-- आठवणीतली आवाजी दिवाळी --
माझ्या लहानपणी लहान मुलांच्या दृष्टीने अगदी नित्य किंवा कॉमन असणाऱ्या किती गोष्टी आज अत्यंत रोडावल्यायत ? ... खूपच ... मुळात सगळ्यात मोठ्ठा आणि महत्वाचा फरक आज लहान मुलांच्या संख्येतच पडलाय ... अलीकडे लग्नाळू जोरापेक्षा फॅमिली प्लॅनिंगचा जोर इतका झालाय की अनेक घरांत मुलाची संख्या एकच्या पुढे जात्येय, असं फारसं दिसतच नाहीये ... त्यामुळे मे महिन्याची सुट्टी किंवा दिवाळीची सुट्टी असली तरीही मैदानात मुलं अगदीच मोजकी दिसतात ... नाही म्हणायला आमच्या कॉलनीमधलं, मैदान मात्र थोडाफार जीव आणि मामुली गवत धरून आहे खरं ... अर्थात जी काही साताठ मुलं आहेत ती खेळतात एकच गेम तो म्हणजे अंडरआर्म क्रिकेट ... पण त्यांचे नियम सुद्धा विचित्रच ... फक्त ग्राउंड स्ट्रोक्स मारायचे ... तेही येणारी जाणारी माणसं पाहून आणि तेही जरा हळूच मारायचे ... माझ्या लहानपणी आमच्यातले चांगले तरबेज भिडू बॉलला, बाजूच्या इमारतींचे पहिले-दुसरे मजले नाहीतर गच्च्या दाखवायचे ... बहुदा देवकृपेनेच असेल; पण तेव्हा कोणाला काही दुखापत वगैरे झाली नाही एवढं खरं ... फक्त कोणीकोणी हिटलर वृत्तीचे काका नाहीतर त्राटिका वृत्तीच्या काकू, बॉल मधोमध चिरून दोन शकलं करून मगच खाली फेकायच्या आणि त्याबरोबर काही 'कढत' शब्दही खाली फेकायच्या एवढंच ... तेवढं तर सोसलंच पाहिजे नाही का ?
पतंग नावाचा खेळ तर संक्रांतीची एक संध्याकाळ वगळता; वारा पडल्यावर पतंग न उडता खालीच पडतो तसा पडेल झालेला आहे ... त्यामुळे कटलेला पतंग पकडण्यासाठी गच्च्यांवरून धावणं आणि मोठ्यांचा ओरडा खाणं हा प्रकारही थांबलाय ... पंतंगाप्रमाणेच भोवरा, गोट्या (राजाराणी, दसबीस, कोयबा, इत्यादी), लगोरी, लोखंडी गाडा, सळई-रुपवी, ढप्पा, व्हॉलीबॉल आणि आणखीन कोण जाणे किती ते ... पण असे कितीतरी मैदानी खेळ कालौघात नष्ट झालेत ...
पण या सगळ्यांपेक्षा मी मोठा झाल्यामुळे आणि काळही बदलल्यामुळे 'माझा कुठला आनंद नष्ट झालाय ?' असं कोणी विचारलं तर माझं एकच उत्तर असेल ... फटाके वाजवण्यातला सर्वश्रेष्ठ आनंद आता पूर्णपणे नष्ट झालाय ... ठीक आहे ... प्रदूषणाच्या नि पर्यावरण ऱ्हासाच्या विचारामुळे आणि बदलत्या काळानुसार हे होणारच; पण तरीही तो आनंद संपल्याचं वाईट वाटायचं ते वाटतंच.
आमच्या मजल्यावरच्या बारा बिऱ्हाडातल्या बारा कुटुंबांनी एकत्र येऊन 'सहयोग' नामक संस्था स्थापन केली होती व त्याअंतर्गत महिन्याला ऑर्डरनुसार वाणसामान मस्जिदवरुन स्वस्तात आणून नाममात्र नफा घेऊन वाटप करून आपापसात व बाहेरही विकायचं हा उपक्रम उत्साहाने चालू केला होता ... हा 'सहयोग' उणीपुरी पंचवीस वर्ष चालू होता ... माझ्या लहानपणी तर हा 'सहयोग'चा उत्साह खूपच जोरात होता ... ब्रह्मवृंदाने ही वाणिज्य वृत्ती अंगिकारल्यामुळे शिलकी नफ्याचं लक्ष्मीपूजनही खास उत्साहात होत असे ... याच सहयोगचा फटाके विक्रीचाही उपक्रम असे ... लक्ष्मीपूजनाच्या रात्री खास सहयोगची हजार किंवा दोन हजाराची परेडही जोरदार वाजत असे ... त्यामुळे साधारणतः नवरात्रापासूनच फटाके विक्रीचं बिगुल वाजत असे व येणाऱ्या दिवाळीच्या विचारांच्या उत्साहात त्या पोरवयातसुद्धा रात्रीची शांत झोप काहीशी नष्ट होत असे ...
मला आठवतंय - वडिलांच्या धाकामुळे विचार करकरून शक्य तितक्या कमी किमतीची फटाक्यांची यादी मी बनवत असे; पण तरीही त्यात बरीच काटछाट होतच असे ... दोनेक वर्षांनंतर मी 'अगदी आवश्यक तेवढेच फटाके लिहिलेत,' असा कांगावा करत चांगली पन्नाससाठ रुपयांची यादी बनवत असे आणि मग काटछाट होऊन तीसपस्तीस रुपयांचे फटाके सॅंक्शन होत असत ... तेवढ्यावर मी चांगलाच आनंदी होत असे. माझ्या आवडीनुसार माझ्या यादीत भुईचक्र, अनार, सुदर्शनचक्र, चिड्या, रॉकेट, सापगोळी, टेलिफोन, असले शोभेचे फटाके बरेच कमी असत त्यामुळे फुलबाजाही कमी घेऊन भागत असे ... शोभेचे फटाके दुसऱ्यांनी उडवलेले बघून आपण फक्त नेत्रसुख घ्यावे आणि स्वतः मात्र दणदणीत आवाजी फटाके वाजवावेत; तेही शक्यतो हातातूनच पेटवून फेकावेत, असे माझे लाडके सिद्धांत असत ... फटाके वाजवत उनाडण्याचा वेळ जास्त असायला हवा म्हणून, आणि बेताच्या किमतीचे सॅंक्शन झालेले फटाके पुरवून वाजवायचे म्हणूनही; मी डायरेक्ट माळा वाजवण्याची श्रीमंती फारशी कधीच केली नाही ... तर ज्याप्रमाणे ख्यालगायक एकाएका सुराची बढत करतो, त्याप्रमाणे एकेक फटाका सोडवून वाजवून त्याचा आनंद घेणे हीच माझी पद्धत होती ... माझ्या मुलाने सुद्धा त्याच्या लहानपणी याच पद्धतीने फटाके वाजवून मला घराण्याची कला पुढे नेण्याचा आनंद मिळवून दिला ...
खरंतर वसुबारसेपासून दिवाळी सुरु होते असं आई नेहमी म्हणत असे; पण हा नियम माझ्या फटाके वाजवण्याच्या बाबतीत आणि दिवाळीचा फराळ खायला सुरुवात करण्याच्या बाबतीत फिरवला जाई आणि या दोन गोष्टींपुरती दिवाळी नरकचतुर्दशीच्या पहाटेपासूनच सुरु होत असे ... नरकचतुर्दशीच्या पहाटेचे साडेतीन चार वाजताचे जोरदार आवाजी फटाके आमच्या इमारतीतल्या 'व्यवस्थित बाळू'चे असत ... हा माझ्यापेक्षा पाचसहा वर्षांनी मोठा असला तरी पोरवयाचाच ... मात्र तो इतर सर्व वाभऱ्या मुलांपेक्षा खूपच शिस्तीचा आणि व्यवस्थित होता; म्हणून तो सर्वांसाठी 'व्यवस्थित बाळू'च ...
डोळे चोळत त्यानी वाजवलेले थोडेसे फटाके वरून ग्यालरीतून बघितले की ती दारू माझ्या अंगी भिनायची आणि मग पटकन तेल-उटणं लावून देण्यासाठी आईच्या मागे लकडा लावायचा, हे बहुतेक वर्षी ठरलेलं होतं ... अर्थात आई तिचा पहिला चहा व इतर आवश्यक कामं झाल्यावर पाटावर बसवत असे व तेल-उटणं चोळून देत असे आणि आंघोळीचं पाणीही काढून देत असे. मग अंगाचं तेल-उटणं मोती साबणाने काढून, स्वच्छ अभ्यंगस्नान ... त्यानंतर आईने दिलेलं कारीट फोडणं ... अर्थात बाथरूममधल्या अडचणीच्या जागेमुळे आणि लाथेतल्या कमी जोरामुळे हा नरकासुर सहसा पहिल्याच आक्रमणात कधी यमसदनाला जात नसे ... उलट जरा जागा बदलून घरंगळत हसत राहायचा ... आणि हे पाहणारं आईबाबांपैकी कोणीतरी 'हात-तुझी' म्हणून हसायचे ते वेगळंच ... पण नंतर प्रतिहल्ले चढवल्यावर मात्र नरकासुर धारातीर्थी पडायचा ...
मग छानसे कपडे घालून फटाके वाजवणं ... यावेळपर्यंत बऱ्यापैकी दिसायला लागलेलं असल्यामुळे पहिल्या सकाळी तर शोभेचे फटाके उडवायचे नसत. त्यामुळे फक्त हातात पेटती उदबत्ती घ्यायची ... पिशवीत सोडवलेले सिंगल लवंगी, पोपट, डामरी आणि जरा मोठं झाल्यावर चारसहा मोठे लक्ष्मीबार आणि दोनतीन खोकेवाले किंवा सुतळी ऍटमबॉम्ब; हा ऐवज घेऊन अंगणातल्या मुलांच्या गँगमध्ये सामील व्हायचो. सुरवातीला फक्त लक्ष्मीबार आणि ऍटमबॉम्ब खाली कठड्यावर ठेवून वाजवायचो बाकी लवंगी, पोपट, डामरी पेटवून हातातूनच फेकायचो. जरा मोठा झाल्यावर लक्ष्मीबार आणि आसपासची जागा बघून ऍटमबॉम्बही हातातून फेकण्याचं डेअरिंग करायला लागलो ... थोड्या वेळा लवंगी आणि पोपट, काळी वात काढत नसल्यामुळे हातात फुटलेत. लक्ष्मीबार आणि ऍटमबॉम्ब मात्र काळी वात काढूनच हातातून फेकायचो ... तरीही एकदोन वेळेला तेही खूप जवळ फुटून डोळ्यांसमोर काही क्षण अमावस्या पसरल्याचा अनुभव आहेच ... धाडस एवढं वाढायला मात्र एक कारण घडलं होतं ...
बरीच वर्ष माझ्यापेक्षा मोठ्ठ्या, कॉलेजात जाणाऱ्या दादा लोकांचा एक शिरस्ता होता ... अर्थात आम्ही त्यात फक्त बघ्ये होतो. अशी तीसपस्तीस मुलं पैसे काढून फक्त बरेच ऍटमबॉम्ब आणि चिड्या असे दोनच प्रकारचे फटाके आणायची ... याशिवाय एक मोठ्ठी परेडही ... मग भाऊबीजेला जरा उशिरा म्हणजे रात्री अकरानंतर, उदबत्त्या घेऊन मोठ्ठा राउंड करून मधल्या जागेत अगोदर चिड्या आणि नंतर ऍटमबॉम्ब्स हातातून पेटवून फेकायची ... त्या काळात ते चालून गेलं खरं ... ग्यालऱ्या ग्यालऱ्यांमधून बघणाऱ्यांना खूप मजा यायची ... मोजक्या काही वेळा पेटत्या चिड्या मजल्यांवर गेल्या, पण फार काही विपरीत घडलं नाही आणि आश्चर्य म्हणजे त्याकाळी ही गोष्ट रहिवास्यांनी बऱ्यापैकी लाइटली घेतली ... एकदा मात्र एक पेटती चिडी मैदानातल्या मैदानात एका जाड्या दादाच्या मागेच लागली ... आणि मग, पुढे तो जाडा दादा जोरात धावतोय आणि मागे पेटती चिडी, असं कमालीचं विनोदी चित्र बघणाऱ्या लोकांची हसता हसता पुरेवाट झाली ... शेवटी एकदा एका पेटत्या चिडीनी दुसऱ्या मजल्यावरचा एक कंदील अर्धवट पेटवून दिल्यामुळे गरमागरमी होऊन चिड्या पेटवणं बंद पडलं आणि फक्त ऍटमबॉम्ब्स उरले. ते मात्र बरीच वर्ष चालू राहिले ... अगदी शेवटी त्यांची हजार किंवा दोन हजाराची परेड धडधडायची आणि मग त्यांचे फटाके आणि भाऊबीज-दिवाळी एकदमच संपायची ...
त्यावेळेला विचार तसे ऑर्गनाइज्ड नसल्यामुळे तितकंसं लक्षात आलं नाही पण आता विचार केल्यावर असं वाटतं की होळीमध्ये शिव्या घालण्यामागे आणि बोंब मारण्यामागे जो विचार होता तसाच काहीसा विचार फटाके वाजवण्यामागे असावा ... म्हणजे कसा; तर ... दांडगाई करणाऱ्या शत्रुपक्षातल्या मुलांच्या बाबतीत दुबळ्या मुलांच्या मनात जो राग असतो तो व्यक्त करण्यासाठी दाणकन आपटीबार फोडतांना त्या पोरांना उचलून आपटल्यासारखं वाटणं, मोठ्या व्यक्तींनी केलेला अभ्यास आणि व्यायाम करण्याचा उपदेश किंवा तत्सम उपदेश फुस्सकन हवेत उडवून लावण्यासाठी अनार पेटवणं, आईबाबांचा किंवा मोठ्या व्यक्तींचा राग आला तरी काहीच करता न आल्यामुळे भुईचक्रासारखं पेटून जागच्याजागी गरगरत बसणं, दुश्मन मुलांच्या बुडाखाली पेटवतोय अशी कल्पना करून घेऊन दणदणीत ऍटमबॉम्ब फोडणं, वगैरे वगैरे ... असो.
भाऊबीजेनंतर एकही फटका वाजवायचा नाही हा माझा आणि बहुतेक सर्वांचा शिरस्ता होता ... त्यामुळे भाऊबीजेनंतर तुरळक फटाके वगळता दिवाळीचं कवित्व फक्त घरोघरचा फराळ आणि दिवाळी अंकांचं वाचन संपेपर्यंतच उरत असे.
फोटो - गुगलच्या सौजन्याने -
@प्रसन्न सोमण.
२२/१०/२०१९.
प्रसिद्धी - अभूतपूर्व (ऑक्टोबर २०१९)
प्रसिद्धी - अभूतपूर्व (ऑक्टोबर २०१९)