Saturday, 22 May 2021

--- हरहर ! केवढा हा अन्याय ! ---

 

--- हरहर ! केवढा हा अन्याय ! --- 

 

सकाळी उठलो. ब्रश करून स्वयंपाकघरात गेलो. जनरली यावेळी सौ.ची स्वयंपाकघरामध्ये कामांची लगबग सुरु असते. त्यामुळे अगोदर करून ठेवलेला चहा मायक्रोवेव्ह मध्ये गरम करून घेण्याचं काम बहुतेकवेळा माझं मलाच करावं लागतं. तशी पद्धतच आखून दिली गेली आहे आणि काहीशा नाइलाजापोटी मी सुद्धा ती मान्य करून घेतलीय ... इथपर्यंत ठीक आहे ... पण आज चहा गरम करता करता असं लक्षात आलं की सौ. स्वयंपाकघरामध्ये नसून वॉशरूममध्ये गेलेली आहे ... त्याच वेळेस असंही लक्षात आलं की बारीक गॅसवर दूध मंद आंचेवर तापत ठेवलेलं आहे आणि ते दूध वर येऊन फुरफुरतं आहे ... अरेच्चा ! ... याचा अर्थ काय ? बायको वॉशरूमला जाते आणि तरीही दूध खुशाल वर येतं ? ... मग मनात पहिला विचार हा आला की दुधाखालचा गॅस बंद करण्याचं रोजचं काम तर माझं नाहीये ! ... काय बरं करावं ? ... पण माझ्या चहामध्ये दूध तर घालावंच लागणार होतं. शेवटी काहीच उपाय दिसेना तेव्हा नाईलाजाने मी दुधाखालचा गॅस बंद केला ... हे काम मला करावं लागल्यामुळे माझ्यावर होणाऱ्या धडधडीत अन्यायामुळे मी एवढा पेटून उठलो, की काही क्षण दूध चहामध्ये घालून तो चहा आपल्याला प्यायचा आहे, हेही मी विसरलो. अगोदर तर, माझ्या रोजच्या सरावाचं नसलेलं, गॅस बंद करण्याचं काम मला जमणार की नाही, असाही संभ्रम मनात उत्पन्न झाला होता ... पण प्रयत्न केल्याबरोब्बर गॅस सहजच बंद झाला ... म्हणजे स्वयंपाकघरामध्ये करावी लागणारी कामं तशी सोप्पीच असतात तर ! .... या बायका ही कामं करून उगाच रॉकेट सायन्सचा शोध लावल्याचा आव आणतात !

 

अर्थात आज सकाळी हे काम केल्याचा एक सूक्ष्म आनंदही मला आहे ... कारण सवयीप्रमाणे बायको, "स्वयंपाकघरातलं एक्कही काम तुम्ही करत नाही." अशी माझ्या अंगावर फिस्कारली तर ... "मॅडम, सकाळी दुधाखालचा गॅस मी बंद करून दुधाची बासुंदी होण्याची प्रक्रिया थांबवली, त्यावेळी आपण कुठे गायब होतात ?" असा खोचक प्रश्न मला विचारता येईलअर्थात माझी खात्री आहे की, असा प्रश्न मी विचारला तरीही ती खजील वगैरे काही होणार नाही ... उलट, "हो; काय मोठठं काम केलंय !" असं म्हणत, नाक उडवून एक तुच्छतादर्शक हुंकार देईल ... काय करणार ? ... असतं एखाद्याचं नशीब खडतर ! ...

 

नमुना म्हणूनआणि गम्मत म्हणून, विनोदाच्या प्रयत्नापुरता, एक प्रसंग उसना घेतलाय हं ! … शिवाय हे लिखाण सौ.कडून प्रसिद्धीपूर्व ऑडिट सुद्धा करून घेण्यात आलेलं आहे ... तेव्हा उगीच माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल तर्क-वितर्क नकोयत ....

 

@प्रसन्न सोमण.

२१/०५/२०२१.