Thursday, 11 January 2018

#१०) माझे आवडते पुस्तक - हिमालयाची सावली (नाटक)

#माझीआवडतीदहामराठीपुस्तके

#१०हिमालयाची सावली (नाटक)

हिमालयाची सावली (नाटक) / लेखक - प्रा. वसंत कानेटकर (जन्म - २० मार्च १९२० / मृत्यू - ३१ जानेवारी २००१.)

@@  प्रा. वसंत कानेटकर यांचा अल्पपरिचय  @@ 
 
     प्रा. वसंत कानेटकरमराठीतील प्रसिद्ध नाटककार आणि लेखक. अगदी प्रारंभापासून प्रा. वसंतराव कानेटकरांनी आपल्या लिखाणासाठी नाटक हाच फॉर्म निवडला. वसंतराव हे रविकिरण मंडळातील प्रसिद्ध कवी गिरीश यांचे चिरंजीव. वसंतरावांचं वास्तव्य बहुतांश काळ नाशिक येथे होतं आणि त्यांनी नाशिकच्याच गोखले एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयामध्ये अध्यापनाचं काम अनेक वर्ष केलं. वसंतरावांचा इंग्रजीचा, इंग्रजी साहित्याचा आणि विशेषतः शेक्सपियरचा सखोल अभ्यास होता. शेक्सपियरवर तर त्यांची निरतिशय भक्ती सुद्धा होती.

     वसंतरावांनी एकूण ४० नाटकं आणि तीन कादंबऱ्या लिहिल्यायत. त्यांची बहुतांश नाटके व्यावसायिक रंगभूमीवर अमाप यशस्वी झालीयत. ज्या नाटककारांच्या नाट्यकृतींतून प्रचंड लोकप्रियता आणि उच्च दर्जा या दोन्ही गोष्टी हातात हात घालून जातात, अशा प्रमुख नाटककारांमध्ये वसंतरावांना खूप वरचं आणि मानाचं स्थान नक्कीच द्यावं लागेल.

     वसंतरावांनी 'वेड्याचं घर उन्हात' या त्यांच्या पहिल्या नाटकापासून नाट्यलेखनाला सुरुवात केली आणि त्या नाटकापासूनच नाट्यलेखनाच्या बाबतीत त्यांनी प्रयोगशीलता जोपासली. मात्र नाट्यलेखनात नवनवे प्रयोग करतांना रसिकांच्या रसिकतेकडे दुर्लक्ष करावे, अशी त्यांची मानसिकता नव्हती. 'प्रेमा तुझा रंग कसा,' या त्यांच्या प्रचंड गाजलेल्या नाटकाच्या पुस्तकामधल्या निवेदनामध्ये ते म्हणतात, "साहित्यात काय अगर रंगभूमीवर काय, नवे प्रयोग करू इच्छिणाऱ्यांनी वाचकप्रेक्षकांच्या रसिकतेला हातात हात घालून बरोबर नेले पाहिजे. लोकप्रियतेच्या नावावर बेमुर्वतखोरपणे थुंकून कोणताही प्रयोग यशस्वी होणार नाही अशीच माझी श्रद्धा आहे."         

     समस्याप्रधान, पौराणिक, हलकीफुलकी फार्सिकल कॉमेडी, ऐतिहासिक, पारंपरिक संगीत नाटक; अशी स्तंभित करणारी वैविध्यपूर्ण नाट्यलेखनाची त्यांची झेप त्यांनी ओळीने पहिल्या काही नाटकातच दाखवून दिली. त्यांनी त्यांच्या नाट्यलेखनाच्या संपूर्ण कारकिर्दीत - काही मोजके अपवाद वगळता - व्यावहारिक दृष्ट्या प्रचंड यशस्वी आणि त्याच बरोबर अत्यंत दर्जेदार अशा नाटकांची रसिकांना अक्षरशः सवयच लावली.

     त्यांच्या अनेक उल्लेखनीय नाटकांपैकी काहींचा उल्लेख करायचा म्हटलं तर, 'वेड्याचं घर उन्हात,' 'प्रेमा तुझा रंग कसा,' 'रायगडाला जेव्हा जाग येते,' 'मत्स्यगंधा,' 'अश्रूंची झाली फुले,' 'लेकुरे उदंड झाली,' 'मला काही सांगायचंय,' 'गोष्ट जन्मांतरीची,' 'सूर्याची पिल्ले,' 'गगनभेदी,' या आणि अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण नाटकांचा उल्लेख करावा लागेल.

     वसंतरावांनी काही प्रमुख आदरणीय व्यक्तिरेखांना मुख्य स्थान देऊन आणि त्यासोबत काल्पनिकतेचेही रंग भरून 'विषवृक्षाची छाया' (इतिहासकार वि.का. राजवाडे यांना केंद्रस्थानी ठेवून), 'हिमालयाची सावली' (भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांना केंद्रस्थानी ठेवून), 'कस्तुरीमृग' (जुन्या संगीत नाटकांच्या जमान्यातील नटी आणि गायिका हिराबाई पेडणेकर यांना केंद्रस्थानी ठेवून) आणि 'वादळ माणसाळतंय' (सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांना केंद्रस्थानी ठेवून) अशी अत्यंत उल्लेखनीय, महत्वाची अशी नाटकं लिहिली.

     नाटकांसोबतच वसंतरावांनी 'घर,' 'पंख' आणि 'पोरका' अशा तीन कादंबऱ्याही लिहिल्या तसंच 'लावण्यमयी' नावाचा कथासंग्रहही लिहिला. याशिवाय त्यांनी काही सुंदर एकांकिकाही लिहिलेल्या आहेत. मात्र त्यांचं नाव प्रामुख्याने नाटककार म्हणूनच ओळखलं जाईल. वसंतरावांनी; 'रसिकहो,' 'मी माझ्याशी,' 'नाटक - एक चिंतन,' या नावाची वैचारिक लेखांची तीन पुस्तकंही लिहिलेली आहेत.       

@@ @@

     'मराठी माणूस हा अतिशय नाटकवेडा आहे,' असं विधान आपण अनेकवेळा ऐकलेलं असतं. हे विधान खरंही आहेच कारण आपणही अनेकवेळा हौसेनं नाटकं बघत असतो आणि नाटकाला होणारी रसिकांची गर्दीही बघत असतो. मुळात नाटक ही गोष्ट ऑडियो व्हिज्युअल आहे; ती एक परफॉर्मिंग आर्ट आहे ही गोष्ट आपणा सर्वांनाच माहीत आहे. पण ... नाटक ही फक्त वाचण्याची गोष्ट असू शकते का ?, नाटकाचं छापील पुस्तक साहित्य या सदरात मोडू शकतं का ? हा जरा थोडासा वादाचा विषय असू शकतो... मात्र या प्रश्नाचं माझ्यापुरतं उत्तर मी मिळवलेलं आहे. माझ्या दृष्टीनं हा वादग्रस्त मुद्दा मुळीच नाही. मला नाटकांची पुस्तकं मनापासून आवडतात किंबहुना अनेकदा मी नाटकांची पुस्तकं प्राधान्याने वाचतो. कधी पुस्तक वाचून नंतर नाटक बघायला मिळतं तर कधी बघितलेल्या नाटकाचं नंतर कधीतरी पुस्तक वाचायला मिळतं. बाकी असंख्य जुन्या नाटकांच्या बाबतीत पुस्तक वाचून किंवा पुस्तक वाचता वाचता डोळ्यांसमोर नाटक व्हिज्युअलाइज करावं लागतं. बऱ्याचवेळा जुन्या जमान्यात होऊन गेलेलं आणि गाजलेलं किंवा दर्जेदार म्हणून बोलबाला झालेलं नाटक असतं. अशा नाटकांची पुस्तकं मिळवून वाचायची मला खूपच उत्सुकता असते आणि मी ते करतही असतो.

     माझ्या लहानपणी प्रा. वसंत कानेटकर हे नाव नाटककार म्हणून प्रचंड गाजलेलं होतं. व्यावसायिक रंगभूमीवर एकाचवेळी त्यांची दोन-दोन / तीन-तीन नाटकं प्रचंड गर्दीत चालू असायची. मी खूप लहान होतो त्या काळात 'रायगडाला जेव्हा जाग येते,' 'अश्रूंची झाली फुले,' 'लेकुरे उदंड झाली,' अशा त्यांच्या दोन-तीन नाटकांनीं तर लोकप्रियतेचा उच्चांक गाठलेला असावा. वास्तविक, करमणुकीसारख्या गोष्टींसाठी अत्यंत काटकसरीनी, हिशोबानी पैसा खर्च करणारी माझ्या आई-वडिलांची पिढी होती; पण तरीही कानेटकरांच्या नाटकांच्या बाबतीत त्यांचा पैशांचा बटवा नक्कीच थोडा ढिला होत असे. त्यामुळे मी लहान असतांना मला मूळ संचातलं 'अश्रूंची झाली फुले' आणि 'लेकुरे उदंड झाली,' ही दोन नाटकं बाबांनी दाखवल्याचं आठवतंय. मात्र 'लेकुरे'मध्ये प्रेक्षकांना प्रश्न विचारले जातात त्यावेळी मी जोरात प्रतिसाद देऊन माफक हशा पिकवल्याची एक अंधुक आठवण सोडली तर, बाकी काहीच मला आठवत नाहीये; कारण ते आठवण्याएवढ्या मोठ्या वयाचा मी नव्हतोच. मात्र थोडा मोठा झाल्यावर गणेशोत्सवात इथेतिथे सादर होणारी काही नाटकं, शाहीर साबळ्यांची काही मुक्तनाट्य, वगैरे बघायला मिळाली. शिवाय आमच्या सोसायटीच्या वार्षिकोत्सवातही नित्य नियमाने नाटक सादर होत असे आणि आश्चर्य म्हणजे अशी, हौशी मंडळींनी सादर केलेली, यथातथा नाटकं बघूनही नाटकाचं प्रेम बऱ्यापैकी वाढीला लागलं.

     कालांतराने वाचनवेडातून लायब्ररी जॉईन केल्यानंतर इतर पुस्तकांबरोबरच मी नाटकांची पुस्तकंही मिळवून आवर्जून वाचत असे आणि त्यातही प्रा. वसंत कानेटकरांच्या नाटकांना अग्रक्रम देत असे. अशातच एके दिवशी मला 'हिमालयाची सावली' या नाटकाचं पुस्तक मिळालं. नाटकांच्या पुस्तकांच्या बाबतीत आणखी एक चांगली गोष्ट ही असते की, पृष्ठसंख्या माफक असल्यामुळे या पुस्तकांचा बसल्या बैठकीत फडशा पाडता येतो व लिंक, अर्थात अनुसंधान, लक्षात ठेवणं वगैरे गोष्टी कराव्या लागत नाहीत. 'हिमालयाची सावली' सुद्धा अर्थातच मी एकाच बैठकीत संपवलं; पण वाचून संपवलं तरी नंतर बराच काळ मी मनानं विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकातच होतो. अम्मळ विचारांती असे ठरते की - या नाटकाचा इम्पॅक्टच तेवढा जबरदस्त आहे.

     'हिमालयाची सावली' नाटक आलं तेव्हा अत्यंत स्वाभाविकपणे असं सरसकट समजलं गेलं की या नाटकातील प्रो. गुंडो गोविंद भानू ही व्यक्तिरेखा; भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांची व्यक्तीरेखा डोळ्यांसमोर ठेवून लिहिली गेलीय... नाटककार वसंतराव मात्र निवेदनामध्ये या बाबतीत रसिक वाचक-प्रेक्षकांना स्पष्टपणे सांगतात की "नाटकातील कथावस्तू, घटना आणि व्यक्तिरेखा सर्वस्वी नसल्या तरी प्राधान्याने कल्पितच आहेत. वस्तुस्थितीशी थोडेफार साम्य आढळताच एकदम निष्कर्षाला येऊन, पात्र-प्रसंगांच्या गळ्यात तडकाफडकी नावनिशीवार चिठ्ठ्या डकवण्याचा उतावळेपणा रसिकांनी करू नये." एकोणिसाव्या शतकाची अखेर आणि विसाव्या शतकाची सुरुवात या पूर्ण कालखंडाबद्दलच वसंतरावांना खूप आकर्षण वाटलं, या कालखंडात त्यांना ऋषितुल्य स्फूर्तिदायक व्यक्तित्व दिसली. या व्यक्तित्वांच्या विचारधारा, त्यांची जीवनचरित्रं आणि त्या अनुषंगाने नंतर बदलत चाललेला काळ; यांचा धांडोळा वसंतरावांनी घेतला आणि त्याच्या परिणामस्वरूप 'हिमालयाची सावली' हे नाटक जन्माला आलं. अर्थात वसंतरावांनी थोडीशी मुग्धता पाळली तरीही, नाटकातील भानूंची व्यक्तिरेखा महर्षी कर्व्यांना केंद्रस्थानी कल्पूनच लिहिली गेली आहे, हे उघड आहे... फक्त ही भानूंची व्यक्तिरेखा ऐतिहासिक पद्धतीने निर्मिलेली नसल्यामुळे; काही खरं, काही कल्पित, अशा पद्धतीने ही व्यक्तिरेखा चितारलीय. म्हणूनच महर्षी कर्वे, त्यांचे कुटुंबीय, त्यांच्या आयुष्यातल्या सर्व घटना आणि भानूंची व्यक्तिरेखा यांची तपशीलवार आणि थेट तुलना करणं अयोग्य आहे. कल्पित व्यक्तिरेखा ही सत्य व्यक्तिरेखेशी कधी 'डायरेक्ट टॅली' होत नसते. मला वाटतं, वसंतरावांनाही हेच अभिप्रेत असावं.

     मात्र 'हिमालयाची सावली' मधला परमोच्च बिंदू म्हणून सावली हा शब्द येतो. म्हणजेच नाटकातील बयो ही व्यक्तिरेखा... नाटकातील सर्वच गोष्टींचा तपशीलवार उल्लेख करणं शक्यही नाही आणि तो हेतूही नाही; पण तरीही या नाटकातील बयोची व्यक्तिरेखा आणि त्या व्यक्तिरेखेशी साखरेप्रमाणे विरघळून गेलेली बयोची भाषा, या गोष्टी खरंच नाटकातील उल्लेखनीय परमोच्च बिंदू आहेत. भानूंनी विलक्षण ममत्वानं संस्था स्थापतांना वैयक्तिक संसाराकडे, बायकोकडे, मुलाबाळांकडे अक्षम्य दुर्लक्ष केलं; प्रसंगी त्यांचे हितसंबंध भानूंनी पायदळी तुडवले; म्हणून भानूंना ही बयो अगोचर फटकळपणे बोलायला मागेपुढे पाहत नाही. मात्र त्याचबरोबर भानूंनी कष्टाने उभ्या केलेल्या संस्थांमधली माणसं स्वार्थाला आणि पैशाला भुलून भानूंचं संस्थांमधलं महत्व कमी करू पाहतात तेव्हा याच बयोचा रणरागिणी आवेश खास वाचण्यासारखाच आहे. प्रसंगा-प्रसंगांनी नाटकाच्या अखेरपर्यंत फुलवत नेलेली बयोची व्यक्तिरेखा आणि बयोची भाषाही खरोखर अविस्मरणीयच.

     नाटकातला संघर्षबिंदू अचूक पकडण्याची वसंतरावांची क्षमता खरंच थक्क करते. प्रसंगांमधली जोडणी - लिंक - सुद्धा कमालीची प्रवाही आहे. --

     पहिल्या काही पानातच भानूंचा मुलगा पुरुषोत्तमाने भानूंची नक्कल करतांना म्हटलेली, "तुला विसावे वर्ष लागेपर्यंतच तुझ्या शिक्षणाची जबाबदारी माझ्यावर होती; आता पुढचा मार्ग तुझा तू पहा" ... ही वाक्य जेव्हा नंतरच्या प्रसंगात भानू जशीच्या तशी उच्चारतात तो प्रसंग ....
 
     काही काळानंतर बयो गव्हाचं जड पोतं घेऊन टांगा करून येते आणि टांगेवाल्याला पोतं आत आणून ठेवायला सांगते... नंतर आत येऊन पुरुषोत्तमाशी बोलतांना बयो पुरुषोत्तमाला वडिलांच्या संस्थेत नोकरीसाठी चिकटवून द्यायचा विषय काढते तेव्हा नकार देतांना पुरुषोत्तम आवेशात म्हणतो "जा जा ! प्रसंग पडला तर मी रस्त्यावर हमाली करीन, पण --" .... नेमका हे वाक्य अर्धवट असतांनाच टांगेवाला खांद्यावर जड पोतं घेऊन आत येतो आणि पुरुषोत्तमाला "वाईच पोतं उतराया हात लावा," अशी विनंती करतो; तो प्रसंग ....

     बयो आपला भाऊ तातोबा याला भानू आणि पुरुषोत्तम यांच्यातील संवाद सांगतांना म्हणते, "ती दोघं एकमेकांशी बोलतात की ! पण काही खर्चाचं, हिशेबाचं असलं तरच बोलतात... बाकी भानूंची माणसं एकमेकांशी दुसरं कशाबद्दल बोलणार रे ?" ... आणि नेमकं काही काळानंतर भानूंच्या ऑपरेशनचा आणि उपचारांचा खर्च निम्मा निम्मा वाटून घेण्याबद्दल पुरुषोत्तम आणि त्याचा मोठा सावत्र भाऊ जगन्नाथ यांचं बोलणं चालू असतांना ते ऐकत ऐकतच बयो आणि तातोबाचा प्रवेश होतो; तेव्हा बयो तातोबाला म्हणतेच की, "ऐक मेल्या ! म्हणाले ते खोटं का ? दोन भानू एकत्र आले की हिशोबाशिवाय दुसरं काही बोलायचेच नाहीत... पटली खात्री ?" .... हा प्रसंग.

     जुनी नाटकं आपल्या जमान्यात रंगमंचावर सादर होऊन, गाजून, बोलबाला होऊन खूपच काळ लोटलेला असल्यामुळे ही नाटकं आज रंगमंचावर सादर होतांना बघायला मिळणं हे अशक्यच आहे. त्यामुळे या जुन्या नाटकांचं 'तेज' अनुभवण्याचा एकच उपलब्ध मार्ग म्हणजे या नाटकांची पुस्तकं वाचणं आणि वाचता वाचता नाटक डोळ्यांसमोर आणणं; हाच आहे. याचाच अनुभव मी नेहमी घेत असतो ... घेत राहीन.                 

-- भाग १०) हिमालयाची सावली (नाटक) -- मा प्त -- 
#माझीआवडतीदहामराठीपुस्तके ही लेखमाला -- मा प्त --   

ऋणनिर्देश -- माहिती फोटो 'इंटरनेट'च्या सौजन्याने.

ताजा कलम - माझ्या संग्रही असलेल्या पुस्तकाच्या आवृत्तीनुसार मी लेख लिहिलाय. कदाचित या पुस्तकाच्या वेगळ्या आवृत्तीत काही बदल असू शकतील.
          
@प्रसन्न सोमण
०९/०१/२०१८.




प्रावसंत कानेटकर