Friday, 29 April 2022

---- माय डियर उन्हाळा ----

 


---- माय डियर उन्हाळा ----

 

 

बँकेमधली काही कामं किंवा मार्केट मध्ये मारावी लागणारी  फेरी असेल तर मी नेहमीच सकाळी साडेअकरा-बाराच्या आसपास घराबाहेर पडतो ... तसा मी कायमस्वरूपी मुंबईकर असल्यामुळे मुंबईच्या उन्हात मी मस्त आणि मनसोक्त चालू फिरू शकतो ... तसं पाहिलं तर अगदी लहानपणापासूनच उन्हाळा हा माझा आवडता ऋतू ... निदान मुंबईचं ऊन तरी मला अजिबातच त्रासदायक वाटत नाही ... तसा घाम तर इथे कायमचाच सोबती; पण त्यासाठी दोन मोठ्ठे रुमाल किंवा नॅपकिन बाळगले की काम भागतं ... अगदी शालेय वयापासूनच; वार्षिक परीक्षा संपण्याच्या सुमाराचं - म्हणजे एप्रिल अखेरीचं आणि मग मे महिना आणि पुढे शाळा सुरु होईपर्यंतचं - ऊन हे तब्येतीसाठी अत्यंत पोषक असतं; हा विश्वास तेव्हा जो डोक्यात फिट्ट बसला आणि पटला तो आजही पक्का स्थिर आणि निष्ठावान आहे ... मध्ये रिझल्टच्या दिवसाच्या आगेमागे एखाददुसऱ्या दिवसाचं ऊन हे काहीसं त्रासदायक असलं तरीही तो त्रास मोजकाच आणि हंगामी असायचा ... मग पुढे कोडगेपणानंतर तर तो त्रास कायमचा खल्लासच झाला.

 

 

उन्हाळ्याची किंवा मे महिन्याची सुट्टी म्हणजे जवळपास मन मानेल तेवढं खेळणं, उंडारणं, अभ्यास या शब्दातला सुद्धा मनात आणणं, मित्रांबरोबर वाट्टेल तेवढा धुडगूस घालणं, वेळप्रसंगी मजबूत भांडणं करणं आणि मग भले दुसऱ्याला मारायला जमलं नाही तरी; कोणी जिभल्या काढत मला हाणायला आलाच तर चपळपणे पळून जाणं, अगदीच शरीर दमलं तर पत्ते, कॅरम वगैरेंचे डाव मांडणं; या सगळ्या गोष्टी अगदी काल घडल्या असल्यासारख्या डोळ्यांसमोर आहेत ...

 

 

या दिवसांत पूर्वी अजूनही एक छुपं आकर्षण होतं ... त्यावेळी माझी आई आणि मजल्यावरच्या काही इतर बायका घरामध्ये पापड, बटाट्याचा कीस, चिकवड्या, कुरडया, इत्यादी गोष्टी करत असत ... मला वाटतं आमच्या कॉलनीत अनेक इमारतींमध्ये आणि अनेक मजल्यांवर अशा गोष्टी होत असत ... भले या उद्योगांना त्या काळी लिज्जत हे नांव नसलं तरीही माझ्या मनामध्ये या गोष्टींची लज्जत फारच न्यारी होती ... कारण या गोष्टी गच्चीमध्ये वाळवणाला पडल्यानंतर त्यांना  कावळ्यांपासून वाचवण्यासाठी आवश्यक ती झेड सुरक्षा पुरवणं ही गोष्ट आमच्या खांद्यांवर असल्यामुळे ओलसर स्वरूपातल्या या गोष्टींचा घास आमच्या मुखी या सर्व बायकांना भरवावाच लागायचा ... ते डांगर आणि मग त्या लाट्या, तो ओला कीस, वाट्यांमधून मिळणारा तो चिकवड्यांचा ओला चीक, इत्यादींची चव केवळ अवर्णनीय ... मग राखण करतांना कावळ्यांना हाकलण्याच्या मिषानं गेल्यानंतर अर्धवट वाळलेल्या आणि अर्धवट ओल्या दोनतीन चिकवड्या तोंडात सरकवणं ही जस्ट एक मुखशुद्धी, एवढंच ... खरंतर तयार होऊन गेल्यानंतर या गोष्टी पानात पडल्या तर त्यावेळी लागणाऱ्या चवीपेक्षा सुद्धा; निर्मिती प्रक्रियेतल्या या गोष्टींची चटक इतकी खास आणि विलक्षण होती की त्याची तुलना फक्त कॉलनीच्या वार्षिकोत्सवात बसवण्याच्या प्रक्रियेत असलेल्या - म्हणजे तालमीतल्या - नाटकाशीच करता येईल, असं माझं तरी म्हणणं आहे

 

 

चिक्कार वर्षांनी अगदी परवाच कॉलनीतून बाहेर पडतांना मी शेजारच्या पाण्याच्या टाकीवर घातलेलं चिकवड्यांचं वाळवण बघितलं ... मुळात सर्वात प्रथम माझं त्या चिकवड्यांच्या वाळवणाकडे लक्ष गेलं, तेव्हा मला जुन्या स्मृतींनी एकदम भरून आलं ... शन्नांची लाडकी उपमा द्यायची तर घशात आवंढा दाटून आला ... मग नंतर मी आणखी एकेक गोष्टी नजरेनं टिपत गेलो ... त्या लग्नाच्या रुखवतासाठी वगैरे करतात तशा रंगीबेरंगी चिकवड्या होत्या ... संख्येनं जेमतेम पंचवीसतीस चिकवड्या असतील, पण आश्चर्य म्हणजे त्या पूर्ण उघड्या, म्हणजे साडीचं वगैरे झाकण घातलेल्या, अशा होत्या आणि राखणीला आजूबाजूला कोणीही नव्हतं ... त्याहून आश्चर्य म्हणजे, तरीही त्यावर चोच मारायला कोणी कावळाही आजूबाजूला नव्हता ... आजकाल कावळे सुद्धा व्रतस्थ झालेत की काय कोण जाणे ! ... ही इतकी तोकडी सुरक्षा व्यवस्था पाहिल्यानंतर, एकदम शाळकरी मुलगा होऊन डल्ला मारून दोनतीन चिकवड्या तोंडात सरकवाव्यात, असा मला सारखा मोह होत होता ... मात्र तो आवरण्याचं महामुश्कील काम मला करता आलं; हे त्या चिकवड्यांच्या मालकीण बाईंचं सुदैव ...

 

 

आजकाल जुन्या गाजलेल्या व्यक्तिरेखा, प्रसंग कलाकृती घेऊन त्यावर हिरकणी, पावनखिंड, चंद्रमुखी सारखे छान भव्यदिव्य चित्रपट येतायत ... त्यामुळे पापड, चिकवड्या, कुरडया, बटाट्याचा कीस, अशांसारख्या गोष्टी अनेक बायकांनी एकत्र येऊन बनवण्यातली आणि नंतर त्यांची वाळवणं पोराटोरांनी राखण्यातली अफलातून कला मोठ्या पडद्यावर साकार होईल, व्हावी, अशी उमेद मी बाळगून आहे ... हवं तर केस काळे वगैरे करून राखणीसाठी आवश्यक ती पोरे व्हायला मी आणि माझ्या कॉलनीतले सगळे बाप्ये आनंदाने तयार होतील ... सर्वश्री ओक, मांडलेकर, इत्यादी प्रभृती इकडे लक्ष घालतील काय ?      

 

 

मुद्दा काय तर; उन्हाळा या ऋतूची जी काही माझ्या मनात आवड उत्पन्न झाली ती अगदी पार त्या वयापासूनची आहे. या आवडीमध्ये; जरा उशिरा आणि खिशाला जरा परवडल्यानंतर मुखामध्ये जाणाऱ्या आंब्यांचा सुद्धा आपला एक वाटा - आणि बाठा सुद्धा - आहे.

 

 

शालेय वयाच्या नंतर पुढे नोकरीला लागल्यावर आणि आऊटडोअर पद्धतीचं काम करायला लागल्यानंतर उन्हामध्ये फिरणं हे ओघाने आलंच ... अशा वेळी काही कलिग्ज टोपी, गॉगल वापरायचे ... ते मला कधी जमलं किंवा पटलं नाही; त्यामुळे तेही मी कधी केलं नाही ... माझ्या लहानपणी माझी शाळेची सुट्टी आणि जरा नंतर माझ्या मोठेपणी माझ्या मुलांच्या शाळेची सुट्टी बघून ट्रीपच्या वगैरे निमित्ताने जे काही मोजके दिवस थोडंबहुत फिरणं झालं तेही उन्हाळ्यातच ... कारण दिवाळीची सुट्टी कायम मुंबईतच आणि आमच्या कॉलनीतच घालवायची हीच माझ्या बाबांची आणि पुढे माझीही इच्छा असायची ... बरं, ट्रीपच्या निमित्ताने फिरणं व्हायचं तेही कोकणात किंवा फारतर पुणे-सातारा-कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्राच्या टापूत; त्यामुळे याच्या पूर्व बाजूच्या महाराष्ट्रात अगदी सनस्ट्रोक होऊ शकेल इतका कडक उन्हाळा असतो, वगैरे ऐकून किंवा पेपरमध्ये वाचून माहिती ... तसं नाही म्हणायला एकदा पुष्कळ नंतर - तीनचार दिवसांसाठीच पण - अगदी मे महिन्यात मित्रांसोबत ताडोबालाही जाऊन आलो ... त्या दरम्यान येतांना एक दिवस नागपूरला सुद्धा होतो; पण तेव्हाही ऐन उन्हाच्या कडाक्यात चाललो वगैरे नसल्यामुळे तसा काही फारसा त्रास जाणवला नाही बुवा ! ... त्यामुळे अनुभवातच मार खाल्ल्यावर काय बोलणार आणि काय लिहिणार ?

 

 

एकूणच काय, तर पावसाळ्यात किंवा थंडीत मला सर्दट प्रकृतीमुळे जो त्रास होतो तो उन्हाळ्यात मुळीच होत नाही ... त्यातून आजकाल काळ बदलल्यामुळे आणि माझ्या खिशाला पूर्वीच्या तुलनेत काहीसे बरे दिवस आल्यामुळेही; जनरली बाहेर फिरतांना वाहन आणि मुक्कामाचं ठिकाण अर्थात हॉटेल, हे एसी असतंच ... शिवाय उन्हाळ्यात दिवस मोठा असल्यामुळे साईट सीईंग करतांना तीही एक जमेची बाजू असते त्यामुळे ट्रीप्स वगैरेसाठी माझा वैयक्तिक प्राधान्यक्रम, हा नेहमीच उन्हाळा असतो.

 

 

आता मला उन्हाळा आवडतो म्हटल्यानंतर अगदीच नैसर्गिक आणि साधीसोप्पी गोष्ट ही आहे की, विरुद्ध पार्टीला - म्हणजे सौ.ला - उन्हाळा अजिबातच आवडत नाही, हे ओघानं आलंच ...

 

 

आता उन्हाळ्याच्या प्रेमामध्ये न्हाऊन निघालेल्या विषयाचा ट्रॅक जरा, ट्रीप्स अर्थात फिरणं या गोष्टीकडे वळवतो ... निवृत्तीनंतर भरपूर फिरणं आणि - देशोदेशी फिरणं तितकंसं शक्य नाही झालं; तरी - आपला भारत तरी शक्य तेवढा फिरणं, ही गोष्ट अनेकांसाठी जिव्हाळ्याची असते ... खरं म्हणजे तशीच ती पूर्वी माझ्यासाठीही जिव्हाळ्याची होती; पण ... नंतर मग त्यामध्ये इतर अनेकानेक धोके दिसायला लागले ... वेगवेगळ्या आवडीनिवडी आणि प्रेफरन्सेस शिरायला लागले की असंख्य मतभेदांचा धुरळा तेवढा उडतो, असं लक्षात यायला लागलं ...

 

 

आता हा विषय भले वेगळा असला तरीही त्याचे धागेदोरे उन्हाळ्याशी किंवा उन्हाशी जुळतात ... बऱ्याच जणांना ट्रीप्स किंवा फिरण्यासाठी उन्हाळा अजिबात नकोच असतो ... थंडीचा सिझन बेस्ट, असा त्यांचा निर्वाळा असतो आणि तरीही साईट सीईंग करत फिरण्याची वेळ ही, ऊन डोक्यावर असतांनाची नसते - काहीवेळा गर्भित कारण दुपारची वामकुक्षी फारच अत्यावश्यक वाटत असते, हेही असतंच - मग असं म्हणता म्हणता साधारणपणे सकाळी साडेनऊदहा ते संध्याकाळी पाचसाडेपाच ही वेळ फिरण्यासाठी संपूर्णपणे बाद केली जाते ... गंमत म्हणजे ट्रिप्स साठी बेस्ट असलेल्या थंडीच्या सीझनमध्ये दिवस लहान असतो, हे सहजगत्या विसरलं जातं ... मग पावणेसहा-सहाच्या दरम्यान बाहेर हळूहळू मजबूत अंधार पडत ती बाहेरची 'बेस्ट' थंडी पडायला लागली की; मुंबईच्या - रात्री सुद्धा असणाऱ्या उजेडाला आणि - हवेला इम्युन असलेला जीव जरासा धास्तावायला लागतो ... शेवटी साईट सीईंग संपवून मुक्कामाचं हॉटेल गाठणं आवश्यकच होतं ...

 

 

अर्थात याला अनेक सन्माननीय अपवाद असतीलच हे अगदीच मान्य ... त्यामुळे मी त्या चौकट राजातल्या दिलीप प्रभावळकरांप्रमाणे 'मी असा कसा, वेगळा वेगळा' गाणं म्हणत बसतो, झालं

 

 

मात्र आजकाल हे असले वात्रट मुद्दे मांडून निमंत्रण दिल्यासारखा वाद ओढवून आणणं, मला फारच गैरसोयीचं वाटायला लागल्यामुळे; मी 'मोठी ट्रीप' या विषयामध्ये गोगलगायीप्रमाणे शरीर आक्रसून टाकून माझ्याच पाठीवरच्या शंखात लुप्त होतो ... शिवाय माझ्यापुरतं सांगायचं तर; ट्रीपच्या उत्साहाने माझ्या शरीराला दिलेली अदृश्य किल्ली फारतर आठनऊ दिवसांत संपते आणि मला रिचार्ज होण्यासाठी माझं मुंबईतलं घर आवश्यक वाटायला लागतं ... थोडक्यात मी होमसिक होतो

 

 

मुंबईला एकदा मित्रांच्या घोळक्यात गप्पा ठोकत असतांना एक कोकणप्रेमी मित्र कोकणच्या खाड्यांचं, किनाऱ्यांचं, देवस्थानांचं रसभरीत वर्णन करत होता; तेव्हा प्लेन चेहऱ्यानं दुसरा एक मित्र म्हणाला - "मेल्या कोकणात जाऊन खाड्या, समुद्र नि देवळंच बघायची ना ? या गोष्टी आपल्या मुंबईत नाहीत ? खुळ्यासारखे हज्जारो रूपडे खर्चून तुम्ही आपले जाता नि येता ... निष्पन्न काय ?"

 

 

हे बोलणं तेव्हा तरी मला प्रचंड अरसिकपणाचं वाटलं होतं खरं, पण आता ? ... कुठेतरी त्यात थोडाफार तथ्यांश असेलही असं वाटतं, हे खरंय ...

 

 

कोणे एके काळी मला शिवाजी महाराजांचे सगळे किल्ले चढून जाऊन बघायची इच्छा होती ... प्रत्यक्षात त्या काळी ज्या ज्या किल्ल्यांवर गाडी जात होती, ते किल्ले गाडीनं जाऊन बघितले सुद्धा ... मात्र बाकीचे किल्ले गो.नि.दां.च्या पुस्तकाची पारायणं करून त्या पुस्तकांमार्फत कागदोपत्री पाठ करून टाकले; आणि त्यामुळे आता मी ते बघितलेत, असं समजून चालतोय ... तरी त्या काळी फक्त पुस्तकांचाच सहारा होता; आज तर इंटरनेट मार्फत जग इतकं झक्कास वेगवान झालंय की घरामध्ये एसीमध्ये बसून जगामधलं कुठलंही ठिकाण मस्त तंत्रामध्ये बघायला मिळतंय ... उद्या कदाचित सेम अनुभूती प्राप्त करून घेणारा स्वतःचाच रोबोट बनवून ही सगळी ठिकाणं बघून येण्यासाठी पाठवून देता येईल, इतपत प्रगती होईलही ... कुणी सांगावं ?

 

 

असो ... माझ्या उपरण्याला उन्हाळा प्रशस्तीची घट्ट गांठ बांधून सुरुवात केली खरी; पण ती केव्हा सुटली आणि उपरणं भरकटत भरकटत ट्रिप्सच्या फांदीवर येऊन कधी विसावलं कळलंच नाही; तेव्हा आता थांबतोच ...

 

 

@प्रसन्न सोमण

२८/०४/२०२२.


प्रसिद्धी - अभूतपूर्व (जून २०२४)