#थोडी_गाणी_आणि_थोडा_माझा_फापटपसारा
#काही_सांगितिक_किस्से...
५)
काही सांगितिक किस्से ...
संगीतावर, गाण्यांवर काही लिहायला
जाणं, म्हणजे काही साधं काम नाही महाराजा .... त्यासाठी फक्त कानसेन असून भागत नाही
... त्यासाठी एकतर तुम्हाला संगीतामधली उत्तम जाणकारी लागते किंवा पुढे घुसून कलाकारांच्या
ओळखी काढून, त्यांच्या मुलाखती घेऊन, त्यांचा संगीतप्रवास, किस्से, इत्यादी जाणून घ्यावे
लागतात (ही पद्धत शक्यतो पत्रकारांची ... कामाचा एक भाग म्हणून ...) किंवा मग निदान
लिखाणासाठी भरपूर संदर्भ शोधून, मुद्दाम त्या हेतूनी भरपूर वाचन वगैरे करायचे कष्ट
घेऊन मग संगीतविषयक माहिती, आठवणी, किस्से, इत्यादींचं निवडण-पाखडण करून ते आपल्या
भाषेत मांडून लिखाण सजवावं लागतं .... लिहिणारा नुसताच माझ्यासारखा कानसेन असेल तर
मग आजकाल इंटरनेटच्या मदतीने (बसल्या जागी किमान तेवढे सर्फिंगचे आणि टाईप करण्याचे
कष्ट तर करावेच लागणार ना !) आवडत्या गाण्यांची जंत्री देऊन आणि संगीतकार, गायक इत्यादींवर
स्तुतीपर लिहून त्याला लिखाण गुंडाळावं लागतं ... लिहिणारा संगीतातला तज्ञ् असेल तर
तो गाण्यासाठी वापरलेला राग, सुरांची सरगम देऊन योजलेली सुरावट, आवाजातली आंदोलनं, हरकती,
मुरक्या, कलाकारांचा कलानिर्मितीचा उन्मेष, त्यांच्या कलेला फुटलेले सृजनशील (की सर्जनशील
? ... माझा नेहमीच गोंधळ होतो ... कारण इथे खेळीमेळीच्या मूडमध्ये हे शब्द वापरले तरी
हे शब्द काही 'माझे' नव्हेत.) नवनिर्मितीचे धुमारे, इत्यादी गोष्टींबद्दल उसासून लिहितो
.... मी नक्कीच इतका तज्ञ् नाही आणि मला कलेचं अशा पद्धतीचं ‘पृथःकरणात्मक विश्लेषण’
फारसं आवडतही नाही. (पोटफोड्या 'ष' आणि शेंडीफोड्या 'श' आपापल्या योग्य जागी असावेत,
अशी आशा आहे ... तसंही 'विश्लेषण' आणि 'डिसेक्शन' या दोन शब्दांत साधर्म्य आहेच.)
.... त्यामुळे आवडत नसलेल्या गोष्टी मी कशा लिहिणार ? .... आवडतच नसलेल्या गोष्टी लिहायला
ती परीक्षेची उत्तरपत्रिका थोडीच आहे ? .... दुसरं म्हणजे संगीताबद्दलची माहिती, किस्से,
आठवणी लिहिण्याच्या हेतूनी शोधायच्या म्हणजे मुद्दाम फक्त त्यासाठी म्हणून लायब्रऱ्यांचे
उंबरठे झिजवणे, शोध घेणे, वाचणे, साधनसामुग्री मिळवणे, इंटरनेटवरची बसल्या जागेची माहिती
कदाचित इंग्रजीत असेल तर अर्थ लावत बसणे, या सगळ्या कष्टप्रद भानगडी येतात, अभ्यास
येतो ... तो तर माझा मुळीच पिंड नाही .... त्यामुळे 'थोडी गाणी आणि थोडा माझा फापटपसारा'
या शीर्षकांतर्गत लिहिलेल्या लेखांचा समारोप करतांना मी गाण्यांचे, कलाकारांचे पूर्वी
वाचलेले, ऐकलेले दोनचार किस्से तेवढे सांगतो झालं ...
सी.रामचंद्र – ‘मलमली तारुण्य
माझे तू पहाटे पांघरावे’ (गायिका आशा, चित्रपट घरकुल, संगीतकार सी.रामचंद्र) हे कमालीचं
सुंदर आणि माझं भन्नाट आवडतं गाणं ... बऱ्याच नंतर मी नूरजहाँचं ‘दोस्त’ सिनेमातलं
‘बदनाम मुहब्बत कौन करे’ (संगीतकार सज्जाद हुसेन) हे हिंदी गाणं ऐकलं व त्याची अवघड
कंपोझिशन आणि टिपिकल तिचंच असू शकतं असं नूरजहाँचं सादरीकरण दोन्ही मला खूपच आवडलं
... त्याहीनंतर कधीतरी इसाक मुजावरांच्या लिखाणात सी.रामचंद्र अण्णांचा एक इंटरेस्टिंग
किस्सा वाचला ... स्वतः अण्णा नूरजहाँचे आणि सज्जादच्या अनोख्या, मुश्किल कंपोझिशन्सचे
जबरदस्त फॅन होतेच ... त्यामुळे अण्णांनी म्हणे ‘बदनाम’ गाण्यावरून ‘मलमली’ची चाल चोरली
... स्वतः ‘मलमली’ गाण्याचा संगीतकारच मुलाखतीतून अशी कबुली देत होता ... आता ‘बदनाम
मुहब्बत’ या दोन शब्दांची आणि ‘मलमली तारुण्य माझे’ या तीन शब्दांची चाल एकच आहे, सारखी
आहे, हे खरंच आहे (इच्छूकांनी दोन्ही गाणी ऐकावी; ऐकावीच) ... त्यामुळे ‘बदनाम’ या
गाण्यामुळे अण्णा इन्स्पायर झाले असतील, हे समजण्यासारखं आणि थोडा विचार केला तर पटण्यासारखं
सुद्धा आहे; पण ‘बदनाम’ची चाल चोरली असं खुद्द अण्णा म्हणाले असले तरी मला ते मान्य
होण्यासारखं नाहीये कारण ‘मलमली’ हे पूर्ण वेगळं, दोन तालांच्या वजनातलं बेहेतरीन गाणं
आहे (एकवेळ दोन तालांचं वजन हे साधर्म्य गृहीत धरलं तर अण्णा - आशा कॉम्बिनेशनचंच ‘नवरंग’मधलं
‘आ दिलसे दिल मिला ले’ आठवू शकतं ... फक्त आठवू शकतं ... कारण ही दोन गाणीसुद्धा पूर्णपणे
वेगळीच आहेत. 'आ दिलसे दिल मिला ले' गातांना आशा तोंड फाकवून ‘मिमिक्री स्टाईल’मध्ये
गायलीय, हे या संदर्भात गैरलागू.) ... अण्णांचं अगदी अस्संच झालंय ‘शारदा’ नाटकातल्या
‘मूर्तिमंत भीती उभी’ या पदाबद्दल ... अण्णांना म्हणे असंच वाटत होतं की आपण ‘मूर्तिमंत
भीती उभी’वरून ‘ये जिंदगी उसकी है’ (गायिका लता - चित्रपट अनारकली - संगीतकार सी रामचंद्र)
चोरलंय ... नंतर कोणीतरी त्यांना सांगितलं की पहिल्या ओळीतले सुरुवातीचे चार स्वर सोडल्यास
दोन्ही गाणी पूर्णतः भिन्न आहेत .... इसाक मुजावरांनी घेतलेल्या त्याच मुलाखतीत म्हणे
अण्णा पुढे असंही म्हणाले की ... “मला ‘मलमली’ फारसं आवडत नाही कारण मी सज्जादचं ‘बदनाम’
चोरलंय आणि नूरजहाँ इतकं चांगलं आशाला मुळीच गाता आलेलं नाहीये” .... माय गॉड ! हे
वाचून तर माझ्या डोळ्यांची बुब्बुळं खोबणीतून बाहेर पडायची शिल्लक उरलीवती ... अरे
! अण्णा स्वतः संगीतकार असले म्हणून काय झालं ? ... इथे आम्ही संगीतप्रेमी रसिक बसलोय
ना न्यायनिवाडा करायला !! ... (माझी ही शैली सहीसही शिरीष कणेकरांच्या धर्तीवर गेलीय
हे खरं, पण या क्षेत्रातले ते माझे आवडते लेखक असल्यामुळे प्रभावित होऊन तसं होणारच
... कणेकरांच्या एका मुलाखतीत स्टाईल कॉपी करूनही लेखक कणेकरांचा नामोल्लेख करत नसल्याबद्दलची
तक्रार ऐकली होती म्हणून हा नामोल्लेख ... दुसरं असं की ‘कॉपी केलीय’ या शब्दांपेक्षा
‘प्रभावित झालोय’ हे शब्द वापरले की गुन्हा बराच डायल्युट झालाय असं आपलं उगाच वाटतं
... )
मला वाटतं प्रत्येक गाणं निर्माण
होतांना आपापलं नशीब घेऊन येतं ... 'पुरुषोत्तम सोळांकूरकर' हे वास्तविक खूपच अप्रसिद्ध
असे संगीतकार ... पण त्यांनी माणिक वर्मांना
दिलेलं 'वाजवी मुरली शामसुंदरा' हे भावगीत तेव्हाही खूपच गाजलं आणि आजही ते गाणं प्रसिद्ध
आहे ... हेच गाणं, अर्थातच वेगळ्या चालीत, 'पोस्टातली मुलगी' या चित्रपटासाठी वापरलं
गेलं ... पण हे चित्रपटातलं गोड गाणं; संगीतकार सुधीर फडके / गायिका आशा भोसले या तगड्या
कॉम्बिनेशनचं असूनही; का कोणास ठाऊक; पण तितकंसं गाजलं नाही, हे खरं ...
दुसरे एक अप्रसिद्ध संगीतकार
बाळ माटे यांच्या संगीत दिग्दर्शनानी सजलेला 'अमृताहुनी गोड नाम तुझे देवा' हा माणिकबाईंचा
अभंग सुद्धा अत्यंत गाजला ... एवढा की त्याकाळी मद्रासची प्रसिद्ध गायिका वसंतकुमारी
हिने माणिकबाईंकडून या अभंगाची चाल शिकून घेऊन तामिळ शब्द लिहून घेऊन गाणं रेकॉर्ड
केलं आणि ते तामिळ गाणंही म्हणे तितकंच गाजलं.
श्रीनिवास खळे उर्फ खळेकाका
अत्यंत मेहेनती होते हे खरंच आहे; मात्र उमेदवारीच्या काळात नुसतीच भरपूर मेहेनत, धडपड
... पण फळ मिळण्याचं काही चिन्हंच नाही, या परिस्थितीला ते विलक्षण कंटाळले
... मुळात संगीताच्या नादासाठी ते फक्त त्यांची
हार्मोनियम घेऊन घर सोडून पळून मुंबईला आलेले होते. शिवाय ते त्याकाळात प्रेमविवाह
सुद्धा करून बसले होते ... मात्र प्राप्ती तर काहीच होत नव्हती ... शेवटी निराशेच्या
भरात ते त्यांची अत्यंत लाडकी हार्मोनियम विकून संगीतातली धडपड संपवण्याच्या निर्णयापर्यंत
आले होते ... मात्र त्यांच्या पत्नीने समंजसपणा दाखवून त्यांना परावृत्त केलं, धीर
दिला ... {फार भाग्यवान होते खळेकाका ... पण नेमक्या याच वेळी मला 'अशीच आमुची आई असती'
(गायक व संगीतकार दशरथ पुजारी) हे गाणं का आठवतंय बरं ?} ... पुढे परिस्थिती सुधारली
म्हणून खळेकाकांचं संगीत वाचलं आणि अर्थातच रसिकांचीही संगीत श्रीमंती वाढली ... खळेकाकांचं
‘या चिमण्यांनो परत फिरा’ गीतकार ग.दि.मां.नी खळेकाकांकडूनच सलग अकरा वेळा ऐकलं आणि
विलक्षण प्रसन्न होऊन ग.दि.मा. खळेकाकांना म्हणाले - "गीतकार म्हणून मला काय म्हणायचंय
ते तुला बरोब्बर कसं कळतं रे !"
वास्तविक जुन्या जमान्यात आधी
गाण्यांचं संगीत आणि नंतर त्या चालीत 'फिटिंग केलेले' शब्द असा प्रकार विशेष होत नसे
... माहिती असलेल्या किश्श्यांवरून तरी, बऱ्याचशा कलाकारांनी अशा उलट्या गंगेची 'अनैसर्गिक'
म्हणून संभावना केलेली दिसते ... पण तरीही अपवादात्मक गाणी अशाप्रकारे घडली असावीत
.. पु.लं.नी सांगितलेल्या किश्श्यानुसार त्यांनी ग.दि.मां.ना विणकाराच्या हातमागाचा
ऱ्हिदम तोंडाने ठाक ठाक करून ऐकवला आणि डॅ डॅ डॅ डॅ डॅ च्या भाषेत चाल ऐकवली तेव्हा
त्यानुसार ग.दि.मां.नी झटक्यात 'कबीराचे विणतो शेले' (चित्रपट - देव पावला / गायिका
- माणिक वर्मा) हे गीत लिहून दिलं ...
असाच दुसरा किस्सा आहे - 'स्वर
आले दुरुनी' (भावगीत - गायक सुधीर फडके - संगीत
प्रभाकर जोग) या गाण्याचा ... संगीतकार प्रभाकर जोग यांनी मुंबईत ही चाल तयार करून
त्याची सरगम पत्राद्वारे, नागपूरला असलेल्या यशवंत देव यांना गीत लिहिण्यासाठी पाठवली
... देवांची समयसूचकता अशी की त्यांनी; स्वर पत्राद्वारे मुंबईतून नागपूरला आल्यामुळे;
‘स्वर आले दुरुनी’ अशी शब्दयोजना करून पुढचं गीतलेखन केलं ...
जुन्या
जमान्यात एच.एम.व्ही.
अर्थात रेकॉर्ड कंपनीच्या
अधिकाऱ्यांचे त्यांचे
त्यांचे म्हणून
काही रेकॉर्डच्या प्रसिद्धी
विषयक ठोकताळे असत
आणि त्यानुसार ते
सरळ कलाकारांना आणि
संगीतकारांना अटीच
घालत असत ... अर्थात
ते साहजिकच आहे
म्हणा कारण हिंदीमध्ये
जसे पैसे घालणारे
निर्माते आणि फायनान्सर्स
सर्वेसर्वा असतात
तद्वत मराठीमध्ये रेकॉर्ड
कंपनीचा अपर
हॅन्ड असणारच
... आपली निर्मिती मोठ्या
प्रमाणात लोकांसमोर
यावी आणि आपल्याला
पैसे-प्रसिद्धीही मिळावी,
यासाठी कलाकार, संगीतकारांना
या अटी मान्य
कराव्याच लागत.
खळेकाका
बडोद्याचे होते
व कुंदा बोकील
ही गायिकाही बडोद्याचीच
होती ... खळेकाकांना कुंदाताईंचं
गाणं आवडतही असे
त्यामुळे त्यांना
कुंदाताईंना सोलो
गाणं देऊन ब्रेक
द्यायचा होता
... पण एच.एम.व्ही.च्या अधिकाऱ्यांना
कॉलेजकुमारी असलेल्या
कुंदाताईंचा पातळ
आवाज भलताच शाळकरी
वाटला आणि त्यामुळे
‘कुंदाताईंच्या आवाजात
आम्ही फक्त बालगीतंच
रेकॉर्ड करू’
असं त्यांनी खळेकाकांना
सांगून टाकलं; त्यामुळे
मग ‘शाळा सुटली
पाटी फुटली’ आणि
‘गमाडी गम्मत जमाडी
जम्मत’ ही दोन
बालगीतंच कुंदाताईंच्या आवाजात प्रथम
रेकॉर्ड झाली
... ही दोन्ही बालगीतं
तुफान गाजल्यानंतर मग
कुंदाताईंची बालगीतांच्या
तावडीतून सुटका
होऊन त्यांना मोठ्या
गायिकेची गाणी
मिळाली.
दशरथ पुजारींची आठवण वर निघालीच आहे तर त्यांच्याविषयी थोडंसं
... दशरथ पुजारी सुरुवातीला खूप
उत्तम आणि तयारीचं
शास्त्रीय संगीत
गात असत; थोडेफार
कार्यक्रम सुद्धा
ते करायचे. त्यामुळे
त्यांनी आपल्या
शास्त्रीय संगीताच्या
रेकॉर्डस् निघाव्या
यासाठी खूप प्रयत्न
केले पण एच.एम.व्ही. च्या अधिकाऱ्यांनी त्यांना ...
‘आधी बाहेर खूप
मैफिली करून प्रसिद्ध
व्हा ... मगच
आम्ही तुमच्या रेकॉर्डस्
काढण्याचा विचार
करू,’ असं सांगून
त्यांची बोळवण
केली ... प्रसिद्ध भावगीत
गायक आणि शिवाय
एच.एम.व्ही.चे अधिकारी
असलेल्या जी.एन.जोशींनीं पुजारींना वेगळीच
कल्पना दिली ... त्यांनी
पुजारींना सांगितलं –
“तुम्ही संगीत देऊन भरपूर
प्रमाणात भावगीतं
निर्माण करा;
म्हणजे मग तुमच्या
गीतांच्या रेकॉर्डस्
काढल्या जातील”
... या निमित्ताने पुजारी
शास्त्रीय संगीतातून
भावगीतांच्या दुनियेत
धडपड करू लागले
... तरीही एच.एम.व्ही.चे दरवाजे
पटकन उघडले नाहीतच ...
त्यांनी पुजारींना
सांगितलं – “तुम्ही
उत्तमोत्तम गायक-गायिकांना घेऊन या
तरच तुमची गाणी
रेकॉर्ड होतील” ...
पण पुजारी सुद्धा
तेव्हा उमेदवारीच्या काळात
संगीतक्षेत्रात धडपडच
करत होते, त्यामुळे
एकदम प्रथितयश गायक-गायिका
आणणं त्यांना जमलं
नसावं ... शेवटी कसं
कोण जाणे पण,
गीतकार श्री.नाना
साठे यांची दोन
गीते गायिका प्रमोदिनी
देसाई या,
त्यामानाने नवख्या असलेल्या, गायिकेच्या आवाजात रेकॉर्ड करण्याचं
एच.एम.व्ही.च्या अधिकाऱ्यांनी मान्य
केलं आणि पुजारी
(एच.एम,व्ही.
रेकग्नाईझ्ड) संगीतकार
झाले. ही दोन
सुंदर भावगीतं आहेत
'श्रीरामा घनश्यामा
आलास कधी परतून'
आणि 'हांस रे
मधू हांस ना.'
.... ही गाणी चांगल्यापैकी
प्रसिद्ध झाली
म्हणूनच आपल्याला
एच.एम.व्ही.च्या रेकॉर्डस्
मार्फत पुजारींचं सुंदर
संगीत ऐकायला मिळालं,
पण तरीही त्यांनी
संगीत दिलेली कैक
गाणी लाईव्ह कार्यक्रमांमधून गाजली पण
त्यांच्या रेकॉर्डस्
निघाल्या नाहीत
त्या नाहीतच.
एच.एम.व्ही.च्या
अधिकाऱ्यांचा पुजारींच्याच
संदर्भातला अजून
एक किस्सा आहे
– ‘चांदणे ते तेच
मधुबन ती निशा
शरदातली’ या सौ.अनुराधा साळवेकर यांच्या गीताला पुजारींनी
सुंदर चाल लावली;
पण या खेपेला
एच.एम.व्ही.च्या अधिकाऱ्यांना गीताचं
काव्यच पसंत पडलं
नाही आणि ते
गीत रेकॉर्ड झालं
नाही ... आपली सुंदर
चाल फुकट जाऊ
नये म्हणून पुजारींनी
नांदगावकरांच्या भेटीत
त्यांना चाल
ऐकवून त्यावर गीत
लिहायला सांगितलं.
ही भट्टी मात्र
जमली आणि 'रात्र
आहे पौर्णिमेची तू
जरा येऊन जा'
(गायिका सुमन कल्याणपूर)
हे अनुपम भावगीत
जन्माला आलं
... म्हणजेच चाल
आधी आणि त्यावर
गीत असाही अजून
एक किस्सा ...
‘सावळाच
रंग तुझा’ (गायिका
माणिक वर्मा
- संगीतकार सुधीर
फडके) या भावगीताच्या
अलोट लोकप्रियतेविषयी काही
सांगायलाच नकोय
... पण या गाण्याविषयीचा किस्सा स्वतः
माणिकबाईंनीच ‘सावळाच
रंग तुझा’ या
कॅसेटवर सांगितलाय
... तो त्यांच्याच शब्दात
देतोय ...
"सावळाच रंग
तुझा हे माझं
सर्वात लोकप्रिय ठरलेलं
भावगीत ... विख्यात संगीतकार
सुधीर फडके उर्फ
बाबूजींनी माझ्याकडून
दोन महिने तालीम
करून घेऊन चार
गाणी बसवली. प्रत्येक
जागा-अन-जागा गळ्यातून
घोटून घेऊन, त्यांचं
समाधान झाल्यानंतरच, त्यांनी
(बाबूजींनी) त्या
गाण्याच्या रेकॉर्डिंग
साठी एच.एम.व्ही.ला माझं
नाव सुचवलं. परंतु
एच.एम.व्ही.चे अधिकारी
जरा साशंकच होते.
कारण माझी शास्त्रीय
संगीताची मेहेनत
जास्त असल्यामुळे सुगम
संगीतासाठी त्यांना
माझा आवाज योग्य
वाटत नव्हता
... परंतु बाबूजींच्या अत्याग्रहामुळेच ‘सावळाच रंग
तुझा’ ही ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाली
... नंतर मात्र सारा
रंगच पालटून गेला
... या गीतानी मला
अक्षरशः धवल
कीर्तीच्या शिखरावर
आरूढ केलं ... माझ्या
कुठल्याही मेहफिलीत
या गीताची फर्माईश
झाली नाही असं
कधी झालंच नाही
... चाळीस वर्षांनंतर सुद्धा
मॉरीशसला झालेल्या
मराठी जागतिक परिषदेत
रसिकांच्या आग्रहाखातर
त्यांनी मला
हे गीत गायला
लावलं" .... --- या
गाण्यानंतर भावगीत-भक्तीगीत गायिका
म्हणून मराठी मनांत
माणिकबाईंचं काय
स्थान आहे, हा
इतिहास आहे ... त्या
कलाकारांचं आणि
आपलंसुद्धा नशीब
खरोखरच थोर म्हणून
तेव्हा, कसं का
होईना पण, ‘सावळाच
रंग तुझा’ रेकॉर्ड
झालं ... अन्यथा कदाचित
माणिकबाई या
फक्त शास्त्रीय संगीत
गाणाऱ्या गायिकाच
राहिल्या असत्या
...
कलाकारांच्या
उमेदवारीच्या काळात;
... 'ही दोन वेण्यांवाली
परकर पोलक्यातली महाराष्ट्रीय
मुलगी गाण्यामध्ये काय
उजेड पाडणार ?' असा भाव मनात बाळगून, साक्षात स्वरलतेला
कमी लेखणारी हिंदी
चित्रपटसृष्टीतली तज्ञ्
मंडळी काय आणि
ही 'एच.एम.व्ही.चे अधिकारी,'
नामक माणसं काय
? ... एकुणात त्याहीकाळी 'बिग
बॉस' होते म्हणायचे
...
ताजा कलम – १) मी फक्त रेकॉर्ड्सच्या आधारे आणि 'आठवणीतली गाणी' या साईटच्या आधारे लिहिलंय आणि २)उल्लेखलेली गाणी 'आठवणीतली गाणी' या साईटवर किंवा 'यु ट्यूब'वर ऐकायला मिळतील ...
@प्रसन्न सोमण.
०८/०१/२०१९.