#अजूनएकमराठीसंगीतकार
#११)दशरथ पुजारी
खूप म्हणजे खूप खूप वर्षांपूर्वी मराठी
रंगभूमीवर आत्माराम सावंत लिखित 'मुलगी' हे नाटक चालू होतं.
या नाटकामध्ये नायिका एका मैफिलीत अदा करून एक गीत सादर करते असा एक प्रसंग होता.
या गीताला, मैफिलीचा ढंग यावा म्हणून, नाटकाच्या तरुण, तडफदार संगीतकाराने एक ठुमरी-दादरा अंगाची अप्रतिम चाल बांधली होती
व नाटकातील नायिका हे गीत गात असे. थोड्या काळात,
या नाटकाचे प्रयोग थांबल्यानंतर, हे गीत एच.एम.व्ही.मध्ये रेकॉर्ड झाले.
ते गीत नितांत सुंदर पद्धतीने सादर करणारी महाराष्ट्राची लाडकी गायिका होती माणिक वर्मा,
ते ठुमरी-दादरा
अंगाचे अप्रतिम गीत होते 'त्या सावळ्या तनुचे मज लागले
पिसे गं' आणि ही बेमिसाल चाल बांधणारे संगीतकार होते दशरथ पुजारी.
संगीतकार श्रीनिवास खळे यांच्याप्रमाणेच संगीतकार दशरथ पुजारी ही सुद्धा महाराष्ट्राला बडोद्याचीच देणगी आहे. पुजारींचा जन्म १९३० मध्ये बडोद्यालाच झाला पण पुढे
पुजारी कुटुंब मुंबईला आलं. त्यानंतर पुजारी सहा-सात वर्षांचे असतांना मुंबईतल्या दंग्यांच्या भीतीमुळे पुजारी कुटुंब बार्शीला शिफ्ट झालं. घरामध्ये फारसं संगीत नसूनही छोट्या पुजारींचा जीव संगीतात रमत होता.
बार्शीचेच गोपाळराव भातंब्रेकर हे पुजारींचे संगीत गुरु.
पुजारी सात वर्ष
या भातंब्रेकर गुरुजींकडे शास्त्रीय संगीत शिकले तसेच
हार्मोनियमही शिकले. त्या
काळात ख्याल, ठुमरी
व फारतर नाट्यसंगीत यामध्येच पुजारी रमले
होते. पुढे पुजारी मुंबईला आले. ते उत्तम गात असत व उत्कृष्ट हार्मोनियमही वाजवत
असत. पुजारींनी एच.एम.व्ही.मध्ये
आपलं शास्त्रीय गायन रेकॉर्ड व्हावं म्हणून प्रयत्न केले; मात्र
तिथल्या अधिकाऱ्यांनी तुम्ही अगोदर बाहेर प्रयत्न करून प्रसिद्ध गायक व्हा, मगच तुमचं
क्लासिकलचं रेकॉर्डिंग करू, असं सांगून पुजारींना वाटाण्याच्या अक्षता लावल्या. त्यानंतर पुजारींनी शास्त्रीय गायनाचे काही कार्यक्रम केले, अनेकांना हार्मोनियमची साथ केली व काही
हार्मोनियम सोलोचेही कार्यक्रम केले.
असाच एक कार्यक्रम ऐकून जुन्या जमान्यातले भावगीत गायक आणि एच.एम.व्ही.चे अधिकारीही असलेले श्री.जी.एन.जोशी खूप प्रभावित झाले व त्यांनी पुजारींना 'चांगल्या कवितांना स्वरबद्ध करून भावगीते व भक्तिगीते निर्माण करा,'
असा सल्ला दिला.
'भावसंगीतात काहीतरी केलंत
तरच एच.एम.व्ही.मध्ये रेकॉर्डिंग होऊ शकेल,' असंही जी.एन.जोशींनी पुजारींना सांगितलं... झालं,
मनाने शास्त्रीय संगीतातच बुडलेल्या पुजारींना हे एक नवीनच आव्हान मिळालं. एच.एम.व्ही.मधला मोठा म्युझिक डायरेक्टर होऊनच दाखवीन, या जिद्दीने ते चांगली काव्य शोधायलाही लागले व त्यांना उत्तमोत्तम चाली लावायलाही लागले. केरवा, दादरा,
रूपक, इत्यादी निरनिराळ्या तालांच्या वजनात, अक्षरशः कारखाना काढला असल्यागत, ते चाली लावीत
असत. त्यानंतरही एकदा एच.एम.व्ही.मधल्या अधिकाऱ्यांनी पुजारींना, 'चांगले गायक / चांगल्या गायिका घेऊन
या; मग तुमची
गाणी रेकॉर्ड करू,'
असंही सांगितलं. शेवटी गीतकार श्री.नाना
साठे यांची दोन गीते गायिका प्रमोदिनी देसाई यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्याचं एच.एम.व्ही.अधिकाऱ्यांनी मान्य
केलं आणि पुजारी (एच.एम,व्ही.
रेकग्नाईझ्ड) संगीतकार झाले. ही दोन सुंदर
गाणी आहेत 'श्रीरामा घनश्यामा आलास कधी परतून' आणि 'हांस
रे मधू हांस
ना.' ही दोन अतिशय सुंदर अशी गाणी का कोण जाणे पण इंटरनेटवर कुठेच उपलब्ध नाहीयेत.
तशी पुजारींनी चिक्कार गीतांना चाली
लावून गाणी निर्माण केली, मात्र त्यापैकी फारच थोडी गाणी
रेकॉर्डवर आली व गाजली. बरीचशी गाणी
रेकॉर्डवर आलीच नाहीत.
काही जुन्या भावगीत गायकांप्रमाणेच पुजारी भावगीत गायनाचे अनेक कार्यक्रम करू लागले व त्यामध्ये ही गाणी
रसिकांना ऐकायला मिळाली व त्या त्या
वेळी ही गाणी
रसिकप्रियही झाली. मात्र
रेकॉर्ड निघून रेडियोवर त्या वाजवल्या जाऊन प्रसिद्ध होणे, हा प्रवास बऱ्याच गाण्यांच्या बाबतीत झालाच नाही.
रेकॉर्डसच्या बाबतीत सांगायचं तर पुजारींच्या ज्या गाण्यांच्या रेकॉर्ड्स निघाल्या ती गाणी मात्र रेडियोमार्फत भरपूरच गाजली. वास्तविक पुजारी स्वतः गायक होते;
पण तरीही त्यांच्या संगीतात पुरुष गायकांच्या गाण्यांचं प्रमाण फार थोडं आहे. त्याकाळी पुरुष भावगीत गायक
स्वतःच्या मैफिलीत स्वतः
गाणी गायचे व त्यातही स्त्री स्वरातली गीते सुद्धा कार्यक्रमात पुरुष गायचे; पण मुख्यतः तो जमाना
स्त्री स्वरातली गीते व स्त्री गायिकांचाच होता.
अगदी सुरुवातीपासून पुजारींनी विश्वासाने ज्या दोन स्वर्गीय गळ्याच्या गायिकांकडून भरपूर
गाणी गावून घेतली
त्या दोन गायिका आहेत माणिक वर्मा
व सुमन कल्याणपूर. जरा ही गाणी
आठवलीत तर ही गोष्ट
तुमच्याही सहजच लक्षात येईल -
माणिक वर्मा
यांची गाणी - रंगरेखा घेऊनी मी भाग्यरेखा रेखिते, निळ्या नभातून नील चांदणे, जनी नामयाची रंगली कीर्तनी, कृष्णा पुरे ना थट्टा किती ही, या मुरलीने कौतुक
केले, चरणी तुझिया मज देई, भाग्य
उजळले तुझे चरण पाहिले, क्षणभर उघड नयन देवा, नका विचारू देव कसा,
रंग तुझा सावळा
दे मला गोविंदा घननीळा, इत्यादी...
सुमन कल्याणपूर यांची गाणी - आठवे
अजुनी यमुनातीर (चित्रपट - बोलकी
बाहुली), केशवा माधवा, जुळल्या सुरेल तारा,
पाण्यातली परी मी, प्रीत सागरी तुझ्या स्मृतीचे, रात्र आहे पौर्णिमेची, रे क्षणाच्या संगतीने, सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले,
क्षणी या दुभंगुनिया, आंस आहे अंतरी
या आसरा हृदयात दे आणि अशीच
इतरही अनेक गाणी.
मुरलीधर घनश्याम सुलोचन व सायंकाळी निवांत वेळी रातराणी उमलली जिवलगा प्रीती अबोल झाली (दोन्ही गाण्यांच्या गायिका - कुमुद
भागवत), ते गीत कोकिळे गा पुन्हा पुन्हा (गायिका - उषा वर्तक), नच साहवतो हा भार (गायिका - वाणी जयराम), तुझी सुरत मनात राया भरली
रे (लावणी / गायिका - शोभा गुर्टू); अशी काही अपवादात्मक गाणी पुजारींनी अन्य गायिकांकडून सुद्धा गावून घेतलेली आहेत.
आपलं गाणं जास्तीत जास्त बिनचूक आणि सुंदर व्हावं
यादृष्टीने संगीतकार व गायक-गायिका त्यावेळेस किती मेहनत घेत असत, हे दर्शवणारा पुजारी
आणि माणिक वर्मा यांचा एक किस्सा आहे. जनी नामयाची रंगली कीर्तनी (गायिका - माणिक वर्मा)
या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या आधीच्या रात्री दोन वाजेपर्यंत माणिकबाईंची मैफिल रंगली
होती. तरी माणिकबाई सकाळी वेळेवर रेकॉर्डिंगला आल्या. पूर्ण गाणं रेकॉर्ड झाल्यानंतर
परत रेकॉर्ड ऐकतांना पुजारींच्या असं लक्षात आलं की, जनी या शब्दातील 'ज'चा उच्चार
जग या शब्दातल्या 'ज'प्रमाणे झाला आहे; पण तो हवाय जहाज या शब्दातल्या 'ज'प्रमाणे.
माणिकबाई या पुजारींच्या मानाने सर्वार्थाने जेष्ठ असूनही पुजारींनी माणिकबाईंना अपेक्षित
उच्चार कसा हवाय, हे सांगितलं व पहिला टेक ओके झाला असूनही माणिकबाईंनी योग्य उच्चारासहित
गाणं पुन्हा गावून रेकॉर्ड करून दिलं.
गीतकार श्री.मधुकर जोशी यांनी शिवाजी महाराजांच्या
आयुष्यातील एका प्रसंगावर एक सुंदर गीत लिहिलं होतं. या गीताला चाल लावून पुजारी आपल्या
जाहीर कार्यक्रमात हे गीत म्हणत असत व ते लोकांना फार आवडत असे. अशाच एका कार्यक्रमात
हे गीत ऐकून तेव्हाचे मुख्यमंत्री श्री.यशवंतराव चव्हाण यांनी पुजारींना अशी सूचना
केली की संपूर्ण शिवचरित्रावरील गीतांचा कार्यक्रम पुजारींनी करावा. त्यानंतर मग श्री.मधुकर
जोशी यांनी संपूर्ण शिवचरित्रावर तब्बल ६९
गीते लिहिली व त्यांना चाली लावून पुजारींनी 'गीत-शिवायन' या शीर्षकाअंतर्गत
या गीतांचे अनेक जाहीर कार्यक्रम सादर केले. त्याच्याच आगेमागे निमित्त ठरलेल्या त्या
पहिल्या गीताची रेकॉर्डही निघाली. ते गीत होते, 'अशीच आमुची आई असती सुंदर रूपवती,
आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती.'
ग.दि.मा.व बाबूजी सुधीर फडके यांच्या प्रसिद्ध
'गीतरामायणा'पासून स्फूर्ती घेऊन गीतकार श्री.म.पां.भावे यांनी कृष्णचरित्रावर काही
गाणी लिहिली होती. या गाण्यांना पुजारींनी चाली लावल्या आणि 'गीतकृष्णायन,' या शीर्षकाअंतर्गत
पुजारींनी या गाण्यांच्या सादरीकरणाचे बरेच प्रयोगही केले. हे प्रयोग त्यावेळेस लोकप्रियही
झाले. यातील एका प्रयोगाला स्वतः बाबूजी सुधीर फडके हजर होते व कार्यक्रमानंतर बाबूजींनी
कार्यक्रमाबद्दल व पुजारींच्या वैशिष्ट्यपूर्ण चालींबद्दल खूप गौरवोद्गार काढले होते.
काही काळानी याच 'गीतकृष्णायन' कार्यक्रमातील
'कृष्णा पुरे ना थट्टा किती ही,' या एका गाण्याची माणिक वर्मा यांच्या स्वरात
रेकॉर्डही निघाली व तीही अतोनात गाजली.
'मृदुल करांनी छेडीत तारा' (गायिका - सुमन कल्याणपूर),
या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेस योगायोगाने आशा भोसले व ओ.पी.नय्यर रेकॉर्डिंग
स्टुडियोत आले. गाणं ऐकून ओ.पी.नी आशाला लगेच विचारले - "कम्पोजर कौन है ? गायिका
कौन है ? क्या खूबसूरत और क्या लयमे गाया है ! वा वा ! भाषा तो नही समझता लेकिन सूर,
ताल और गीतका वजन जो हैं वो बहोतही अच्छा है !" ... व्हॉट अ कॉम्प्लिमेंट ! आशानी
अर्थातच ताबडतोब ओ.पी.ना सुमनचा व संगीतकार म्हणून पुजारींचा परिचय करून दिला.
गीतकार सौ.अनुराधा साळवेकर यांच्या एका गीताचा
सुद्धा असाच एक रंजक किस्सा आहे. सौ.साळवेकरांनी त्यांचं एक कवितेचं पुस्तक पुजारींना
भेट दिलं. त्यातील एक कविता पुजारींना अतिशय आवडली. ती कविता अशी होती -
चांदणे ते तेच मधुबन ती निशा शरदातली
संगतीला नाही कान्हा आज राधा एकली !!
या कवितेला पुजारींनी रूपकच्या वजनातली सुंदर
चाल लावली व ते गाणे 'एच.एम.व्ही.'तल्या अधिकाऱ्यांना ऐकवले. का कोण जाणे, पण त्या
अधिकाऱ्यांना ते काव्य पसंत पडले नाही व त्यांनी रेकॉर्डिंगला नकार दिला. एवढी सुंदर
चाल वाया जाते आहे याची पुजारींना फार रुखरुख होती. पुढे गीतकार शांताराम नांदगावकरांनी
त्यांच्या गीताच्या रेकॉर्डिंगसाठी पुजारींकडे टुमणं लावल्यानंतर पुजारींनी नांदगावकरांना
ही चाल ऐकवून त्यावर शब्द लिहून आणा, मग पाहू; असं सुचवलं. नांदगावकरांनी हे
आव्हान स्वीकारून त्या चालीवर -
रात्र आहे पौर्णिमेची तू जरा येऊन जा
जाणिवा थकल्या जीवाच्या एकदा ऐकून जा !!
असं लाजवाब गीत लिहिलं व ते अप्रतिम गाणं सुमन
कल्याणपूरच्या स्वरात रेकॉर्डही झालं. प्रथम चाल व मग त्यानुरूप त्यावर रचलेले गीत;
अशा पद्धतीने पुजारींनी केलेलं हे एकमेव गाणं...
सौ.साळवेकरांच्या गीतालाही रूपकच्या वजनातली वेगळी चाल पुजारींनी लावली व पुढे
कॅसेटच्या जमान्यात पुजारींच्या एका अल्बममध्ये गायिका शोभा जोशी यांनी ते गाणं गायलं.
संत सोहिरोबांच्या 'हरी भजनाविण काळ घालवू नको
रे,' या अभंगाला पुजारींनी अहिर भैरव रागातली एकतालातली चाल लावली व स्वतःच्या आवाजात
हा सुंदर अभंग पुजारींनी रेकॉर्ड केला. ही रेकॉर्ड भरपूर गाजली. पुढे पं.जितेंद्र अभिषेकी
बुवांनी याच अभंगाला एकतालातलीच सोहोनी रागातली तितकीच सुंदर चाल लावली. अभिषेकी बुवांचीही
या अभंगाची रेकॉर्ड निघाली व तीही तितकीच गाजली... सारांश, संगीत दिग्दर्शन म्हणजे
एक प्रकारचं सागर मंथनच आहे. या मंथनातून सुंदर सुंदर गाण्यांची भरपूर रत्ने अनेक संगीतकारांनी
आपल्या झोळीत ओतलेली आहेत.
शास्त्रीय संगीतात रमल्यामुळे सुरुवातीला कठीण स्वरूपाच्या चाली लावण्याकडे पुजारींचा कल होता. मात्र नंतर
त्यांनी सोप्या, गुणगुणता येण्याजोग्या चाली लावण्यावर भर दिला. तरीही
खटके, हरकती, मुरक्या यांची आवश्यक त्या
ठिकाणी योजना पुजारींनी जरूर केलेली आहे.
उदाहरणार्थ - 'वाऱ्यावरती घेत लकेरी
गात चालल्या जललहरी (गायिका - सुमन कल्याणपूर), या गाण्यात जललहरी गात चालल्या असल्यामुळे 'जललहरी' या शब्दावर आवश्यक अशा हरकती मुरक्यांची योजना पुजारींनी केलेली आहे.
त्या काळातल्या इतर काही मराठी
संगीतकारांप्रमाणेच दशरथ पुजारी यांची कारकीर्द चित्रपट संगीतात अजिबातच फुलली नाही.
भावगीते, भक्तिगीते, एच.एम.व्ही.च्या
रेकॉर्ड्स, भावगीत गायनाचे तसेच गीतकृष्णायन व गीतशिवायन यांचे अनेक
जाहीर कार्यक्रम, रेडियोवरील भावसरगम व इतर कार्यक्रम, पुढे कॅसेटच्या जमान्यात केलेले अल्बम्स, या द्वारेच पुजारींचे संगीत फुलले.
रेडियोच्या निमित्ताने संगीतकार यशवंत
देव यांच्याशी पुजारींचे अकृत्रिम स्नेहसंबंध जुळून आले व त्या योगे
देव व पुजारी अशी जोडी जमली.
जेव्हा संगीतकार दशरथ पुजारींच्या हव्याहव्याशा वाटणाऱ्या धुंदफुंद गाण्यांची आठवण येते तेव्हा पुजारींनीच कॉर्ड्स पद्धतीनुसार चाल दिलेलं गाणं मी नकळत गुणगुणायला लागतो -
मस्त ही हवा नवी, वाटते
नवे नवे
तू जिथे
तिथे तुझी धुंद,
मी तुझ्यासवे !!
माझ्या पसंतीची दहा गाणी
--
१) चल उठ रे मुकुंदा झाली पहाट
झाली - सुमन / भावगीत
२) कृष्णा पुरे ना थट्टा - माणिक वर्मा / भावगीत
३) झिमझिम झरती श्रावणधारा - सुमन / भावगीत
४) भाग्य उजळले तुझे
चरण पाहिले - माणिक
वर्मा / भावगीत
५) मृदुल करांनी छेडीत
तारा - सुमन / भावगीत
६) रंगरेखा घेऊनि मी भाग्यरेखा रेखिते - माणिक
वर्मा / भावगीत
७) नच साहवतो हा भार - वाणी जयराम / भावगीत
८) रात्र आहे पौर्णिमेची - सुमन / भावगीत
९) वाऱ्यावरती घेत लकेरी
- सुमन / भावगीत
१०) जनी नामयाची रंगली
कीर्तनी - माणिक वर्मा / भक्तीगीत
आधार व ऋणनिर्देश / पुस्तक - अजून त्या झुडुपांच्या मागे / संगीतकार दशरथ पुजारी यांचे
आत्मकथन / शब्दांकन - वसंत वाळुंजकर
- स मा प्त -
ता क - १) प्रयत्नपूर्वक थोडीफार माहिती मिळवून लेख लिहिलेत.
२) माहिती मुख्यतः गुगल, विकिपीडिया व इतर काही इंटरनेट साईट्स वरून साभार
घेतलीय आणि थोडीशी माहिती मी ऐकलेली, वाचलेली आहे.
३) लेखात व्यक्त झालेली मतं पूर्णतः वैयक्तिक आहेत, अर्थात मी सोडून इतर कोणीही
त्यासाठी जबाबदार नाही.
४) मी लहानच माणूस आहे पण तरीही कलाकारांचे एकेरी उल्लेख केलेले आहेत ते त्या
कलाकारांवरील अतीव प्रेमापोटीच.
५) निवडलेली दहा गाणी ही संगीतकाराच्या 'अनेक सर्वोत्कृष्ट गाण्यांपैकी दहा' आहेत.
६) मी उल्लेखिलेली गाणी आठवणीतली गाणी डॉट कॉम या साईट वर माहिती व
६) मी उल्लेखिलेली गाणी आठवणीतली गाणी डॉट कॉम या साईट वर माहिती व
लिरिक्स सहित ऐकायला उपलब्ध आहेत.
@प्रसन्न सोमण –
प्रसिद्धी - अभूतपूर्व (नोव्हेंबर २०२०)
खूप कष्ट करून अमूल्य माहिती तुम्ही उपलब्ध करून दिली आहे खूप खूप धन्यवाद प्रसन्नजी सकाळ प्रसन्न केलीत.
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद ... उशिरा उत्तर दिल्याबद्दल क्षमस्व ...
Delete