- देणगी -
हरीच्या टेबलापाशी त्याच्या सेक्शनमधल्या कुठल्यातरी सोसायटीचे सेक्रेटरी, चेअरमन हरीच्या मागे कामाचा तगादा
लावत होते. -
"देखो
पाण्डे साहब ! ऑलरेडी बहुत चक्कर काटे
है हमने ! अगले
हप्तेमे हम वापीस
आएंगे ! प्लिज आप हमारा लेटर रेडी
रखो"
मुळात कॉर्पोरेशनमधल्या आमच्या असेसमेंट अँड कलेक्शन खात्यातल्या वॉर्ड इन्स्पेक्टर्सच्या टेबलांभोवती दुपारनंतर टॅक्स पेअर्सचा - ज्यांना 'पार्टीज' असं म्हणतात त्यांचा - थोडाबहुत गराडा असायचाच. सकाळच्या वेळी इन्स्पेक्टर्स आपापल्या सेक्शनमध्ये म्हणजे वर्किंग एरियामध्ये आऊटडोअरची कामं करत असल्यामुळे ह्या पार्टीज त्यांच्या काही ना काही कामांसाठी आपल्या एरियाच्या वॉर्ड इन्स्पेक्टर्सना भेटायला दुपारनंतर यायच्या. त्यातही हरीच्या पार्टीजचा हरीशी संवाद
साधारण याच लाईन्सवर चालतो याची आम्हाला चांगलीच कल्पना होती...
अर्थात पार्टी कितीही शेर असला तरी हरी स्वतः सव्वाशेर होताच, त्यामुळे हरी त्याच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये तोंड
भरून आश्वासनं देत त्याच्या भडकू पार्टीजना परतवून लावायचाच.
हरीप्रसाद पाण्डे हा दिसायला तसा काटकुळाच. फार तर साठेक किलो वजन असेल. वर्ण गोरेपणाकडे झुकणारा पण तरीही
थोडासा रापलेला. थोडे
थोडे पांढुरके होत चाललेले केस असे मागे फिरवलेले. डोळ्यांवर नोटेमधल्या गांधीजींचा असतो तसा चष्मा. कपडे, बूट तसे बऱ्यापैकी पॉश असायचे खरे, पण तरीही वागण्यामध्ये आणि बॉडी लँग्वेजमध्ये हमखास एकप्रकारचा पोरकटपणा जाणवायचाच. तो कोणाशी काय बोलेल
आणि कसा वागेल
याचा काही नेम नसायचा. बिहारचा भय्या
असला तरीही मुंबईकर असल्यामुळे आणि कॉर्पोरेशनमधल्या एवढ्या वर्षांच्या नोकरीमुळे हरी मराठी छानच बोलायचा. मधून मधून त्याच्या बोलण्यात हिंदी यायचं
एवढंच.
आमचे खाते
प्रॉपर्टी टॅक्सशी आणि त्या टॅक्सच्या कलेक्शनशी संबंधित. त्यातुन आमची वॉर्ड
इन्स्पेक्टर ही पोस्ट
आऊटडोअरची आणि सो कॉल्ड 'एक्झेक्युटिव्ह' पोस्ट. त्यामुळे आऊटडोअरच्या वेळी सेक्शन मधल्या प्रॉपर्टीजचं इन्स्पेक्शन करणं
आणि शक्यतो मोठ्या रकमेच्या प्रॉपर्टी टॅक्सच्या बिलांची वसुली करणं ही आमच्याकडून अपेक्षित असलेली कामं. साहजिकच दर महिन्याला पूर्ण कॉर्पोरेशनचं प्रॉपर्टी टॅक्स कलेक्शनचं टार्गेट तर असायचंच; पण मग ते टार्गेट, वॉर्ड-वाईज स्प्लिट होऊन
आम्हाला आमच्या साहेबांकडून आमच्या सेक्शनसाठी टार्गेट दिलं
जायचं. सप्टेंबरचं हाफ इयर एन्डचं टार्गेट आणि मार्चचं इयर एन्डचं टार्गेट गाठण्यासाठीची लगबग,
गडबड म्हणजे आमच्या खात्यासाठी जणू आंगणेवाडीची जत्रा आणि कुंभमेळाच.
अर्थात मधल्या महिन्यांमध्येही टार्गेट्स असायचीच. त्यामुळे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आमच्या सुपरिंटेंडंट साहेबांकडून आम्हाला कलेक्शनच्या आढाव्यासाठी कॉन्फरन्सचं निमंत्रण ठरलेलं असायचं. आता साहेब
म्हटल्यावर त्यांच्या तोंडातून निघालेला प्रत्येक शब्द आम्ही
झेललाच पाहिजे अशी अपेक्षा होती. साहेबांनी कोणाच्याही कामाची स्तुती करणं हा एक प्रकारचा फाऊल मानण्याची प्रवृत्ती होती. उलट आम्ही किती कलेक्शन आणू शकू हा आकडा आमच्या तोंडून ऐकल्यानंतर तो आकडा
फारच कमी असल्याबद्दल साहेबांनी आमच्यावर तुटून पडणं, हेच परफेक्टली नॉर्मल होतं. पण साहेबांपुढे जास्त बोलायचं नसतं, साहेबांचं गपगुमान ऐकून
घ्यायचं असतं, हे आम्हीही आमच्या मनावर
बिंबवून घेतल्यामुळे आस्ते आस्ते आमचीही कातडी
कमावली जायची; पण तरीही थोडंफार दडपण
यायचंच.
हरीचा सेक्शन नं. २ असल्यामुळे कॉन्फरन्समध्ये त्याची पाळी
लगेचच यायची -
"हरी,
कलेक्शनची काय सिच्युएशन ? तुला ५० लाखाचं टार्गेट आहे."
"नक्की
होणार साहब."
तेवढ्यात साहेब, झालेल्या कलेक्शनची वही चाळायचे ... आणि लगेच आवाज चढवून ...
"अरे होणार म्हणून काय सांगतोस ? आज २७ तारखेपर्यंत तुझे फक्त
७० हजार झालेत...
काय कामं करता
का नुसताच टाईमपास करत बाहेर हिंडता ? शरम वाटत नाही ?... प्लॅनिंग नाही काही नाही,
उरलेल्या तीन दिवसात काय ४९ लाखांच्या वर कलेक्शन आणणारेस ?"
"साहब,
माझा सेक्शन ऑफिस
पासून जरा लांब
पडतो ना ! लोक ऑफिसात काउंटरवर टॅक्स भरायला येत नाहीत.
मी सगळ्यांना सॉल्लिड डोस दिलाय. आप बिलकुलही फिकर मत करो साहब ! मेरा
कलेक्शन तो हो ज्जाएगा साहब !
'हो ज्जाएगा' हे तर हरीचं 'ट्रेडमार्क प्रॉमीस'च होतं... एवढं कलेक्शन आणणं
हरीला झेपणार नाहीये याची कल्पना असल्यामुळे; चिडलेले साहेब सुद्धा शेवटी, कुठे या निर्लज्जावर वेळ घालवत
बसा, असा विचार
करून पुढच्या इन्स्पेक्टर्सकडे वळायचे.
हरी पांढरी बजाज चेतक स्कुटर सतत वापरायचा. ऑफिसमध्ये जाता
येतांना आणि सेक्शनमध्ये जाता येतांना सुद्धा... सकाळी डायरेक्ट सेक्शनमध्ये न जाता नऊला ऑफिस
मध्ये यावं आणि मगच आऊटडोअरला जावं ही ऑर्डर साहेब
प्रत्येक कॉन्फरन्समध्ये द्यायचेच; मात्र आऊटडोअर जॉब असल्यामुळे मस्टर क्रॉसिंग फारसं होत नसे. पण उशिरा येणं हा मुळी हरीचा स्वतःचा अलिखित नियमच होता.
त्याबद्दल कुठल्याही साहेबांनी विचारलं की हरीचे एक्सक्युजेस नमुनेदार असायचे -
"काय करणार साहब, येतांना स्कुटर मुळे त्रास
झाला हो !"
कधी क्लच
वायर तुटली, कधी ब्रेक वायर तुटली,
ही कारणं म्हणजे ट्रम्प कार्ड्स होती.
"हल्ली
रात्री लवकर झोपच
येत नाही, त्यामुळे सकाळी लवकर डोळे
उघडतच नाहीत हो साहब !" असं सुद्धा कारण
एकदा देऊन हरीने
साहेबांचे डोळे बशीभर
उघडायला लावले होते.
जोशी म्हणून एक वॉर्ड इन्स्पेक्टर आमचा कलीग होता.
जरासा यंग आणि रॉ होता. बिचारा खरोखरच खूप हार्ड
वर्कर होता. तसा मिक्स वगैरे होत असे; पण तरी थोडा मितभाषी आणि सेन्सेटिव्ह सुद्धा होता.
एका कुठल्यातरी महिन्यात या जोश्याला सत्तर लाखाचं तगडं टार्गेट होतं
आणि खरोखर तो कष्टही खूपच घेत होता. कलेक्शन कॉन्फरन्स मध्ये हरीनी नेहमीप्रमाणे 'मेरा
टार्गेट तो हो ज्जाएगा साहब,' असं प्रॉमिस देऊन टाकलंच होतं. होता होता
जोश्याची आढाव्याची पाळी आली तेव्हा जोश्याने बिचाऱ्याने चाचरत चाचरत
साहेबांना सांगितलं, "साहेब सत्तर
लाख मला खूपच
जास्त टार्गेट आहे.
मी खूप एफर्टस घेतोय पण मी ६८ लाखांपर्यंत पोहोचेन आणि दोनेक लाख कमी पडतील असं वाटतंय." -- झालं
- साहेब बसल्या जागी
कढईतल्या पॉपकॉर्न सारखे तडतडले. -- "दोन लाख कमी पडतील म्हणून सरळ मला सांगताय तुम्ही ? काही शरम वगैरे आहे की नाही ? काही
प्लॅनिंग करायला नको,
झडझडून काही कामं
करायला नकोत, आळशी
झाला आहात तुम्ही फार !" करत करत साहेब
जोश्यावर एवढे पिसाळले की जोश्या बिचारा रडवेला झाला... कॉन्फरन्स नंतर नवख्या जोश्याला हरी आपले अनुभवाचे बोल सांगत होता
- "अरे एवढी मेहनत
घेऊन तू ६८ लाखापर्यंत कलेक्शन मॅनेज
करतोयस तर, टार्गेट मी कम्प्लिट करीनच, असं सांगायला तुझं काय जात होतं
? मी बघ, टार्गेट करीन असं सांगितलंय. पण खरंतर माझं
कलेक्शन दिलेल्या टार्गेटच्या जवळपास पण पोहोचणार नाहीये. तू उगीच घेतलंस ना फायरिंग अंगावर ओढवून ? अरे बादमे साहब लोग वॉर्ड
का टोटल टार्गेट देखते है, इंडिव्हिज्युअल टार्गेट थोडी कोई देखता
है ?" ... तरीही जोश्याच्या हे सगळं पचनी पडत नव्हतं. -
"पण मी खरंच खूप प्रयत्न करतोय."
"देख जोशी ! साहेबांनी आपल्याला बांद्र्यावरून दादरपर्यंत धावत जायला सांगितलं तर आपण काहीतरी प्रयत्न तरी करू.
पण बांद्र्यावरून चर्चगेटपर्यंत धावायला सांगितलं तर ते जमणारच नाहीये, मग आपण दादरपर्यंत तरी कशाला
धावायचं ? तू ७० च्या अगेन्स्ट ६८ लाख मॅनेज करतोयस म्हणजे कमालच आहे,
पण साहेबांना काही कौतुक आहे का ?
तू तो सचमुच
पागल ही है
!"
ही असली
मुलखावेगळी लॉजिक्स घेऊन
काम करणारा - खरं म्हणजे न करणारा - हरी ! पण सोशल कामं
करण्याच्या बाबतीत मात्र
त्याच्या काम करण्याच्या उत्साहाला उधाण यायचं.
त्याचे खात्याबाहेरचे कॉन्टॅक्टस सुद्धा उत्कृष्ट होते. त्यामुळे असिस्टंट कमिशनरांच्या सेक्रेटरीकडे, महापौरांच्या सेक्रेटरीकडे, कुठल्या नगरसेवकांकडे, अशी जर कुठली खात्याची किंवा साहेबांची कामं असतील
तर ती कामं
हरी खरोखरच चोख करायचा. किंवा मग ऑफिसची सत्यनारायणाची पूजा, दिवाळी, दसरा या सारखी
फंक्शन्स ऑर्गनाईझ करणं हा हरीचा हातखंडा विषय होता. असल्या फंक्शन्सच्या निमित्ताने गप्पा मारतांना वातावरण जरा मोकळं असतं. त्यावेळी आमचे साहेब हसत हसत सांगायला लागले - "या हरीच्या अंगावर कितीही ओरडा, त्याला काहीही वाटत नाही, त्याच्या चेहेऱ्याची इस्त्री सुद्धा मोडत नाही." ... यावर हरीने काय उत्तर
द्यावं ? तो म्हणाला - "ओ साहब, ओरडणं काय एवढं मनाला लावून
घ्यायचं ? ... जोपर्यंत तुम्ही समोरचा पेपरवेट फेकून मारून
मला इजा करत नाही तोपर्यंत काही टेन्शन नाही." ... बोला ! यावर आहे काही उत्तर
?
आमच्या आऊटडोअर मध्ये स्त्री राज्य
नव्हतंच, पण इनडोअर मध्ये मात्र सगळं
स्त्री राज्यच. इनडोअर सेक्शन बाजूलाच होता.
आऊटडोअर आणि इनडोअर हे दोन्ही आमच्या खात्याचेच भाग, म्हणून सगळी फंक्शन्स वगैरे नेहमी एकत्रच साजरी
व्हायची. फंक्शन्स ऑर्गनाईज करणं,
जेवणाची ऑर्डर देणं,
हे सगळं हरीच
करायचा. एकदा असंच
ऑफिसच्या सत्यनारायणाच्या पूजेचं आणि जेवणाचं फंक्शन झाल्यावर दोन-तीन दिवसांनी हरी काही कामासाठी इनडोअर सेक्शनमध्ये गेला होता; मात्र तिथून
तो दोन मिनिटातच परत आउटडोअरला आला तो वेड्यासारखा हसतच आला. -- "क्या हुवा हरी
? एवढा हसतोयस कशासाठी ?" कोणीतरी विचारलं. लगेच आमच्या सगळ्यांचा गोतावळा हरीजवळ जमला.
"अरे क्या बोलू यार
! ती फलाना फलाना
बाई एवढी पागल
आहे ना ! एक मिनिटके लिये तो उसने मेरा बडा प्रॉब्लेम कर दिया
! ... आता सत्यनारायणाची पूजा आणि जेवण मी ऑर्गनाईज केलं होतं त्याला तीन दिवस होऊन
गेलेले, माझ्या डोक्यात काही कामाचे वेगळेच विचार आणि अचानकच ही मूर्ख बाई मला जोरात विचारते, 'पाण्डेजी, ताट कसं होतं
?' ... अरे यार माझ्या डोक्यात काही भलताच
अर्थ शिरला आणि मी बावचळलोच. माझ्या एकदम फिट्ट ! अरे ही येडी बाई नक्की काय विचारत्येय मला ? ... मग शांतपणे परत तिनं विचारलं की 'परवा तुम्ही जेवण
ऑर्गनाईज केलं होतं
ना, त्या ताटाचा रेट काय होता
? जेमतेम कसंतरी उत्तर
देऊन मी कलटी
मारली"
असेच एकदा
हरीच्या टेबलाभोवती तीन-चार व्हिजिटर्स बसलेले होते. बोलण्यावरून व कपड्यांवरून ते बिहार
साईडचे गाववाले भय्येच दिसत होते. कदाचित हरीचे गावचे नातेवाईक असावेत. त्याच दरम्यान, नेहमीप्रमाणे हरीच्या कामात
काही चूक निघाल्यामुळे, समोरच्या केबिनमधून साहेबांनी हरीला ओरडून बोलावले. साहेबांच्या केबिनच्या काचेतून दिसतच
होते की नेहमीप्रमाणे हरी खच्चून बोलणी खातोय.
साहेबांनी ओरडून बोललेले काहीकाही डायलॉग्ज बाहेर ऐकूही येत होतेच.
ते लेक्चर ऐकून
हरी जागेवर आला,
पण तरीही चेहरा
नेहमीप्रमाणे हसतमुखच होता.
हरीचे गाववाले मात्र
बावचळलेले दिसत होते.
ते हरीला म्हणाले -
"क्यों
हरीभाई, तुम तो कहते थे तुम्हे जबरदस्त काम करना
पड़ता है, तुम्हारे साहब तुम्हे बहुत
इज्जत देते है। हमने तो कुछ औरही देखा।"
"तुम्हे यहाँके तौर तरीके
कुछ मालूम नहीं,"
हरी म्हणाला. हरीचं
टेबल नेहमीप्रमाणेच चिक्कार अस्ताव्यस्त होतं, सगळी रजिस्टर्स वगैरे पसरलेली होती.
काचेतून साहेबांच्या केबिनमधलं साहेबांचं मोठं टेबल मात्र,
प्लॅस्टिकचे इन ट्रे
आणि आऊट ट्रे
असे दोन ट्रेज
सोडले तर, नीटनेटकं आवरलेलं दिसत होतं.
स्वतःच्या टेबलाकडे बोट दाखवत हरी त्या
गाववाल्यांना म्हणाला -
"मेरा
टेबल देखके ही किसीकोभी अंदाजा आ जायेगा की मुझे
कितना ज्यादा काम करना पड़ता है। देखो कितने
रजिस्टर्स कैसे बिखरे
है। और वहाँ
साहबका टेबल देखो
कितना क्लीन और क्लियर है। इसका
ये मतलब नहीं
है की साहब
काम नहीं करते।
काम करना हम लोगोंका काम है और ज्युनियर लोगोंके ऊपर चिल्लाना, उनको लेक्चर देना, ये हमारे
साहबका काम है। इसीलिए उनको चिल्लाना पड़ता है। अगर साहब चीखेंगे, चिल्लाएंगे नहीं और ज्युनियर्स के साथ दोस्तोंकी तरह बोलेंगे तो साहबको पगार थोड़ेही मिलेगी ?"
अर्थात हरीच्या या तत्वज्ञानाला मात्र आम्ही अगदी मनापासून दाद दिली.
असा हा बेछूटपणे,
स्वच्छंदीपणे जगणारा हरी संध्याकाळी ऑफिस टाईमनंतर मात्र खूप वेळ ऑफिसात थांबत असे.
कामात मार खाणारा हरी संध्याकाळी उशिरापर्यंत थांबून नक्की काय काम करायचा कोण जाणे
! ... शेवटी ऑफिस बंद करतांना सुद्धा तो सगळ्यांना थांबायला लावून, वॉशरूम मध्ये जाऊन
अंघोळ केल्यासारखा हात, पाय, चेहरा, एवढंच
नव्हे तर शर्टाच्या आतले गळा, छाती,
काखा हे अवयव
सुद्धा तो पाण्याने धुवून घेत असे.
असा एक काहीतरी विचित्र, मनस्वी, पण हॅपी गो लकी स्वभावाचा हा इसम होता.
मार्च महिन्याची अठ्ठावीस तारीख. इयरएन्ड मुळे सगळं ऑफिसच
भन्नाट कामात. दुपारच्या वेळी अचानक मला साहेबांकडून बोलावणं आलं.
केबिनमध्ये साहेब मला सांगत होते -
"सोमण,
अरे त्या हरीच्या घरून कुणा मुलाचा फोन आला होता
की हरीची तब्येत बरी नाहीये. त्याला पॅरा टायफॉईड झालाय
म्हणे. गेल्या आठवड्यात मी कलेक्शनचे काही मोठ्या अमाऊंट्सचे चेक्स काही कामासाठी हरीबरोबर वॉर्ड
ऑफिसर साहेबांकडे पाठवले होते. ते हरीने
मला परत दिले
नव्हते. ते आणायला हवेत. हरीच्या स्वतःच्या कलेक्शनचे चेक्स सुद्धा त्याच्याकडून आणायला हवेत.
हरी तर आता काही दिवस येऊ शकणार नाहीये. वेस्टर्न साईडला राहणारा तूच एक आहेस. जरा दहिसरला त्याच्या घरी जा. सगळे चेक्स
घेऊन ये आणि त्याच्या तब्येतीचीही विचारपूस करून
ये."
हरी तीन-चार दिवस ऑफिसला आला नव्हता, पण कारण नक्की कळलं
नव्हतं. आम्ही सगळे
कलिग्ज म्हणजे दोस्त
खरे; पण घरच्या पातळीपर्यंत दोस्ती कुणाचीच वाढली नव्हती. त्यामुळे हरीच्या होम फ्रंटबद्दल काहीच माहित नव्हतं. त्याच्या घरी कोण कोण असतं याचीही काहीच कल्पना नव्हती...
मी ऑफिस
मधून हरीचा पत्ता
घेतला आणि दहिसरला शोधत शोधत हरीच्या चाळीतल्या खोलीच्या दारात उभा राहिलो. जेमतेम एक डबलरूमचं चाळीतलं घर. बाहेरच्या खोलीत एक जुनाट दिवाण. दिवाणावर हरी पांघरूण घेऊन
झोपलेला. कपाळावर मिठाच्या पाण्याची घडी आणि बाजूलाच एक दहा-बारा वर्षांचा मुलगा होता. खाली लादीवर सुद्धा दोन छोटी
शाळेतली मुलं अभ्यास करत बसली होती.
खोलीत एका टी.व्ही.ट्रॉलीवर टी.व्ही., एक गोदरेजचं कपाट
आणि एक उघडं
लाकडी कपाट. या लाकडी कपाटात दप्तरं व इतर शैक्षणिक साहित्य खच्चून भरलेलं होतं. मला बघताच
हरीच्या बाजूला बसलेल्या मुलाने दारापर्यंत येऊन हळू आवाजात माझ्याकडे विचारणा केली व मग हरिजवळ जाऊन
'चाचा' अशी हाक मारली व हरी लगेच जागा झाला.
दारात मला बघून
हरीने पडल्या पडल्या, "अरे सोमण ! ये रे ये ये ! बस."
असं स्वागत केलं.
"काय रे हरी ? एकदम
पॅरा टायफॉईड ?" मी विचारलं
"क्या
करू यार ! एकदम
मार्च एंडलाच आडवा
पडलो. आता साधारण बरं आहे; पण थोडे दिवस विश्रांती लागेलच."
"तुझ्याकडचे साहेबांनी दिलेले चेक्स
आणि तुझेही काही
कलेक्शनचे चेक्स असतील
तर ते माझ्याकडे दे"
"मला वाटलंच होतं सोमण
की, साहब तुलाच
माझ्याकडे पाठवतील," असं म्हणत हरीने त्याची बॅग मागवून त्यातून सगळे चेक्स माझ्याकडे दिले. मी ते माझ्या बॅगेत ठेवता
ठेवता मुलांकडे बघून म्हटलं, "तुझी मुलं का रे हरी ?"
"हो, तशी मला मुलांसारखीच आहेत पण माझी
मुलं मात्र नाहीत"
"म्हणजे ?"
"तुम्हे पता नहीं होगा,
लेकिन इथे मुंबईत माझ्याकडे आमच्या गावची
आठ मुलं राहतात."
"काय सांगतोस काय ?"
क्या करू यार सोमण ? मुझसे
देखा नही जाता
! आमचं बिहारमधलं गाव एकदम बॅकवर्ड. शिक्षणाच्या वगैरे काहीच चांगल्या सोयी नाहीत. मला स्वतःला सुद्धा आमच्या एका दूरच्या चाचांनी मुंबईत आणून शिकवलं. वो चाचा तो अब गुजर गये,
अब मेरी बारी
!"
"आणि तुझी फॅमिली ?"
"अब ये बच्चेही मेरी
फॅमिली ! सच पूछो तो, माझं सुद्धा लग्न झालं होतं."
"होतं
?"
"हो. माझ्या वडिलांनी गावाला माझं लग्न लावून
दिलं होतं. दीड महिना रजा घेऊन
हनिमून वगैरे करून
बायकोला गावालाच ठेवून
मी परत आलो होतो. पण वर्षभरातच बायकोला युटेरसचा कँसर निघाला. वडिलांनी तिला पाटण्याला नेवून काही
थोडे उपचार केले
पण कँसर फास्ट
डेव्हलप झाला आणि ती वारली. कुछ दिनके लिए तो मैं लगभग बर्बाद हुवा था, पण थोड्याच दिवसात सावरलो."
"ओह !
सो सॅड !"
"मग माझ्या फॅमिलीतल्याच दोन छोट्या मुलांना मी शिक्षणासाठी आणि राहण्यासाठी मुंबईमध्ये माझ्या घरी घेऊन आलो. स्वयंपाकाला एका बाईंची व्यवस्था केली आणि माझी
आणि दोन मुलांची गृहस्थी सुरु झाली.
धीरे धीरे वन बाय वन करते
करते आठ बच्चे
हो गये ! साथ साथ रहनेसे हमारा
प्यारभी बढ़ गया।"
"हरी,
तू खरंच ग्रेट
आहेस. पण अरे,
राहण्या-शिक्षणाच्या खर्चाचं आणि जागेच्या कमतरतेचं काय ? कसं मॅनेज केलंस ?"
"अरे यार, बिहारची गावची
माणसं आम्ही. हाय्यर मिडल क्लासवाला; या बडा आदमी बननेका तो मुझे शौकही
नहीं था। ही आपण बसलो आहोत
ती डबलरूम होतीच;
नंतर शेजारचीही एक डबलरूम मिळाली. शिवाय
काही सोसायट्यांचे मिनिट्स, हिशेब,
वगैरे लिहिण्याची काही पार्टटाईम कामंही करत गेलो आणि ऑफिस
टाईम नंतर जास्त
थांबून करत गेलो.
आजही मी, स्कुटर वगळली तर बाकी,
शक्य तेवढा कंजूषपणा करून पैसे वाचवतोच. अपनेआप मॅनेज होता
चला गया यार
!"
"आणि तुझ्या आई-वडिलांचा काय स्टॅन्ड ? त्यांनी तुझ्या दुसऱ्या लग्नासाठी काही प्रयत्न नाही
केले ?"
"वडील
तर आठ वर्षांपूर्वी वारले.
आईचं सुद्धा आता वय झालंय. गावाला माझ्या दोन भावांबरोबर असते. आईनी, घरच्यांनी मला दुसऱ्या लग्नाबद्दल अनेक वेळा सांगून पाहिलं: लेकिन मेरा
मन नहीं माना। खैर, अब तो उमरभी गुजर
गयी। पन्नाशीकडे आलो आता मी. अब लड़के अच्छी तरहसे
लिख-पढ़ रहे है। सबकुछ अच्छा
है। आगे का आगे देखेंगे।"
"हरी माझं ऐक. अजूनही तुला एखादी गरजू
प्रौढ मुलगी मिळेल.
अरे मुलं उद्या
शिकून सवरून मोठी
होऊन दूर होतील,
वेगळी होतील. वाढत्या वयात कम्पॅनियन पाहिजे यार."
"नहीं
यार ! अब तो वो चान्स बिलकुलही नहीं है।"
"मग उद्या तुझं म्हातारपण आल्यावर ?"
"छोड़ ना !" डोळे मिचकावत हसत हसत हरी म्हणाला "तू फ़िक्र मत कर। हो ज्जाएगा यार
!"
-------------------
आज जवळ जवळ पंचवीस एक वर्ष उलटली. तसं पाहिलं तर कॉर्पोरेशनच्या नोकरीत नाना नमुन्याचे नाना स्वभावाचे बरेच जण दोस्त झाले होते.
त्या त्या वेळेला ही दोस्ती खूप जवळची सुद्धा वाटली
होती. पण रिटायरमेंटच्या एवढ्या काळात ही दोस्ती कुठेतरी दूर दूर लोटली गेलीय, गंजल्यासारखी झालीय.
एवढ्या वर्षांनंतर सुद्धा आठवणी येतातच; पण तरीही मुद्दाम कोणाचे व्हेअर अबाऊट्स जाणून
घेऊन कुणाला कॉन्टॅक्ट करावं, असं मात्र
वाटत नाही किंवा
खरं म्हणजे हातून
घडत नाही.
आयुष्यातले चढ उतार तर कोणालाच चुकत नाहीत... माझ्याही आयुष्यात जेव्हा जेव्हा संकटं आली, कठीण
प्रसंग आले तेव्हा तेव्हा माझ्याही मनात अनेक निगेटिव्ह विचार आले. पण लगेचच
त्या त्या वेळी,
जोरात उडणाऱ्या कारंज्यासारखा, उत्साहाने फसफसलेला हरीचा चेहरा
डोळ्यांसमोर आला आणि कुठूनतरी कानांमध्ये, 'हो ज्जाएगा यार !' हे शब्द घुसले.
@प्रसन्न सोमण -