Tuesday, 22 May 2018

लकवा –- ५ शीर्षक - चुलीतून आलेलं गुपित

n लकवा –- ५.

शीर्षक - चुलीतून आलेलं गुपित

          काय बरं सांगणार होते मी तुम्हाला ? ... हं .... ती एक म्हण आहे बघा .... बोलणाऱ्याची माती सुद्धा हातोहात खपते पण बोलणाऱ्याचं सोनं सुद्धा पडून राहतं, अशी काहीशी ...... या म्हणीसारखीच माझी गत झाली अलिकडे .... त्याचीच गोष्ट तुम्हाला सांगते .....
          
           मला खरं म्हणजे घराबाहेर पडायला फारसं कधी जमतच नाही.... कोकणात तालुक्याच्या गावाला मी माझी खाणावळ चालवते ..... खाणावळ तशी चांगली चालते; पण त्यामुळंच मला कधी बाहेर जाता येत नाही .... कारण ...... मी आपली कायम चुलीला जुंपलेली ....... तुम्हाला जी गोष्ट सांगायचीय ती सुद्धा या चुलीच्या निमित्तानेच जुळली ....... एवढं माझं हयातभर या चुलीशी नातं; पण हल्ली हल्ली या चुलीला बरंच मोठं ग्लॅमर प्राप्त झालंय, हे मला अगदी नुकतंच कळलं.....

      आठ-दहा दिवस खाणावळीची योग्य ती सोय लावून मी दोन घरगुती समारंभांसाठी नुकतीच नाशिकला आणि मुंबईला जाऊन आले..... नाशकात माझी भाची होती तर मुंबईत पुतण्या .... कधी नव्हत ती, नाशकात आलेच होते तर .... काळाराम मंदिर, पंचवटी, रामकुंड, वगैरे नाशकाची धार्मिक बाजू पाहून, दर्शन घेत होते. भाचीबरोबर भाड्याच्या गाडीतून फिरणं चाललं होतं ...... मध्येच एके ठिकाणी एक मोठा बोर्ड पाहिला ....... 'चुलीवरची मिसळ' असं वर्णन असलेला...... मी एकदम बुचकळ्यात पडले, की मिसळीचा चुलीशी संबंध म्हणजे फक्त मिसळीतल्या उसळीचा, तर्रीचा असणार ...... मग त्यात एवढी मोठी जाहिरात करून विशेष वर्णन करण्यासारखं काय आहे ? ....... नाहीतरी जेवण म्हणून असलंच काहीतरी सटरफटर खायचं होतं, तर बघूया तरी ...... म्हणून आम्ही त्या हॉटेलात गेलो. हॉटेलात खरोखरच ती मिसळ खाण्यासाठी चिक्कार गर्दी होती. आत गेल्यावर तिथेच अजून दुसरीही एक मोठी जाहिरात पाहिली ..... त्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं 'चुलीवरचं आयस्क्रीम ' ....... खरंतर हे वाचूनच मी एकदम थंड पडले, पण खालच्याच ओळीत त्याचा खुलासाही होता ....... चुलीवरती आटवलेल्या दुधाचं आयस्क्रीम ..... हुश्श ...... आम्ही मिसळ खाल्ली ..... ती चवीला छानच होती, हेही खरं..... आता तसं पाहिलं तर, गॅसवर शिजवलेल्या अन्नापेक्षा चुलीवरच्या अन्नाची चव वेगळी असतेच, हे कोकणात हयात चुलीपुढे काढलेल्या मला काय माहित नव्हतं का ? ...... पण तरीही, विशेषतः मिसळ आणि आयस्क्रीम सारख्या पदार्थांच्या संदर्भातला चुलीचा खास उल्लेख मला जरा मजेशीर वाटला, हे नक्कीच.

          नाशिकनंतर मी लगेच मुंबईला माझ्या पुतण्याकडे आले. बोलता बोलता मी पुतण्यापाशी या चुलीवरच्या मिसळीचा आणि चुलीवरच्या आयस्क्रीमचा उल्लेख - खरं म्हणजे गम्मत म्हणूनच - केला; तर त्यानी मला सांगितलंनीत - "काकू, अगं मुंबईलासुद्धा काही मोठ्या मोठ्या रेस्टॉरंट्समध्ये स्पेशॅलिटीज म्हणून चुलीवरच्या अन्नाची मोठ्ठी जाहिरात केली जाते. अंधेरी इस्टला तर एका मोठ्ठ्या हॉटेलात चुलीवरच्या, वेगवेगळ्या पिठांच्या भाकऱ्या ऍव्हलेबल असतात आणि एकेका भाकरीची किंमत जर तू ऐकलीस तर नक्कीच तुला घेरी येईल, एवढी भयंकर जास्त असते. मी अंधेरी ऑफिसला असतांना आम्ही काही कलीग निव्वळ चुलीवरच्या वेगवेगळ्या भाकऱ्या खाण्यासाठी तिथे जाऊन महागडी बिलं भरत होतो."
                 
          हा दौरा आटपून मी कोकणात माझ्या गावी, माझ्या घरी येऊन परत माझ्या चुलीला जुंपली गेले ..... पण आता त्याच चुलीकडे पाहण्याची माझी दृष्टी मात्र साफ बदलली होती...... काही वेगळीच चक्र माझ्या डोक्यात फिरत होती ...... सहज गम्मत म्हणून ..... आणि बघूया तर खरं, ..... असा विचार करून मी माझ्या खाणावळीच्या बाहेर एक मोठ्ठा बोर्ड लावला ...... बोर्ड जाणाऱ्यायेणाऱ्याला सांगत होता .... 'चुलीतल्या राखेनी घासलेल्या भांड्यांतील जेवण मिळेल.' ...... रोजच्यासारखंच जेवण शिजत होतं; रोजच्यासारखीच खाणावळीत बऱ्यापैकी गर्दी होत होती.

          बरोब्बर दहा दिवसांनी एक मुंबईकर साहेब आमच्या मॅनेजरना सांगत होते - "खरोखरच तुमच्याकडचं जेवण खूपच वेगळं आणि खूपच चविष्ट लागत होतं हो ! …… मला तुमच्या चुलीतली राख विकत मिळेल का हो ? ...... एक पाकीट राख विकत द्या ना मला !" …….

           आता ? ...... आता काय ? ....... एकदम मस्त चाललंय आमचं.

@प्रसन्न सोमण.
१४/०४/२०१८.

स्पष्टीकरण --
१) लकवा म्हणजे --- ल = लघुत्तम, क = कथा आणि वा = वाङ्मय
२) लकवा मधील कथा ही शब्दसंख्येने लकवा मारल्याप्रमाणे आक्रसलेली असायला हवी; अर्थात कथेतली अभिव्यक्ती, कथेतला आशयही आक्रसलेला असायला हवा ..... (आशय आणि अभिव्यक्ती हे दोन प्रकार शिंचे कसे असतात कोण जाणे; पण असतात खरे ...)
३) कथेत शब्द शक्य तितके कमी असावेत; मात्र मध्ये मध्ये घातली जाणारी टिम्ब किती असावीत, यावर मर्यादा नाही ... (क्वचित शब्दांपेक्षा टिम्ब संख्या जास्त असू शकते.)
४) हल्लीच्या फास्ट ... इन्स्टंट ... झटपट जमान्यामुळे हा वाङ्मयप्रकार भारी लोकप्रिय होईल अशी उमेद आम्ही बाळगून आहोत; म्हणून हे स्पष्टीकरण (स्पष्टीकरण वाचलंच नाही तरी कथेचा 'आशय' कळू शकतो, ..... तेवढाच शॉर्टकट ..... तेवढंच आणखी झटपट.)         


---------- @@@@@ ----------




Thursday, 17 May 2018

लकवा -- ४ शीर्षक - गजब शहरातली अजब मजा .....

n लकवा –- ४.

शीर्षक - गजब शहरातली अजब मजा .....

          सकाळची वेळ ..... ब्रेकफास्टला मी एका उडप्याकडे आलो होतो.... माझा उत्तप्पा येऊ घातला होता .... तेवढ्यात शेजारच्या टेबलाशी एक म्हातारेसे पण लालबुंद काका आणि एक 'जून' तरुण (मे, जून, जुलै मधला जून नव्हे) .... किंवा नव-मध्यमवयीन, असा पुतण्या; असे दोघेजण येऊन बसले आणि बोलायलाही लागले ..... म्हणजे मुख्यतः काकाच बोलायला लागले आणि पुतण्या मान डोलवायच्या कामाला लागला.
          "हे बघा, तुम्ही लेखक वगैरे असलात तरी अजून तुम्ही तरुण आहात" ..... काका तावातावाने बोलायला लागले. ते काका त्या नव-मध्यमवयीन पुतण्याला तरुण म्हणत होते. मात्र तरीही ते त्याला 'अहो-जाहो' करत होते; हे काय कमी आहे ?
          "छे हो काका ! थोडंसं लिहितो एवढंच, पण सातत्य अजिबात नाही .... सातत्याचा अभाव हाच माझा स्वभाव ...... लेखक कसला ! काहीतरी छोटं-मोठं खरडत असतो झालं !!"
          "ते तुम्ही काहीही लिहा. त्याच्याशी आम्हाला काही कर्तव्य नाही" ...... काकांनी तुकडा तोडला.... "आणि अभाव, स्वभाव, असलं नुसतं साहित्यिक बोललं, म्हणजे झालं; असंही नव्हे ! त्यापेक्षा माझ्या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर द्या ...."
"कोणता प्रश्न काका .... ?"
"काय हो तुम्हा लेखक लोकांना लिहायला हेच शहर बरं सापडतं ? ..... इतर एवढ्या गावांमध्ये, शहरामध्ये काय गोष्टींचा, कथांचा दुष्काळ पडलाय ? ..."          
             "तुम्ही काय बोलताय, मला काही समजत नाहीये काका !"
          "बाकीच्या गावांमध्ये, शहरांमध्ये काय सुस्पष्ट पाट्याच लावल्या जात नाहीत का ? .... काय हो ! .... मग फक्त याच शहराबद्दल उपहासानी, कुचेष्टेनी लिहिण्याचा तुम्ही लोकांनी काय मक्ता घेतलाय का ?" .... काका एकदम फॉर्मातच आले होते ..... पुतण्या उंदरासारखा चेहरा करून आणि फक्त कान सुपाएवढे करून ऐकून घेत होता.
          "या शहरातल्या पाट्यांपासून भामट्यांपर्यंत आणि कमिशनरांपासून पेन्शनरांपर्यंत सगळ्या गोष्टींबद्दल तुमच्या लिखाणातून मनसोक्त कुचेष्टा करता तुम्ही लोकं; पण या शहराच्या परंपरेची काही दगड तरी माहिती करून घेतली आहे तुम्ही ?" ….. चेकाळलेले काका एकदम जोरात जाबडले.  
          "अहो पण काका मी कधी असं काही लिहिलंय ?"
          "तुम्ही म्हणजे अगदी तुम्हीच असं नाही हो ! ...... पण तरीही ...... अगदी तुम्ही सुद्धा अलिकडे पेन्शनरांबद्दल एक छोटी कथा लिहिलीत, तीही कथा याच शहरात घडवलीत ना ?"
          "अहो, मी कुठे शहराचं नांवबिव लिहिलंय ?"
          "पण 'मंडईत' असा उल्लेख आहेच ना ? ….. ती मंडई इथलीच असणार ! ….. बाकी कुठे कुठली आलीय मंडई ?"
          "बापरे ! ….. हे अजबच तर्कशास्त्र आहे काका ! ….. आणि मी लिहिलेली कथा कुठे घडते हे ठरवण्याचं स्वातंत्र्य मला नाहीये का काका ? ..... तुमचं तर्कशास्त्र भारतीय घटनेनी मला दिलेल्या मूलभूत स्वातंत्र्यावर गदा आणणारं आहे" ....... तसा बोलायला पुतण्याही काही कमी नव्हता.
          "हो ?? ..... आणि त्यापूर्वीच्या तुमच्या एका कथेत नवरा, बायकोवर अनन्वित अत्याचार करतो असं वर्णन तुम्ही केलंय, तेव्हा काय त्या बायकोच्या घटनात्मक स्वातंत्र्याचा सत्कार होतो ?" ..... काका खरोखर ऐकतच नव्हते.... "या शहराबद्दल इतकं वाईटसाईट लिहिता तुम्ही लोक, पण या शहराच्या महान परंपरांबद्दल काही माहित्येय तुम्हाला ? ..... या शहराचा इतिहास काही माहित्येय तुम्हाला ? "
          "पण काका मी इथलाच आहे .... इथेच राहणारा आहे आणि तुमच्याप्रमाणेच माझंही या शहरावर विलक्षण प्रेम आहे, हे 'तुम्हाला' माहित्येय का ?" .... आता मात्र पुतण्याही उखडला.... "माफ करा काका ! ….. मी जरा निघतो ! ….. मला एका कामासाठी जायचंय !! ….."
          "असं का ? तुम्ही इथलेच आहात का ? ..... मग तर तुमची जबादारी फारच मोठी आहे. ती नीटपणे पार पाडा; आणि जाताजाता तेवढं ते बिल जरा चुकतं करून जा" ..... काकांनी शेवटच्या बॉलवर सिक्सरच टोलवली.

@प्रसन्न सोमण.
१४/०४/२०१८.

स्पष्टीकरण --
१) लकवा म्हणजे --- ल = लघुत्तम, क = कथा आणि वा = वाङ्मय
२) लकवा मधील कथा ही शब्दसंख्येने लकवा मारल्याप्रमाणे आक्रसलेली असायला हवी; अर्थात कथेतली अभिव्यक्ती, कथेतला आशयही आक्रसलेला असायला हवा ..... (आशय आणि अभिव्यक्ती हे दोन प्रकार शिंचे कसे असतात कोण जाणे; पण असतात खरे ...)
३) कथेत शब्द शक्य तितके कमी असावेत; मात्र मध्ये मध्ये घातली जाणारी टिम्ब किती असावीत, यावर मर्यादा नाही ... (क्वचित शब्दांपेक्षा टिम्ब संख्या जास्त असू शकते.)
४) हल्लीच्या फास्ट ... इन्स्टंट ... झटपट जमान्यामुळे हा वाङ्मयप्रकार भारी लोकप्रिय होईल अशी उमेद आम्ही बाळगून आहोत; म्हणून हे स्पष्टीकरण (स्पष्टीकरण वाचलंच नाही तरी कथेचा 'आशय' कळू शकतो, ..... तेवढाच शॉर्टकट ..... तेवढंच आणखी झटपट.)         


---------- @@@@@ ----------