यासाचं वाचतांना, वेणी घालतांना आपोआपच ग्यालरीत रेंगाळणं व्हायचं ... एकदम माझ्या असं लक्षात आलं की चम्याही बराचसा ग्यालरीत असतो ... कितीही नाही म्हटलं तरी होळीच्या रात्रीनंतर हळूहळू चम्याकडे जरा 'विशेष' लक्ष जायला लागलं होतंच ... काहीतरी व्हेग अशी 'आगळीच जाणीव' सुद्धा निर्माण व्हायला लागली होती ... अर्थात ही सुरुवातच होती आणि तीही माझ्यापुरतीच होती हेही खरं .... पण नंतर कॉलनी सोडून जाईपर्यंत माझं हे समोरचं 'ग्यालरी दर्शन' सिक्रेटली चालू होतं ... एकदोन वेळा तर त्याची-माझी नजरानजर सुद्धा झाली पण दोघांनीही - बहुदा बावळटपणानी - आपापली नजर हटवली ... त्यामुळे 'दुर्घटना' (?) घडली नाही आणि 'आखोंही आखोंमे इशारा'ही झाला नाही ... माझंच आपलं 'चुपके चुपके प्यासे प्यासे कुछ हम' हेच चालू राहिलं ...
बोल बोल म्हणता मी दहावी उत्तम मार्कांनी पास झाले आणि कॉलेजला कॉमर्स साईडला जायलाही लागले ... मी बारावीत असतांना बाबांची ट्रान्सफर पुण्याला झाली आणि त्या निमित्तानी आम्ही कॉलनी सोडली ... हळूहळू जमाना बदलत होता, मीही बदलत होते ... नव्या शहरात आले होते त्यामुळे की काय पण; थोडीथोडी बोल्डही व्हायला लागले होते ...
तशी काही मी 'प्रेमवेडी राधा' वगैरे झाले नव्हते; पण तरीही मध्येच चम्या आठवून आणि मनात वादळ उठवून जायचा ... याच दरम्यान कॉलेजच्या मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये एक जनरल 'पात्र' म्हणून चम्याचा किस्सा सांगितला ... दोघीतिघी खास जिवाभावाच्या होत्या; त्यांना 'मनकी बात'सुद्धा सांगितली ...
"काय स्वप्ना तू ? ... अगं त्याच्याशी सरळ बोलायचंस तू !" स्मिता एकदम उसळलीच.
"छे गं ! अगं त्याच्या मनात काय होतं याचा मला कुठे पत्ता होता ? कदाचित त्याच्या मनात अजिबात तसलं काही नसेल !"
"तू त्याला निदान इन्डायरेक्ट मेसेज तरी द्यायचास !"
"कशाला इन्डायरेक्ट वगैरे फालतूपणा ? ... अगं एकाच चाळीत होतात ना तुम्ही दोघं ! जिन्याबिन्यात त्याला गाठून सरळ विचारून टाकायचं." सायली फिस्कारली ... तिचा स्वभावच एक घाव दोन तुकडे करण्याचा होता ...
"छे ! मी स्वतःहून असलं वेडं धाडस कसं करणार ?"
"नाहीतर तुझ्या तिकडच्या कॉलनीतल्या काही मैत्रिणी असतीलच ना ? त्यांना सांगून त्यांच्या थ्रू तरी तुझा इंटरेस्ट त्याला कळवायचास" स्मिताला अगदी राहवत नव्हतं.
"काहीही काय बोलतेयस स्मिता ? अगं तुम्हा पुणेकर पोरींना आमच्या मुंबईच्या चाळींची काय खासियत आहे याचा काही अनुभव नाहीये ... असली गोष्ट मी उघड माझ्या तोंडानी बोलून चुकले असते तर बघायलाच नको ... ही गोष्ट अख्ख्या कॉलनीभर व्हायला काही तास सुद्धा लागले नसते ..."
"कसली घाबरट आहेस गं तू ! ..." तावातावानी सायली बोलायला लागली ... नुसत्या इथे चर्चा करत बसून काय होणारे ? ... चल मीच तुझ्याबरोबर तुझ्या कॉलनीत येते आणि तुझ्यासमोरच चम्याशी बोलते ... मग काय प्रॉब्लेम आहे तुला ?" सायलीच्या फटकळपणापुढे काही अपीलच नव्हतं ...
"नको सायली ! इतका बिनधास्त मोकळेपणा तुझ्यात असला तरी माझ्याकडे नाहीये ... मुळात त्याच्या मनात काय आहे हे माहीत नाहीये ... त्यामुळे असला डायरेक्ट भेटून विचारण्याबिचारण्याचा वेडेपणा मुळीच नको."
"ठीक आहे मग ! ... तू बस घुम्यासारखी मनातल्या मनात इथेच कुढत ! ..." वैतागून सायली म्हणाली ... पण मग न राहवून पुढे लगेच म्हणाली -
"एक लक्षात ठेव ... तुला कधीही काहीही मदत लागली तर मला सांग ... आय ऍम ऑलवेज देअर टु हेल्प यु ..."
------------
मनात अजिबात प्रेम नसलं तरीही भरपूर सहवासानी एखाद्या व्यक्तीबद्दल प्रेम वाटायला लागतं ... बहुतेक सगळ्या अरेंज्ड लग्नांनंतर असंच घडतं ... चम्याच्या बाबतीत मात्र माझं बरोब्बर उलट घडलं असावं ... बीकॉम होईपर्यंत अजून तीन वर्ष गेली ... नंतर वर्षभर पुण्याला एक पार्टटाईम नोकरीही केली ... तोवर माझ्या मनातला, चम्या प्रकरणातला पहिला ओलावाही ओसरला होता ... आईबाबा हळूहळू स्थळंही बघायला लागले होते ... आणि नाशिकमध्ये घर असलेला आणि
एका खाजगी कंपनीत ऑफिसर असलेला रमेश माझा नवरा होणार हे नक्की झालं ... नोकरी करणं ही तशी माझी वैयक्तिक आवड नव्हतीच; त्यामुळे मी गृहिणीच असणार हेही नक्की झालं ... लग्न झालं
... संसार सुरु झाला ... योग्य वेळी आम्हा दोघांचीही लाडकी सोनाली जन्माला आली आणि मग तिच्या संगोपनात, अभ्यासात आणि संसाराच्या रामरगाड्यात मी इतकी गुरफटून गेले की मला दिवस अपुरा पडायला लागला ...
बघता बघता वर्ष लोटली .... सोनालीनं झकास शिक्षणही घेतलं आणि नोकरीलाही लागली ... एकूणच सोनाली तिच्या आईच्या तुलनेत फारच बोल्ड होती ... त्यामुळेच झट की पट प्रेमात पडून तिनी स्वतःचं लग्न जमवूनही टाकलं ... आमच्यावर फक्त तिचं लग्न धुमधडाक्यात लावून देण्याची जबाबदारी उरली ... या निमित्तानी आपली सगळी जुनी आणि प्रेमातली माणसं लग्नाला बोलवावी असं ठरवलं आणि न राहवून मी रमेशकडे आमच्या मुंबईच्या कॉलनीचा विषय काढला ... रमेशनीही 'त्यावेळच्या शेजाऱ्यापाजाऱ्यांना जरूर बोलाव,' असा ग्रीन सिग्नल दिला ... त्यामुळे या आमंत्रणाच्या निमित्तानी मला मुंबईची आणि कॉलनीची वारी घडली ... नाही म्हटलं तरी; आता मात्र चम्याची आठवण येऊन मनात ठुसठुस सुरु झाली ...
दुपारी चारच्या सुमारास कॉलनीत पोहोचले ... कालानुरूप त्यावेळच्या शेजाऱ्यांपैकी तीनच घरात जुनी ओळखीची माणसं भेटली ... त्यातच आमच्याच चाळीतला आणि साधारण माझ्या बरोबरीचा नाऱ्या आणि त्याचे वयस्कर आईवडीलही भेटले ... जुने विषयही निघाले ... उडत उडत बातम्याही कळल्या ... त्यातूनच ओघाओघानी बोलणं निघाल्यानंतर; चम्या सध्या कॉलनीत राहत नव्हता पण मुंबईतच गोरेगावला राहत होता आणि तो सेल्सटॅक्स मध्ये ऑफिसर होता, हेही कळलं ... छातीत एक बारीकशी कळ उठली
...
आता थोडाफार वेळ मिळायला लागला ... सोशल मिडियाची आणि त्यातही व्हाट्स अप आणि फेसबुकची माहिती करून घेऊन मी नुकतीच थोडीथोडी त्यामध्ये रमायला शिकले होते ... आणि अगदी परवाच फेसबुकवर एक कथा वाचनात आली ... या कथेचा नायकही चाळीचाच रहिवासी आणि त्याचंही त्याच चाळीतल्या मुलीवर एकतर्फी प्रेम ... त्याचंही प्रेम लाजऱ्याबुजऱ्या स्वभावामुळे अव्यक्त राहिलेलं आणि कालानुरूप विसरलं किंवा दूर सारलं गेलेलं ...
कथा वाचता वाचताच हुरहूर दाटून यायला लागली ... बरेचसे संदर्भ जुळत गेले ... अगदी बरोब्बर ... माझ्या चम्याचीच कथा होती ती ....
@प्रसन्न सोमण
१९/०४/२०१९.प्रसिद्धी - अभूतपूर्व (जानेवारी २०२४)