#माझीआवडतीदहामराठीपुस्तके
#९) अभोगी
अभोगी
/ लेखक - रणजित देसाई (जन्म - ८ एप्रिल १९२८ / मृत्यू - ६ मार्च १९९२.)
@@ रणजित देसाई यांचा अल्पपरिचय
@@
रणजित देसाई – मराठीतील एक सुप्रसिद्ध लेखक. रणजित देसाई हे प्रामुख्याने कादंबरीकार होते. मात्र कादंबरी लेखनाबरोबरच त्यांनी कथालेखन आणि नाट्यलेखनही केले आहे. त्यांनी थोरले माधवराव पेशवे यांच्या जीवनावर लिहिलेली 'स्वामी' ही ऐतिहासिक कादंबरी एवढी रसिकमान्य झाली की त्यांचा नामोल्लेख 'स्वामी'कार रणजित देसाई असा होऊ लागला.
'स्वामी'नंतर रणजित देसाईंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित 'श्रीमान योगी' ही द्विखंडात्मक लक्षणीय कादंबरी लिहिली ('श्रीमान योगी'ची मूळ आवृत्ती दोन खंडांची होती पण कालांतराने नंतरच्या आवृत्तीमध्ये पृष्ठसंख्या वाढवून संपूर्ण कादंबरी छापली गेली.) कर्णचरित्रावर आधारित 'राधेय' ही अप्रतिम कादंबरीसुद्धा रणजित देसाईंनी लिहिली. कोल्हापूर जिल्ह्यातील कोवाड हे रणजित देसाईंचे गाव. 'कोवाड'बद्दल त्यांना विलक्षण आपलेपणा व प्रेम होतं. रणजित देसाई हे अतिशय रसिक वृत्तीचे होते. साहित्याबरोबरच शास्त्रीय संगीत व चित्रकलेची त्यांना विशेष आवड होती. त्यांच्या लेखनातूनही ही आवड प्रतिबिंबित होते. चित्रकलेच्या आवडीमुळे आणि जाणकारीमुळे त्यांनी 'राजा रविवर्मा' ही कादंबरी सुद्धा लिहिलेली आहे.
वर उल्लेख केलेल्या कादंबऱ्यांबरोबरच त्यांच्या 'अभोगी,' 'शेकरा,' 'प्रतीक्षा,' 'पावनखिंड,' 'बारी,' इत्यादी कादंबऱ्या रसिकांना खूपच आवडलेल्या आहेत. देसाईंनी विपुल कथालेखन आणि नाट्यलेखनही केलेले आहे. त्यांचे 'आषाढ,' 'कमोदिनी,' 'गंधाली,' 'प्रपात,' 'मेखमोगरी,' 'रुपमहाल,' इत्यादी कथासंग्रह सुद्धा गाजलेले आहेत. याशिवाय 'कांचनमृग,' 'गरुडझेप,' 'तुझी वाट वेगळी,' 'पंख जाहले वैरी,' 'स्वरसम्राट तानसेन,' यासारख्या त्यांच्या नाटकांनीही चांगला नावलौकिक मिळवला.
@@ @@
आमच्या शेजारच्या, नजर कमजोर असलेल्या एका आजोबांना रणजित देसाईंची 'श्रीमान योगी' आणि नंतर 'स्वामी' ही पुस्तकं वाचून दाखवण्यासाठी माझा मोठा भाऊ दुपारचे तीन-एक तास जात असे. बहुदा घरामध्ये असलेल्या आईला माझ्या छळातून निवांतपणा मिळावा म्हणून, मलाही ती भावाबरोबर पाठवत असे... कसं, का, हे मला सांगता येणार नाही पण, मस्तीखोर असूनही, हे वाचन मी मनापासून ऐकत असे आणि, लहान असल्यामुळे अगदी तपशीलवार नाही कळलं तरीही, ते मला अतिशय आवडतही असे. पुढे भावाची शाळेतली इयत्ता आणि अभ्यास वाढल्यानंतर हे वाचन मी चालू ठेवलं. या निमित्ताने शालेय वयातच माझ्या 'श्रीमान योगी' आणि 'स्वामी' या दोन नितांत सुंदर ऐतिहासिक कादंबऱ्या वाचून झाल्या; आणि 'रणजित देसाई' हे नाव अत्यंत आदराचं म्हणून माझ्या मनावर कोरलं गेलं. पुढे दहावी मॅट्रिक नामक दैत्याचा माझ्याकडून बऱ्यापैकी यशस्वी पद्धतीने अंत झाल्यावर घरातून थोडी जास्त मोकळीक मिळून मला आमच्या पार्ल्यातील टिळक मंदिरची लायब्ररी जॉईन करण्याची परवानगी मिळाली आणि पुस्तकांच्या समुद्रात मी जमतील तसे हातपाय मारायला लागलो. याच दरम्यान मला संगीताच्या मैफिली मुंबईत कुठे कुठे जाऊन ऐकण्याचंही वेड लागलं होतंच. नेमका हरिप्रसाद चौरासियांचा अफलातून अभोगी राग झाकीरभाईंच्या संगतीत मी 'रंगभवन'मध्ये ऐकला आणि त्या धुंदीत असतांनाच लायब्ररीत रणजित देसाईंची 'अभोगी' ही त्यावेळी नवी कोरी असलेली कादंबरी (प्रथमावृत्ती १९८७) नजरेला पडली. त्या क्षणी 'अभोगी' या शीर्षकाचीच विलक्षण भुरळ पडली आणि कादंबरीवर मी झडप घातली. एका अतिशय धुंद मनोवस्थेतच ही कादंबरी मी लागोपाठ दोनदा वाचून काढली. 'श्रीमान योगी' आणि 'स्वामी'मुळे अत्यंत 'गॅरेंटी'ने दर्जेदार लिखाण करणारा लेखक म्हणून रणजित देसाईंचं नाव आदरस्थानी होतंच पण तरीही त्यांचं ललित लिखाण मी 'अभोगी'च्या निमित्ताने पहिल्यांदाच वाचलं आणि खरंच सांगतो, अतिशय भारावून गेलो.
गर्भश्रीमंत असलेल्या आणि इंग्लंड मध्ये उच्च शिक्षण घेत असलेल्या, कलासक्त डॉक्टर कैलासच्या आणि उल्काच्या प्रेमसंपन्न संसाराच्या वर्णनाने कादंबरीचं कथानक आकार घेऊ लागतं. पण कैलास इंग्लंडमध्ये असतांनाच उल्काला टीबीची लागण होते आणि कैलासला परतावं लागतं. कैलासचे दोन अत्यंत जवळचे डॉक्टर मित्र उल्काला ट्रीटमेंट देतात, पण त्याकाळात या रोगावरची नवीन औषधं उपलब्ध नसल्यामुळे दुर्दैवाचा घाला पडून उल्का दगावते. आकाशात चमकत असतांनाच उल्का खाली निखळून पडते म्हणून की काय, देसाईंनी नायक कैलासच्या पत्नीचं नाव उल्का ठेवलंय. उल्कासोबत लोणावळ्याला काढलेल्या रम्य दिवसांची आठवण म्हणून कैलास वडिलांनी लोणावळ्याला खरेदी केलेल्या मोठ्या जमिनीवर आपलं हॉस्पिटल काढून गोरगरिबांवर उपचार करू लागतो. गोव्यातील मंगेशी हे कैलासचं कुलदैवत असल्यामुळे कैलासचे मंगेशीशी, तिथल्या वयोवृद्ध चंपा भाविणीशी आणि तिची मुलगी केशर यांच्याशी कौटुंबिक ऋणानुबंध असतात. या निमित्ताने केशर, तिचा बालपणीचा सवंगडी आणि तरुणपणीचा मोठा गायक महेशकुमार यांचा कथानकात प्रवेश होतो. काही काळाने महेशकुमारलाही प्राथमिक अवस्थेतल्या टीबीची लागण होते आणि एकाकी विधुर कैलास; महेशकुमार आणि त्याच्या सुश्रुषेसाठी केशरलाही आपल्या लोणावळ्याच्या हॉस्पिटल कम बंगल्यामध्ये घेऊन येतो. कैलासच्या ट्रीटमेंटमुळे आणि नवीन शोध लागलेल्या औषधांच्या साहाय्याने आस्ते आस्ते महेशकुमार रोगमुक्तही होऊ लागतो.
या सगळ्या घटनांच्या रूपाने कथानक पुढे पुढे सरकू लागतं... या सर्व कथानकामध्ये, एकाकीपणातही कैलासचा केशर आणि महेशकुमार या दोघांवरचाही निर्हेतुक लोभ; मोठा गायक असलेल्या महेशकुमारचा मूडी, हेकट आणि संशयी स्वभाव; केशरची स्नेहमय सेवावृत्ती; स्पृहणीय सोशिकपणा आणि तिचं महेशकुमारवरचं विलक्षण अकृत्रिम प्रेम सततच जाणवत राहतं. महेशकुमार नावाच्या आगीमध्ये सोन्याप्रमाणे जळूनही आपल्या स्वभावाचं अतिशय शुद्ध स्वरूप केशर सातत्याने दाखवत राहते. मात्र कथानकाच्या शेवटी; महेशकुमारवर निरतिशय प्रेम असूनही त्यानं कैलासवर घेतलेल्या खुरट्या, वेदनामय संशयामुळे चवताळलेल्या नागिणीसारखी बेभान होऊन ती महेशकुमारला नाकारते व 'अभोगी' होऊन राहते... पूर्ण कथानकामध्ये एकाकी, उदात्त कैलास आणि प्रेमळ, सोशिक, अभोगी केशर यांचा निर्हेतुक, अकृत्रिम लोभ आणि महेशकुमार पायी होत राहणारी त्यांची फरपट रणजित देसाईंनी अत्यंत हृद्द्य पद्धतीने रंगवली आहे.
कादंबरीमध्ये रणजित देसाईंच्या अलौकिक भाषा सौंदर्याचा प्रवाह सतत वाहताच आहे. कैलास लोणावळ्याला उल्काला डोंगरावरून वाहणारा झरा दाखवत असतांना आलेलं वर्णन --
"उल्का, जेव्हा पावसाळा असतो ना, त्यावेळी प्रचंड धबधब्याचं रूप इथून दिसतं. हा पाण्याचा ओघ कशासाठी झेपावतो ? कोणत्या ओढीनं ? कुठे जायचं असतं त्याला ? त्याचं समर्पण कुठे व्हायचं, हे त्याला तरी कुठे ठाऊक असतं ? सारेच ओहोळ सागराला मिळत नसतात. काही वाटेतच लुप्त होऊन जातात. पण म्हणून धाव मात्र थांबत नाही. जीवन हे असंच असतं. एकदा झोकावून दिलं की अखंडपणे धावावंसं वाटतं. मिळेल त्या वाटेनं, मिळेल त्या ध्येयानं !" ….
उल्का माकडांना चणे शेंगदाणे देत असतांना --
"दुसऱ्याला देतांना असं जमिनीवर फेकू नये. तू चण्यांचा हात माकडांना सामोरा धर, ती इजा न करता चणे टिपून खातील, तृप्त होतील"
"या माकडांना एवढं बरोब्बर कसं कळतं ?"
"का ? भिकाऱ्याला भीक कशी मागावी, हे कळत असतं" …..
याच माकडांना भजी देऊ केल्यावर ती नाक फेंदारून पळून जातात तेव्हा --
"उल्का ! पाहिलंस ! भिकारी का असेना, पण त्यालाही आवड निवड असतेच." …..
उल्काच्या निधनानंतर लोणावळ्याच्या कड्यावर विचारमग्न असलेल्या कैलासचे विचार --
"कधी कधी कड्यावरून वाहत असलेला पाण्याचा प्रवाह कारण नसतांना मध्येच थांबतो. मग राहतो तो उघडा बोडका कडा. त्या प्रवाहानं ह्या कड्याला किती भेगा पडलेल्या असतात, ते तो प्रवाह आटल्यानंतरच कळतं." …..
क्षयाची लागण झालेल्या महेशकुमारचे मनस्वीपणातले विचार --
"मरताना दुसऱ्या कोणी माणसानं एक पीडा गेली, असं म्हणू नये. चार माणसांनी का होईना, हा जगायला हवा होता, असं म्हटलं तरी जीवनाची सार्थकता झाली, असं मला वाटतं." …..
महेशकुमारच्या नीच गोपूकाकाच्या संदर्भातले रंगा मास्तरांचे तळतळाट --
"मी त्या गोप्याला चांगला ओळखतो. त्यानं माडांच्या बागा वाढवल्या पण इतक्या उंच माडावरच्या नारळात गोड पाणी कसं येतं, हे त्या हलकटाला कधी कळलं नाही." …..
कैलासनं महेशकुमारकडे व्यक्त केलेले विचार --
"महेशकुमार ! मरण हवंसं वाटतं तेव्हा येत नाही आणि नकोसं वाटतं तेव्हा कुठूनतरी अचानक अवतरतं. जी गोष्ट आपल्या हाती नाही, त्या गोष्टीचा वैताग माणसानं करू नये, एवढं मी आजवरच्या आयुष्यातून शिकलो आहे. मला वाटतं माणूस कितीही वैतागला तरी जीवनाची आसक्ती त्याला सुटत नाही. परमेश्वरावर तुमचा विश्वास असेल तर एक गोष्ट विसरू नका. चांगल्या गोष्टींबरोबर काही वाईट गोष्टीही आयुष्यात दिलेल्या असतात. त्या मोजक्याच असतात. तेवढ्या सोसण्याइतपत मन खंबीर ठेवलं, तर परमेश्वर उदंड हातानं देत राहील." …..
आजारपणात महेशकुमारचे विचार --
"केशर तू कधी विचार केलास का ? अंधारी रात्र असते, अजून पहाट व्हायची असते, क्षितिजावर पिठोरी रेषाही उमटलेली नसते, अशावेळी भैरव गातात. पहाट कधी होईल ? प्रियकराची वाट पाहून थकलेल्या प्रेयसीचं विव्हल मन त्यात गुंतलेलं असतं. सगळीकडे निःस्तब्ध, शांत, नीरव असतं. आणि मग नकळत पूर्वदिशा पांढरते. धरती जागी होऊ लागते. धुक्याच्या आवरणाखाली तापलेला जलाशय श्वास सोडू लागतो. रात्रीच्या काळोखाला भ्यालेले पक्षी सुटकेचा आनंद व्यक्त करू लागतात. अशा वेळी भटियार येतो. जणू प्रियकराच्या आगमनाचा खलिता प्रेयसीच्या हाती आलेला असतो. उजाडू लागतं. सारी धरित्री दिनकराच्या आगमनाच्या वार्तेनं चैतन्यमय बनते. तेव्हा भूप येतो. मीलनाचा क्षण नजीक आलेला असतो." …..
महेशकुमार केशरची ‘भाविणीची पोर’ म्हणून हेटाळणी करतोच पण संशयापायी कैलासलाही अद्वातद्वा बोलतो. मात्र काही काळाने कैलासचे उपकार स्मरून तो कैलासची क्षमा मागण्यासाठी येतो. तेव्हाचे वर्णन –
"महेशकुमार, मी बोलूनचालून सर्जन चिरफाड करण्यापलीकडे मला काही येत नाही. तुम्ही माझ्या रोगाचं अचूक निदान केलंत. नेमकं त्यावर बोट ठेवलंत. क्षणभर मला असं वाटलं की तुम्ही गायक नाही सर्जन आहात."
महेश म्हणाला, -
"मी सर्जन नाही. खोट्या गोष्टींची भलावण करणं मला जमत नाही. हजारो माणसांच्या समोर गातांना त्यातले ज्ञानी किती आहेत, याची समज मला असते: पण चुकून एखादा बदसूर लागला तर जाणकारापासून अजाणकारापर्यंत सारं सभागृह चुकचुकतं. सुरेल स्वर साऱ्यांनाच कळतो आणि बेसूर साऱ्यांच्याच मनात चुकचुकून जातो. आज माझा सूर बेसूर बनला याची मला खंत वाटते."
कैलास हसत म्हणाला,
"सूर बेसूर कधीच नसतो. काहीतरी नवीन दाखवण्याची जिद्द त्यात असते. त्यामुळं कित्येकदा तो अपयशीच ठरतो. ते तुम्ही मनाला लावून घेऊ नका." .....
कादंबरीच्या शेवटी बरा झालेला पण तसाच हेकट, संशयी, मनस्वी असलेला महेशकुमार केशरची 'भाविणीची पोर,' 'रांड,' अशा शेलक्या शब्दात अवहेलना करून कैलासलाही वेडंवाकडं बोलतो व कालांतराने पश्चात्ताप होऊन केशरकडे येतो, तेव्हाचं वर्णन --
निर्विकारपणे केशरनं विचारलं,
"तुमच्यासह मी यायला हवं ?"
"हो !" महेश म्हणाला.
"एक विचारू ?"
"जरूर विचार."
"मी कशासाठी हवी आहे ?"
महेश क्षणभर त्या प्रश्नानं गोंधळला.
"कशासाठी ... म्हणजे ?"
"कशासाठी ... या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कदाचित माहीत असेल. अखंडपणे पुढं धावणाऱ्या माणसाला मागचं काहीच आठवत नाही. आणि आठवावं तरी कसं ? ... महेश, मी तुम्हाला संगती हवी आहे ती फक्त मागे साथ देण्यासाठी. तंबोरा उचलण्यासाठी. माझी योग्यता मला माहीत आहे. महेश, तानपुरा घुमायला एक सुताची तात लागते. या धाग्याची योग्यता फार मोठी, पण किंमत मात्र कवडीचीही नसते. बसल्या ठिकाणी कुठंही तो धागा मिळतो. एक फेकून दुसरा घेता येतो. पण त्या फेकलेल्या धाग्याबद्दल कुणीही हळहळ करीत नाही. तुम्ही फेकल्या धाग्याची फिकीर करू नका. तुमचा शब्द झेलणारे अनेक साथीदार मिळतील. पाठीमागेच बसून साथ द्यायची असते. नसली तरी काही बिघडत नाही, त्याशिवाय काही अडतही नाही.".....
एकुणात; सर्व कथानकामध्ये कैलास हा मनस्वी, धीरोदात्त नायक एकाकी राहतो. उल्का ही अल्पकाळची नायिका अकाली मृत्युपायी 'अभोगी' राहते तर तर केशर ही चिरंतन नायिका महेशकुमारच्या हेकट वर्तनापायी, नादान संशयापायी स्वनिर्णयाने 'अभोगी' राहते; आणि ही 'अभोगी' आपल्या मनाला कायमची चुटपुट लावून संपते.
-- भाग ९) अभोगी -- स मा प्त --
क्रमशः
- - भाग #१०)हिमालयाचीसावली
ऋणनिर्देश -- माहिती
व फोटो 'इंटरनेट'च्या सौजन्याने.
ताजा कलम - माझ्या संग्रही असलेल्या पुस्तकाच्या आवृत्तीनुसार मी लेख लिहिलाय. कदाचित या पुस्तकाच्या वेगळ्या आवृत्तीत काही बदल असू शकतील.
@प्रसन्न सोमण –
२९/१२/२०१७.![]() |
रणजित देसाई |
No comments:
Post a Comment