Monday, 9 September 2024

--- शास्त्रीय संगीत कलाकार व फिल्म इंडस्ट्री --- ७) इतर काही शास्त्रीय संगीत कलाकार

 


#शास्त्रीयसंगीतकलाकारवफिल्मइंडस्ट्री

 

--- शास्त्रीय संगीत कलाकार फिल्म इंडस्ट्री ---

 

[वास्तविक सगळ्यांविषयी एकच लेख लिहावा की अनेक छोट्या मोठ्या लेखांचा गुलदस्ता बांधावा या बद्दल माझ्या मनात संभ्रमच होता ... मी शास्त्रीय संगीताचा निःसीम चाहता तर आहेच पण कदाचित तितक्याच इंटेन्सिटीनी मला सिनेसंगीतही (हिंदी मराठी) आवडतं - विशेषतः जुनं ... सिनेमाच्या दुनियेचा आणि अर्थात त्यातल्या संगीताचा आपल्यामधल्या कलेशी ऋणानुबंध जोडावा असं अगदी हिराबाई बडोदेकर, मास्तर कृष्णराव इथपासून ते आजच्या बेगम परवीन सुलताना, पं.अजय चक्रवर्ती पर्यंतच्या अनेक शास्त्रीय संगीत कलाकारांना वाटत आलेलं आहे आणि हिंदी, मराठी सिनेसृष्टीलाही या दिग्गज कलाकारांना आपल्या प्रवाहात सामावून घ्यावं असं वाटलेलं आहे. यातल्या काहींचं सिनेसृष्टीतलं कर्तृत्व जरा छोटेखानी आहे तर काहींचं बऱ्यापैकी मोठं आहे ... या कलाकारांबद्दलच्या माझ्या मनातल्याही आवडी थोड्याफार डाव्या उजव्या आहेतच ... त्यामुळे सगळं एकाच मोठ्ठ्या लेखात व्यक्त करणं कठीण होतं ... त्यामुळे छोटे किंवा मोठे पण वेगवेगळे लेख लिहिलेत ... या सगळ्याच कलाकारांचं मुख्य कर्तृत्व शास्त्रीय संगीताच्या त्यांच्या स्वतंत्र मैफिलींमधून प्रकट झालंय ... थोडक्यात फिल्मी दुनिया हे त्यांचं मुख्य करियर नसून पूरक करियर आहे किंवा होतं ... हे लेख लिहितांना काही मला असणारी माहिती तर बरीचशी इंटरनेटवर मिळणारी माहिती यांची सांगड घालून जमतील तसे लेख लिहिलेत ... आपल्याला आवडतील अशी आशा करतो.]

 

#)इतरकाहीशास्त्रीयसंगीतकलाकार

 

) इतर काही शास्त्रीय संगीत कलाकार

 

हिराबाई बडोदेकर - जुन्या जमान्यातल्या अतिशय लोकप्रिय झालेल्या किराणा घराण्याच्या प्रसिद्ध गायिका म्हणजे हिराबाई ... तो मराठी संगीत नाटकांचा काळ असल्यामुळे त्यांनी 'युगांतर,' 'साध्वी मीराबाई,' 'सौभद्र' अशी अनेक नाटके भूमिका गायन करून गाजवली ... गुगलच्या माहितीनुसार हिराबाईंनी 'सुवर्ण मंदिर,' 'प्रतिभा,' 'जनाबाई' 'म्युनिसिपालिटी' अशा काही सिनेमांतून सुद्धा भूमिका आणि अर्थातच गायन केलंय ... अर्थात काळ जुना असल्यामुळे फार काही तपशील उपलब्ध झाला नाही ... 

 

मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर - १९३५ एवढ्या जुन्या काळी रिलीज झालेल्या 'धर्मात्मा' या बालगंधर्व अभिनित सिनेमाचे संगीतकार मास्तर कृष्णराव होते ... त्या सिनेमात १६ गाणी होती ... लगेच पुढच्या वर्षी रिलीज झालेल्या 'प्रभात' कंपनीच्या 'अमरज्योती'चेही ते संगीतकार होते ... ते 'प्रभात'चे सुरुवातीचे संगीतकार असल्यामुळे प्रभातच्या गाजलेल्या 'गोपालकृष्ण,' 'शेजारी,' शेजारीवरून हिंदीत आलेला 'पडोसी' इतर सिनेमांची त्यांची कारकीर्द होती ... त्याकाळी म्हणजे १९३६ मध्ये 'शेजारी' मध्ये 'लख लख चंदेरी,' हे दहा मिनिटांच्या लांबीचे प्रसिद्ध गाणे त्यांनी दिले ... सिनेमातल्या कारकिर्दीपूर्वी मराठी संगीत नाटकांचा जमाना तेजीत असतांना त्यांनी अनेक नाटकांना सुद्धा संगीत दिलेलं आहे त्यापैकी 'आशा निराशा,' 'अमृतसिद्धी,' 'संत कान्होपात्रा,' 'कोणे एके काळी,' 'एक होता म्हातारा,' 'कुलवधूही काही गाजलेली नाटके त्यांनी त्यांच्या बेमिसाल संगीत दिग्दर्शनानी सजवली.

 

.अली अकबर खान - हे खरंतर अत्यंत गाजलेले बेहेतरीन सरोद वादक ... परंतु त्यांनी  'आँधीया' या प्रमुख हिंदी चित्रपटाला संगीत दिलं ... याच सिनेमात लताचं त्याकाळी चांगलंच गाजलेलं चार भागातलं 'है कहींपे शादमानी' हे वैशिट्यपूर्ण गाणं आहे ...  खांसाहेबांप्रती आदर म्हणून शास्त्रीय संगीतावर आधारित असलेल्या या गाण्यासाठी लताने म्हणे एक पैसाही मोबदला घेतला नाही ... नूतनच्या 'सीमा' या सिनेमामध्ये शंकर जयकिशन यांच्या संगीत दिगदर्शनाखाली खानसाहेबांनी सरोद वाजवली होती असा एक उल्लेख गुगलवर आढळला ... या व्यतिरिक्त आणखीही काही सिनेमांमध्ये त्यांची सरोद वाजली असेलही; पण मग मात्र खांसाहेबांची कारकीर्द इंडस्ट्रीत फार बहरली नाही.

 

.विलायत खान - नामवंत सतारवादक .विलायत खान यांचीही संगीतकार म्हणून फिल्म इंडस्ट्रीमध्ये छोटी कारकीर्द घडलेली आहे ... इंटरनेटच्या माहितीनुसार खांसाहेबांचे 'जलसाघर (बहुदा सत्यजित रे यांचा बंगाली सिनेमा), ' गुरु,' 'कादंबरी' हे तीन सिनेमे संगीतकार म्हणून दिलेले आहेत ... त्याचबरोबर त्यांनी 'कविता कृष्णमूर्ती' यांना गायिका म्हणून 'कादंबरी' सिनेमात पहिली संधी दिली, असाही उल्लेख आहे ... मात्र त्यात 'कविता' लताचं 'महल' मधलं जुनं गाजलेलं 'आयेगा आनेवाला' (संगीतकार - खेमचंद प्रकाश) हेच गाणं गाते ... मात्र 'कादंबरी' सिनेमात आशाचं 'अंबरकी एक पाक सुराही' हे एक अत्यंत सुंदर गाणं आहे ... आणि अर्थात त्याचं संगीतकार म्हणून श्रेय निश्चित खांसाहेबांचंच आहे ... पण या व्यतिरिक्त ' गुरु' वा 'जलसाघर' मधलं कुठलंच गाणं मला शोधून सापडलेलं नाही ... कदाचित माझ्या नजरेतून निसटलेली खांसाहेबांची फिल्म इंडस्ट्रीमधली अजून कुठली निर्मिती असेलही ...

 

.रईस खान - हेही एक अत्यंत नावाजलेले सतारवादक होते ... यांचीही फिल्म इंडस्ट्रीमध्ये बऱ्यापैकी मोठी कारकीर्द झालेली आहे ... मात्र त्यांची अत्यंत महत्वाची ओळख विशेषतः संगीतकार मदन मोहन यांचे आवडते सतारवादक अशी झालेली आहे मदन मोहन यांच्या संगीतात लता, आशा रफी यांच्या अनेक गाण्यांना रईस खानजींच्या सतारीची उत्कृष्ट साथ लाभलेली आहे.

 

.अब्दुल हलीम जाफरखान - हेही एक नामवंत सतारवादक होते ... जाफरखान साहेबांचीसुद्धा सतारवादक म्हणून फिल्म इंडस्ट्रीत अगदी १९४६ इतक्या जुन्या काळापासून जुन्या 'परवाना' या चित्रपटापासून कारकीर्द घडलेली आहे ... सतारवादक म्हणून त्यांची 'मुघले आझम,' 'झनक झनक पायल बाजे,' 'गुंज उठी शहनाई' आणि 'कोहिनूर' अशा संगीताच्या दृष्टीने कमालीच्या गाजलेल्या सर्व सिनेमांमधून सेवा घडलेली आहे ... विशेषतः त्यांची 'गुंज उठी शहनाई' मध्ये .बिस्मिल्ला खान यांच्या शहनाईबरोबरची जुगलबंदी अत्यंत सुंदर आहे ... कोहिनूर मधल्या 'मधुबनमे राधिका नाचे रे,' या प्रसिद्ध गाण्याच्या शेवटी जाफरखान साहेबांच्या सतारीवर राग हमीर कमालीचा सुंदर वाजलेला आहे. विशेषतः नौशादजींनी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण सतारवादनाचं तोंड भरून कौतुक केलेलं आहे.

 

पंडित बिरजू महाराज - अत्यंत प्रसिद्ध कथ्थक नृत्यसम्राट असलेल्या बिरजू महाराजांनी 'शतरंजके खिलाडी (१९७७)' मध्ये 'कान्हा मैं तोसे हारी' ही नृत्यासाठीची भैरवी गायलीय कोरियोग्राफीही केलीय (संगीतकार - सत्यजित रे) ... यानंतर विशेष गाजलेल्या शाहरुख-माधुरीच्या 'देवदास (२००२)' मध्ये ' काहे छेड मोहे कान्हा' या गाण्यातलं 'मालती गुंधाड' (शब्दांबाबत चूकभूल द्यावी-घ्यावी) हा बसंत रागातला पहिला मुखडा सुद्धा बिरजू महाराजजींनी गायलाय ( पुढचं गाणं थोडं माधुरीनी गायलंय तिच्या सोबत कविता कृष्णमूर्ती आहे) ... या गाण्याची पूर्ण सिनेमामधल्या नृत्याची कोरियोग्राफी सुद्धा बिरजू महाराजजींनीच केलीय.

 

बेगम परवीन सुलताना - शास्त्रीय गायनाची कारकीर्द जोशात सुरु असतांना बेगम परवीन सुलतानाजींनी हिंदी चित्रपटसृष्टीतही काही मोजकी पण चांगली गाणी गायली आहेत ... साल १९७१ मध्ये दो बुंद पानी या चित्रपटात परवीनजींनी गायिका मिनू पुरुषोत्तम बरोबर संगीतकार जयदेव यांचं 'पितलकी मोरी घागरी' हे अत्यंत सुंदर गाणं गायलंय ... त्यानंतर परवीनजींनी १९८० मध्ये 'कलंकिनी कंकाबती' या बंगाली सिनेमात 'बेंधेची बिना गान शोनाबो' (उच्चारांच्या बाबतील चूक भूल देणे घेणे) हे आणखी एक छान गाणे संगीतकार आर.डी.बर्मन यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गायलंय ... (पुढे १९८१ साली 'बेमिसाल' नावाच्या हिंदी सिनेमात हीच चाल लताच्या आवाजात 'एरी पवन ढुंढे किसे तेरा मन चलते चलते' हे रूप घेऊन आली.) ... १९८१ सालच्या 'कुदरत' सिनेमामध्ये परवीनजींच्या आवाजातल्या व्हर्जनमध्ये 'हमे तुमसे प्यार कितना' हे सुंदर गाणे नृत्याच्या पार्श्वभूमीवर आले ... आर.डी.बर्मन यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली; अतिशय सुंदर हरकती मुरक्यांसहित हे गाणं परवीनजींनी इतक्या बेहेतरीन पद्धतीने गायलंय की जवाब नही ! या गाण्याला तबल्यावरची पं सामता प्रसादजींची साथ सुद्धा उल्लेखनीय आहे ... यानंतर त्यामानाने अलीकडच्या 'गदर' सिनेमामध्ये संगीतकार उत्तम सिंग यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली परवीनजींनी, पं.अजय चक्रवर्ती यांच्याबरोबर सहगायनामध्ये 'आन मिलो सजना' ही अत्यंत उत्कृष्ट अशी खमाज ठुमरी गायलेली आहे.

 

किशोरी आमोणकर - प्रतिथयश गायिका किशोरी आमोणकर यांचीसुद्धा अगदी छोटी कारकीर्द हिंदी फिल्म इंडस्ट्रीत झालेली आहे ... शांताराम बापूंच्या 'गीत गाया पत्थरोंने' या सिनेमामध्ये संगीतकार रामलाल यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली 'गीत गाया पत्थरोंने' हेच 'दुर्गा' रागातलं टायटल सॉन्ग किशोरीताईंनी गायिलेलं आहे ... सुरुवातीच्याच तानेनंतर खूपच सुंदर हरकती, मुरक्यांसह हे गाणं किशोरीताईंनी खुलवलेलं आहे ... हिरोईन राजश्रीचं नृत्य असलेलं हे सुंदर गाणं यु ट्यूबवर ऐकायला मिळू शकतं ... या गाण्यानंतर मात्र पुन्हा किशोरीताई फिल्म इंडस्ट्रीच्या दिशेला गेल्या नाहीत.

 

पंडित रामनारायण - अत्यंत नावाजलेले सारंगीनवाझ रामनारायणजींची सारंगी वादक म्हणून फिल्म इंडस्ट्रीत उल्लेखनीय कारकीर्द झाली ... खूप तरुण वयापासून रामनारायणजी मुंबईत आले फिल्म इंडस्ट्रीत उत्तम सारंगीवादक म्हणून नावारूपाला आले ... 'अदालत,' 'गंगा जमुना,' 'हमदर्द,' 'काश्मिरकी कली,' 'मधुमती,' 'मिलन,' 'मुघले आझम,' 'पाकिझा' इत्यादी अनेक नामवंत संगीतप्रधान सिनेमांमध्ये रामनारायणजींनी सारंगी वाजवलेली आहे ... 'गुलाम महम्मद' यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली पाकिझा सिनेमामधल्या 'चलते चलते, युही कोई मिल गया था' या गाण्यामध्ये योग्य आणि हवा तसा परिणाम साधण्यासाठी रामनारायणजींनी म्हणे थकता २१ टेक्स दिले ... इतक्या निष्ठेने वादन करणारे सारंगीवादक रामनारायण म्हणूनच संगीतकार .पी.नय्यर यांचे अत्यंत लाडके वादक होते.

 

शिव-हरी अर्थात पं.शिवकुमार शर्मा पं.हरिप्रसाद चौरासिया - प्रख्यात संतूरवादक पं.शिवकुमार शर्मा आणि प्रख्यात बासरीवादक पं.हरिप्रसाद चौरासिया या दोघांनीही फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपापल्या वाद्याची साथ देऊन कित्येक गाण्यांना चार चांद लावले याची गणती करता येणं सुद्धा कठीण ... ऐन तारुण्यापासूनच या दोन्हीही थोर कलाकारांनी फिल्म इंडस्ट्रीत वादक कलाकार म्हणून खूप निष्ठेनं काम केलं ... मात्र बऱ्याच उशिरा म्हणजे १९८१ सालच्या 'सिलसिला' या सिनेमापासून हे दोघं संगीतकार म्हणून एकत्र आले ... संगीतकार म्हणून मात्र त्यांची कारकीर्द फार मोठी झाली नाही किंवा म्हणावी तशी बहरली नाही ... संगीतकार म्हणून त्यांनी सहा चित्रपटांना संगीत दिलं ... ) सिलसिला (१९८१), ) फासले (१९८५), ) चांदनी (१९८९), लम्हे (१९९१), साहिबा (१९९३) आणि डर (१९९३)

या सिनेमांपैकी खास उल्लेख करावा अशी गाणी म्हणजे

) नीला आसमान सो गया (सिलसिला / लता व्हर्जन)

) जो तुम तोडो पिया (सिलसिला / चंद्रकौंस रागातलं सुंदर मीरा भजन)  

) खुदसे जो वादा किया था (सिलसिला / गायिका पामेला चोप्रा)   

) मेरे हाथोंमे नौ नौ चुडिया (चांदनी / लता कोरस)

) मोरनी बागामा बोले आधी रातमा (लम्हे / लता इला अरुण)

) जादू तेरी नजर (डर / उदित नारायण)

अर्थात ही या शिव-हरी जोडगोळीची मला आवडणारी गाणी.

 

याही व्यतिरिक्त माझ्या दृष्टीतून निसटलेले काही शास्त्रीय संगीत कलाकार नक्की असणारच ज्यांची फिल्म इंडस्ट्रीत काही लक्षणीय कारकीर्द झालेली आहे ... मात्र माझ्या दृष्टीने सध्या एवढंच पुरे ...

 

लेखमाला समाप्त ...

 

@प्रसन्न सोमण / १२-०७-२०२४.