Friday, 4 January 2019

#थोडी_गाणी_आणि_थोडा_माझा_फापटपसारा - ४) इतर काही अल्पपरिचित कलाकार ...


#थोडी_गाणी_आणि_थोडा_माझा_फापटपसारा
#इतर_काही_अल्पपरिचित_कलाकार...

) इतर काही अल्पपरिचित कलाकार ...

गायिका गानप्रभा प्रभा अत्रे यांच्याबद्दल संगीतप्रेमींना काहीच सांगायला नकोय ... त्यांचा 'जागू मैं सारी रैना'वाला 'मारुबिहाग' आणि 'तन मन धन तोपे वारू'वाला 'कलावती' या रेकॉर्डस् माहीतच नाहीत असा संगीतप्रेमी सापडणं अशक्य ... किंबहुना असा माणूस असलाच तर तो संगीतप्रेमी नव्हे, हे नक्कीच ... पण प्रभाताईंच्या कनिष्ठ भगिनी गायिका उषा अत्रे-वाघ यांच्याबद्दलची माहिती ? ... इंटरनेटवर तरी जवळजवळ ‘ना के बराबर ... उषाताई म्हणे गाणं अजिबात शिकल्याच नाहीत ... प्रभाताईंचं गाणं ऐकून-बघून उषाताई डायरेक्ट गायलाच लागल्या ... प्रोफेशननी उषाताई डॉक्टर होत्या ... त्या थोडंस्सं लाईट म्युझिक गायल्या आणि एकूणच असंही दिसतंय की त्यांनी म्युझिक लाइटलीच घेतलं ... उपलब्ध असलेली मोजकी पाच गाणी लक्षात घेतली तर या त्यांच्या म्युझिक लाइटली घेण्यामुळे रसिकांचं नक्कीच नुकसान झालंय ... उषाताईंच्या पाच गाण्यांमधली सुद्धा फक्त दोन सोलो गाणी म्हणजे ... 'घर दिव्यात मंद तरी बघ अजून जळते वात' (संगीतकार गजानन वाटवे / भावगीत) हे एक बेहेतरीन गाणं आणि दुसरं ... 'मी सांगू कसे रे आज मनातील तुजला' (संगीतकार रंजना प्रधान / भावगीत) हे जरा तुलनेनं कमी प्रसिद्ध, पण अप्रतिम गाणं ... बाकीची तिन्ही गाणी सुधीर फडके यांच्या बरोबरची ड्युएट्स आहेत ... या ड्युएट्स मधली दोन मंजुळ भावगीतं आहेत - 'ते स्वप्न भाववेडे नयनी समूर्त होते फुलते मनात माझ्या अपुले अबोल नाते' आणि 'भावविकल ओठावर शब्द विकल जाहले आर्त धुंद गीतातील सूर सूर संपले' (दोन्ही गाण्यांचे संगीतकार सुधीर फडके) .... तिसरं ड्युएट मात्र चित्रपटगीत आहे आणि ते आहे अत्यंत सुंदर आणि अतिप्रसिद्ध असं 'नवीन आज चंद्रमा नवीन आज यामिनी' (संगीतकार सुधीर फडके चित्रपट उमज पडेल तर) ... बस्स ! फक्त या पाच अप्रतिम गाण्यांनंतर गायिका म्हणून उषाताईंची कारकीर्द संपली .... हे काही अर्थातच योग्य झालं नाही ...

खरं म्हणजे मराठीत तरी कृष्णा कल्ले यांची गणना कमी प्रसिद्ध गायिकांत करणं तितकंसं योग्य होणार नाही. कृष्णाताई बऱ्यापैकी प्रसिद्ध होत्या ... पण तरीही मराठीतल्या लोकप्रिय गायक गायिकांच्या आठवणी काढतांना, पहिल्या उमाळ्यात तरी, पटकन कृष्णा कल्ले हे नांव बहुदा येणार नाही ... कृष्णाताईंबद्दलची माहिती विकिपीडियावर वाचली आणि योगायोगाची गम्मत वाटली ... कारण ही मूळची कानडी गायिका वडिलांच्या नोकरीमुळे बालपणी कानपूरला होती. नातेवाईकांकडे म्हणून कृष्णाताई मुंबईला आल्या आणि कुठेतरी अरुण दातेंनी त्यांचा आवाज ऐकला. त्यांनी कृष्णाताईंचा यशवंत देव यांच्याशी परिचय करून दिला आणि हळूहळू या योगायोगाच्या साखळीमुळेच कृष्णाताईंची गायिका म्हणून करीयर सुरु झाली. आठवणीतली गाणी साईटवर त्यांची ३७ गाणी आहेत. बऱ्याच संगीतकारांकडे त्यांनी गाणी गायलीयत आणि गाण्यांमध्ये विविधतासुद्धा लक्षणीय आहे. त्यामध्ये ‘अशी नजर घातकी बाई गं उभ्या उन्हात सुकली जाई गं (संगीतकार श्रीनिवास खळे) सारखी अनोख्या चालीची लावणी आहे. ‘उठ शंकरा सोड समाधी (चित्रपट पडछाया, संगीतकार डीडी उर्फ दत्ता डावजेकर) सारखं शास्त्रीय संगीताच्या पार्श्वभूमीवरचं कठीण गाणं आहे. ‘गोडगोजिरीं लाजलाजरी ताई तू होणार नवरी (सहगायिका उषा मंगेशकर, चित्रपट धर्मकन्या, संगीतकार हृदयनाथ मंगेशकर) आणि ‘मैनाराणी चतुर शहाणी (संगीतकार श्रीनिवास खळे) यासारखी सुंदर बालगीतं आहेत, ‘देश हीच माता (चित्रपट जिव्हाळा, संगीतकार श्रीनिवास खळे) सारखं देशभक्तीपर गाणं आहे ‘अंतरंगी रंगलेले (संगीतकार अनिल मोहिले), ‘चंद्र अर्धा राहिला आणि ‘मन पिसाट माझे अडले रे थांब जरासा (दोन्ही गाण्यांचे  संगीतकार यशवंत देव), ‘पत्र तुझे ते येत अवचित लाली गाली फुलते नकळत (संगीतकार बाळ चावरे) यासारखी गोड भावगीतं आहेत ‘रामप्रहरी रामगाथा रंगते ओठावरी (संगीतकार श्रीनिवास खळे) सारखी भक्तिगीतं आहेत आणि ‘श्रीरंग सावळा तू मी गौरकाय राधा (सहगायक अरुण दाते, संगीतकार अनिल मोहिले) सारखं मंजुळ द्वंद्वगीत सुद्धा आहे. ...

अल्पपरिचित कलाकारांच्या आठवणी काढतांना आणखी एका अप्रसिद्ध गायक कलाकाराची आठवण काढल्याशिवाय मला राहावतच नाहीये ... तो गायक आहे पु.ल.देशपांडे ... होय ... खरं म्हणजे, संगीतकार म्हणून पु.ल.चांगल्यापैकी प्रसिद्ध आहेत; पण गायक म्हणून पु.ल.अल्पपरिचित म्हणायला हरकत नसावी .... माझ्या बालपणीच्या आठवणीत मी कधीमधी 'बाई या पावसानं' (भावगीत / संगीतकार जी.एन.जोशी) हे 'नाटक सारखं दणदणीत गाणं' रेडियोवर ऐकलेलं होतं पण अर्थातच तेव्हा हे पु.लं.नी गायलंय वगैरे काही समजत नव्हतं ... पुढे जाणतेपणीच ते समजलं ... पु.लं.नीच पुढे वसंतराव देशपांडे यांच्यावरच्या लेखात लिहिल्याप्रमाणे तरुणवयात पुण्यात भावगीत गायक म्हणून पु.ल. व त्यांचा साथीदार तबलावादक म्हणून वसंतराव यांनी काही घरगुती मेहफिली केलेल्या होत्या ... तरुण वसंतरावांच्या गाण्याची तारीफ करताकरता पु.लं.नी लिहिलंय ... "एव्हाना वसंताने माझे कान साफ खराब केले होते ... मलाच माझे गाणे ऐकवेना ..." स्वतः पु.लं.नी स्वतःच्या गाण्याची अशी चेष्टा-मस्करी केल्याचं आधीच वाचनात आलं होतं ... ‘बाई या पावसानं’ हे गाणं कानावर पडलेलं असलं तरी व्यवस्थित ऐकलेलं नव्हतं ... पुढे आठवणीतली गाणी साईटवर पाहिलं तर गायक पु.लं.ची तीन गाणी आहेत .... ‘बाई या पावसानं’ (भावगीत / संगीतकार जी एन जोशी), ‘पाखरा जा त्यजुनिया’ (नाटक - संगीत वहिनी / संगीतकार श्रीधर पार्सेकर) आणि ‘ललना कुसुम कोमला’ (नाटक - संगीत वहिनी / संगीतकार श्रीधर पार्सेकर) ... तिन्ही गाणी नीट ऐकली आणि गायक पु.ल.देशपांडे सुद्धा मला खूप आवडले ... त्यांचा आवाज खूप सुरेल आणि पुरेशी फिरक असलेला होता ... पण त्यांनी स्वतःच गाणं (स्वतःचं गाणं) सिरियसली घेतलं नाही ... अर्थात तेही ठीकच आहे ... हे एक क्षेत्र तरी त्यांनी इतरांना गाजवण्यासाठी शिल्लक ठेवलं ... (त्या गाजवणाऱ्यांचं पु.ल. मोकळ्या मनानं तोंड भरून कौतुक नक्कीच करत असत.) ...

जुन्या ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही च्या जमान्यातसांगत्ये ऐका,’ ‘वैजयंता,’ अशा तमाशापटातील गाणी ऐकता ऐकता अशीच अजून एक अपरिचित गायिका मनापासून आवडली ... माझ्या आईकडून मला तिचं नांव कळलं ... ती म्हणजे मधुबाला जव्हेरी (चावला) ... तिची जेमतेम /१० गाणी आठवणीतली गाणी साईटवर दिसतात ... पैकी फक्त दोनच भावगीतं आहेत आणि दोन्हीही माझी खूप आवडती आहेत ... एक आहेअंबरात नाजुकशी चंद्रकोर हासे’ आणि दुसरं आहेजिवाच्या जिवलगा नंदलाला रे’ (दोन्ही गाण्यांचे संगीतकार यशवंत देव) ... बाकीची गाणी चित्रपटगीतं आहेत ... त्यामध्येआज मी आळविते केदार’ (संगीतकार वसंत पवार / चित्रपट अवघाची संसार) खूपच गाजलेलं आहे ... बहुदा या लोकप्रियतेमुळेच 'मी आळविते जयजयवंती' (संगीतकार राम कदम / चित्रपट भाग्यलक्ष्मी) हे अजून एक चांगलं गाणं तिला गायला मिळालं; ते मात्र फारसं गाजलं नाही. ‘सप्रेम नमस्कार विनंती विशेष’ (सहगायक वसंतराव देशपांडे / संगीतकार वसंत पवार / चित्रपट वैजयंता) आणिसांगा या वेडीला’ (सहगायक विठ्ठल शिंदे / संगीतकार वसंत पवार / चित्रपट सांगते ऐका) ही ड्युएट्स मात्र गाजली ... फार गाजली नसली तरी मला मात्रकाल रात सारी मजसी झोप नाही आली, (संगीतकार वसंत पवार / चित्रपट सांगत्ये ऐका) ही बैठकीची लावणीसुद्धा खूप आवडते.

या, नाही म्हटलं तरी पांढरपेशांची गाणी सादर करणाऱ्या, कलाकारांबरोबरच; लोकगीतं सादर करणारे कलाकार आणि त्यांची काही लक्षणीय लोकगीतंही माझ्या आठवणींत आघाडीवर आहेत ... नमुन्यादाखल उल्लेख करायचा तर त्यात ‘डोंगरी शेत माझं गं मी बेनू किती’ आणि ‘सुटला वादळी वारा’ म्हणणारे शाहीर अमर शेख आहेत; ‘काठी न घोंगडं घिऊं द्या की रं’ म्हणणारे शाहीर निवृत्ती पवार आहेत; ‘तुझी भलं रं तुझी भलं रं भलगडी दादा भलं रं’ आणि ‘सनई वाजे मंजुळ नादें’ म्हणणारे शाहीर पुंडलिक फरांदे आहेत; ‘गंगा जमुना दोघ्या बहिणी गो पानी झुळझुळ व्हाय,’ ‘चांदनेन चांदनं पीठभर चांदनं’ आणि ‘लाय लाय लाय लाय लायेकरनी’ म्हणणारे बालकराम वरलीकर आहेत ... ही वेगळीच झींग असलेली कोळीगीतं, लोकगीतं पूर्वी एका प्रसंगात फारच महत्वाची होती ... ‘प्रासंगिक करार’वाल्या येस्टीत ३५/४० जणांच्या जथ्यासहित धमाल ट्रीपला निघालेलो असलो की येस्टीच्या पत्र्यावर जोरात ताल धरून बोंबलून बोबलून गायला ही कोळीगीतं, लोकगीतंच हवीत ... अशावेळी जोरजोरात गावून, वेसावच्या पारूला, लायेकरनीला नाहीतर वाकड्या तोंडाच्या गोवेकरनीला हाळी घालतांना भलताच जोर चढायचा ... बालपणीच्या अशाच एका ट्रीपमध्ये मी 'बांधावरले घुमटे तुजं नांव काय, माज्या नावाशी तुला करायचं काय' असं एक लोकगीत ऐकलं होतं ... नावाबद्दल सांगतांना पुढे हे गीत छान मनोरंजक होतं ... या गीताची रेकॉर्ड नसल्यामुळे पुढच्या आयुष्यात हे गीत मी कधीच ऐकलं नाही ... अर्थात आताशा घरोघरी चारचाक्या झाल्यापासून अशा ह्या समूह ट्रिप्सना आळा बसलाय ... लोकगीतातून लायेकरीन, वाकड्या तोंडाची गोवेकरीन, वेसावची पारू वगैरेंनीही कल्टी मारलीय आणि त्याजागी ‘शांताबाई’ भलतीच लुडबुड करून राहिल्यायत आणि भावगीतातल्या झिमझिम झरणाऱ्या श्रावणधारांचं पाणी जिरून जाऊन त्याचं ‘गढुळाचं पाणी’ होऊन लोकगीतांतून कारंजासारखं उडायला लागलंय ..... लोकगीतांच्या आठवणी काढतांना मी शाहीर साबळेंना जाणीवपूर्वक बाजूला ठेवलंय कारण शाहीर साबळे हे अल्पपरिचित तर नाहीतच; पण आयुष्यभर खूप कष्ट घेऊन महाराष्ट्रभर पसरलेलं लोकसंगीताचं भांडार जगासमोर आणण्यासाठी अपरंपार कष्ट करणारे आणि झटणारे ते एक खूप आदरणीय कलाकार आहेत ..... आजही जुनी लोकगीतं कानावर पडली तर ‘मुंबई ब’ ची सकाळी ११ वाजून २ मिनिटांनी असलेली शनिवारची कामगारसभा हटकून आठवतेच ...          

ताजा कलम) मी फक्त रेकॉर्ड्सच्या आधारे आणि 'आठवणीतली गाणी' या साईटच्या आधारे लिहिलंय आणि )उल्लेखलेली गाणी 'आठवणीतली गाणी' या साईटवर किंवा 'यु ट्यूब'वर ऐकायला मिळतील ...

@प्रसन्न सोमण
३०/१२/२०१८.

No comments:

Post a Comment