Wednesday, 2 May 2018

लकवा –- ३. शीर्षक - अपमान सांगावा जनात .....

n लकवा –- ३.

शीर्षक - अपमान सांगावा जनात .....

          रविवार सकाळ ...... माझं निवांत पेपरवाचन चाललंवतं .... रविशंकरच्या अप्रतिम 'अहिरललत'ची सीडीही ऐकत होतो..... तेवढ्यात कर्कश्य बेल वाजली ....  त्याचं काय आहे, .... आम्हाला झोपेतून येणारी जाग हा जरा वादग्रस्त विषय असल्यामुळे कर्कश्य आवाजाचीच बेल बसवावी लागते .... मी आतल्या दिशेला पाहिलं खरं, पण बेल वाजल्यावर दार उघडण्याचं काम माझंच असल्याचा 'आतला' निवाडा असल्यामुळे नाईलाजाने उठून दार उघडलं ..... दारात दोघं मध्यमवयीन ....
          "काय आहे ?" ..... पेपर वाचण्यात आणि रविशंकरचं सतारवादन  ऐकण्यात विक्षेप आल्यामुळे माझ्या आवाजातल्या मूळच्याच तुसडेपणाला अधिकच धार आलीवती ...
          "आम्ही समाजसुधारक संस्थेतर्फे आलोय ... ते लेखक सोमण आपणच का ? ...."
          लेखक ? .... मी जरा चमकलोच …… पण तरीही, माझं अलिकडचं छोटं-मोठं लिखाण आठवून ......
          "हो .... का ? ...."
          "आम्ही तुमच्या सत्काराची एक योजना घेऊन आलोय ...."
          "काय ?" .... मी हाताला एक चिमटा काढून पाहिला .... अचानकच ऐन उन्हाळ्यात दिवाळी-दसरा अगदी जवळ आल्याचा भास झाला.
          त्याचं काय आहे, ..... खरंतर मी असल्या लोकांना उंबऱ्याच्या आत पाऊल टाकूच देत नाही; पण त्यांच्या आधीच्या वाक्यानी चमत्कार केला होता .... मी पटकन पायघड्या कुठून आणता येतील, हा विचार करत होतो, तेवढ्यात .....        
          "आम्ही आत येऊ का ?"
          "या या .... बसा ना ! ...." माझ्या एका बोटाच्या इशाऱ्यावर बिचाऱ्या रविशंकरनी मेहफिल थांबवली…… मी माझ्याच आनंदात मश्गुल होतो, तेवढ्यात ..... "जरा प्लिज थंड पाणीसुद्धा मिळेल का ?" त्यातल्या एका समाजसेवकानी आतल्या दिशेला नजर वळवत विचारलं .... आता यातल्या 'सुद्धा'चा निर्देश चहाकडे आहे, हे समजण्याएवढा मी दुधखुळा नव्हतो. (बाय वे, हा 'दुधखुळा' शब्द अगदी बालपणापासूनच माहित्येय, पण हा 'नादखुळा' म्हणजे काय हो ? .... समानार्थी शब्द तर नाही ना ?) ..... पण मी स्वतः जरी आनंदात असलो तरी, मी चहा करण्याची विनंती केलीच तर 'आतून' माझ्या शब्दाला किंमत दिली जाईलच, याची खात्री वाटल्यामुळे मी त्या 'सुद्धा'कडे दुर्लक्षच केलं आणि आतून गार  पाण्याची बाटली आणि पेले आणून त्या 'सेवका'समोर ठेवले. (बघा तरी किती कामसू आणि स्वाभिमानी आहे मी ! .... हे काम मी स्वतःचं स्वतः करू शकतो.) ...... थंड पाणी पिऊन 'सेवक' थोडे ताजेतवाने झाले.......
          "तुम्ही खूप छान, उमदे, लेखक आहात .... आमच्या संस्थेने पुढच्या रविवारी सकाळी तुमचा सत्कार ठरवलाय तो स्वीकारायला तुम्ही यायचंय," म्हणत त्यांनी शबनममधून निमंत्रणपत्र-कम-पॅम्प्लेट दिलं.
          'जग ग्लोबल झालं पण या समाजसुधारकांच्या खांद्यावरून शबनम उतरल्या नाहीत,' .... आता मी लेखक आहेच म्हटल्यावर मनातल्या मनात मी माझं निरीक्षण नोंदवून ठेवलं .....
          "सत्कारासाठी मी सहकुटुंब यायचंय का ?"
          "तुमच्या लेखनात कुटुंबाचा सहभाग आहे का ?"
          "नाही बुवा"
          "मग प्लिज तुम्ही एकटेच या ..... उगाच तुम्हालाही अवघड वाटायला नको" ..... खरंतर या शेवटच्या वाक्याचा अर्थ मला कळला नाही पण तथाकथित विनोद असेल असं गृहीत धरून मी "ठीक आहे" म्हटलं.

-----------

          सभागृहात थोडावेळ भण्ण शांतता होती .... परवाचे दोघे आणि इतर पाच-सहा खादीधारी होते ... तेवढ्यात एक पिकल्या केसांचा माणूस बोलायला लागला  .....
          "समाजातल्या अश्लीलतेचं निर्मूलन करणं, हे आपल्या संस्थेचं ध्येय ....  'ब्रीद' म्हणा ना ! ...... पण या लेखक महोदयांनी अलिकडच्या त्यांच्या एका कथेच्या लिखाणात, काही ठिकाणी स्पष्ट तर काही ठिकाणी सूचक शब्दांमध्ये अश्लीलतेकडे निर्देश केलेला आहे ..... त्यांच्या संदर्भाधीन कथेचा आपण निषेध केलेलाच आहे." .....
"काय ? ..... अहो पण मला ....." मी राहवून जागेवरूनच ओरडलो.
"मध्येच बोलू नका .... तुम्हाला विचारू तेव्हाच बोला ..." पिकल्या केसांनी मला परस्पर जामलं.
"अलिकडच्याच एका कथेत तुम्ही एका प्रौढ स्त्रीच्या आणि तिच्या सुनेच्या संवादांमध्ये आणि वर्णनामध्ये काही अश्लाघ्य शब्दांचा वापर केलाय. या लिखाणात तुम्ही टाईट जीन्स, चड्ड्या, उघड्या मांड्या, पुस्तकाचे मलपृष्ठ असे अश्लीलतेकडे अंगुलीनिर्देश करणारे निंद्य आणि गर्ह्य शब्द योजलेत. शिवाय बलात्कार हाही शब्द तुम्ही वापरलाय. हे शब्द श्लील आणि पवित्र आहेत असं का तुम्हाला म्हणायचंय ?"
"अहो पण ते हलकं-फुलकं, विनोदी लिखाण आहे...... शिवाय वर्णन संवादसुद्धा सासूच्या, एका म्हाताऱ्या बाईच्या, फटकळ वागण्या-बोलण्याच्या संदर्भात आहे हो !"
"तुम्ही याच समाजात राहता ना ? ..... या संदर्भात समाजात अलिकडे वारे कसे वाहतायत, हे अद्याप तुम्हाला माहित नाही ? .... मुळात तुमच्या विरुद्ध एक्स-पार्टी खटला चालवून आम्ही अगोदरच तुम्हाला दोषी ठरवलेलंच आहे."
"अहो पण एक्स-पार्टी का ?"
"आमची तशी पद्धतच आहे ... तुम्हाला आता काही डिफेन्सच नाहीये .... पण ... लिखाणामध्ये अश्लीलतेकडे अंगुलीनिर्देश असला तरी हे लिखाण तुम्ही थोडक्यात आटपलंय .... शिवाय हा तुमचा पहिलाच गुन्हा आहे याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून तुम्हाला दिलेली सौम्य शिक्षा हीच आहे की ज्याचा तुम्ही मलपृष्ठ या शब्दात, अप्रत्यक्ष पण अत्यंत हीन, उल्लेख केलात त्याच तुमच्या अवयवावर आमचे सारे सभासद आता त्यांची पदचिन्ह उमटवतील ...."
सारे सभासद त्वेषानं उठले .... नाही, नाही, नको, नको, असं ओरडत सुटल्याचं आणि पटकन उठून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचं फक्त मला स्मरतंय ......


-----------


जागा झालो तेव्हा बेडच्या बाजूच्या जमिनीवर होतो ..... आमच्या धाकट्यानं झोपेत नको तिथं (बा मना सज्जना ! लिहितांना 'शब्द हे शस्त्र आहे, ते जपून वापरा,' हे वचन नेहमी मनावर कोरून ठेवावे, हे आतातरी तुला कळावे  ....) लाथ मारून मला ढकललं होतं.

ताजा कलम - वाचकहो, कृपा करून मला माफ करा .... आणि 'ती' ..... 'संदर्भाधीन' कथा आपण जर वाचली असलीत तर कृपया ती विसरून जा .... कारण मी नक्कीच, स्पष्ट अथवा सूचक अशा सर्वार्थांनीती कथा मागे घेतलीय .....                 

@प्रसन्न सोमण.
१३/०४/२०१८.

स्पष्टीकरण --
) लकवा म्हणजे --- = लघुत्तम, = कथा आणि वा = वाङ्मय
) लकवा मधील कथा ही शब्दसंख्येने लकवा मारल्याप्रमाणे आक्रसलेली असायला हवी; अर्थात कथेतली अभिव्यक्ती, कथेतला आशयही आक्रसलेला असायला हवा ..... (आशय आणि अभिव्यक्ती हे दोन प्रकार शिंचे कसे असतात कोण जाणे; पण असतात खरे ...)
) कथेत शब्द शक्य तितके कमी असावेत; मात्र मध्ये मध्ये घातली जाणारी टिम्ब किती असावीत, यावर मर्यादा नाही ... (क्वचित शब्दांपेक्षा टिम्ब संख्या जास्त असू शकते.)
) हल्लीच्या फास्ट ... इन्स्टंट ... झटपट जमान्यामुळे हा वाङ्मयप्रकार भारी लोकप्रिय होईल अशी उमेद आम्ही बाळगून आहोत; म्हणून हे स्पष्टीकरण (स्पष्टीकरण वाचलंच नाही तरी कथेचा 'आशय' कळू शकतो, ..... तेवढाच शॉर्टकट ..... तेवढंच आणखी झटपट.)         


---------- @@@@@ ----------

No comments:

Post a Comment