Wednesday, 21 July 2021

--- ये पैसा क्या चीज है ---


 --- ये पैसा क्या चीज है ---

 

 

सुदैवाने मी अगदी सत्शील आणि आदर्श आई-बापाच्या पोटी जन्मलो. हेही मान्यच आहे की माझ्या जन्मापासूनच देव माझ्या पाठीशी आहे आणि बराच काळ देवरूपी आईबाबा माझ्या पाठीशी होते. माझी आई पूर्णवेळ गृहिणी बाबा एकटेच कमावते होते. मात्र त्यांच्यावर तशा जबाबदाऱ्या फारशा नव्हत्या; त्यामुळे परिस्थिती तशी खाऊनपिऊन सुखी मध्यमवर्गीय, अशीच होती. माझं बालपण एकदम मस्तच गेलं; फक्त गोट्या, पतंग, भोवरा, इत्यादींसाठी चुकून बाबांकडे वीसपंचवीस पैसे (आईशप्पथ तेवढे पुरायचे) मागितले की, "प्रसन्न, पैसे कमवायला घाम गाळावा लागतो: काही मिळणार नाही," हे ऐकून घ्यायचो आणि मग चारदोन दिवसांनी मागल्या दारानी आईकडे लकडा लावला की मिनतवारी करून आई, बाबांकडून घेऊन मला पैसे द्यायची. त्यावेळी पैसा या वस्तूशी तेवढाच सटीसामाशी संबंध यायचा. जरासा मोठा झाल्यावर मधून मधून "आपला पैसा आपणच पै पै वाचवून जपायचा असतो," असा एक कानमंत्र मिळायचा. अर्थात 'पैसा जपणं,' ये मेरे बसकी बात नही, याची खात्री वाटल्यामुळेच की काय, असाही एक इशारा मिळायचा की, "कमावता झाल्यावर, त्या प्रमाणात, राहण्याचे आणि जेवणाखाणाचे पैसे तू घरी द्यायचे." आता कानोसा घेतल्यानंतर मला तरी असं वाटतंय की, बापाने मुलाला असं सांगण्याचा जमाना पूर्णपणे संपलायअर्थात तेही ठीकच आहे.  

 

 

मी मॅट्रिकनंतर अभ्यासाचा यथेच्छ उजेड पाडल्यानंतर, घरात प्रकाश फारच वाढला म्हणून, बाबांनी माझ्याकडून एक अर्ज भरून घेतला. यथावकाश मी एक वर्षासाठी अप्रेन्टिस क्लार्क म्हणून महापालिकेत चिकटलो. वर्षानंतर ब्रेक मिळून नंतर मी महापालिकेतच रेग्युलर क्लार्क म्हणून लागणार होतो. अप्रेन्टिस असतांना महिन्याकाठी स्टायपेंड होता १३० रुपये. त्यावेळच्या कथा, कादंबऱ्यांत. सिनेमात हटकून आदर्श मुलगा दिसायचा जो आपली कमाई इमाने इतबारे आईच्या हातात ठेवायचा. मी मात्र तसलं काहीही केलं नाही; पण बाबांशी बोलून त्यांच्या संमतीने स्टायपेंडमधले ५० रुपये बाबांच्या हातात दिले उरलेले ८० रुपये स्वतःकडे ठेवले. ‘मला स्वतःलाच पैसा साठवायचाय स्वतःच मॅनेज करायचाय,’ असलं काहीतरी नम्र आर्ग्युमेण्ट बाबांच्या पायाशी करून मी त्यांची संमती मिळवली असणारविशीचं वय आणि हातात स्वकमाईचे अखंड ८० रुपये ! बाप रे ! … मोठ्ठी रक्कम !! ... मग मी काय केलं ? काही नाही, साठवून ठेवलेकारण मला खर्च करायचाच होता, पण माझी स्वप्न फारच प्रचंड होती. रेग्युलर क्लार्क झाल्यावर त्यावेळी मला सुरुवातीला पगार होता ६७२ रुपये. त्यातूनही चारपाच महिने अशाच पद्धतीने घरखर्चाला विनियोग करून, उरलेली साठवण करत राहिलो. आणि ... १९८२ च्या दिवाळीच्या सुमारास कसलासा इलेक्ट्रॉनिक्सचा सेल लागला आणि त्यावेळपर्यंत साठलेले पैसे खिशातल्या खिश्यात उड्या मारायला लागले. शेवटी बिनधास्तपणे जाऊन माझे पैसे वापरून मी पॅनासॉनिकचा छोटा टेपरेकॉर्डर घरात आणला आणि तीन कोऱ्या कॅसेट्स आणल्या. (टेपरेकॉर्डर होता त्यावेळेस काहीतरी १०५० रुपयांच्या आसपास आणि कोऱ्या कॅसेट्स ३५ रुपयाला एक याप्रमाणे १०५ रुपये ...आज तो टेपरेकॉर्डर अस्तित्वात नाहीये पण तरीही स्वकमाईची आणि स्वउपभोगाची पहिली मोठी वस्तू म्हणून तो टेपरेकॉर्डर अधूनमधून माझ्या स्वप्नात येतो.) या खरेदीसाठी कारणं दोन ... एक म्हणजे यावेळपर्यंत बाबांनी घेऊन दिलेला टेपरेकॉर्डर दुरुस्तीच्या पलीकडे जाऊन बिघडून पडला होता आणि दुसरं म्हणजे माझी संगीत ऐकण्याची भूक जेवणाच्या भूकेपेक्षाही जास्त वाढू लागली होती. या प्रसंगानंतर, … "काही गरज होती का ? तुझं सगळं आयुष्य पडलंय. सेव्हिंग्ज करत जा रे !" अशी बरीच लेक्चर सेशन्स मला ऐकावी लागली, पण मी माझे कान तिकडून काढून घेऊन ते टेंपरेकॉर्डरच्या स्पीकरला चिकटवलेया प्रसंगानंतर माझी एकूण पैसा पॉलिसी ठरून गेली. वाचवायचे वाचवायचे, आणि एखाद्या मोठ्ठ्या छंदाचं स्वप्न बघून उडवून टाकायचेमस्त चाललं होतं.

 

 

पुढे लग्नानंतरही सुदैवाने फार काही बिघडलं नाही. डबल इंजीन, म्हणजे कमावती नवरा-बायको असं आमचं कपल असल्यामुळे माझी आधीचीच पैसा पॉलिसी बऱ्यापैकी चालून गेली. टाइम टु टाइम दोघांचीही इन्क्रीमेंट्स, प्रमोशन्स, बोनस फॅसिलिटीज, लोन फॅसिलिटीज, इत्यादी गोष्टींमुळे आणि कमी जबाबदाऱ्यांमुळे; अगदी घर खरेदीसकट सगळं ठीकठाक पार पडलं बुवा ! … देवाची आणि आईबाबांचीच कृपा !                  

 

 

माझ्या बायकोच्या कॉमर्स साईडमुळे, प्रायव्हेट कंपनीतल्या नोकरीमुळे आणि शिवाय तिच्या काही गुजराथी शेअरबाज कलिग्जमुळे, तिला म्युच्युअल फंड्स, स्टॉक्स, एसआयपी; या शब्दांची थोडी जनपछान होती. मला मात्र एलआयसी, सेव्हिंग अकाउंट्स बँक एफडीज या पलीकडे इन्व्हेस्टमेंट या शब्दातला सुद्धा आजवर माहिती नव्हता. (या वाक्यात मी चलाखीने गुंतवणूक हा मराठी शब्द टाळलाय याची नोंद घ्यावी.) शिवाय माझ्या आईबाबांच्या पार्श्वभूमीमुळे की काय कोण जाणे पण, 'शेअर्स' हा शब्द उच्चारला की त्याच्यापुढे 'बुडाले' हाच शब्द तेव्हा अदृष्यपणाने मनात वावरायचा. तसे शेअर मार्केटमध्ये छानपैकी रमणारे अनेक मित्र होते आणि त्यांच्या सुरस कहाण्या सुद्धा ऐकाव्या लागायच्या, पण मी त्या कौशल्याने कानाआड करायचो. एक, एकटाच कमावता असलेला शेअरबाज मित्र चांगुलपणाने माझ्या फारच मागे लागायचा आणि शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायला आणि लक्ष घालायला सांगायचा. "तुझ्यासारखं माझं डबल इंजीन असतं तर मी शेअर्समध्ये केवढेतरी कमावले असते. तू लक्ष घाल रे," म्हणून खूप अजीजी करायचा पण मी जाम बधलो नाही.

 

 

मात्र रिटायर झाल्यानंतर पहिल्या पहिल्या जोशात मी त्याच मित्राच्या मदतीने सेव्हिंग्ज, डिमॅट आणि ट्रेड असा ट्रिपल अकाउंट उघडला. याच दरम्यान मी आयपीओ नावाचा नवीन शब्द शिकलो. कॉम्प्युटर तर वापरता येतच होता. काही पेपरच्या सदरातून आलेल्या टिप्स आणि दोनतीन लागलेले आयपीओज असा माझा पोर्टफोलिओ सुद्धा सजला. बाय वे हा पोर्टफोलिओ शब्द सुद्धा या शेअरमार्केटच्या संदर्भात नवीनच समजला. यापूर्वी माहिती असलेला पोर्टफोलिओ ऑफिसच्या कामांचा होता. आता रिटायर झाल्यामुळे वेळच वेळ आहे तर, मित्र म्हणतो तो अभ्यास करून सगळ्या शेअर्स विषयक ज्ञानाचा चट्टामट्टा करायचा आणि मजबूत श्रीमंत व्हायचं; असा जोरदार निर्धार मी रिटायर झाल्या झाल्या केला होताआज सहा वर्ष झाली. माझा तो केविलवाणा पोर्टफोलिओ आणि माझ्या बधिरलेल्या मेंदूसकट मी; … होतो तिथेच आहोतआत्ता, अगदी परवा परवा, माझ्या त्या मित्राने पोटतिडीकेनं मला ऑफर दिली की, "मी तुझं वाईट करणार नाही एवढा तर तुझा विश्वास आहे ना, मग मी तुला टिप्स देत जाईन. मी सांगेन त्याप्रमाणे ट्रान्झॅक्शन्स तू करत जा." पण मग मी बाणेदारपणे त्याला सांगितलं, "याला काय अर्थ आहे ? … मग मी फक्त कॉम्प्युटर ऑपरेटरच राहणार आहेअसं नको, माझी इच्छा; स्वतः अभ्यास करून शेअर्समध्ये श्रीमंत होण्याची आहे." … जाऊ दे झालंआता मी 'हे कार्य नव्हे तुजजोगे,' असं स्वतःच्या मनाला समजावलेलं आहे.  

 

 

मुळात माणसाला पैसा लागतो किती ? ... प्रश्न खूपच सोपा आहे, पण उत्तर अतिशय गहन आहे ... हो ... काही माणसं अशी होऊनही गेलीयत की त्यांना पैसा अजिबात लागलाच नाही; पण त्या संतवृत्तीच्या व्यक्ती झाल्या. तुकाराम महाराजांनी म्हटलंच आहे की 'सोने आणि रूपे आम्हा मृत्तिकेसमान' ... मातीशी नाळ जोडलेली असल्यामुळे मृत्तिका त्यांना नक्कीच माहित होती; पण तुलना करण्यासाठी सोने आणि रूपे त्यांनी कितीसे हाताळले होते, याचा कुठेच उल्लेख आल्याचं ऐकिवात नाही. मला वाटतं, रामदासस्वामींना सुद्धा फक्त एकदाच पैशाची गरज भासली. चाफळच्या राममंदिर उभारणीसाठी. त्यावेळी त्यांनी स्वतः आणि शिष्यांकरवी काखेच्या झोळीचा उपयोग केला. अशा थोर व्यक्ती सोडल्या तर तुम्हाआम्हाला पैसा हा लागतोच. पण त्याची साठवण करावी किती ? ... उत्तर अवघड आहे.

 

 

मी अनेक गुंतवणूकप्रेमींचं खाजगी वा जाहीर लेक्चर मनोभावे ऐकण्याचा प्रयत्न केलाय. मात्र आजवर एकानेही असं सांगितल्याचं ऐकलं नाहीये की, 'अमुक ठिकाणी तमुक काळासाठी ढमुक रकमेची गुंतवणूक करा. जो फायदा होईल तो काढून घ्या आणि मस्तपैकी स्वतःच्या छंदासाठी उडवा.' मी जाणीवपूर्वक स्वतःच्या किंवा कुटुंबाच्या छंदासाठी उडवण्याबद्दल बोलतोय ... जबाबदारीसाठी आणि आवश्यक असलेला जो खर्च करावाच लागतो, तो प्रत्येकजण करतोच ... त्याबद्दल मी बोलत नाहीये. 'पैशाकडे पैसा जातो' म्हणतात त्याप्रमाणे 'झालेला फायदा अजून गुंतवा' आणि 'अजून जास्त फायदा करून घ्या' ... सामान्यतः हा असाच मामला असतो का ? ... हे अगदीच मान्य आहे की, सांगणारी वा सल्ला देणारी व्यक्ती ऐकणाऱ्याच्या भल्यासाठीच सांगत असते ... पण प्रॅक्टिकली माझा तरी असाच अनुभव आहे की, ही सुद्धा एकप्रकारची नशाच असते, एकप्रकारचा छंदच असतो. कॅसेट्सच्या जमान्यात मला असा ऑडियो कॅसेट्स जमवण्याचा छंद होता. तीनशे, चारशे, पाचशे, अशा कॅसेट्सच्या वाढत जाणाऱ्या आकड्याकडे समाधानाने पाहण्यात आणि त्यांचं इंडेक्सिंग करण्यात मी खूपच रमत असे ... यातल्या किती कॅसेट्स मी ऐकू शकणार आहे; त्या ऐकण्यासाठी कितीसा वेळ माझ्याकडे आहे; असले प्रश्न मला अजिबात पडत नसत. तसाच उत्तम वाचनीय पुस्तकं विकत घेऊन जमवून ठेवण्याचाही मला छंद होता. थोड्याफार प्रमाणात अजूनही आहे. अर्थात हे अगदीच खरं की जमवलेल्या कॅसेट्स किंवा पुस्तकं यांचं परत पैशात रूपांतर करता येत नाही; पण गुंतवणुकीचं मात्र पैशात सहज रूपांतर करता येतं ; वारसा म्हणून पुढच्या पिढीलाही त्याचा जास्त उपयोग होतो. ... पण मला थोडंसं खटकतं ते हे की, तशीच नड असल्याशिवाय गुंतवणुकीचं किंवा त्यातल्या फायद्याचं सुद्धा पैशात रूपांतर करायचंच नसतं, हा विचार

 

 

जुन्या काळी एक क्ष नावाचा शेअरबाज मित्र मी असा पाहिलेला आहे की प्रत्यक्ष त्याची आई मला म्हणाली होती की, "आमच्या क्ष ला काय कमी आहे ? त्याच्याकडे पैसा अक्षरशः पाणी भरतोय." मात्र दुसऱ्या वेळी त्याच क्ष ची बायको माझ्याकडे तक्रार करत होती की, "बघा हो भावजी, घरोघरी कलर्ड टीव्ही येऊन जुने झाले तरीही आमच्याकडे तोच जुना ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीह्यांच्या मी मागे लागल्येय, पण हे काही नवीन कलर्ड टीव्ही घ्यायला तयार नाहीत. काय करायचाय तो नवीन कलर्ड टीव्ही, असा ह्यांचा प्रश्न" ... हे असं का; तर त्या क्ष ला स्वतःला टीव्ही बघण्याची अजिबात आवड नव्हती म्हणून ... अर्थातच त्या क्ष ला फक्त स्वतःचा दिसामासांनी वाढत असलेला पोर्टफोलिओ न्याहाळण्याचाच छंद होतात्यावेळी मात्र असं वाटून गेलं की 'अरे, हे कुठेतरी चुकतंय ! गुंतवणूक करण्याची सवय कितीही चांगली असली तरी गुंतवणूक आणि, भले घरातील दुसऱ्या व्यक्तीच्या का असेना; मजेसाठी, छंदासाठी केला जाणारा खर्च; यांत काहीतरी बॅलन्सिंग नको का ? ...

 

 

असो ... तसा कुठलाही छंद तोपर्यंत अजिबातच वाईट नाही जोपर्यंत घरच्यांना किंवा इतरांना त्याचा ताप होत नाही ... त्यामुळे पैसा जमवण्याचा, शेअरबाज असण्याचा किंवा गुंतवणूक विषयक गॉसिपिंगचा छंद एकदम मस्त आणि अर्थातच फायदेशीरही आहे ... पण मी त्या छंदाशी जवळीक करण्याचा थोडाफार प्रयत्न करूनही माझ्याशी मात्र तो छंद, सतत माझ्याविषयी विरक्त असणाऱ्या सुंदरीसारखा वागलाय, एवढं खरं

 

 

@प्रसन्न सोमण

१८/०७/२०२१.