--- आंबा खरेदी ही एक समस्या ? ---
माझ्या असं लक्षात आलंय की कोकण या प्रांताबद्दल एक वेगळीच, शब्दांत न सांगता येणारी, आपुलकी लोकांमध्ये आहे आणि त्या आपुलकीचं एक प्रमुख कारण म्हणजे तिथे पिकणारे आंबे, हे असावं; असं दिसतंय ... सोशल मीडियावर, विशेषतः काही पोस्ट्सवर बऱ्याचदा; कोकणात आपल्या स्वतःच्या आंब्यांच्या बागांमध्ये खपणाऱ्या लोकल व्यक्ती आणि इतर सर्व काहीसा हेवा करणारा समाज; असे दोन तट पडलेले सुद्धा दिसतात ... बेधडकपणे जनरल स्वरूपाच्या, भल्याबुऱ्या कॉमेंट्स करणाऱ्यांची तर एकुणात कमतरताच नाहीये ... या बॅकड्रॉपवर हे माझंही काही पांढऱ्यावर केलेलं काळं, एवढंच ......
“आंबे विक्रेत्यांमध्ये ‘अस्सल देवगड हापूस आंबे आहेत साहेब,' असं म्हणून आंबे विकणारे एवढे झालेत की देवगडच्याच माणसांना कळेनासं झालंय की आपल्या
बागांमधल्या कलमांवर एवढ्या प्रचंड संख्येनं आंबे लागले तरी कधी ?” अशा आशयाची एक खेळकर पोस्ट पूर्वी सोशल मीडियावर, माझ्या माहितीतल्या बऱ्याच समूहांवर, फिरत होती ... तेव्हा त्यावरच्या बऱ्याचशा कॉमेंटीही वाचल्या ... कदाचित या वर्षी रिपीट परफॉर्मन्स होईलही … त्या निमित्ताने काही विचार, काही शंका ...
मुळातच मला काहीही कळत नाही हे मान्य करतो ... फक्त काही प्रश्न आणि मुद्दे -
१) 'देवगडचे (किंवा रत्नागिरीचेही)
आंबे' या टर्ममध्ये -
अर्थात ऑथेन्टिक म्हणून - आपण भौगोलिक परीघ कसा आणि
कुठपर्यंत समजावा ? कारण आमचे
मिठबावला (देवगड पासून पूर्वी बावीसतेवीस किलोमीटर्स वर; तर आता तारामुंबरीमार्गे साधारण चौदाएक किलोमीटर्सवर)
घर आहे, तिथे जाणं-येणं
असतं … अनुभव म्हणून मिठबाव-कातवणच्या
बागांमधले आंबे खाल्लेत ... मालवण-वेंगुर्ल्याचेही मित्र होते, त्यांचीही कलमं होतीच आणि
अलिबागवाल्या मित्रांचीही कलमं होतीच ...
२) मी जन्मजात मुंबईकर ...
बोरिवली पूर्व; नॅशनल पार्क
जवळची सोसायटी - येथे आधी ८ वर्ष राहिलोय ... त्यात किमान ४/५ वर्ष तरी नॅशनल
पार्क मधल्या कलमांचे आंबे खाल्लेत ... तोही रस मला छानच लागला होता ... मुंबईच्या
फेरीवाल्यांकडून 'देवगड हापूस' म्हणून मिळणारे आंबे एप्रिलअखेरीच्या सुमारास जनरली परवडतात सुद्धा आणि मी ते बिनधास्तपणे खातो सुद्धा ... दर सुद्धा घासाघीस केल्यावर थोडाफार कमी करतात आणि तोही
फारशी कुठली रडगाणी न गाता ... कधी हे आंबे चांगल्या
चवीचे असतात कधी जेमतेम असतात; पण मुंबईला मिळतात हे नक्की ... मुळातच 'खाईन तर घरच्या साजुक तुपाशीच' किंवा 'पिईन तर फक्त स्कॉचच,' (आपापल्या प्रकृतिधर्मानुसार योग्य वाटेल ती म्हण स्वीकारावी) अशा पिंडाचा काही मी नाहीये … बहुदा माझी अरसिकांतच गणना
होईल हे मी जाणून आहे; पण गावच्या लोकल लोकांकडून
एप्रिल, मे केव्हाही
विचारा, बहुतेक वेळा
"हय आंबा असा खंय ? कीड लागलेली हा ... भरीक भर म्हंजे नासधूस करून या मेल्या वांड्रान्नी सत्यानाश केलो … शिरा पडली ती!" असली रडगाणीच हुकमी ऐकायला मिळालीयत ... शिवाय खात्रीशीर, मालकीच्या बागेतले हापूस
म्हटल्यावर दरही मजबूत ... त्यामुळे बऱ्याचदा तो आंबा विकाऊ असला तरी माझ्यासाठी तरी खरीदाऊ नसतो ...
मुळात आधी हापूसच्याच पोटजाती किती ? … पारंपरिक कलमांखेरीज
रत्ना नावाची एक पोटजात ऐकिवात आहे ... शिवाय
आंबा पिकवलाय नक्की नैसर्गिकरित्या, का 'कार्टार' (या किंवा असल्याच नावाचं
काहीतरी एक पावडरस्वरूपी असतं बुवा; ... नक्की त्याचं नांव काय, कोण जाणे ! ... मला क्वार्टर हा शब्द नक्की माहित्येय !)
घालून त्याच्या साहाय्याने ? ... असल्या अनेक भानगडी आहेत ... (परदेशातल्या परिचितांकडून
नेहमीच तुमच्या आधी आम्ही मस्तपैकी आंबे खातो हे ऐकायला मिळतं) ...
३) गेल्या वर्षी
एप्रिलच्या मध्यावर जामसंडे-देवगड इथे फिरूनही; - बायकोने गाडीतून उतरून उतरून अनेकठिकाणी चौकशी करून सुद्धा - दोनतीन दिवसांत
खाण्याजोगे होतील असे आंबे नव्हते … आंबे भरपूर होते; पण ते सगळे हिरवेगार आणि पिकायला चांगल्यापैकी चेंगटपणा करणारे ... मुंबईला आल्या आल्या
मात्र तयार आंबे मिळाले ... तसंही मुंबईला मार्चच्या मध्यापासूनच अनेकठिकाणी आंबे दिसायला लागतात ... त्यावेळी रेट्स भारी असतात; पण ते मोजायची तयारी असेल तर लवकर खाण्याजोगे आंबेसुध्दा मिळतात ... नाहीतरी ‘पिकतं तिथं विकत नाही,’ ही म्हण आहेच ... कदाचित मुंबईला (फक्त मुंबईला ?) फसवत असतीलही ... (आमच्यासारखे फसवून घ्यायला तयार असलेले आंबाभक्त सुद्धा बहुसंख्येनं आहेतच की !) … मरू दे ! ... नाहीतरी हा काय फारमोठा जीवन मरणाचा प्रश्न आहे ? ... अगदी मिठबावचेच म्हणून माहित असलेले आंबेसुद्धा
एका वर्षी फार ओकेओके आणि ऑर्डीनरी निघालेत ... शेवटी नक्की गॅरेंटी कसली मिळते ? ...( पु.लं.चं "तुमाला
आधी बगुन घेयाला काय होते ?
आमी नारियल काय
घरी बनवते काय ?" हे वाक्य हटकून
आठवतंय) ...
खात्रीचे मिठबांव देवगड परिसरातले काही
आंबे विक्रेते आहेत; पण मुंबईकरांना ते आंबे पिकअप पद्धतीने आणावे लागतात ... म्हणजे
गावच्या लोकांनी बसमध्ये चढवलेल्या आपल्या पेट्या; बस मुंबईत जिथे थांबते त्या हायवेवर
किंवा थांब्यांवर उतरून घेऊन ते घरी आणावे लागतात ... बसच्या वेळेचा बिलकुल भरवसा नसतो
... बसच्या क्लिनरला वारंवार फोन करून बस कुठपर्यंत आलीय; विचारत बसत ताटकळावं लागतं
... अशा पद्धतीने मी अगोदर आणले आहेतच ... पण आता सिनियर सिटीझन झाल्यावर वयानुरूप
आणि दगदगीनुसार जमत नाही ... अन्यथा रस्त्यावर उतरून न घेतलेला असा माल बसवाल्यांच्या
ऑफिसमध्ये जमा होतो तिथून त्या पेट्या वाहन करून आणाव्या लागतात ... शिवाय, पाच पाच
डझनाचं वजन उचलून जिने सुद्धा चढवत नाहीत; आणि कामांमुळे हाताशी कोणी यंग ब्रिगेडसुद्धा
नाही ... त्यात या शिंच्या ऑनलाईनवाल्या सगळ्यांनी दारात सामान आणून देण्याची चटक लावलीय
... त्यातही हल्ली ब्लॉक सिस्टीम आणि सिक्युरिटी मेझर्समुळे फेरीवाले दाराशी येत नाहीत
... त्यामुळे "पक्का देवगड हापूसही है साहब," अशी पक्की खात्री देणाऱ्या
लोकल भय्यांकडून, उचलवेल एवढंच वजन म्हणून, एकएक डझन आंबे घेऊन गोड मानून घ्यायचे झालं
! ...
मला स्वतःला तर काही कळत
नाहीच; पण लोकल लोक नक्की काय कॉमेंट करतात ते पाहावं, म्हणून गावच्या एका परिचितांना विचारलं, "काका, मी नॅशनल पार्कच्या कलमांचा किंवा अलिबागच्या परिचित बागेमधून
घेतलेला आंबा आणून तुम्हाला 'आत्ताच देवगडला घेतला,' म्हणून सांगितलं तर तुम्हाला नक्की हे खोटं सांगतोय, असं ओळखता येईल का हो ?"
"जाड्या किंवा पातळ सालीवरून कळेल आणि चवीवरून
कळेल" ...
"हे आंबा फोडल्यावर झालं; फ़ोडणंच काय पण सालीत नख
सुद्धा खुपसू दिलं नाही, आणि नुसता दाखवला तर ? … कारण विक्रेते आंब्यात नख खुपसू देणार नाहीत"
नुसता दाखवलास तर फार काही कळणार नाही"
असं त्यांचं उत्तर होतं बुवा !
इथे वेगळ्याच क्षेत्रातला एक किस्सा आठवतोय ...
माझ्या एका दूरच्या काकांनी जस्ट एक गंमत म्हणून, शिवाजी महाराजांची बाबासाहेबांच्या पुस्तकात उपलब्ध असलेली जन्मकुंडली पेनाने कागदावर कॉपी करून, निव्वळ एक गंमत म्हणून, त्यांचा मित्र असलेल्या
ओळखीच्या कोण्या ज्योतिषाला दाखवली होती
आणि "माझ्या ऑफिसातल्या मित्राची कुंडली आहे ... प्लिज काही सांगा," ... असंही पुढे विचारलं होतं ...
त्या ज्योतिषी बाबांनी एक क्षणभर त्या दूरच्या
काकांकडे रोखून पाहिलं ... मग शांतपणे ते म्हणाले, "तुम्ही म्हणताय तर कदाचित हा माणूस तुमचा ऑफिसचा मित्र असेलही; पण तरीही माझ्या ज्ञानानुसार ही कुंडली कुठल्या तरी थोर, अत्यंत महान
व्यक्तीची वाटत्येय ... म्युन्सिपाल्टीतल्या माणसाची मुळीच वाटत नाहीये ... हवं तर
तुमच्या कॉपी करण्यात नक्की काही चूक झालेली नाही ना, हे परत एकदा तुम्ही तपासा" ...
ते ज्योतिषी अर्थात त्या काकांचे स्नेहीच होते
त्यामुळे काकांनी लगेच शरणागती पत्करून खरी गोष्ट त्या ज्योतिषी बाबांना सांगितली
!
मुद्दामच दोन्ही प्रकारच्या गोष्टी सांगितल्या
... सांगायचंय एवढंच की ह्या आंब्यांबद्दलही; आंब्यांचं म्हणून काही शास्त्र असेल ... ते शास्त्र नक्की
आणि नीट समजणारी ज्ञानी मंडळी असणारच ... आहेतच ... पण तरीही बहुसंख्य माणसं नक्कीच माझ्यासारखी फार काही न समजणारी, अशी असणार ... त्यामुळे
आमच्यासारख्यांना फसवणं फार काही कठीण नाही ...
पण तरीही आम्ही आणि आमच्यासारखे बरेच; नीटपणे घासाघीस करून दर वगैरे कमी करून घेऊन, चेहरा मात्र साळसूदपणे फसल्यासारखा ठेवून, मुंबईतून आंबे घेतात आणि 'हे आंबे देवगड हापूसच आहेत,' असा विश्वास ठेवून
बिनधास्तपणे ओरपतात ...
{ लिखाण काही खरं काही खोटं अशा स्वरूपाचं आहे ... आजची तारीख एक एप्रिल आहे, हेही ध्यानात असू द्या ... }
@प्रसन्न सोमण / ०१-०४-२०२३.
प्रसिद्धी - अभूतपूर्व (मे २०२४)