-- इमोटीकॉन्स, स्मायलीज आणि त्या निमित्ताने इतरही --
जेमतेम काही वर्षांपूर्वी मी डिजिटली साक्षर झालो आणि त्या बरोबरच मी फेसबुक नामक भासमान मित्रप्रदर्शनात प्रवेश केला. यापूर्वी प्रवासाने मनुजा चातुर्य येते एवढीच कल्पना होती; पण याशिवाय माझ्या असंही लक्षात आलं की फेसबुक नामक प्रदर्शनामध्ये संगणकासमोर बसल्या जागची 'सफर' केल्याने मनुजाला जे चातुर्य येते त्याला तोडच नाही. तसं चातुर्य माझ्या अंगी आलंही पण फक्त एक अपवाद सोडून. तो अपवाद म्हणजे इमोटीकॉन किंवा स्मायली नामक टिकल्या रुपी चिन्हांचा.
इमोटीकॉन आणि स्मायली हे दोन शब्द तरी बरोबर आहेत; पण बस्स ... एवढंच माझं या बाबतीतलं ज्ञान. बाकी एकाही चिन्हाचा धड अर्थ म्हणून मला कळत नाही. भासमान जगातल्या थोड्याशा वावरानंतर, उंचावलेला अंगठा निवडणे म्हणजे लाईक करणे, हे माझ्या लक्षात तरी आलं; पण तरी पटलेलं अजूनही नाहीच. एखाद्या गोष्टीला मी 'अंगठा दाखवला' म्हणजे ती गोष्ट मला आवडली, या गृहीतकानी माझ्या सामान्य बुद्धीला तरी अंगठाच दाखवलेला आहे. अर्थात तरीही बऱ्याच वेळेला मला हा अंगठा वापरावाच लागतो. काय करणार ? समाजात जनरितीप्रमाणे वागावंच लागतं, नाही का ?... तेव्हा मी असा अंगठे बहाद्दर आहे.
तसा व्हाट्स ऍप, फेसबुकवर माझा बऱ्यापैकी वावर आहे. आवडलेल्या पोस्ट्स मी (नाईलाजाने अंगठाच वापरून) लाईक करत असतो, त्यापुढेही 'व्यक्त व्हावंसं' वाटल्यास कॉमेंट लिहीत असतो. अधून मधून मला सुचेल ते माझ्या मगदुरानुसार लिहून पोस्ट्स सुद्धा टाकत असतो (मला स्वतःलाच खरं वाटत नाहीये, पण अधून मधून टाकलेल्या माझ्या पोस्ट्सना थोडाफार चांगला प्रतिसाद सुद्धा मिळत असतो.) पण या सर्व प्रक्रियेत मी (अंगठा सोडून) कधीही कुठलाही इमोटीकॉन वापरलेला नाहीये... मात्र तरीही मी एवढं बघितलंय की, तासभर साडीच्या दुकानात घालवलेल्या बाईसमोर जसा शे-शंभर किंवा अधिकच साड्यांचा ढीग दिसतो तशाच प्रकारे ढिगाने इमोटीकॉन्स उपलब्ध आहेत. त्यात अनेक प्रकारच्या व्हरायटीज सुद्धा दिसतात.
ज्या भावना व्यक्त करण्यासाठी चार पाच वाक्य लिहावी लागतात त्या भावना एका इमोटीकॉनच्या वापराने व्यक्त होऊ शकतात, असं मला नव्या पिढीकडून (पक्षी : माझ्या मुलांकडून) सांगण्यात आलेलं आहे. असेलही कदाचित तसं. पण मग बऱ्याच ठिकाणी एखाद्या विनोदी लिखाणाला, एकदा वर्तुळातला तोंड फाकवणारा हसरा चेहरा दाखवल्यानंतर पुन्हा ती खूण सहा सात वेळा रिपीट का केली जाते ? सात मजली हास्य दाखवण्यासाठी की काय ? एकूणच, खुणा रिपीट का केल्या जातात ? ... असो. यातलं मला खरंच काही कळत नाही. म्हणूनच, एका इमोटीकॉनच्या वापराने ज्या भावना व्यक्त होऊ शकतात त्या भावना व्यक्त करण्यासाठी चार पाच वाक्य लिहावी लागत असतील तर मला चार पाच वाक्य लिहावी लागणं मंजूर आहे. कारण खुणेतल्या सामर्थ्यापेक्षा 'शब्दांच्या' सामर्थ्याची मला तरी जास्त मातब्बरी वाटते.
तसंही, इमोटीकॉन्सच काय; आयुष्यात मला कुठल्याही खुणांचा अर्थ म्हणून कळला असेल तर शपथ ! माझ्या लहानपणी माझ्या मित्र मैत्रिणींना पत्ते खेळण्यात फार मजा येत असे. हे मित्र हुकुमांसाठी बेमालूमपणे खुणा करण्यात आणि अर्थात समजण्यात सुद्धा तरबेज होते. मीही पत्त्यांमध्ये सहभागी व्हायचोच; पण मला खुणा समजतही नसत आणि करताही येत नसत. त्यामुळे माझं पत्त्यात सहभागी होणं म्हणजे बावळटपणा दाखवणं, मित्रांना एक विनोद विषय निर्माण करून देणं आणि माझ्या पार्टनर्सना शिव्या घालण्यासाठी एक माणूस उपलब्ध करून देणं एवढ्यापुरतंच मर्यादित होतं... बाय द वे, मला शिव्या मात्र ते जोरदार 'शब्दांनीच' घालत असत, खाणाखुणा वापरत नसत; हा माझ्यासाठी एक दिलासाच होता. दमशेरास नामक जो खेळ आहे त्यातही मी अधून मधून सामील होत असे. कारण ? ... मघाशी सांगितलं तेच. समाजात वावरतांना माणसाला समाजाभिमुख व्हावंच लागतं. पण या दमशेरास मध्येही माझी भूमिका माझ्यापुरती ठरलेली असे. खाणाखुणांचा अर्थ लावण्याच्या विषयात गप्प बसणे व इतरांची या बाबतीत जी गम्मत होत असते ती एन्जॉय करत मस्त 'शाब्दिक' कॉमेंट्स पास करणे.
'डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे' वगैरे स्वरूपाच्या प्रेमाच्या खाणाखुणांपासून तर मी आयुष्यभर कोसों दूर राहिलेलो आहे. तसा मला डोळा 'मारता' येतो; पण एक डोळा मारल्याबरोबर कानाखाली दोन्ही डोळे पांढरे होण्याएवढा जाळ निघाला तर, शब्दांवर कितीही प्रेम असलं तरी तोंडावाटे शब्द काही फुटणार नाही आणि शेवटी बंद पालथी मूठ पुन्हा पुन्हा तोंडावर आपटण्याची 'खूण' तेवढी करावी लागेल; या भीतीने मी आजतागायत कधीही 'तसला काही प्रकार' केलेला नाहीये. वास्तविक माझ्या घराण्यात जवळपास सर्वांनी प्रेमविवाह केले, तरी मी मात्र आवडलेल्या मुलीला ऑफिस मधल्या बाईंच्या मध्यस्थीने तिच्या आई-वडिलांच्या पातळीवरून 'शाब्दिक' मागणी घालून आणि कालांतराने तिच्या आई-वडिलांशी स्पष्ट 'बोलणी' करून विवाह केलेला आहे.
जसा खाणाखुणांवर माझा विश्वास नाही
तसा संदिग्ध बोलण्यावरही माझा विश्वास नाही. 'समझनेवालोंको इशारा काफी है' टाईपचे;
किंवा तुटक, संदिग्ध आणि कमी बोलणारे इसम मी शक्यतो 'ऑप्शन'लाच टाकतो. कमाल कमाल इंग्रजी
आद्याक्षरांचे शॉर्टफॉर्म्स वापरून केलेले चॅट्स पाहिले तरी मी लगेच डायव्हर्शन सारखा
सरळ वळसा (?) घालून पुढे निघून जातो. या असल्या लिखाणापेक्षा (एकवेळ, वेळप्रसंगी) इंग्रजीतून
टाईप केलेलं मराठी सुद्धा परवडतं. तसंच, वाचनाची बऱ्यापैकी आवड असली तरीही 'रिडींग
बिटवीन द लाईन्स' पद्धतीच्या काव्यापासून -- की काव्व्यापासून ? ... मला असं वाटतं
की उच्चारानुसार हा शब्द काव्व्यापासून असाच लिहायला हवा. तरच योग्य अर्थ स्पष्ट होईल.
अन्यथा 'शिवाजी महाराज आपल्या गनिमी काव्याने शत्रूला पळवून लावत असत,' या वाक्याचा;
‘शिवाजी महाराज म्हणजे फार धोकादायक कवि होते,’ असला काहीतरी 'भयंकर' अर्थ काढला जाऊ
शकतो… पण जनरितीविरुद्ध
जाऊ नये म्हणून मी 'काव्यापासून' असं लिहिलंय एवढंच -- आणि मोजक्या शब्दांमध्ये 'आभाळाएवढा'
आशय व्यक्त करण्याचा दावा करणाऱ्या साहित्यापासून (साहित्त्यापासून ?) मी चार हात लांबच
राहतो. मी 'ललित' आणि भरपूर शब्दांमधून, गप्पांमधून आणि संवादांमधून लेखकाला काय करायचं
असेल ते व्यक्त करणारं साहित्य 'आपलं' मानतो. 'शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलिकडले'
हे माझ्यासाठी फक्त गीतकार मंगेश पाडगावकर, संगीतकार पु.ल.देशपांडे आणि गायक अभिषेकीबुवा
या डेडली कॉम्बिनेशनचं एक अप्रतिम 'गाणं' आहे... स्वतः बोलतांना सुद्धा मी शब्दबंबाळपणे
आणि प्रसंगी वाचाळपणे सुद्धा मला काय म्हणायचंय ते नीट समजावून सांगतो. विशेष म्हणजे
माझं हे स्पष्ट आणि नीट समजावून सांगणं बहुतेकांना समजतं, पटतं आणि मान्य सुद्धा होतं
असा माझा अनुभव आहे. अपवाद अर्थातच फक्त ..... 'बायको'... असो ! तो एक वेगळाच विषय
होईल… अर्थात जेव्हा माझा एकट्याने घर सोडून चतुर्थाश्रम स्वीकारण्याचा विचार पक्का
होईल तेव्हा मी या विषयाबद्दल जरूर लिहून जाईन.
सारांश काय ? तर इमोटीकॉन्सचे आणि
माझे 'जमणे नाही.' इति अलम !
विशेष सूचना - इमोटीकॉन्सरुपी प्रतिक्रियांना
फक्त अंगठा दाखवण्यात येईल व बाकी दुर्लक्ष करण्यात येईल.
@प्रसन्न
सोमण
०८-०९-२०१७.प्रसिद्धी - अभूतपूर्व (ऑगस्ट २०२४)
No comments:
Post a Comment