शीर्षक
- परिस्थितीची प्रश्नचिन्हं .....
कुणी चांगल्या सायकॅट्रिस्टचा रेफरन्स द्याल
का ? ... मला खरंच सायकॅट्रिस्ट हवाय ...
-----
जयुवर माझं खूप प्रेम आहे ... पण तरीही हल्ली
आमच्या कुरबुरी, आमची भांडणं नक्कीच व्हायला लागलीयत ... शेवटी प्रेम प्रेम म्हटलं
तरी त्या व्यक्तीशी अगदी एकरूप होणं शक्यच नसतं ना ! ... तशी फक्त कृष्णाशी राधा एकरूप
झालीवती म्हणे ... जस्ट पुराणातली वांगी ... त्यातही राधा - म्हणे - कृष्णाशी एकरूप
झालीवती; पण कृष्ण नव्हे ... कृष्णाच्या बाबतीत सोयीस्कर मौनच आहे ... बहुदा म्हणूनच
'राधाकृष्ण' म्हणतात, 'कृष्णराधा' नव्हे ... ते असो ... जयु आणि मी दोन वेगळ्या व्यक्ती
आहोत ... दोन व्यक्ती म्हटल्यावर दोन मनं आली, अनेकविध मतं आली आणि पर्यायाने मतभेद
आलेच ... त्याला काय करणार ? मतभेदांचं मुख्य, किंवा कदाचित एकमेव, कारण आमचा आमोद
...
सगळं सुरुवातीपासूनच सांगू का ? ..... सांगायला
तर हवंच ... सांगण्यासाठीच तर लिहितोय ना ! ...
शिक्षण आटोपल्यानंतर, अर्निंग सुरु झाल्यानंतर;
धर्म, जात-पात, स्टेटस अँड ऑल, यांचा ठोकताळा मनात बांधूनच आमचं प्रेम, लग्नाच्या आणाभाका
असं सगळं साग्रसंगीत पार पडलं ... पण वेगळा संसार मांडायचाय हे ठरलंच होतं ... त्यामुळे
मनासारख्या जागेची तजवीज होईस्तोवर लग्न लांबलं ... लग्नानंतर 'एन्जॉय' करायचं असल्यामुळे
पाळणा थोडा अधिकच लांबला ... आणि पहिल्या पाळण्याची चाहूल लागेस्तोवर जयुनी तिशी पार
केली ... अर्थात दोघांनीही आधीच्या पिढीच्या ओढगस्तीच्या संसाराबद्दल बरंचसं ऐकलं-वाचलं
होतं; थोडंफार अनुभवलंही होतं ... ती ओढगस्त आपल्या संसारात नको नको म्हणता म्हणता
'हवं हवं' ते सारं जमवेस्तोवर जरा जास्तच उशीर झाला खरा ... जयुच्या वयाच्या बत्तिशीला
बाळाची चाहूल लागली ... प्रेग्नन्सीच्या काळात सारं काही आलबेल होतं ... योग्य वेळी,
थोडीफार कॉम्प्लिकेशन्स होऊन का होईना, आमची गोंडस छोकरी जन्माला आली ... कॉम्प्लिकेशन्स
फक्त जयुच्या तब्येतीबाबत होती ... त्यामुळे जयु पुढे कधीही गरोदर राहता कामा नये,
असा मेडिकल इशारा आम्हाला दिला गेला ... अर्थात गोंडस छोकरीच्या जन्माच्या आनंदात आम्ही
ही वस्तुस्थिती सहजच मान्य केली .... जयु बाळासह सुखरूप घरी आली .... सुखानी भरलेला
महिना हा हा म्हणता संपला आणि ... सुखी संसाराच्या दुधात दुर्दैवाचं विरजण पडलं
... बाळाला कावीळ झाल्याचं निमित्त झालं आणि इतर गुंतागुंत वाढत जाऊन आमच्या बाळाचा
मृत्यू झाला ... दोघंही हताश झालो .... सुरुवातीला लाइटली घेतलेल्या 'त्या' मेडिकल
इशाऱ्यातली तीव्रता जयुला तर खूपच जाणवायला लागली .... 'काळ हेच दुःखावरचं एकमेव औषध
असतं' हे वाक्य खूपदा वाचलंवतं; काही वेळा आम्ही ते दुसऱ्या दुःखी जीवाला ऐकवलंही होतं;
पण याच वाक्याचा प्रत्यय आम्हालाही घ्यावा लागेल, हे मनीस्वप्नीही नव्हतं ... पण हे
वाक्य खरं आहे हे नक्कीच ! .... दीडदोन वर्षात दोघं सावरलो .... पण अपत्यसुख ? ...
त्याची आंस असतेच ना ? ....
ऍडॉप्शनचा निर्णय घेऊन आम्ही दोघंही अनाथाश्रमात
.... सहा महिन्यांचा गुटगुटीत, मस्त, खेळकर मुलगा ... नांव आमोद .... अनाथाश्रमानंच
ठेवलेलं ... धर्म, जात, पोटजात, बीज, सर्व माहिती अर्थातच गोपनीय ... नाहीतरी आम्हालाही
त्या माहितीची गरज नव्हतीच ... वाढतांना तो जीव आपोआपच आमच्या लाइफस्टाइल नुसार वाढणार
होता ... वाढत होता .... आयुष्यात सुखं रिझ्युम होत होती ... होता होता आमोद साताठ
वर्षाच्या वयात आला ... जयुनी आणि मी त्याला त्याच्या भाषेत, गोडीगुलाबीत वस्तुस्थिती
सांगून टाकली ...
इथूनच परिस्थिती, मुंगीच्या पावलांनी पण निश्चितपणे,
बिनसायला लागली असावी ... त्याही नंतर तीनचार वर्ष गेली ... आम्ही पंचेचाळीशीच्या आतबाहेर
आलो ... तब्येतींच्या काही तक्रारी, काही ऑफिसच्या जबाबदाऱ्यांची टेन्शन्स, असं सगळं
चालूच होतं ... त्यातच चौथी-पाचवी पर्यंत तशी चांगली असलेली आमोदची शैक्षणिक प्रगती
सातवी-आठवीच्या दरम्यान ऍव्हरेज व्हायला लागली ... अडनिड्या वयात हळूहळू येणाऱ्या उद्दामपणाबरोबरच;
'नाहीतरी तुम्ही थोडेच माझे सख्खे आईबाबा आहात ?' ... असा एक प्रश्न मला त्याच्या नजरेत
दिसायला लागला, माझ्याशी त्याच्या तुटक वागण्यातून थोडा जाणवायलाही लागला ... मात्र
ही सगळी अनुभूती माझी होती ... जयुच्या प्रेमळ, सहज वागण्यात कसलाच फरक पडला नव्हता
आणि बहुदा आमोदच्या जयुवरच्या प्रेमातही .... मात्र आड वयातल्या आमोदच्या अंतर्मनात
काय विचार चालू असतील देव जाणे ! ... तसं वरकरणी सगळं ठीक होतं, त्यामुळे की काय पण,
परिस्थिती हळू हळू बदलायला लागलीय, विपरीत वळण घ्यायला लागलीय, असं जयुला अजिबातच जाणवत
नव्हतं ... त्यामुळे तिचं आमोदशी प्रेमानं वागणं, लाड करणं तसंच होतं ... कुठेतरी मला
तिचा अतिप्रेमळपणा खटकतही होता .... अर्थात माझ्या मनातल्या शंका खरंच खऱ्या आहेत का
? ... की त्या माझ्या मनाच्या कोतेपणामुळे मला जाणवतायत, हे मला निश्चित ठरवता येईना
... त्यामुळे या विषयावर जयुशी स्पष्टपणे संवाद साधणंही मी टाळत होतो ... त्यामुळेच की काय, हळूहळू जयुच्या आणि माझ्या नात्यातही
दुरावा यायला लागला ...
बस्स ! … गोष्ट इथेच थांबवायला हवी ! ... कारण
ती इथे येऊन थांबलेली आहेच ....
पण गोष्ट खरंच थांबलीय का ? .... मनाला असंख्य प्रश्नांचे भुंगे पोखरत चाललेत त्याचं काय ? ... परमेश्वरा ! ... मी नक्की काय करू ?, कसा वागू ? .... कुटुंबातला कर्ता पुरुष, हेड ऑफ द फॅमिली म्हणून तिघांच्याही भल्याचा विचार मी करतो आहेच, म्हणून तर ही अस्वस्थता ... पण जुन्या कथा-कादंबऱ्यांत हमखास आढळणारी … 'आणि सर्वजण सुखाने नांदायला लागले,' … अशी परिस्थिती मला कशी आणता येईल ? ... की 'जे जे होईल ते ते पाहावे' अशा वृत्तीने एकेक दिवस ढकलत राहावा ? .... नक्की काय करू तरी काय ? .... अरे 'कर्ता पुरुष' अशी पदवी दिली म्हणजे तो पुरुष 'सर्वसाक्षी परमेश्वर' थोडाच होतो ? ... खरंच मला कळेनासं झालंय ... मी भ्रांतचित्त झालोय .... सोप्या भाषेत भैसाटलोय ...
कुणी सायकॅट्रिस्ट देता का सायकॅट्रिस्ट ? ...
@प्रसन्न सोमण.
०९/०७/२०१८.
स्पष्टीकरण --
१) लकवा म्हणजे --- ल = लघुत्तम, क = कथा आणि वा = वाङ्मय
२) लकवा मधील कथा ही शब्दसंख्येने लकवा मारल्याप्रमाणे आक्रसलेली असायला हवी; अर्थात कथेतली अभिव्यक्ती, कथेतला आशयही आक्रसलेला असायला हवा ..... (आशय आणि अभिव्यक्ती हे दोन प्रकार शिंचे कसे असतात कोण जाणे; पण असतात खरे ...)
३) कथेत शब्द शक्य तितके कमी असावेत; मात्र मध्ये मध्ये घातली जाणारी टिम्ब किती असावीत, यावर मर्यादा नाही ... (क्वचित शब्दांपेक्षा टिम्ब संख्या जास्त असू शकते.)
४) हल्लीच्या फास्ट ... इन्स्टंट ... झटपट जमान्यामुळे हा वाङ्मयप्रकार भारी लोकप्रिय होईल अशी उमेद आम्ही बाळगून आहोत; म्हणून हे स्पष्टीकरण (स्पष्टीकरण वाचलंच नाही तरी कथेचा 'आशय' कळू शकतो, ..... तेवढाच शॉर्टकट ..... तेवढंच आणखी झटपट.)
---------- @@@@@ ----------