n लकवा –- २.
शीर्षक - हे कोण बोलले
बोला, का माझा अंतू बहकला ?
बेडरूममध्ये काकू माझ्याशी बोलायला आल्या
..... काकू म्हणजे माझ्या सासूबाई ..... म्हातारी म्हणजे विचारूच नका .... एकदम ढ्याणटुण आणि बिनधास्त कारभार ..... वागायलाही आणि
बोलायलाही एकदम तेज ..... नॉनस्टॉप बोलणं ...... एकदम फु ss ल्ल टॉकटाईम ! ......
"काय म्हणावं या झिपरीला ! ती लांडी
चड्डी तर अशी घातलीय की सगळ्या मांड्या वाळत घातलेल्या कुरडयांसारख्या उघड्या पडल्यायत
...... आमचे अंतूशेटही बरे गोड गोड बोलून खिदळतायत ...." काकूंची एमपी थ्री सुसाट
सुटली.
हे अंतूशेट म्हणजे अनंत कारखानीस ! म्हणजे
आमचे काका ..... माझे सासरे ...... काकूंचं बोलणं असं आहे की, बोलायला लागल्यावर त्यांना
बोलायला; पोरींच्या चड्ड्यांपासून चंद्रावरच्या खड्ड्यांपर्यंत कोणताही विषय चालतो,
हे मला माहित होतं ....... पण आज खरोखरच त्या बाहेर हॉलमध्ये आलेल्या पोरीच्या चड्डीवर
तोंड टाकत होत्या ..... खरंतर झालं होतं इतकंच की, कुणी एक शॉर्ट्स घातलेली हायफाय
मुलगी, क्राय का तसल्याच कुठल्याशा हायफाय सामाजिक संस्थेसाठी मदत मागायला आली होती;
आणि काका सौजन्यानं तिचं ऐकून घेत होते.
"असल्या चड्ड्या आणि टीशर्ट घालतात
टवळ्या आणि वाईट वेळ आली की बलात्कार झाला म्हणून चव्हाट्यावर कोकलत बसतात."
..... काकू करवादल्या ..... तरी बरं, काकूंनी स्वतःच टाईट जीन्स घातली होती.
"काकू काय बोलताय ? ..... अहो, काकांबद्दल
बोलताय तुम्ही !"
"बलात्काराचं अंतूशेटबद्दल नाही बोलत
गं मी ! ….. त्यांना काय धड जमलंय ? .... पण इतर चार घरी सुद्धा जाईलच ना ही ! या झिपरीला
पूर्ण कपडे घालायला काय झालं होतं ? ... सगळं शरीर निदान झाकायचं तरी !"
"काकू, अहो पुस्तकाच्या मुखपृष्ठ-मलपृष्ठावरचं
चित्र ज्याला बघायचंच आहे, तो पुस्तकावरचं कव्हर काढणारच ना ?"
"खरंय गं बायो तुझं !" .....
तेवढ्यात काका बेडरूममध्ये आले .... त्यांच्या
चेहऱ्यावर पुसटसं स्मित होतं की काय, असं मला आपलं वाटून गेलं.
"अगं, पुढच्या रविवारी मला आठवण कर
हं !" .... काका काकूंना सांगायला लागले
.... या पोरीनी आणि तिच्या मैत्रिणींनी गावाबाहेर हेल्थकॅम्प ऑर्गनाईझ केलाय.... संधी
आहे तर, मी फुल चेकिंगला जाऊन येईन म्हणतोय !" ..... मंद हसत काका पुन्हा बाहेर
हॉलमध्ये गेले.
काकूंच्या तोंडाचा 'आ' वासला गेला
..... "अगो ! .... आमच्या अंतूशेटचाच अण्णू गोगट्या झाला की काय गो ?"
@प्रसन्न सोमण.
१२/०४/२०१८.
स्पष्टीकरण --
१) लकवा म्हणजे --- ल = लघुत्तम,
क = कथा आणि वा = वाङ्मय
२) लकवा मधील कथा ही शब्दसंख्येने
लकवा मारल्याप्रमाणे आक्रसलेली असायला हवी; अर्थात कथेतली अभिव्यक्ती, कथेतला आशयही
आक्रसलेला असायला हवा ..... (आशय आणि अभिव्यक्ती हे दोन प्रकार शिंचे कसे असतात कोण
जाणे; पण असतात खरे ...)
३) कथेत शब्द शक्य तितके कमी
असावेत; मात्र मध्ये मध्ये घातली जाणारी टिम्ब किती असावीत, यावर मर्यादा नाही ...
(क्वचित शब्दांपेक्षा टिम्ब संख्या जास्त असू शकते.)
४) हल्लीच्या फास्ट ... इन्स्टंट
... झटपट जमान्यामुळे हा वाङ्मयप्रकार भारी लोकप्रिय होईल अशी उमेद आम्ही बाळगून आहोत;
म्हणून हे स्पष्टीकरण (स्पष्टीकरण वाचलंच नाही तरी कथेचा 'आशय' कळू शकतो, ..... तेवढाच
शॉर्टकट ..... तेवढंच आणखी झटपट.)