---- बँक व्यवहारांची मज्जा ---
साधारणतः अशा प्रकारची टायटल्स बहुदा शंकर पाटलांच्या कथेची असायची; आणि मग बंडुआबा, रखमात्त्या, खंडुबा, असल्या काहीशा नावांची पात्रं त्या देशावरच्या किंवा घाटावरच्या कथेत यायची आणि एकूण वाचकाची मस्त, धमाल करमणूक व्हायची .... पण कोणी सांगावं, कदाचित त्याहीपेक्षा जास्त करमणूक मी करू शकेन की काय, अशी मोठ्ठी शंका मला येत्येय.
हल्ली हल्ली मी नक्की मुंबईकरच आहे ना, आणि २०२२ सालच्या मुंबईत मी खरंच यशस्वीरित्या (?) जगतोय ना; अशी जबरदस्त शंका मला यायला लागलीय ... कारण नजर आणि मन उठसूट मागे मागे जायला लागलंय. आज माझ्या अज्ञानाचा प्रचंड मोठ्ठा महासागर मला फारच जाणवायला लागलाय आणि नाकातोंडात पाणी जाण्यासारखी परिस्थिती आहे खरी ! ... काही आप्तस्वकीय आणि काही हितचिंतकांमुळे मी कसाबसा तरतोय एवढंच ... आता याच भावनेतून, हळूहळू सुचेल तसं काही काही स्वरूपाचं माझं अज्ञान समोर ठेवावं, असं वाटतंय ... बहुसंख्य जण खोखो हसतील हे खरंच; पण मोजक्या काही जणांना चुकून सहवेदना जाणवेल सुद्धा ...
आयुष्यात नुसते पैसे कमावून भागत नाही तर त्याची पुढे काहीतरी व्यवस्था लावावी लागते ... म्हणजे एकतर ते पूर्ण खर्च करून संपवावे लागतात, नाहीतर चुकून उरलेच तर कुठेतरी साठवावे लागतात; हे मुळात प्रथम नोकरीला लागल्यावरच मला कळलं ... पण तेही अगदी सुरुवातीला नाहीच, कारण त्याचा सगळा विचार करायला बाबा समर्थ होते. मुंबई म्युन्सिपाल्टीत १९८२ मध्ये नोकरीला लागल्यावर पहिल्या वट्ट ६८२/- रुपये पगारातले, माझ्या खर्चाला लागणारे पैसे सोडून, उरलेले पैसे मी, माझे म्हणून, बाबांकडे ठेवायला दिले आणि मोकळा झालो ... बाय द वे, तेव्हा आमचा पगार आम्हाला रोख स्वरूपात आमचे कॅशियर (तेव्हा बहुदा वीस पैशांचा असलेला रेव्हेन्यू स्टॅम्प आमच्याकडून घेऊन) द्यायचे ... त्यामुळे माझं बँकेत खातं वगैरे असण्याचा प्रश्नच नव्हता ... पण तोवर माझा थोरला भाऊ सुद्धा बँकेत नोकरीला लागलेला होता; त्यामुळे बाबांनी त्याला आणि मला सांगून त्याच्या बँकेत माझं पहिलं खातं उघडून घेतलं व माझे पैसे त्यात जमाही करून घेतले ... इथवरही माझा त्या बँकेशी काहीही संबंध आलेला नव्हता; फक्त सुरुवातीला दादानी, 'इथे इथे बस रे काऊ' करत दाखवलेल्या ठिकाणी माझ्या सह्या तेवढ्या मी केल्या. मग दादानी पासबुक, चेकबुक आणि स्लिपबुक नामक एक कागदांचा जुडगा मला देऊन ते सगळं सांभाळून ठेवायला सांगितलं होतं आणि तेवढंच मी इमानाने केलं होतं ... तीन वर्षांनी, १९८५ मध्ये कधीतरी, आम्हाला बँकेत खातं उघडायला सांगून त्याचे डिटेल्स ऑफिसात द्यायला सांगितले कारण पगार खात्यात जमा होऊ लागणार होता ... माझी 'दादा' नावाची बँक होतीच; त्यामुळे काहीही अडचण मला पडली नव्हती; फक्त पैसे नेऊन बँकेत भरण्याचं त्याचंच काम कमी होऊन माझ्या सांगण्यानुसार तो मला आपले पैसे काढून आणून द्यायचा ... त्यामुळे तो ज्या ज्या ब्रँचमध्ये फिरला त्या त्या ब्रँचमध्ये माझी खाती झाली, पण मला काय त्याचे ? ... फक्त पासबुकं, स्लिपबुकं आणि चेकबुकं मी नीट ठेवत होतो एवढंच ... पुढे एकदम बऱ्याच नंतर दादानी निवृत्त होण्यापूर्वी ती त्याच्या बॅंकांमधली माझी खाती बंद करवून घेतली; पण ते खूपच पुढचं ... त्या आधी १९८८ मध्ये मी संसारात पडून वेगळ्या ठिकाणी राहायला गेलो आणि चांगलीच आफत आली; कारण दादाची रोज किंवा हुकमी भेट होईनाशी झाली ... शिवाय 'माझी बँकांची कामं मलाच केली पाहिजेत,' ही समज मला आली ... नाईलाज आहे, संसारात पडल्यावर आपली कामं आपल्याला कळायला लागतातच; त्याला कोण काय करणार ?
मग माझ्या घराजवळच्या एका बँकेत माझं मीच स्मार्टली खातं उघडलं ... कधीमधी स्लिपबुक नीट भरून थोडीफार कॅश किंवा चेक खात्यात भरायला शिकलो; आणि विथड्रॉव्हल स्लिप भरून पैसे काढायलाही झक मारत शिकलोच ... या सगळ्या शिक्षणात दादाचा मला मोठाच आधार होता ... काळ पुढे पुढे जातच होता ... माझं घरही एकदोन वेळा बदलून झालं होतं ... त्या त्या काळाच्या गरजेनुसार बँकांची ती ती कामं अर्थात माझी मीच केलीही ... दरम्यान बँकांमध्ये कॉम्प्युटर, प्रिंटर ही यंत्र येत होती; नव्हे आलीच ती ... त्यामुळे आताशा वेड्यावाकड्या अक्षरातल्या खरडलेल्या पासबुकाच्या तुलनेत प्रिंटरवर प्रिंट होऊन आलेली पासबुकं - बँकेची प्रिंटरमधली शाई स्पष्ट असेल तर - बरी दिसत होती ... अर्थात जोवर स्लिपा वगैरे भरायला माझ्या खिशाला लटकलेलं माझं कारकुनी पेन (आणि प्रेमही) सलामत होतं, आणि कामं करून द्यायला खिडकीपलीकडे 'माणूस' होता; तोवर तसं काही फार बिघडत नव्हतं.
मात्र पुढे पुढे ह्या कॉम्प्युटरचा बऱ्यापैकी त्रास व्हायला लागला आणि आमच्या म्युन्सिपाल्टीत सुद्धा त्याचा शिरकाव झाला ... एकूणच मला संगीत, वाचन, नाटक-सिनेमा, इत्यादीचं प्रेम असल्यामुळे तेवढ्यापुरता ऑडियो-व्हिडियोचा आणि मराठी टायपिंगचा वापर तेवढा मी शिकून घेतला होता; त्यामुळे उगाचच मी हुशार आहे आणि मला कॉम्प्युटर येतो (म्हणजे काय ?) असला काहीतरी भयानक गैरसमज माझ्या म्युनिसिपल मित्रांच्यात पसरला होता.
काळ अजून अजून पुढे सरकतच होता आणि तांत्रिक प्रगतीमध्ये म्युन्सिपाल्टीपेक्षा बँका पुढे असल्यामुळे बँकांमध्ये येऊन चुकलेल्या कॉम्प्युटर्सच्या पाठोपाठ आता हळूहळू बँकांच्या बाहेर एटीएम मशीन्स बसायला लागली आणि मग एटीएम कार्ड्स उर्फ डेबिट कार्ड्स घेतली गेली किंवा घ्यावी लागली ... तरीही माझं विथड्रॉव्हल बराच काळ पूर्वीप्रमाणेच चालू होतं ... कारण ? ... एटीएम आलं, स्मार्टफोन्स आले, नेटबँकिंग सुद्धा आलं; पण अरे; या सगळ्याचा नीटनेटका वापर शिकवणार कोण ?
इथे सगळ्यात पहिला आडवा आला तो घाबरट न्यूनगंडवाला स्वभाव ... त्यातून आमचं नशीब सुद्धा असं नंबरी; की कसले तरी वेडेवाकडे घाबरवणारे अनुभव नेमके आमच्याच वाट्याला यायचे ... हळूहळू ते पुढे येतंच आहे ...
तर सांगायची गोष्ट ही की, एटीएम
कार्ड घेतलं तरीही माझं बँकेत जाऊन विथड्रॉव्हल चालूच होतं; पण पुढे कधीतरी दादानी
मला सांगितलं की हळूहळू बँकेतून पैसे काढून देणं बंदच होणार आहे, तेव्हा तू एटीएमचा
वापर शिकून घे ... 'आलिया भोगासी,' म्हणत; एटीएमचा वापर कसा करायचा हे थोडं बायकोकडून,
थोडं मुलाकडून, थोडं इतर हितचिंतकांकडून; शिकून घेऊन काहीसा भयभीत मनःस्थितीत, मी मेहुण
बोलावल्यासारखा त्या अजस्त्र भीतीदायक मशिनपुढे सहकुटुंब उभा राहिलो ... रामनाम म्हणत
सांभाळलेलं कार्ड त्या कुठल्याशा फटीत घातलं ... या गडबडीत पाठ केलेला पिन नंबर विसरू
नये, याची महत्प्रयासाने काळजी करीत समोर दिसणाऱ्या सूचना कसाबसा पाळत गेलो ... शेवटी
एका फटीतून नोटा बाहेर आल्यावर त्या, दक्षिणा घेतल्यासारख्या, पटकन हस्तगत केल्या व
फटीतलं कार्ड सुद्धा पटकन काढून घेतलं ... नंतर बाहेर आलेला रिसीटचा चतकोरही घेतला
आणि खऱ्या अर्थाने सुस्कारा सोडला. स्मार्ट फोनवर मेसेज सुद्धा आला आणि मग हे मशीन
प्रकरण सुद्धा आपल्याला जमतंय बुवा; असा थोडासा आत्मविश्वास जमा झाला ... पण नाहीच;
कारण नंतर अगदी थोड्याच दिवसांत बायकोबरोबर तिच्या विथड्रॉव्हल साठी वेगळ्या ठिकाणी
गेलो आणि बघतो तो काय; हे मशीन काहीतरी भन्नाट निराळंच होतं ... त्यावरच तिने तिचे
पैसे काढले तरीही माझा जमा झालेला थोडासा आत्मविश्वास ढळला तो ढळलाच .... अरे, ठिकठिकाणची
सगळीच्या सगळी मशिन्स आयडेंटिकल एकसारखीच ठेवायला कसली अडचण होती ? ... माणसाने नवनवीन
शिक्षण तरी किती काळ चालू ठेवायचं ?
नंतरही कधीतरी एका वेगळ्याच
मशीनवर 'हे मशीन कसं आहे बघुया तर खरं,' असा विचार करत धाडस करून मी त्या वेगळ्याच
मशीनसमोर गेलो ... लिहिलेल्या ठिकाणी नीट वाचून कार्ड घातलं, तर माझं कार्डच त्या मशीनच्या
पोटात गडप झालं ... मोठ्ठ्या मुश्किलीने मी माझं धक्का येऊ पाहणारं हृदय सांभाळून धरलं
आणि जीव मुठीत धरून स्क्रीनवरच्या सूचना पाळत गेलो ... पुढे यशस्वीपणे नोटा, रिसीट
सगळं बाहेर आलं खरं; पण 'माझ्या कार्डाचं काय,' असा विचार मनात येतो न येतो तोच खटकन
आवाज होऊन तिथूनच कार्डही बाहेर आलं ... हुश्श ! ... सुटलो खरा; पण 'हे कार्ड गिळणारं
मशीन आपल्याला नको रे बाबा,' म्हणत जो बाहेर आलो तो आजवर मी काही तिथे गेलेलो नाही.
कालपरत्वे थोड्याशा दिसण्याच्या
प्रॉब्लेममुळे मोबाईलचा छोटा साडेपाच-सहा इंची स्क्रीन मला बिलकुल झेपत नाही आणि मोबाईलवर
टायपिंग तर महाकठीण वाटतं; त्यामुळे मी डेस्कटॉपचा १५ इंची स्क्रीन आणि फुलसाईझ कीबोर्ड-माउसवर
जरा तरी शूर असतो, एवढंच ...
मुलाचा आधार घेऊन मी मोठ्या
कॉम्प्युटरवर नेट बँकिंग का शिकून घेतलं, त्याचीही एक स्टोरीच आहे ... सवयीनं कधीतरी
बँकेत पासबुक अपडेट करायला गेलो; तर "ते तुमचं तुम्हीच करून घ्या," असं सांगितलं
गेलं ... बघतो तर इथेही एक पुरुषभर उंचीचं छपाई मशीन आलं होतं ... कसंबसं त्या बँकेच्या
शिपायाच्या मदतीनं पासबुक छापून घेतलं खरं ... पण मनात म्हटलं; ही सारखी सारखी इतर
कोणाकडे तरी मदत का आणि किती मागायची ... बरं, प्रत्येक ठिकाणच्या मशिन्सचं वर्किंग
आणि ऑपरेशन्स निरनिराळी ! ... तेवढ्यात एका मित्रानी माहिती दिली की, "आता पासबुक
वगैरे बाळगायचं आणि छापायचंच नाही ! आत्ताच्या काळात माणसाने शक्य तेवढं पेपरलेस राहायचंय
त्यामुळे तू नेटबँकिंग शिकून घे म्हणजे या सगळ्या प्रिंटिंग वगैरे भानगडी संपतील"
... झालं ! एवढे दिवस फक्त ऐकूनच माहिती असलेली 'नेटबँकिंग' ही भानगड शिकणं आलं !
... मुलगा शिकवायला होताच ... आता थोडीफार तीही भानगड जमायला लागलीय ... अगदी अजिबात
प्रश्नच नाही की आपल्या कामाच्या बाबतीत खूपच सोय ही होतेच, पण मनाचा गोंधळ उडतो त्याचं
काय ? ... अजूनही खरंतर मला ह्या आयएफएससी कोड, ओटीपी, एनईएफटी, आरटीजीएस, इत्यादी
आद्याक्षरांच्या बाबतीत काडीचंही ज्ञान नाहीये; पण मुलानी शिकवलेलं जे काही आहे ते
मी, मलाच माहित असलेल्या विवक्षित ठिकाणी लिहून ठेवलंय आणि ज्ञान वगैरे, आपल्या डोक्यावरून
जाणाऱ्या गोष्टी, मिळवायचा प्रयत्न न करता; 'सांगितलंय तेवढं गुमान ऐकायचं आणि बसल्याजागी
आपला व्यवहार पदरात पाडून घ्यायचा,' एवढंच धोरण मी कसंबसं पाळत आलोय.
नंतर चारदोन वेळा मी माझ्या
पहिल्या यशस्वी मशिनमधून पैसे काढले खरे, पण त्याच मशीनच्या ठिकाणी एकदा जाऊन बघतो
तो, ते मशीनच बदललेलं दिसलं ... बदलण्याचं कारण काय होतं कोण जाणे ... या नवीन मशीनमध्ये
कार्ड खुपसण्याची फट दिसली, पण पैसे कुठून बाहेर येतील ते काही सापडेच ना ! कदाचित
जरा बारीक अक्षरात काही लिहिलेलं असेलही, पण मला त्यावेळी काही दिसलं नाही एवढं खरं
... तरीही मनाचा धडा करून मी त्या फटीत कार्ड खुपसलं ... देवदयेनं कार्ड गडप वगैरे
न होता ते मला दिसत होतं, ही मात्र समाधानाची बाब ... पुढच्या सूचना नीटपणे पार पाडल्या
आणि आता पैसे कुठून, कसे बाहेर यायचेत कोण जाणे, या चिंतेत जराशी वाट बघत बसलो ...
व्हायचे ते आवाज झाले आणि मग जाहिरातीत दाखवतात त्याप्रमाणे खटकन कुठलीशी खिडकी उघडली
आणि आत खोलवर माझ्या नोटा दिसल्या ... उतावीळपणे मी लगेच आत हात खुपसून त्या पटकन काढून
घेतल्या ... तेवढ्या निमिषार्धातही मनात, 'न जाणो, माझा हातही त्या राक्षसी मशीनमध्ये
अडकून बसला तर काय करायचं,' हा भयंकर विचार तरळून गेलाच ... पण तशातला काहीही चमत्कार
न घडता मला नोटा मिळाल्या, कार्ड मिळालं, रिसीट मिळाली आणि मोबाईलवर यशस्वीपणाचा मेसेजही
झळकला ... याबद्दल त्या दयाघनाचे आभार मानत मी बाहेर पडलो.
याच ठिकाणी हे मशीन बदललं जाण्यापूर्वीच्या
काळात माझ्या पूर्वीच्या यशस्वी मशीननेच मला दगा दिला होता; ही गंमत वेगळीच ... गंमत
म्हणतोय खरा, कारण आज ती गंमत वाटत्येय; पण त्यावेळी जो ताप व्हायचा तो झालाच ... झालं
होतं असं की जुन्या माहितीच्या मशीनवर मी बिनधासपणे पैसे काढत होतो ... दहा हजार रुपयांची
- माझ्यासाठी - तगडी रक्कम होती ... सगळं काही अगदी नीटपणे पार पडलं पण फक्त कुठूनही
पैसे बाहेर आलेच नाहीत ... तेवढ्यात मोबाईलवर पैसे यशस्वीपणे काढले जाऊन रक्कम वजा
झाल्याचा मेसेज आला आणि मग मात्र माझ्या काळजाने ठाव सोडला ... तरीही डोकं जमेल तेवढं
थंड ठेवून मी पहिलं माझं कार्ड ताब्यात घेतलं आणि मग बाहेर मदतीसाठी त्या रखवालदाराकडे
धावलो ... त्याने बाजूलाच ज्या बँकेचं मशीन होतं त्या बँकेत पाठवलं ... माझा हवालदिल
चेहरा बघून आणि आवाज ऐकून त्या बँकेच्या माणसाने एक रजिस्टर माझ्यापुढे ठेवून, वेळ
वगैरे टाकून मला तक्रार लिहायला सांगितली ... शिवाय खातं असलेल्या माझ्या बँकेतही जाऊन
तक्रार करायला सांगितली ... बँक बंद असायची त्यावेळी हे रजिस्टर त्या दुष्ट मशीनजवळच
ठेवलं जायचं म्हणे ! ... लगेच माझं खातं असलेल्या बँकेत जाऊन मी त्यांच्या, याच गोष्टीसाठी
प्रिंटेड असलेल्या, फॉर्मवर तक्रार नोंदवून आलो ... "काळजी करू नका साहेब ! एकदोन
दिवसांत तुमचे दहा हजार रुपये परत तुमच्या खात्यात जमा होतील," असं भरगोस आश्वासनही
मला त्या दयाळू बँकरने दिलं; आणि त्यानुसार खरंच दोन दिवसांत पैसे खात्यात जमा झालेही
... अरे, पण दोन रात्री माझी झोप हराम झाली, त्याची काय वाट !
आता नाईलाजाने मी या सगळ्याच
बाबतीत थोडा थोडा रूळलोय ... नाहीतरी भारत कॅशलेस करायचाय, हे ऐकतोच आहे ... पण वैयक्तिक
पातळीवर रिक्षावाल्यांकडे किंवा इतरही कुठे, आपल्याला सुट्ट्या पैशांचा प्रॉब्लेम फार
भेडसावतोय, शिवाय सुट्ट्या नाण्यांचा प्रश्न तर फारच गंभीर झालाय; पण ते स्कॅन का काय
ते करण्याचं विचित्र चौकटीतलं चित्र जिकडे तिकडे दिसतंय; हे पाहून हल्ली मी, ते स्कॅन
करायचं असतं ते, 'गुगल पे' शिकून घ्यायचा प्रयत्न चालवलाय ... शिकवायला बायको, मुलगा
आहेतच ... ठीक आहे, आयुष्यभर विद्यार्थी राहायचंच आहे, तर राहीनही; पण खरा एक छोटास्सा
प्रॉब्लेम वेगळाच आहे ... तांत्रिक प्रगती कितीही झाली तरीही आपल्या खात्यात आपले पैसे
शिल्लक असावेच लागतात, ही लय भारी मोठ्ठी अडचण आहे ...
तर ही आहे माझ्या बँक व्यवहारांची
मोठी मज्जा ...
@प्रसन्न सोमण.
०५/०३/२०२२.
प्रसिद्धी - अभूतपूर्व (मार्च २०२४)