--- वार्षिकोत्सवांची नशा ---
दिवाळीची सगळी हौसमौज आटोपली की लगेच सूचनाफलकावर सूचना लागत असे ती वार्षिकोत्सवातल्या नाटकासंबंधीची व इतरही सांस्कृतिक कार्यक्रमांसंबंधीची ... ‘सोसायटीच्या नाटकामध्ये सहभाग घेण्याची इच्छा असणाऱ्यांनी अमुक तारखेला रात्री ९.३० वाजता सोसायटीच्या सभागृहात जमावे,’ इतकी त्रोटक दोनतीन ओळींची ती सूचना, प्रत्यक्षात जादूच्या अक्षरांनी लिहिल्यासारखी भारलेली वाटत असे ... मग त्या भेटीआधीच टाकीवर नाहीतर सोसायटीच्या नाक्यावर चर्चांची जोरदार (धूम्र)वलये उमटत असत ...
अर्थात ज्या काळासंबंधी मी लिहितोय तो काळ एकतर टीव्हीच्या - किंवा जास्त योग्य पद्धतीने सांगायचं तर केबल टीव्हीच्या - आगमनापूर्वीचा आणि एकूणच टीव्हीला तुच्छ मानणाऱ्या नाटक्यांचा खास काळ होता ... मोबाईल नामक मच्छरसारखं उपद्रवी आणि एकाच हातामध्ये मावणारं
एखादं यंत्र कधी येईल हे कुणाच्या गावीसुद्धा नव्हतं ... त्याकाळी टेपरेकॉर्डर आणि कॅसेट या यांत्रिक गोष्टी मात्र परिचित तर होत्याच पण नाटकांच्या दृष्टीने बॅकग्राउंड म्युझिकचा विचार करता खूप महत्वाच्या सुद्धा होत्या ...
तर अशी ही वार्षिकोत्सवासंबंधीची सूचना लागली रे लागली की लगेच मनात 'जिवलगा कधी रे येशील तू' म्हणत; डोळ्यांसमोर मोकळ्या पटांगणातल्या एका छोट्या इमारतीसमोरच्या जागेत बांधलं जाणारं सोसायटीचं स्टेज नजरेसमोर तरळून छळायला लागायचं ... या स्टेजवरचा दर्शनी भागातला 'वार्षिकोत्सव' आणि पुढे जे असेल ते साल, असा बोर्ड सुद्धा नजरेसमोर यायचा ... मी तबलजी होतोच आणि खूप लहानपणापासूनच मला स्टेजवर जायची भीती कधीच वाटली नाही ... पण स्टेजचं तीव्र आकर्षण मात्र नेहमीच वाटायचं ... या वार्षिकोत्सवांत हौशी स्थानिक कार्यक्रम सुद्धा अत्यंत उत्साहाने आणि जोरदार पद्धतीने होत असल्यामुळे अशा हौशी कलाकारांकडून किंवा त्यांच्या आईवडिलांकडून, 'आहेस ना रे ?' असं विचारून, माझी तबलासाथीसाठी ऍव्हॅलेबलिटी चेक केली जात असे ... कोणी भावगीतं, बालगीतं किंवा सिनेसंगीत गात असत किंवा कोणी पोरीबाळी भारी कॉस्च्युमसहित नाच उर्फ डान्स बसवत असत; ... पण तरीही कॅसेट लावून नाचण्याचं प्रमाण कमी असल्यामुळे तबलजी म्हणून मला काम असायचंच ... त्यामुळे, 'कृपया प्रसन्न सोमण यांनी तबला घेऊन स्टेजच्या पाठीमागे यावं,' ही अनाउन्समेंट नेहमीच ऐकायचो व उगाचच एक प्रकारचा गर्वही अनुभवायचो ... अनेकदा सोसायटीतील काही बालगोपाळ मंडळी छोटी छोटी नाटुकली सुद्धा सादर करायची ... त्यातल्या काही जणांचं संवाद किंवा ऍक्शन चुकणं किंवा विसरणं, मग सर्वांसमक्ष जीभ चावत प्रॉम्प्टर कडून ऐकून दुरुस्ती करणं; या सगळ्या गोष्टी अगदी काल घडल्यासारख्या नजरेसमोर येतायत.
वार्षिकोत्सवातल्या उत्तमोत्तम कार्यक्रमांचा उल्लेख करतांना सोसायटीतल्या दोनतीन खुमासदार आणि पूर्ण लांबीच्या वाद्यवृंदांच्या
कार्यक्रमांचा उल्लेख करणं सुद्धा अपरिहार्य आहे ... हे वाद्यवृंद; माझ्यासारखाच तबलजी व भरीला तबलातरंग वादकही असलेल्या आमच्या संजीव कानिटकरने अगदी जीवापाड कष्ट करून बसवलेले होते ... सोसायटीतले बरेच हौशी गायक गायिका घेऊन आणि स्वतःच्या ओळखींवर वाद्यवृंदातले अनेक नामवंत कलाकार सोसायटीत आणून त्याने हे वाद्यवृंद उत्तमरीत्या सादर केले होते ...
बालवयातून पुढे जरा तारुण्यावस्थेत आल्यानंतर खरी चिरकाळ आठवत राहणारी मौज अनुभवली ती एकांकिका आणि मोठ्या दोन किंवा तीन अंकी नाटकांच्या संदर्भात ... अगदी खरं सांगायचं तर मला अभिनयाचं अंग अगदी अजिबातच नाही ... पण तरीही स्टेज फियर नसल्यामुळे, बारकुड्या देहयष्टीमुळे आणि शिवाय बिनधास्त आगाऊपणे सर्व दोस्तकंपनीमध्ये वावरल्यामुळे - थोडक्यात शक्य तितका काळ घराबाहेर काढल्यामुळे - माझ्या खाती एकांकिकांमधले आणि नाटकांमधलेही थोडेफार छोटे छोटे रोल्स जमा आहेत, हे नम्रपणे सांगू इच्छितो ... माझा मोठा भाऊ बराच चांगला अभिनय करत असे व या नाटकांसंबंधी विलक्षण अंगभूत हौस त्याच्या ठायी भरपूर प्रमाणात होती ... माझा नाटकातल्या अभिनयाशी जवळजवळ शून्य संबंध असला तरीही तबलजी असल्यामुळे आणि संगीताचं उत्तम अंग असल्यामुळे; मी किमान बॅकग्राउंड म्युझिकच्या निमित्ताने तरी स्वतःचा संबंध नाटकाशी जोडायचोच ... अर्थात नाटकांच्या तालमींची आणि त्या काळातल्या अवर्णनीय टाईमपासची विलक्षण ओढ, हे त्यामागचं प्रमुख कारण असे ...
वास्तविक पाहता आमची सोसायटी आज षष्ठ्यब्दीपलीकडे गेलेली आहे आणि वार्षिकोत्सव जवळजवळ सुरुवातीपासून होतच असल्यामुळे माझ्या बाल्यावस्थेतले बरेच वार्षिकोत्सव, त्यातली नाटके थोडी थोडी स्मरणात आहेतच ... मात्र माझ्या मनात धुंद करणाऱ्या आठवणी आहेत त्या मी जरासा मोठा होऊन उंडगेगिरी करू लागल्यानंतरच्या व वार्षिकोत्सवांमध्ये काही ना काही सहभाग घेऊ लागल्यानंतरच्या ...
नाटकांसाठी अभिनयाची कंड असणारे युवक व पुरुष बरेच असले तरीही स्त्री पात्रांचा विचार करता त्यांची जमवाजमव करणं, हा जरासा जाणवण्याजोगा प्रॉब्लेम असे ... पण आमच्या सुदैवाने काही मुली आणि काही संसार करत असलेल्या महिला सुद्धा उत्साहाने या गोष्टीसाठी तयार होत असल्यामुळे वार्षिकोत्सवात खूप एकांकिका व नाटके उभी राहिलेली आहेत व उत्तम प्रकारे पारही पडलेली आहेत ...
सोसायटीच्या सर्वच वार्षिकोत्सवांचं आयोजन सोसायटीचीच उत्कर्ष मंडळ नावाची संस्था करत असे ... एकूण सगळाच मामला मध्यमवर्गीयांचा असल्यामुळे असल्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी संस्थेकडे फंड्स तसे बेताचेच असत ... पण तरीही संस्थेतल्या कार्यकर्त्यांची आणि कलाकारांची सुद्धा कार्यक्रम करण्याची आग मोठी असल्यामुळे काही ना काहीतरी जुगाड करून आर्थिक दृष्ट्या तोंडमिळवणी केली जायचीच ... त्यामुळे नाटकांसाठी लागणारी प्रॉपर्टीच काय, पण कपडे सुद्धा अनेकदा अनेक सभासदांकडे मागितले जात व आपुलकीने सभासदांकडूनही अशा गोष्टी पुरवल्या जायच्याच ... काही वेळा सोसायटीतल्या काही महिला 'आपल्या सोसायटीत आपल्या लोकांचं नाटक होतंय,' या एका उत्साही विचाराने तालमीच्या वेळी कलाकार मंडळींना चिवडा, फरसाण, चकल्या, उपमा किंवा तत्सम इतर खाऊ स्वतःहून आणून देत असत ... स्टेजच्या अगदी बाजूच्या इमारतीतले तळमजल्यावरचे सभासद तर कुठल्याही प्रकारच्या मदतीसाठी सज्ज असायचे आणि विशेषतः नाटकी मंडळी मेकअप पासून ते कपडे बदलण्यापर्यंतच्या अनेक कामांसाठी त्या दोनचार बिऱ्हाडांत अक्षरशः हक्क गाजवायची ... खरंतर राणे डेकोरेटर्स आणि नंतर वास्तुशोभा नावाच्या खाजगी कंत्राटदाराकडून माईक्स व ध्वनियंत्रणा पुरवणे स्टेज बांधणे ही कामे करवून घेतली जात असत, पण भरीला उत्कर्ष मंडळातले सभासदसुद्धा एवढे उत्साही आणि कामसू असत की ते अगदी 'कमी तेथे आम्ही,' या भावनेने स्टेजचे बांबू बांधण्याच्या कामातही हातभार लावत असत ... आम्ही नाटकी मंडळीसुद्धा अनेकदा यात सहभाग घ्यायचो ... नाटकाच्या सेटमधले फ्लॅट्स लावण्याच्या कामाला हातभार लावणं, हे तर अगदी नित्याचं होतं ... याशिवाय भाड्याचे कपडे व इतर अनुषंगिक गोष्टी आणण्यासाठी, उत्कर्ष मंडळाचा प्राण असलेला आमचा किरण एवढी मेहेनत करायचा की; नाटक्यांपैकी कोणालातरी पिलियनवर बसवून तो अगदी दादरपर्यंत स्कुटर दामटवून योग्य ते कपडे, ड्रेपरी, इत्यादी आम्हाला मिळवून देत असे ...
नाही म्हटलं तरी सोसायटीतल्या नाटकांच्या आठवणी आहेत तरी किती ? ... अगदी तालमींच्याच आठवणी कितीतरी आहेत ... माझ्या आठवणीत; माझ्या मोठ्या भावाप्रमाणेच आणखीही तिघेचौघे अगदी पुढाकार घेऊन दिग्दर्शन करून नाटके बसवणारे होते ... आमच्या कै.भालचंद्र उर्फ चंदू जोशी यांच्या उत्साहपूर्ण पुढाकाराने सोसायटीत अगदी 'संशयकल्लोळ,' 'सुवर्णतुला,' ही पूर्ण लांबीची संगीत नाटकं सुद्धा झालेली आहेत ... मी अर्थात तबलासाथीसाठी होतोच ... श्री.मुकुंद जोशी याच्या दिग्दर्शनाखाली दोनतीन सुंदर फार्स सुद्धा झालेत ... तर ग्रामीण बोलीची आणि लोकनाट्याची खास आवड म्हणून बंधू श्री.मिलिंद सोमण दिग्दर्शित 'मी लाडाची मैना तुमची,' 'विच्छा माझी पुरी करा,' 'गाढवाचं लग्न,' अशी; अक्षी फर्मास लोकनाट्यसुद्धा सोसायटीत रंगलेली आहेत ... त्यासाठी माझ्या घरात नसलेल्या तुणतुणं आणि ढोलकी या वाद्यांची खरेदी सुद्धा झालेली आहे ... या निमित्ताने आमचे बंधू श्री.अनिल मोडक व मी अशी आम्हा दोघांची ढोलकी जुगलबंदी; अगदी प्रेक्षकांतून ताल धरला जाईपर्यंत आणि शिट्ट्या येईपर्यंत सोसायटीत भन्नाट रंगलेली आहे ... मालवणी बोलीतलं 'वस्त्रहरण' सारखं नाटक स्टेजवर अगदी धुमशान घालत सादर झालेलं आहे एवढंच काय तर श्री.माधव परचुरे दिग्दर्शित पूर्ण लांबीचं आणि, वैशिष्ट्य म्हणजे, पुरुषपात्रविरहित नाटक 'पद्मश्री धुंडिराज' सुद्धा इथे सुयोग्यरीत्या सादर झालेलं आहे ... ही फक्त वानगीदाखल उदाहरणं मी दिलीयत कारण हा काही वार्षिकोत्सवांचा किंवा नाटकांचा पूर्ण इतिहास नाहीये … या आहेत फक्त काही आठवणी ...
आता ही नाटकं म्हणजे फक्त खूप हौशी मंडळींचा कलाकंडू असल्यामुळे विशेषतः तालमींमध्ये अनेकदा झकासपैकी वादविवाद रंगत असत ... यातले बहुसंख्य वादविवाद तालमींना उशिरा आल्यामुळे वा तालमींना दांड्या मारल्यामुळे होत असत ... शिवाय संवादांच्या पाठांतरामध्ये खूप जास्त चालढकल केल्यामुळे आणि 'आयत्यावेळी मी मारून नेतो की नाही ते बघ,' अशांसारख्या संतापजनक वाक्यांमुळे हे वादविवाद खूप वेळा एकदम जोरदारसुद्धा व्हायचे; पण तरीही कुठेतरी; स्टेजवर आपल्याला नाटक छानपैकी सादर करायचे आहे, या विचाराने ते अगदीच विकोपाला न जाता मिटायचे सुद्धा ...
सगळी मंडळी हौशीच असल्यामुळे चुकांचा तर सुकाळच असायचा ... तालमीत चुका झाल्या की न आवरता येण्याजोगा हास्यकल्लोळ व्हायचा ... लोकनाट्यात चुकून समोरच्या पात्राला 'प्रधानजी' म्हणण्याऐवजी 'सरदारजी' म्हटल्याचं आणि त्यामुळे जोरदार हंशा झाल्याचं या क्षणीही आठवतंय ... तालमींमध्ये भले हे चालून गेलं तरी प्रत्यक्ष रंगमंचावर होणाऱ्या चुकांचं काय ? अशावेळी पात्रांना कितीही हसू आलं तरी ते दिसू न देता आवरण्याची मेहेनत करावी लागायची ... उदाहरण म्हणून अशा काही चुका आत्ता प्रकर्षाने आठवतायत ... संगीत नाटकात नारदाचं काम करणाऱ्या नटाने 'कृष्णा, खूप उशीर झाला, तेव्हा आता मी निघतो,' हा संवाद म्हणतांना ऐटीत मनगटावरच्या नसलेल्या घड्याळाकडे पाहिल्याचं आठवतंय ... वधू म्हणून दाखवायला आणल्या जाणाऱ्या मुलीचा फोटो पाहतांना; अर्ध्या मिनिटात तो फोटो प्रेक्षकांकडे करून त्याच्या मागच्या बाजूला लिहिलेले संवाद वाचून म्हणणारा नट सुद्धा मला आठवतोय ... एका नटाने मुव्हमेंट्स करतांना त्याचा सोफ्याच्या मागे लपलेल्या प्रॉम्प्टरला चुकून पाय लागल्यामुळे त्याने स्टेजवर अभावितपणे चक्क 'सॉरी' म्हणून प्रॉम्प्टरला नमस्कार केला होता; हेही स्मरणात आहे ... चटकन आठवणाऱ्या या काही आठवणी ... असे प्रसंग अजूनही बरेच असतील ... संवाद बऱ्यापैकी मागेपुढे करून प्रॉम्प्टरला व अनेकदा सोबतच्या पात्रांनाही बुचकळ्यात टाकणारे प्रकार तर बरेच आहेत; पण दैवकृपेने प्रत्येकवेळेस कोणत्या तरी पात्राच्या उत्तम प्रसंगावधानामुळे प्रेक्षकांना फारसं काही न कळता नाटक योग्य संवादांवर आलेलंही आहे ... नाटक थोडंफार बरंवाईट कसंही झालं तरीही अगदीच फजिती होण्याचा प्रसंग माझ्या आठवणीत तरी एकही नाहीये ...
ज्या आठवणी मी जागवल्या आहेत तो काळ साधारणतः १९७९-८० ते साधारण १९९९-२००० हा
आहे ... अगदी या माझ्या काळानंतरही काही तरुण मित्रांनी तीनचार सुंदर नाटकं वार्षिकोत्सवांमध्ये केली ... सुरुवातीच्या काळामध्ये काही वेळा बाहेरच्या दिग्दर्शकाची मदत घेतली गेली तर नंतरच्या काळातल्या काही मोजक्या नाटकांसाठी त्या नाटकांच्या व्हिडियो कॅसेटची मदत घेऊन ती नाटकं सादर केली गेली ...
काळ पुढे सरकला ... दरम्यान २४ तास केबल टीव्ही सुरु झाला ... पाठोपाठ बऱ्याच गृहिणींना व काही गृहस्थांनाही अडकवून ठेवणारा मालिका नावाचा उच्छाद सुरु झाला व हळूहळू वार्षिकोत्सवातली जिवंत करमणुकीची गंमत बऱ्यापैकी कमी होऊ लागली ... एकीकडे 'कृपया प्रेक्षकांनी कार्यक्रम पाहण्यासाठी खाली मैदानात यावे,' छाप अनाऊन्समेंट करावी लागत होती; तर दुसरीकडे कार्यक्रम, नाटकं करणारी हौशी मंडळीही प्रौढ आणि काहीशी निरुत्साही होत होती ...
आता तर काळ शोलेतल्या धन्नोच्या टापांनी धावत धावत पुढे सरकलाय ... इंटरनेट, स्मार्टफोन्स अवतरलेत आणि जगभरातली वाट्टेल ती करमणूक वैयक्तिकरित्या उपभोगण्यासाठी बोटांच्या टोकावर आणून ठेवण्याची अद्भुत किमया विज्ञानाने केलीय ... साहजिकच हौशी मंडळींची जिवंत पण तरीही काहीशी सबस्टॅण्डर्ड कला विस्मरणात जाऊ लागलीय, नव्हे गेलीच आहे ... दॅट्स द वे इट इज ... अजूनही तीनेक दिवसांच्या रंगलेल्या वार्षिकोत्सवानंतरचे स्टेज उतरवले जाण्याचे प्रसंग आठवले; तरीही काळजात कालवाकालव होऊन मन अगदी विषण्ण होऊन जातं ... एकेका गोष्टींचा एकेक काळ असतो, हेच खरं ... असो ... कुणाला आवडो अथवा न आवडो, काळानुसार होत राहणारे बदल माणसाला मान्य करावेच लागतात ... अर्थातच ते तसे मीही केलेच आहेत; पण तरीही का कुणास ठाऊक डिसेंबर ते साधारणतः फेब्रुवारी या काळात वार्षिकोत्सवांच्या आणि नाटकांच्या आठवणींनी मन कातर व्हायचं ते होतंच ...
ये कंबख्त दिल है के मानताही नही ...
@प्रसन्न सोमण / ०२-१२-२०२३.