---- तालवैविध्य वा
तालवैशिष्ट्य ----
तसा लहानपणापासून मी तबलजी असलो तरीही शास्त्रीय संगीताच्या पार्श्वभूमीमुळे माझा ताल, मात्रा, वजन, ध्रुवपद, पहिलं, दुसरं तिसरं कडवं, मधलं म्युझिक; या किंवा असल्याच शब्दांशी परिचय होता ... बऱ्याच नंतर नंतर काही ऑर्केष्ट्रा मध्ये गायक / वादक असलेल्या परिचितांमुळे किंवा काही चित्रपट संगीत विषयक लिखाणामध्ये वाचल्यामुळे; टु फोरचा मीटर, सिक्स एटचा मीटर, इंट्रो, इंटरल्युड, एम वन, एम टु. व्हीब्रॅटो, फॉलसेटो, ऑक्टेव, ऍडलीब, इत्यादी वेगवेगळे आणि कदाचित काहीसे फिल्मी शब्द कानांवरून गेलेत; पण यांसारख्या प्रत्येक इंग्रजी शब्दाचा नेमका अर्थ काही मला सांगता येईलच असं नाही त्यामुळे तसले शब्द मी फारसे वापरू शकत नाही, पण मला काय म्हणायचंय तो मुद्दा मी पोचवू शकेन एवढं नक्कीच !
अलिकडे चित्रपटसंगीताबद्दल लिहितांना काही विशिष्ट थीम डोळ्यापुढे ठेवून लिहिलेले काही लेख वाचनात आलेत; तसाच काहीसा विचार करावा असं वाटतंय ... मी मुळात तबलजी असल्यामुळे माझं गाण्याच्या ठेक्याकडे, तालाकडे विशेष लक्ष नक्कीच जातं ... सहसा सुगम संगीतात प्रामुख्याने केहेरवा आणि दादरा तालांचे विविध ठेके लावून गाणी केलेली आढळतात ... पण काही वेळेस दोन वेगळ्यावेगळ्या तालातले आणि वजनातले दोन वेगळेवेगळे ठेके वापरून गाणं केलेलं आढळतं ... अशी गाणी वेगळेपणामुळे आणि वैशिष्ट्यामुळे मला पटकन आवडून जातात ... त्यामुळे आज अशा काही गाण्यांची याद ताजी करावी असा विचार करतोय की ज्यात एकतर दोन ताल किंवा ऱ्हीदम्स वापरले गेले असतील किंवा मग त्या गाण्यांमध्ये ऱ्हिदमच्या दृष्टीने काही लक्षणीय असं खास वाजवलं गेलेलं असेल ...
माझ्याकडे लताच्या काही अत्यंत जुन्या गाण्यांचा फोल्डर आहे ... नेमकं त्यामध्ये पहिलंच गाणं असं दोन वजनातलं आलंय ... ते गाणं आहे मतवाले नैनोवालेके मैं वारी वारी जाऊ (बेकसूर / अनिल विश्वास / लता) गाणं सुरु होताहोताच लताच्या भन्नाट आणि धारदार तानेसह तालाशिवाय गायिलेला पहिला शेर येतो व पाठोपाठ कव्वालीबाजाच्या ठेक्यासहित गाणं सुरु होतं ... पहिला इंटरल्यूड संपता संपता ठेका बदलतो व जलद दादरा लावला जातो त्यामध्ये चार ओळींचं कडवं होतं व कडवं संपल्याक्षणी परत कव्वालीबाजाचं ध्रुवपद येतं ... हीच सगळी प्रोसेस दुसऱ्या कडव्याच्या वेळीसुद्धा रिपीट होते व शेवटी कव्वालीबाजाच्या सुंदर ध्रुवपदावरच गाणं संपतं … असंच एक सुश्राव्य गाणं आहे 'किसकी नजरका मस्त इशारा है जिंदगी' (रागरंग / रोशन / लता) ... हे गाणं जरा जलद अशा दादऱ्यातल्या एकदम फडकत्या ऱ्हिदमवर सुरु होतं ... चाल आणि लताच्या कोवळ्या आवाजातल्या मुरक्या तर अप्रतिमच आहेत ... जलद दादऱ्यातच हे गाणं पहिलं कडवं संपेपर्यंत चालतं आणि पहिलं कडवं संपल्या संपल्या ट्रान्स्फर सीन झाल्यासारखं एकदम आठ मात्रांच्या केहेरव्यात दुसरं इंटरल्यूड म्युझिक सुरु होतं ... पूर्ण दुसऱ्या कडव्याच्या दोन बेहेतरीन ओळी केहेरव्याच्या वजनातच आहेत आणि पुन्हा बेमालूम जोडल्यासारखं ध्रुवपद पहिल्याच दादऱ्यात पेश केलं जातं आणि गाणं संपतं ... रोशनचंच आणि 'रागरंग'मधलंच आणखी एक लाजवाब गाणं आहे 'ये कैसी अदाए है उनकी अदाए' (रागरंग / रोशन / लता) ... या गाण्याचा पहिल्या चाळीसेक सेकंदांचा सुंदर इंट्रो केहरवा ठेक्याच्या वजनात सुरु होतो व इंट्रो संपतांनाच इंट्रो एकदम दादऱ्यावर येतो, एवढंच या ठेक्याचं वैविध्य आहे बाकी पूर्ण गाणं दादऱ्यामध्येच आहे ... अर्थात गाणं अत्यंत श्रवणीय आहेच ...
अनिलदांची (संगीतकार अनिल विश्वास) आणखी एकदोन गाणी आठवतायत ज्यात असं थोडंसं तालवैविध्य आहे ... एक आहे - 'कैसे कहदु बजरीया के बीच ये तो कानोमे कहनेवाली बात है' (लाडली / अनिल विश्वास / लता) ... या ही गाण्यात फक्त सुरुवातीला 'सुनो सुनो रे सुनो सुनो सुनो,' असे शब्द आहेत जे केहरव्याच्या बाजात गायिले गेलेत; पण लगेच गाणं कच्छी ठेका किंवा गरब्याच्या ठेक्याच्या वजनात जातं आणि मग पूर्ण गाणं त्याच ठेक्यात आहे ... याही गाण्यात लताचा आवाज कमालीचा कोवळा आलाय ... अर्थात सिनेमा १९४९ सालातला आहे ... आणि अनिलदांचं दुसरं गाणं अक्षरशः एक मास्टरपीस आहे जे आहे 'इंतजार और अभी' (चार दिल चार राहे / अनिल विश्वास / लता) ... 'सांजकी लाली सुलग सुलगकर,' या शब्दांनी धुमाळी सदृश ठेक्याच्या वजनात गाणं सुरु होतं ... पहिल्या दोन ओळींनंतर गाणं क्षणभर थांबतं आणि दादऱ्यात 'इंतजार और अभी' हे ध्रुवपद सुरु होतं ... पहिल्या व दुसऱ्या दोन्ही कडव्यांना धुमाळी ठेक्याच्या वजनातल्याच चाली आहेत व दोन दोन ओळींची कडवी संपल्यावर गाणं परत दादऱ्यातल्या ध्रुवपदापर्यंत येतं ... यामध्ये यमन आणि भैरव सारखे राग वापरून नितांत सुंदर अशी चाल केलीय आणि अर्थातच लतानी त्या चालीचं सोनं केलंय ...
'मेघा छायें आधी रात' (शर्मिली / एस.डी.बर्मन / लता) हे सुद्धा एक सदाबहार गाणं ... या गाण्याचा इंट्रो सुद्धा आठ बीट्सच्या पाश्चात्य ढंगात सुरु होतो व संपवतांना तबल्यावर एकदम बहारदार रूपक ठेका लागतो आणि त्यात अत्यंत अप्रतिम असा मुखडा गायिला जातो ... मग परत पहिल्या कडव्याचं इंटरल्यूड म्युझिक आठ बीट्सच्या पाश्चात्य ढंगातच वाजतं, संपतांना गाणं रूपक वर येतं आणि कडवं रूपकमध्येच होतं ... दुसऱ्या कडव्याचं इंटरल्यूड मात्र रूपकमध्येच आहे व नंतर गाणंही रूपकमध्येच संपतं ...
'जा जा रे जा साजना' (अदालत / मदन मोहन / लता) हे गाणं सुद्धा अशाच दोन तालात नटलंय ... त्यात मुखडा, पहिलं कडवं व तिसरं कडवं लताच्या आवाजात थोड्या सॅड स्वरूपातल्या चालीत आहेत व त्यासाठी साध्या धुमाळी बाजाच्या जेमतेम चार बिट्स वापरल्यायत ... पण दुसरं व चौथं कडवं मात्र आशाच्या फडकत्या आवाजात आहे ... ही कडवी दणदणीत कव्वालीबाजाच्या ठेक्यात व लग्ग्यांमध्ये आहेत व ही कडवी संपतांना आशाची जीवघेणी तान येऊन पुन्हा गाणं काहीशा सॅड मूडमध्ये येऊन संपतं ...
'नवरंग' चित्रपटात अण्णा सी.रामचंद्र यांची अशीच एक दिल लुभानेवाली चाल आहे ... ते गाणं आहे, आशाचं 'आ दिलसे दिल मिलाले' (नवरंग / सी.रामचंद्र / आशा) ... गाण्याचं ध्रुवपद जलद दादऱ्यामध्ये आहे आणि पहिल्या इंटरल्यूड म्युझिकनंतर पहिलं कडवं सुद्धा त्याच ठेक्यात आहे फक्त कडवं संपता संपता आशाच्या दाणेदार तानेनंतर सणसणीत कव्वालीबाजाचा ठेका आणि लग्ग्या लागतात व ध्रुवपद या सुंदर ठेक्यात आणि लग्ग्यांमध्येच चालतं व पुन्हा तानेबरोबर 'दिलसे दिल मिलाले' हे शब्द जोडून घेऊन गाणं परत दादऱ्यात चालतं दुसऱ्या कडव्याच्या वेळी परत हाच पॅटर्न रिपीट होऊन गाणं दादऱ्यात येऊन संपतं ... कदाचित कोठीवरच्या नर्तकीच्या तोंडी असल्यामुळे असेल पण या गाण्यासाठी आशानी पूर्ण गाणं संपेपर्यंत तोंड फाकवुन टिपिकल कोठीवाल्या बाईचा वाटावा असा वेगळाच आवाज लावलाय.
अण्णा सी.रामचंद्र यांची आठवण निघालीच आहे तर आशाचंच एक लाडकं मराठी गाणं प्रकर्षानं आठवतंय ... 'घरकुल' चित्रपटातलं 'मलमली तारुण्य माझे तु पहाटे पांघरावे' (घरकुल / सी.रामचंद्र / आशा) ... हे गाणं दमदार रूपक ताल आणि जोरकस कव्वालीबाजाचा जलद ठेका आणि त्यात वाजलेल्या दिलखेचक लग्ग्या यासाठी खास ऐकण्याजोगं आहे ... मुखडा आणि तिन्ही कडवी रूपकमध्ये आणि कडवी संपतांना गायिले जाणारे मुखडे कव्वालीबाजात असा या गाण्याचा पूर्ण पॅटर्न आहे ... मात्र बारीकशा आलापवजा तानेनी
रूपक ठेक्याशी केलेली जोडणी अत्यंत लुभावनी आहे त्यामुळे पूर्ण गाणं वरच्या उंचीवर जातं ... या गाण्याच्या बाबतीत एक खास गोष्ट सांगण्यासारखी वाटते ... हे गाणं मी खूपच आधीपासून ऐकत होतोच आणि बऱ्याच नंतर मी नूरजहाँचं ‘दोस्त’ सिनेमातलं ‘बदनाम मुहब्बत कौन करे’ (संगीतकार सज्जाद हुसेन) हे हिंदी गाणं ऐकलं व त्याची अवघड कंपोझिशन आणि टिपिकल तिचंच असू शकतं असं नूरजहाँचं सादरीकरण दोन्ही मला खूपच आवडलं ... त्याहीनंतर कधीतरी इसाक मुजावरांच्या लिखाणात सी.रामचंद्र अण्णांचा एक इंटरेस्टिंग किस्सा वाचला ... स्वतः अण्णा नूरजहाँचे आणि सज्जादच्या अनोख्या, मुश्किल कंपोझिशन्सचे जबरदस्त फॅन होतेच ... त्यामुळे अण्णांनी म्हणे ‘बदनाम’ गाण्यावरून ‘मलमली’ची चाल चोरली ... स्वतः ‘मलमली’ गाण्याचा संगीतकारच मुलाखतीतून अशी कबुली देत होता ... आता ‘बदनाम मुहब्बत’ या दोन शब्दांची आणि ‘मलमली तारुण्य माझे’ या तीन शब्दांची चाल एकच आहे, सारखी आहे, हे खरंच आहे (इच्छूकांनी दोन्ही गाणी ऐकावी; ऐकावीच) ... त्यामुळे ‘बदनाम’ या गाण्यामुळे अण्णा इन्स्पायर झाले असतील, हे समजण्यासारखं आणि थोडा विचार केला तर पटण्यासारखं सुद्धा आहे; पण ‘बदनाम’ची चाल चोरली असं खुद्द अण्णा म्हणाले असले तरी मला ते मान्य होण्यासारखं नाहीये कारण ‘मलमली’ हे पूर्ण वेगळं, दोन तालांच्या वजनातलं बेहेतरीन गाणं आहे; तसं 'बदनाम मुहब्बत'चं नाहीये. (एकवेळ दोन तालांचं वजन हे साधर्म्य गृहीत धरलं तर अण्णा - आशा कॉम्बिनेशनचंच ‘नवरंग’मधलं ‘आ दिलसे दिल मिला ले’ आठवू शकतं ... फक्त आठवू शकतं ... कारण ही दोन गाणीसुद्धा पूर्णपणे वेगळीच आहेत.) ... इसाक मुजावरांनी घेतलेल्या त्याच मुलाखतीत म्हणे अण्णा पुढे असंही म्हणाले की ... “मला ‘मलमली’ फारसं आवडत नाही कारण मी सज्जादचं ‘बदनाम’ चोरलंय आणि नूरजहाँ इतकं चांगलं आशाला मुळीच गाता आलेलं नाहीये” .... माय गॉड ! हे वाचून तर माझ्या डोळ्यांची बुब्बुळं खोबणीतून बाहेर पडायची शिल्लक उरलीवती ... असो ... स्वतः अण्णांचं मत काहीही असलं तरीही रसिक म्हणून मला मलमली तारुण्य माझे अतिप्रिय आहे ...
अजून एका अफलातून मराठी गाण्याची आठवण येत्येय ... ते आहे 'नाव सांग सांग सांग नाव सांग' (आशा भोसले व हृदयनाथ मंगेशकर / चित्रपट - मराठा तितुका मेळवावा / संगीतकार - आनंदघन
उर्फ लता मंगेशकर) ... हे सुद्धा एक झपाटूनच टाकणारं द्वंद्वगीत आहे. याही गाण्यात सुरुवातीचं झकास गद्य, मग ढोलकीचा छोटासा पण छप्परतोड तुकडा-तोडा आणि मग लावणीच्या परिचित ठेक्यात गाणं सुरु होतं. गाण्याचा सुंदरसा मुखडा झाल्यावर इंटरल्यूड त्याच ठेक्यात सुरु होतं; पण इंटरल्यूड संपता संपता कडव्यासाठी ढोलकीवर एक पूर्णपणे वेगळा आणि अनपेक्षित सौंदर्याची भन्नाट अनुभूती देणारा आठ बीट्सचा ठेका अशा काही डौलदारपणे चालतो की ... छे !! माझ्याकडे तरी 'त्या' अफाट ठेक्याला देण्यासाठी कुठलीही उपमा नाहीये ... तो फक्त बेभानपणे अनुभवायचा. कडवं पूर्ण झाल्यावर क्षणभरच गाण्यामध्ये अप्रतिम ठेहेराव (पॉज) येतो व परत मूळ लावणीच्या ठेक्यात मुखडा सुरु होतो. या दोन ठेक्यांच्या प्रवासात आशा आणि हृदयनाथचं भन्नाटपणे गायलेलं गाणं खरंच वेड लावतं.
तालवैविध्याचा आणि वैशिष्ट्याचा विचार करता दोन ताल जरी आले नसले तरीही काही खासच गाणी सुद्धा आठवतायत ... 'झपताल' हा तसा थोडा कठीण ताल व थोडीफार गाणी असली तरीही 'झपताल' हिंदी गाण्यांसाठी खूप कमी प्रमाणात वापरला गेलाय ... त्यातलं मनावर ठसलेलं गाणं आहे ते म्हणजे 'घायल हिरनिया मै बनबन डोलू' (मुनीमजी / एस.डी.बर्मन / लता) ... कठीण ताल लक्षात घेता अतिशय गोड, अप्रतिम अशी चाल, लताच्या अप्रतिम ताना-मुरक्या, मध्येच झकास सरगम आणि अगदी जमून आलेली इंटरल्यूड म्युझिक्स यांनी गाणं अफलातून नटवलं गेलंय ... 'एस.डी.'चीच अगदी महागाणी म्हणावीत अशी दोन गाणी आठवतायत ... पहिलं पूर्ण लांबीचं दिलखेचक आणि कठीण अशा रूपक तालामधलं 'पिया तोसे नैना लागे रे' (गाईड / लता व कोरस) व दुसरं 'होटोपे ऐसी बात' (ज्वेल थिफ / लता व कोरस) ... दोन्ही गाणी एवढी सुप्रसिद्ध आहेत की कुठलंही विश्लेषण नकोच ... फक्त तालासुरांसहित आणि म्युझिकसहित दोन्ही गाणी खूप आवडून घ्यायची बस्स !
ज्यामध्ये तालाचं अथवा तालांचं लक्षणीय वैविध्य असतं असा उल्लेख करण्यासारखा आणखी एक प्रकार म्हणजे कव्वाल्या ... यात आठवली जाणारी पहिली कव्वाली सांगायला नकोच ... पूर्ण लांबीची 'ना तो कारवाकी तलाश है' (बरसातकी रात / रोशन / मन्नाडे, रफी, आशा, सुधा मल्होत्रा, एस.डी.बातीश व इतर कोरस) ... या कव्वालीबद्दल तर बाकी काहीच लिहायची आवश्यकता नाही ... 'बरसात की रात' मधल्याच इतरही दोन जरा कमी प्रसिद्ध पण खूप सुंदर अशा कव्वाल्या आहेत ... एक - 'निगाहे नाजके मारोका हाल क्या होगा' (आशा, सुधा मल्होत्रा, पुरुष मुस्लिम कव्वाल व कोरस) व दुसरी 'जी चाहता है चूम लू अपनी नजरको मै' (आशा, सुधा मल्होत्रा, बडे हसन, एस.बलबीर व कोरस) ... 'ना तो कारवाकी' सारखीच आशाची अतिप्रसिद्ध अशी बहारदार कव्वाली आहे 'निगाहे मिलानेको जी चाहता है' (दिल ही तो है / रोशन / आशा व कोरस) ... 'दीपचंदी' तालाच्या वजनातल्या ठेक्याची अशीच एक माझी सुप्रीम आवडती कव्वाली आहे 'मेरी दुनिया लूट रही थी और मै खामोश था' (मिस्टर अँड मिसेस फिफ्टी फाईव्ह / ओ.पी.नय्यर / रफी व कोरस) ... याच प्रकारात पुढे 'तेरी मेहेफीलमे किस्मत आजमकर हम भी देखेंगे' (मुगले आझम / नौशाद / शमशाद, लता व कोरस) हीही सुंदर कव्वाली येते ... खास उल्लेख करावा अशी एक जुनी आणि सुश्राव्य कव्वाली आहे 'हमे तो लूट लिया मिलके हुस्नवालोंने काले काले बालोंने गोरे गोरे गालोंने' (अल हिलाल / बुलो सी.रानी / इस्माईल आझाद कव्वाल व कोरस).
तालाच्या दृष्टीने लक्ष वेधून घेणारा गाण्यांचा आणखी एक प्रकार म्हणजे कोठीवरची गाणी ... यांत बहुसंख्य वेळा कव्वाली बाजाचे व दणकेबाज लग्ग्यांचे ठेके, कधी चालींनुसार येणारे पॉजेस तर कधी ठेक्यांमधली परिवर्तनं ऐकण्याजोगी असतात ... कहोजी तुम क्या क्या खरीदोगे (चित्रपट - साधना / संगीतकार - एन दत्ता / गायिका - लता) या गाण्याची सुरुवातच दणदणीत तबला, तोडा, नृत्याबरोबरची जुगलबंदी यांनी झालीय आणि गाण्यामधला आणि इंटरल्युड्समधला दिलखेचक तबला खास ऐकण्याजोगाच आहे ... असाच सुंदर तबला 'रुठे सैय्या हमारे सैय्या क्यू रुठे' (देवर /रोशन / लता) या गाण्यामध्येही ऐकायला मिळतो ... मुबारक बेगमचा फडकता आणि किंचित सानुनासिक असा सुंदर आवाज लागलाय, अशाच एका सुंदर कोठीवरच्या गाण्यात ... ते आहे 'सुनीये के न सुनीये हम हाले दिल सुनाएंगे' (मधुमती / सलील चौधरी / मुबारक बेगम) ... याही गाण्यातल्या तबल्यावरच्या करामती अगदी ऐकण्यासारख्या आहेत ... अर्थात माझ्या दृष्टीनी कोठीवरच्या गाण्यांमधलं नंबर वन गाणं आहे जुन्या दिलीपकुमारच्या 'देवदास'मधलं 'अब आगे 'तेरी मर्जी' (देवदास / एस.डी.बर्मन / लता) ... हे गाणं सुद्धा तबला आणि वैजयंतीमालाच्या नृत्याच्या सुंदरशा तोड्यानी सुरु होतं आणि नंतर दोन ओळींच्या शेरानंतर दणकेबाज कव्वालीबाजाच्या तबल्यात गाणं सुरु होतं ... पहिलं कडवं दादऱ्याच्या वजनात जातं आणि अप्रतिम जोडकाम होऊन तबल्यावर कव्वालीबाजातल्या अप्रतिम लग्ग्या लागतात ... दुसऱ्या कडव्याच्या दोन ओळी या तालाशिवाय गायिलेल्या आहेत व परत मुखड्याला आल्यावर कव्वालीबाजातल्या लग्ग्या आणि शेवटचा तिय्या होऊन गाणं संपतं ...
मुख्यतः तालाचं सूत्र धरून बऱ्याच गाण्यांच्या बऱ्याच आठवणी काढून झाल्यायत ... अर्थात अशा आठवणीच काढायच्या म्हटल्या तर कित्येक तास खर्ची पडू शकतात तेव्हा आता इथेच थांबतो.
(उल्लेख केलेली सगळी गाणी यु ट्युब वर ऐकायला मिळू शकतील.)
@प्रसन्न सोमण / १३-०३-२०२४.