Thursday, 28 September 2017

-- त्या दोघी --

--  त्या दोघी  --


"हल्ली टेक्नॉलॉजी इतकी कमालीची ऍडव्हान्स्ड झालीय की काही विचारू नकोस !" माझा एक संगीताशी झटापट करणारा नवोदित संगीतकार मित्र मला सांगत होता. "अरे हल्ली खूप पीच करेक्टिंग सॉफ्टवेअर्स निघालीयत. त्यामुळे गायक-गायिकेचा सूर कणसूर लागला, बेसूर लागला किंवा घसरला तरी गाणं परत गायला लागता या सॉफ्टवेअर्सच्या थ्रू प्रोसेसिंग करून ते करेक्ट सुरात आणता येतं. गायक-गायिकांना हल्ली याचा खूपच उपयोग होतो." माझा तो मित्र खूप उत्साहात मला हे सांगत होता.

खरं आहे ! आपली इच्छा नसतांना सुद्धा वेळीअवेळी कानांवर आदळणाऱ्या शील्या, चिकन्या चमेल्या, इत्यादी गोष्टी नाईलाजाने ऐकल्यावर ही प्रगती आपल्याला सुद्धा जाणवतेच की ! आपल्या दोन कानशिलांजवळच्या भोकांवर भले 'नो एंट्री' चा बोर्ड लावलेला असला तरी; बड्या बापाच्या दारू ढोसलेल्या पोराची बेकाबू झालेली कार ज्याप्रमाणे थेट रेल्वे प्लॅटफॉर्मवर घुसते त्याप्रमाणे कानात घुसणाऱ्या या 'प्रोसेस्ड सुरांचं' नक्की करायचं तरी काय, हे कळत नाही हो ! 'गाणं' या नावाखाली, घशात अभ्रकाचा तुकडा अडकलेल्या मधमाशीच्या आवाजाप्रमाणे, येणारे अमानवी आवाजसुद्धा अलिकडे कानांवर बलात्कार करतात, तेही बहुदा याच 'चमत्कारिक' तांत्रिक प्रगतीमुळे. ह्या असल्या प्रोसेस्ड स्वरांपुढे आणि 'घरातल्या' अनप्रोसेस्ड आणि उपजतचढ्या’ स्वरापुढे कानांवर लावलेले 'नो एंट्रीचे' बोर्ड सुद्धा हात टेकतात हो ! म्हणून तर आमचा चेहरा हल्ली सदैव सुतकी, सुकलेला किंवा कावलेला असतो ! जाऊद्या !! 'घरा'नी मारलं आणि नव्या गायक-गायिकांनी ठोकरलं तर तक्रार तरी कोणाकडे करायची ? … अर्थात माझ्या मनातले हे विचार त्या बिचाऱ्याच्या कानावर घालून कशाला त्याच्या उत्साहावर पाणी ओता, असा विचार करून मी गप्पच राहिलो.

पण सांगण्यासारखी गोष्ट ही की, या सगळ्या तथाकथित पीच करेक्टिंग सॉफ्टवेअर्सच्या चालू आणि फ्युचर अपडेटेड व्हर्जन्सच्याही निःसंशय पुढे जाणारं 'ऑल टाइम अपडेटेड पीच करेक्टिंग सॉफ्टवेअर' एका कन्यारत्नाच्या स्वरयंत्रामध्येच इन्स्टॉल करून त्या नादब्रह्म परमेश्वराने हे अद्वितीय कन्यारत्न दिनांक २८ सप्टेंबर १९२९ रोजी लता दीनानाथ मंगेशकर या नावाने जन्माला घातलं.         

वास्तविक लताचं अद्भुत गाणं शब्दात पकडण्याचा प्रयत्न पु.लं.सहित असंख्य बड्या साहित्यिकांनी, लेखकांनी, समीक्षकांनी, इसाक मुजावर, शिरीष कणेकरांसारख्या हिंदी चित्रपटसंगीताच्या आशिकांनी, केलेलाच आहे. तिथे आमच्यासारख्या मच्छरांचा काय पाड ? पण यःकश्चित मच्छर जरी झाला तरी त्यालाही आपला आनंद, आपली कृतज्ञता; भले गुणगुणण्याच्या स्वरूपात का होईना; व्यक्त करण्याचा अधिकार आहेच ना ? शेकडो लेखकांनी लताच्या हजारो गाण्यांचे दाखले देऊन लताच्या गाण्याचं वर्णन आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे; मात्र तरीही, माझी तरी अशी भावना आहे की लताचं अजोड गाणं या शाब्दिक वर्णनात मावतच नाही कारण ते 'दैवी' आहे. आता 'दैवी,' 'कोकिळेचा पंचम स्वर,' 'गळ्यातला गंधार,' हेसुद्धा शेवटी शब्दच आहेत आणि तेही थिटेच आहेत... लताचं बेमिसाल गाणं फक्त अनुभवायचं आणि बेहोष व्हायचं ... बस्स !

याच कारणासाठी लताच्या 'दैवी' गाण्याबद्दल मुळी मला काही लिहायचंच नाहीये. फक्त माझ्या बाजूनी मला काही थोडंसं लिहावंसं वाटतंय ते लताबद्दलच्या 'मानवी' दृष्टिकोनातून.

वास्तविक जाहीररीत्या आजवर या गोष्टी थोड्याशा दबकत दबकत आणि काळजीपूर्वकच मांडल्या गेल्यायत. अर्थातच या गोष्टी फक्त हिंदी चित्रपटगीतांशी निगडित आहेत, मराठी नव्हे. कारण नाही म्हटलं तरी पैसा, प्रसिद्धी या दृष्टिकोनातून मराठी गाणी हे डबकं आहे तर हिंदी चित्रपटगीतं हा महासागर आहे हे नक्कीच... खरंतर या बाबतीतले मुख्य मुद्दे फक्त दोनच आहेत. एक म्हणजे लतानी, प्रसंगी दबाव आणून, गाणी आपल्याकडेच ठेवून, आशासकट सगळ्या (त्यावेळच्या) नवोदित गायिकांना पुढे येण्याची संधी नाकारली आणि दुसरा म्हणजे लता आणि आशा यांच्यात तुम्हाला कोण सर्वश्रेष्ठ वाटते ! खरं म्हणजे अनेक वेळा हे दोन्ही मुद्दे एकमेकात मिसळल्यासारखे वाटतात. पूर्वीची परिस्थिती वेगळी होती; पण आज दोघींचीही संगीत कारकीर्द संपली आहे किंवा जवळ जवळ संपल्यात जमा आहे. त्यामुळे या आणि असल्या मुद्द्यांमुळे आज त्यांच्या किंवा कोणाच्याही हितसंबंधांना कसलाही धक्का लागण्याची काही शक्यताच नाहीये... 'सई परांजपें'चा 'साज' हा सिनेमा याच दोन मुद्द्यांना सुरुवातीला हात घालतो खरा, पण नंतर हा सिनेमा टर्न घेऊन एकदम निराळ्याच वाटेनी जातो.

असं वाचनात आलंय की कवि प्रदीप यांच्या, पंडित नेहरूंना भावनाप्रधान करणाऱ्या ' मेरे वतन के लोगो' या बहुचर्चित गैरफिल्मी गाण्याच्या बाबतीत, गाणं दबाव आणून स्वतःकडे ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न लताकडून केला गेला. या गाण्याचे संगीतकार सी.रामचंद्र यांचं या काळात लताशी वितुष्ट असल्यामुळे हे गाणं त्यांनी आशाला दिलं होतं. (रिपोर्ट्सनुसार संगीतकाराचं लताशी वितुष्ट आल्यामुळेच हे गाणं आशाकडे आलं होतं ... प्लिज नोट.)  पण मधल्या काळातकुठंतरी, काहीतरी’ घडलं आणि प्रत्यक्षात हे गाणं लतानी गायलं आणि पंडित नेहरूंना रडवलं, असा (म्हणे) किस्सा आहे. 'साज' सिनेमामध्ये सुद्धा अप्रत्यक्षपणे याच गाण्याचा किस्सा आलेला आहे.      

स्वतः त्या दोघींनीही जाहीरपणे या पैकी कुठल्याच मुद्द्यांवर कधीच काहीच भाष्य किंवा कॉमेंट केल्याचं माझ्या तरी ऐकण्या-वाचण्यात नाही. केली तरी दोघीही एकमेकींची फक्त स्तुतीच करतात आणि फारतर 'स्पर्धा आम्हालाही होती पण त्या स्पर्धेतून तावून-सुलाखून आम्ही या पदाला पोहोचलो' अशा जनरल स्वरूपाची प्रतिक्रिया व्यक्त करतात. अर्थात त्यांचा एकमेकींबद्दलचा हा अप्रोच नक्की खूप कौतुकास्पद आहेच.

मात्र गम्मत ही आहे की, काहीतरी सनसनाटी निर्माण करू इच्छिणारी पत्रकार, टीकाकार जमात आणि मग त्या अनुषंगाने रसिक संगीतप्रेमी सुद्धा खाजगी भेटीत या मुद्द्यांवर अहमहमिकेनं चर्चा करतात; प्रसंगी वितंडवाद सुद्धा घालतात.                    

लतानी गाणी हिसकावून स्वतःकडे ठेवली किंवा इतर गायिकांना पुढे येऊ दिलं नाही या मुद्द्याच्या बाबतीत मला स्वतःला तरी एवढंच वाटतं की, समजा लतानी इतरांची गाणी हिसकावून घेतली असतीलच तर त्या गाण्यांचे प्रतिष्ठित संगीतकार काय करत होते ? सर्वेसर्वा असणारे निर्माते काय करत होते ? हे लोक का गप्प राहिले ? लताच्या विरोधात जाणं आपल्याला झेपणार नाही असं वाटल्यामुळे की लता हीच सर्वश्रेष्ठ आहे हे मनातून पटल्यामुळे ? ... मुळात वर सांगितलेला 'ऐ मेरे वतनके लोगो' या गाण्याच्या बाबतीतला दुजोरा नसलेला 'कथित' किस्सा सोडल्यास लतानी इतरांची गाणी हिसकावून वगैरे घेतली, या वावड्याच असाव्यात असा माझा तरी समज आहे. अशी अनेक उदाहरणं, चुकून असलीच तरीही ती, जोवर उजेडातच येत नाहीत तोवर तरी लताविरुद्ध असला गैरसमज बाळगण्याचं काहीच कारण दिसत नाही.

शिवाय लताच्या गाण्याचं कितीही 'दैवी' वगैरे वर्णन केलं तरीही लता आणि अर्थातच इतर गायिकासुद्धा चित्रपटसृष्टीत गायनाचा व्यवसाय करीत होत्या. व्यवसाय म्हटल्यावर त्यात इर्षा, स्पर्धा, राजकारणं, इतरांवर कुरघोडी, या गोष्टी सुद्धा आल्याच. हे सुद्धा एक प्रकारचं युद्धच आहे आणि युद्धात शत्रूला 'तुम्ही फारच जोराने मारता,' असं म्हणायचं नसतं. शिवाय त्या कुरघोडी केल्या गेलेल्या गायिकांना सुद्धा हे सगळे पर्याय उपलब्ध होतेच, ही गोष्ट निदान आपण रसिकांनी तरी विसरता कामा नये. त्यामुळे या असल्या कुरबुरी ऐकल्या की मला तरी त्यामध्ये, सर्वश्रेष्ठ असणाऱ्या गायिकेबद्दल इतरांना वाटणारी 'जळजळ,' यापलीकडे दुसरं काही तथ्य वाटत नाही.

लता आणि आशा यांच्यात श्रेष्ठ कोण ? किंवा मग जरा सौम्य शब्दात, लता-आशा मध्ये तुम्हाला कोण जास्त आवडते ? - असा एक विषय घेऊन सुरुवातीला चर्चा आणि मग वादविवाद सुद्धा घालायला रसिकांना, संगीतप्रेमींना भारी आवडतं; असाही एक माझा अनुभव आहे. -- अशी ही तुलना नेमकी का आणि कशासाठी करायची ? आणि अगदी अट्टाहासाने करायचीच झाली तर निवाड्यासाठी नेमका निकष काय आणि कसा लावायचा ? या दोन्ही गोष्टी संगीतप्रेमी असूनही माझ्या डोक्यात अजिबातच शिरत नाहीत. तुलनेसाठी दोघींचीही गाणी दोघींच्याही आवाजात आपल्याला कधी ऐकायलाच मिळालेली नाहीयेत. आता ही पूर्णतः अशक्य असलेली गोष्ट खरी असल्यामुळे स्वतःपुरतं स्वतःचं मत द्यायचं झालं तरी; सिरीयस, दर्दभरी, काळजाला हात घालणारी गाणी लता अप्रतिम गाते किंवा उडत्या चालीतली, नटखट किंवा कॅब्रे टाईपची गाणी आशा भन्नाट गाते; अशांसारख्या जनरल निकषांवर मत द्यायचं तरी कसं आणि का ? ... 'लताच्या गाण्यांमध्ये लता अक्षरशः भान विसरायला लावते आणि आशाच्या गाण्यांमध्ये आशा कलेजा काटून नेते. त्यामुळे दोघीही ‘बाप’च आहेत,' अशासारखं उत्तर मंडळींना चालत नाही. आणि सर्वश्रेष्ठ म्हटलंय, त्यामुळे एकच ऑप्शन निवडा; असा हा थोडासा अवाजवी खोडा असतो.

जबरदस्तीनं एकच उत्तर द्यायचं असल्यामुळे मी निःसंदिग्धपणे माझं स्वतःचं उत्तर देऊनच टाकतो की मला निःसंशय लता सर्वश्रेष्ठ वाटते… आशावर नेहमीच अन्याय होतो, असं 'आशा'दायी व्यक्तींना वाटू शकेल आणि मला स्वतःला तसं जरी वाटलं नाही, तरीही माझ्या मनात आशाबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर तर निश्चितच आहे. मराठीत बाबुजींकडे आणि हिंदीत ओ. पीं.च्या कडे लता गायलेली नाहीये तेव्हा त्या दोघांचीही सगळी नितांत सुंदर गाणी आशाकडे आलीयत आणि अर्थातच आशानी या सर्व गाण्यांचं सोनं केलंय. शिवाय १९५७ ते १९६२ या पाच वर्षात 'काही कुरबुरींमुळे' लता एस.डी.बर्मन यांच्याकडे सुद्धा गायलेली नाहीये. या काळातील एस. डीं.च्या ‘काला पानी,’ ‘बम्बई का बाबू,’ ‘लाजवंती,’ ‘काला बाजार,’ ‘सुजाता,’ इत्यादी सिनेमातली सुंदर गाणी आशाला मिळालीयत. त्या गाण्यांनाही आशानी चार चाँद लावलेयत. आशाच्या दिलखेचक गान कौशल्याबद्दल आणि तिच्या गळ्यातल्या माधुर्याबद्दलही तिळमात्रही कुठलीच शंका नाही.  पण हे सगळं मनापासून मान्य करूनही मला वाटतं की लताच्या गाण्यामध्ये आधी सांगितल्याप्रमाणे वर्णनच न करता येणारी 'काहीतरी खास बात' आहे.             

वयानी मोठी असल्यामुळे लताला खूप फायदा झालाय, असाही एक मुद्दा मांडला जाऊ शकतो. पण मला वाटतं हिंदी चित्रपटसृष्टी नजरेसमोर ठेवली तर त्यात विशेष तथ्य नाहीये. - लता चार वर्षांनी मोठी आहे. ती १९४९ मध्ये 'चुप चुप खडे हो' (बडी बहेन), 'आयेगा आनेवाला' (महल) 'कोई मेरे दिलमे ख़ुशी बन के आया' व 'उठाये जा उनके सितम' (अंदाज) या आणि अख्ख्या 'बरसात' च्या गाण्यांनी एकदम प्रसिद्धीच्या झोतात आली आणि लगेचच पहिल्या क्रमांकावर जाऊन बसली. या हिशोबानी चार वर्षांचा फरक जमेस धरून आशा १९५३-५४ च्या दरम्यान (जेव्हा आशा २०-२१ वर्षांची होती) हिंदीमध्ये अगदी पहिल्या क्रमांकाची जरी नाही तरी लताला तोडीस तोड टक्कर देऊ शकणारी गायिका तरी व्हायला हवी होती. प्रत्यक्षात जवळजवळ १९५७ च्या 'तुमसा नही देखा' पर्यंत आशा एक्स्ट्रॉ नट्यांच्या, कॅब्रे डान्सरच्या, दुय्यम नायिकांच्या किंवा नायिकांच्या सख्यांच्या तोंडी असलेली दुय्यम गाणी गात होती. साधारण १९५७ आणि त्यानंतर मात्र ओ. पीं.ची आणि एस. डीं.ची अनेक सुंदर गाणी गावून आशाची गाडी सुद्धा 'सुसाट सुटली.' मात्र तोवर लता ध्रुवासारखी 'नंबर वन'च्या अढळपदी जाऊन बसलेली होती आणि सर्वेसर्वा असणारे रसिक संगीतप्रेमी; आणि म्हणून निर्माते, पुंजीपती फायनान्सर्स इत्यादींच्या लेखी ती 'पर्यायच नाही' या सदरात जाऊन बसलेली होती. यथावकाश - साधारण १०-१२ वर्षात - दर्दभऱ्या गाण्यांच्या संगीताचा ट्रेंड हळूहळू पण निश्चितपणे बदलला. ही उडत्या चालींची, थोडीशी 'चालू' असलेली गाणी आशानी भन्नाटच गायलीयत हे नक्कीच. फक्त संख्येचा विचार करायचा तर आशाच्या गाण्यांची संख्या कालांतरानी लताच्या गाण्यांपेक्षा जास्त झाली हेही खरं. पण या काळात आशाची कारकीर्द लताच्या कारकिर्दीच्या जवळ जवळ समांतर धावत असली तरीही आशा 'सर्वोत्कृष्ट' पद किंवा 'नंबर वन' पद लताकडून हिसकावून घेऊ शकली नाही, असं माझं प्रामाणिक मत आहे.       

मी रिपीट करतो की - १) मी फक्त हिंदी चित्रपटगीते नजरेसमोर ठेवून माझं विवेचन केलेलं आहे, २) आशाच्या गान कौशल्याबद्दल आणि तिनी दिलेल्या आनंदाबद्दल मला अमाप प्रेम, आदर आणि कृतज्ञताच आहे आणि ३) माझं विवेचन हे फक्त 'माझं मत' आहे आणि त्याविषयी अर्थात मतभेद तर होऊ शकतातच; पण मी फक्त 'व्यक्त झालोय' एवढंच. अर्थात हे 'व्यक्त होऊन' मी आपण होऊन मधमाशांच्या पोळ्यावर दगड मारण्याचं औद्धत्य केलंय की काय, अशी मला शंका येत्येय हे मात्र निश्चित.

फार पूर्वी मी प्रा.शिवाजीराव भोसले यांच्या ‘हिंदुत्व’ या विषयावरील व्याख्यान ऐकायला गेलो होतो. त्या व्याख्यानातील एक वाक्य मला फार आतून भिडलं आणि ते वाक्य माझ्या आजतागायत लक्षात राहिलंय. ते वाक्य असं होतं -- मी हिंदू आहे. माझ्या हातांचा मोक्ष चांगल्या गोष्टी करण्यामध्ये आहे, कानांचा मोक्ष चांगल्या गोष्टी ऐकण्यामध्ये आहे, डोळ्यांचा मोक्ष चांगल्या गोष्टी बघण्यामध्ये आहे, वाणीचा मोक्ष नामस्मरणामध्ये आहे आणि पायांचा मोक्ष आळंदीकडे चालण्यामध्ये आहे… या चालीवर मला एवढंच म्हणायचंय की माझ्या कानांचा मोक्ष लताची ‘दैवी’ गाणी ऐकण्यामध्ये आहे.

(टीप - फक्त अतीव प्रेमापोटी लता व आशाचे उल्लेख एकेरी केलेयत, हे कृपया लक्षात घ्यावे.)


-- मा प्त --

@प्रसन्न सोमण
२८/०९/२०१७.
त्या दोघी