Tuesday, 26 October 2021

--- दिवाळीची साफसफाई आणि मी ---

 

--- दिवाळीची साफसफाई आणि मी ---

 

 

खरं सांगू का ? लिखाण म्हणून काही लिहीत असतांना वैयक्तिक किंवा स्वकुटुंबाबद्दल लिहायचं म्हटलं तर, लिहिण्यासारखं खूप म्हणजे खूपच काही सापडत जाईल ... म्हणजे विषयांची कमतरता कधीच पडणार नाही; कारण नेहमीच स्वसमर्थन करत राहणं आणि दुसऱ्यांना दोष देत राहणं हे जवळपास प्रत्येकाचेच कम्पलसरी आणि लाडकेही विषय असतात ... पण त्यात प्रॉब्लेम एवढाच आहे की हे लिखाण वाचून आपलेच, घरचेच लोक नाराज होऊ शकतात आणि लिखाण इतर ठिकाणी शेअर केलं की लोकांना गृहच्छिद्र - म्हणजे घरातल्या कुरबुरी - दिसू शकतात; आणि कोणाला शेअरच करायचं नाही तर बोंबलायला लिहायचंच कशासाठी ? ...

 

 

या गृहच्छिद्र शब्दावरून आठवण झाली … पूर्वी बेताच्या परिस्थितीमुळे लोकं छिद्र, म्हणजे भोकं, असलेले गंजीफ्रॉक, लेंगे, चट्टेरीपट्टेरी चड्ड्या, यासारखे कपडे अगदी अतिरेक होईस्तोवर सर्रास वापरत असत ... बहुदा म्हणूनच; एकवेळ लोकांना ही कपड्यांवरची बाह्य छिद्र दिसली तर इलाज नाही; पण गृहच्छिद्र मात्र दिसू नयेत, हा एक संकेत आला असावा आणि कदाचित गृहच्छिद्र हा शब्दसुद्धा कपड्यांवरच्या छिद्रांवरून रूढ झाला असावा ... मात्र हल्ली असं काहीसं झालंय की खिशात चांगल्यापैकी छनछन पैसे खुळखुळायला लागल्यामुळे, आणि दर आठपंधरा दिवसांनी शॉप्पिंग नामक एक नामांकित छंद लागल्यामुळे, कपडे बहुसंख्य वेळा छिद्र वगैरे पडण्याच्या बराच काळ आधीच, त्यागले जातात ... ही एक चांगली सोय झालेली आहे ... पण ही सोय घरसंसाराच्या बाबतीत लागू पडू शकत नाही, ही फारच मोठी गैरसोय आहे ... कारण तसला काही विचार करायचा झाला तर डायरेक्ट भणंग, साधू वा गौतम बुद्ध, वगैरे व्हायला लागेल, ते झेपणं महाकठीण ...

 

 

हे इतके भारी विचार माझ्या डोक्यात यायला अगदी परवाच्या रविवारीच, माझ्यासाठी घातवार असल्यासारखं, एक अडचणीचं कारण घडलं; ते म्हणजे दिवाळी जवळ आल्यामुळे एकतर्फी निर्णय होऊन घराची साफसफाई करायची असं ठरवलं गेलं ... कुठूनतरी तीन तरुण पोरं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर मदतीला ठरवली गेली ... मला अर्थातच कुठलाही त्रास न देता निमूटपणे बसण्याची आणि सांगितलं जाईल त्यावेळेस वेगळ्या खोलीत हलण्याची सूचना झाली ... मास्क लावून मी हे पाळलं खरं, पण डोक्यात मात्र विचारांचं मोहोळ उठलं होतं ... आता मी लिहायला गेलो तर ते लिखाण बरंचसं नॉस्टॅल्जीक होतं, असं आपलं माझं मलाच वाटतं ... पण नाही ... ही दिवाळीची साफसफाई ही घटना अगदी सध्यकालीन - आणि बहुदा सर्वकालीनही - आहे ... अर्थात तरीही कुठूनतरी यात नॉस्टॅल्जीया डोकावेल हे नक्कीच ... मात्र तरीही (इथे तरी) मोकळेपणाने व्यक्त होण्यासाठी लिहितोच झालं ...

 

 

अशा प्रसंगी, कोणे एके काळी शक्यतो नाकातोंडाला, जरा जुन्यापैकी रुमाल वा कपडा बांधून विशेषतः घरातल्या माळ्यावर मला चढवलं जात असे ... या माळ्यावरचं सर्व सामान खाली काढल्यानंतर नजरेला जे काही दिसत असे, त्याचं वर्णन करण्यासाठी शब्द सापडणं अशक्य ... वर्षाकाठी मला हुकमी बघायला मिळणारं हेच एक प्रदर्शन ... ही माळा सफाईची वेळ शक्यतो कोण्या हाडवैऱ्यावरही न येवो रे परमेश्वरा ! ... आता अलिकडे बराच काळ माझ्यावर ही वेळ फारशी येत नाही ... वय वाढल्याचा तेवढाच एक फायदा ...

 

 

भले हा फायदा जरी होत असला तरीही आजसुद्धा ही दिवाळीची साफसफाई करायला काढणे, म्हणजे टोकाच्या मतभेदांचं दर्शन घडवण्याचा एक हुकमी एक्काच असतो. माझ्या दृष्टीने तरी ही साफसफाई म्हणजे घरातल्या अडगळीच्या सामानावर किंवा सांदीकोपऱ्यात छानपैकी सेटल झालेली जळमटं, धूळ, इत्यादींची जबरदस्तीने हालचाल घडवून आणून ती धूळ घरातील सर्व व्यक्तींच्या नाकपुड्यांपर्यंत आणून पोहोचवण्याची एक दुर्दैवी सोय आहे. माझ्या छोटेखानी मेंदूनी अगदी विचार कर कर करूनही; स्वतःलाच त्रास देण्याची योजना करून घेण्याची ही हौस कोण्या महाभागाच्या डोक्यात आली असेल, हे मला समजूच शकत नाहीये ... एकतर रविवार असूनही या दिवशी दुपारी नीट छान चवीढवीचं जेवण मिळणं जवळजवळ अशक्य असतं ... शिवाय वामकुक्षीचा विचार, साफसफाईसाठी गुंडाळून ठेवलेल्या गादीत चेंगरून मरून जातो. पुढचे आठ दिवस सोसाव्या लागणाऱ्या संभाव्य सर्दीच्या विचारांच्या त्रासानी मेंदू भंजाळून जातो, तो वेगळाच. असो ... आलीया त्रासाशी असावे सादर ... 

 

 

आता तसं पाहिलं तर घरात एक मिडीयम उंचीचं स्टूल आहे, पण ती उंची पुरेशी नसल्यामुळे उंच स्टूल कुठे, कोणाकडे मिळेल, ते आठवून  व्यवस्था करावी लागते किंवा मग घरातलंच स्टूल टीपॉयवर ठेवून त्यावर चढण्याची तयारी ठेवावी लागते; आणि कदाचित अपघाताची स्वहस्ते सोय करावी लागते ... अशावेळी, "हल्ली ती स्टेनलेसस्टीलची फोल्डिंग शिडी मिळते बघा, ती आपण घेऊया," अशी वार्षिक फर्माईशही होते ... छतापर्यंत पोहोचेल असा उंच दांडूवाला झाडू घरात माळ्यावर असला तर ठीक; नाही तर त्याच्याही खरेदीबद्दल बेत ठरतो ... पूर्वी यासाठी धुणी वाळत घालायच्या काठीला सुंभाने साधी केरसुणी करकचून बांधावी लागायची, असं अंधुक स्मरतंय ... काय करणार ? ... तेव्हाची परिस्थिती ! ... शिवाय साफसफाई कशी केली जावी, याच्याही काही फँटॅस्टिक कल्पना असतात ... एक कहाणी तर माझ्या कानांवर अशी आलेली आहे की; त्या घरातील सर्व व्यक्तींच्या संख्येला आधी किमान तीनने गुणून आणि अर्थात नंतर पुन्हा दोनने गुणून येणाऱ्या संख्येएवढ्या; चपला, बूट, जोडे, इत्यादींचे तळ ओल्या फडक्याने पुसून घेऊन स्वच्छ केले जातात म्हणे ... खरंखोटं ते झिजलेले तळच जाणोत ... माझ्याच घरात एका वर्षी कामवाल्या बाईंच्या मदतीने साफसफाई आयोजित केली असतांना त्या बाईंनी झाडूच्या जोरदार फटकाऱ्यानी ट्युबलाईटची सफाई अशी केली की पत्र्याच्या पट्टीतून ट्युब सुटून खळ्ळखटॅक तर झालंच, शिवाय ट्युबची कनेक्टेड वायरही तुटून खाली लोम्बु लागली ... आता यातून तरी काही बोध घ्यावा की नाही ? ... पण नाही ... हीच गत सिलिंग फॅनच्या वायरचीही झाली ... त्यामुळे अर्जंट वायरमनच्या शोधात धावण्याचं जबरदस्तीने मला करावं लागणारं कामही नक्कीच ठरून गेलं ...

 

 

बरं, नाना प्रकारच्या अगणित वस्तूंनी घर ओसंडून वाहील, इतकं भरलेलं असूनही; नको झालेल्या गोष्टी टाकून कशा द्याव्यात याचा विचार न करता, नवनवीन फालतू गोष्टी खरेदी करण्याच्या योजना कशा डोक्यात येऊ शकतात, ही एक चिंतनीय बाब आहे ... अर्थात या गोष्टी 'फालतू' फक्त माझ्या दृष्टीनेच असतात हे सांगणे न लगे ... एकतर अगणित वस्तू कुठल्यातरी कपाटांत, खणांत, "एवढे पैसे मोजलेत, अगदीच फेकून देणं जीवावर येतंय ... असू देत ! ... येतील कधीतरी उपयोगाला," या विचारांनी जोपासलेल्या असतात. या वस्तू साफसफाईच्या निमित्ताने बाहेर आल्या तरीही पुन्हा त्या, याच विचारांनी ठेवून दिल्या जातात आणि खरोखरच कधी उपयोग करण्यासारखी वेळ आली; तर ती वस्तू नेमकी कुठे ठेवलेली आहे हे मुळीच आठवत नाही. या अनुभवांमुळे की काय कोण जाणे; पण हल्ली साफसफाई करतांना वस्तू पूर्णपणे काढल्याच जात नाहीत आणि फक्त फर्निचर बाहेरून पुसून वगैरे घेतलं जातं. अर्थात तसं तर, हे सगळं काम पूर्णांशाने एकाच दिवसाच्या साफसफाईनी पूर्णपणे होऊच शकत नाही ... तरीही अशाच एका साफसफाई प्रसंगी, "आपण लवकरात लवकर अगदी पूर्ण, फुल फंक्शनवालं, काय ते व्हॅक्युम क्लिनर नावाचं मशीन घ्यायलाच हवं," असा एक ऑर्डरवजा विचार झाला ... माझं नशीब अत्यंत महाथोर म्हणूनच, "अगं त्याचा काही म्हणजे काssही उपयोग होत नाही ... जुनी पद्धतच सर्वात बेस्ट ... त्या व्हॅक्युम क्लिनरची वायर आणि त्याचे सगळे पाईप वगैरे सांभाळत धड साफसफाई अजिबात करता येत नाही ... हवं तर माझ्या घरी पडलेलं आहे ते घेऊन जा," हे सांगणारी 'अगं'चीच एक लांबची बहीण तिला दोनचार दिवसांतच भेटली, त्यामुळे मी वाचलो ... आता 'हवं तर माझ्या घरी पडलेलं आहे ते घेऊन जा, याच्या पुढचे न बोललेले शब्द ... "म्हणजे माझ्या घरातली अडगळ तेवढीच कमी होईल," हेच असणार होते आणि ते मला अगदी बरोब्बर ऐकू आले.

 

 

या साफसफाईच्या प्रसंगी सगळ्यात भयाकारी छळणूक कुठली असेल तर 'नको असलेल्या वस्तूंची विल्हेवाट नक्की कशी लावावी,' हा डोकं भुंग्यासारखं पोखरत जाणारा विचार ... केरकचरा लगेच टाकून देणं अगदीच साधं आणि सोप्पं आहे; पण वस्तूंची विल्हेवाट हा चांगलाच अवघड मामला आहे. पूर्वी चार खेपा जास्त टाकून या वस्तू जवळच असलेल्या म्युन्सिपाल्टीच्या कचरापेटीत टाकता येत असत; पण आता तसं नाहीये. म्हणूनच बहुदा नको असलेल्या गोष्टींची विल्हेवाट लावणं, हे घडतच नाहीये ... एकतर हल्ली कचऱ्याचं कम्प्लिट वर्गीकरण करावं लागतं ... ओला कचरा, सुका कचरा, प्लॅस्टिकसारख्या गोष्टी, इत्यादी तर आहेच; पण त्याहीपेक्षा पुन्हा मेडिकेटेड का काय म्हणतात तो वेगळा कचरा … इलेक्ट्रिकल कचरा आणि इ कचरा म्हणजे इलेक्ट्रॉनिक कचरा, हे तर मलाच काय, सर्व समाजाला, अगदी जगालाही छळणारे विषय होत चाललेत ... मला स्वतःला इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं आकर्षण असल्यामुळे या जुन्या वस्तूंच्या साठवणीच्या पापात मोठा वाटा माझा आहे आणि ती जबाबदारी मला स्वीकारायलाच हवी ... एकतर या गोष्टी सालोसाल टिकण्याएवढ्या टिकाऊ नसतात आणि टिकल्या तरी ती टेक्नॉलॉजी इतकी वेगात जुनी होत जाते की, भले लाजेकाजेस्तव का असेना, या वस्तू बदलाव्याच लागतात आणि मग जुन्या वस्तू कुठेतरी पडून राहतात ... माझ्या समजुतीनुसार समाजाचा मोठा भाग बहुदा या ‘प्रॉब्लेम ऑफ प्लेन्टी’चा शिकार आहे ... पूर्वी रद्दीचा आणि कागदी पिशव्या, इत्यादींचा एखाद्दुसराच खण असे ... आता ? ... आता मात्र लिखाणात नॉस्टॅलजिया येणं भाग आहे ...

 

 

मला आठवतंय, माझ्या आईच्या पंचाहत्तरी नंतर मी तिच्याशी गप्पा मारत असतांना मला मोबाईलवर सौ.चा कॉल आला होता आणि 'घरातल्या सिंकमधून पाणी खूप हळू ड्रेन आउट होत असल्यामुळे शक्यतो लवकर प्लम्बरला पकडा,' अशी एक सूचना झाली होती ... तेव्हा मी आईला म्हटलं, "आई, माझ्याकडे हल्ली ही बिघडाबिघडी आणि उठसूट कुठल्यातरी रिपेअररला गाठणं फारच वाढलंय ... माझ्या लहानपणी आपल्या घरी जवळजवळ काहीच कसं बिघडत नव्हतं गं ?" पटकन आई म्हणाली होती, "तुझ्या लहानपणी आपल्या घरात बिघडायला होतंच काय ?"

 

 

अगदी खरं होतं आईचं ... त्यावेळच्या त्या दोनच खोल्या ... बाहेरच्या खोलीत एक लोखंडी कॉट आणि कपाट आणि एक आजोबांच्या काळातलं सागवानी कपाट, दोनतीन पत्र्याच्या फोल्डिंग खुर्च्या ... इलेक्ट्रिक मध्ये दोन्ही खोल्यांत एक-एक ट्युबलाईट आणि अडचणीसाठी एक-एक २५चा दिवा, फक्त बाहेरच्या खोलीत एक भयानक दणकट सिलिंग फॅन, त्याचा जुनाट रेग्युलेटर तर इतका कामसू निघालाय की आजही तोच चालू आहे ... एक गजराचं किल्लीचं घड्याळ जे ठराविक वेळी रोज किल्ली देत राहिल्यामुळे कधीच बिघडलं नाही ... स्वयंपाकघरात ओट्याच्या खाली भांड्यांसाठी कडप्पा, बाकी भिंतींना फक्त दणकट फळ्या, फ्रिज अर्थातच नसल्यामुळे एक जाळीचं छोटं कपाट ... वॉशबेसिन वगैरे नाहीच, सिंकमधून बाथरूममध्ये सोडलेला आउटलेटचा लोखंडी पाईप इतका मोठा होता की तो स्वतःच्या आतमध्ये, कधीमधी झुरळं सोडल्यास, दुसरं काहीच अडकवूनच घेत नसे … तीच गोष्ट बाथरूमच्या जाळीची ज्याला अलीकडे नाली ट्रॅप म्हणतात ... यात पाणी काय कप्पाळ तुंबणार ? … संसारातल्या या इतक्याशा वस्तूंमधलं काय बिघडणार ? ... फक्त एकच गोष्ट होती ती म्हणजे व्हॉल्व्ह रेडियो आणि तो कधीमधी बिघडायचाच ... मग कोणालातरी पकडून दुरुस्तही करून घेतला जायचा  ... एकूणच लाइफस्टाइल अति साधी होती आणि काहीही अडलेलं नव्हतं ... आता निःसंशय सुखं खूपच आहेत पण त्याबरोबर अनुषंगिक त्रास सुद्धा आलेच ...

 

 

सारांश काय, तर परवाच घरात दिवाळीची साफसफाई पार पडलीय ... माझ्या नजरेला तर घर, त्यापूर्वी होतं तसंच दिसतंय ... नाकपुड्या मात्र जराशा हुळहुळायला लागलेल्या जाणवतायत ... नशिबात काय ती चारपाच दिवस सर्दी असली, तरीही दिवाळीपूर्वी ती खडखडीत बरी होऊ दे रे देवा म्हाराजा ...

 

 

@प्रसन्न सोमण. 

 

२६/१०/२०२१.