Friday, 3 May 2019

--- काव्यप्रेमी रसिकांसाठी एक प्रेमसंदेश ---

https://www.youtube.com/watch?v=GQ4hzCd-oU4

--- काव्यप्रेमी रसिकांसाठी एक प्रेमसंदेश ---


काव्यप्रेमी रसिकजनहो,

कोणे एके काळी समाजमाध्यमावरील आमच्या परिचयाच्या; सुजाण सभासदांच्या; एका समूहावर एक 'कविता पानोपानी' नावाचा खूप सुंदर उपक्रम राबवला जात असे. त्यामध्ये अत्यंत नावाजलेल्या कविंच्या अतिशय अप्रतिम अशा कविता घेऊन, समूहातील काही रसिक विचारवंत सभासद या कवितांचे अत्यंत सुंदर प्रकारे निरूपण, रसग्रहण करीत असत ... त्यायोगे वाचकांना या कवितांच्या सरळ उमगणाऱ्या काव्यार्थाबरोबरच काही न उमगणारा गुह्यार्थही - ज्यांस आंग्ल भाषेत 'रिडींग बिटवीन द लाईन्स,' असा शब्दप्रयोग आहे - खूप सुलभ सोप्या भाषेत समजावून सांगितला जात असे ... असे रसग्रहण करणारे सुविद्य सभासद एक प्रकारे श्री समर्थांच्या 'शहाणे करून सोडावे सकल जन' या आदेशाचे पालनच करीत असत. (हे आमच्या हृदयाच्या तळापासून आलेले अत्यंत सरळ असे विधान आहे. त्यामुळे उगीचच हे 'औपरोधिक विधान' असल्याची शंका मनामध्ये आणण्याचे यत्किमपि कारण नाही.)   ... या स्तुत्य उपक्रमामध्ये वेळोवेळी आम्हीही यथाशक्ती परंतु त्याहीपेक्षा आमच्या अल्पमतीसह सहभागी झालेलो होतोच ... त्यामुळे पुनरपि सांगतो की हा उपक्रम अत्यंत अभिनंदनीय होता व तो आम्हांस अत्यंत प्रिय होता ...

काही कालांतराने आज आम्ही असा विचार करीत आहोत की या उपक्रमाच्या सद्हेतुच्या पवित्र पालखीला आम्हीही आमचा छोटासा हातभार लावावा. (वाक्यात अगोदर 'पवित्र' असा शब्द असला तरीही 'खांदा द्यावा' असा शब्दप्रयोग आम्हांस काहीसा अनुचित भासल्यामुळे आम्ही 'हातभार लावावा' असा शब्दप्रयोग वापरला आहे.)

रसग्रहण करण्यासाठी आम्ही निवडलेली कविता ही आमचीच आहे ... यामागे आमचा विचार एवढाच आहे की नामवंत कविंच्या सुंदर सुंदर काव्यरचनांचं आजवर अनेक धुरिणांनी, विचारवंतांनी अप्रतिम असं रसग्रहण केलेलंच आहे व पुढेही हा सिलसिला चालू राहील ... परंतु आमच्यासारख्या उपेक्षित कविंची तितकीच उपेक्षित परंतु उल्लेखनीय काव्यरचना उपेक्षेच्या अंधारातच नामशेष व्हावी, हे काही योग्य नव्हे.  म्हणून अशा रचनांना समाजात प्रकाशात आणण्याचं कार्य त्या त्या कविंनीच करावं, अशीच आमची मनोधारणा आहे. शिवाय त्या त्या कविनी स्वतः केलेल्या कवितांचा अर्थ त्या त्या कविइतका आणखी कोणाला समजू शकणार ? ... त्यामुळे पुढे वाचकांवर हे कार्य न सोपवता स्वतः कविनीच आपल्या कवितेचं रसग्रहण करावं, हीच आम्हांस अत्यंत योग्य अशी विचारधारा वाटते.

आम्ही निवडलेली कविता आहे -

- गुज माझ्या अंतरीचे -

गुज माझ्या अंतरीचे तुला कधी उमजेल का
सांजवेळी या स्वराने तव उशी भिजेल का !!
अवसेची खिन्न रात काजळी भरली मनात
तिमिरातून अवचित ही चांदणी उगवेल का !! १ !!
वणव्यातील ही परीक्षा सोबतीची मला प्रतीक्षा
पोळल्या मनावरी या मृग कधी बरसेल का !! २ !!
एकरंगी ही विशाल पोकळी मज साहवेना
इंद्रधनू प्रीतीचे तुझ्यासवे सजेल का !! ३ !!

कवि - प्रसन्न सोमण.

कविता वाचल्यानंतर बहुसंख्य रसिकांची कल्पना, ही प्रेमकविता आहे, अशीच होईल याची आम्हांस नम्र जाणीव आहे. त्यामध्ये फार काही गैर आहे अशातलाही भाग नाही ... परंतु बारकाईने पाहू जाता, हा गझल या काव्यवृत्तामध्ये केलेला एक अभंग आहे, हे लक्षात आल्याशिवाय राहणार नाही अशी आमची स्वतःची भावना आहे. ... महाराष्ट्राच्या गौरवास्पद संतपरंपरेचा आम्हास यथार्थ अभिमान आहे त्याचप्रमाणे या संतांनी केलेल्या अभंगांप्रतीही आमची अविचल निष्ठा आहे, हे तर खरंच. याच भावनेतून सदर अभंगाचा जन्म झालेला आहे ... सदर रचना म्हणजे 'अभंग' आहे ही गोष्ट प्रथमवाचनी चटकन बहुसंख्य वाचकांच्या लक्षात येणार नाही; हे नक्की ... परंतु त्याचं एकमेव कारण अभंगाच्या अंत्य-चरणामध्ये 'प्रसन्न' हे नांव वा 'प्रसन्न म्हणे' असे शब्द आलेले नाहीयेत; एवढंच आहे ... वास्तविक आधुनिक काळामध्ये असंख्य रचनाकारांनी अभंगरचना स्वतःच्या नावाचा सुगावा लागू न देता केलेल्या आहेत. उदाहरणार्थ 'आधी बीज एकले, बीज अंकुरले रोप वाढले,' 'निजरूप दाखवा हो हरि दर्शनास द्या हो,' 'देव देव्हाऱ्यात नाही देव नाही देवालयी,' इत्यादी ... आम्हीही याच आधुनिक रचनाकारांचे गतानुगतिक आहोत.

पूर्वरंग म्हणून या रचनेसंबंधीचे इतुके निरूपण केल्यानंतर आम्ही आता आम्ही प्रत्यक्ष रसग्रहणाकडे वळतो आहोत ...   
          
गुज माझ्या अंतरीचे तुला कधी उमजेल का
सांजवेळी या स्वराने तव उशी भिजेल का !!

सरलार्थ - हे प्रिये, हे माझे अंतःकरण तुजविषयीच्या प्रेमाने ओतप्रोत भरलेले आहे, हे माझ्या अंतःकरणाचे गुपित तुला (आता तरी) समजेल काय ? ... या संधीकाली तुझ्या प्रेमविव्हल प्रार्थनेकरिता मी हा जो स्वर लावलेला आहे, त्यातील कारुण्यामुळे तुझ्या नयनांमध्ये प्रेमाश्रू येऊन तुझी कोमल उशी भिजेल काय ?

गुह्यार्थ - हे दयाघन परमेश्वरा, तुझ्या भक्तीविषयी माझिया चित्तात जो आंतरिक उमाळा आहे त्याचे तुला आकलन होईल काय ? तुझिया दर्शनाचा लाहो माझ्या चित्तात अनावर झाल्याकारणाने प्रार्थनेकरिता मी जो हा स्वर लाविला आहे त्यामुळे तरी, मजविषयी उपेक्षेच्या प्रगाढ निद्रेमध्ये असणाऱ्या तुझी उशी मजविषयीच्या अनुकूलतेमुळे थोडी तरी भिजेल काय ?

अवसेची खिन्न रात काजळी भरली मनात
तिमिरातून अवचित ही चांदणी उगवेल का !! १ !!

सरलार्थ - हे प्रिये, तू माझी जी उपेक्षा करीत आहेस त्या उपेक्षेमुळे ही रात्र मला अमावास्येच्या रात्रीसमान काळोखी व खिन्न मनःस्थितीतली भासत आहे ... माझ्या अंतःकरणामध्ये नैराश्यरूपी काजळी भरून वाहत आहे ... या अमावास्येच्या काजळ्या रात्रीच्या गडद अंधारामध्ये मजप्रती सुहास्यवदना होऊन अचानक तू  चांदणीसमान माझ्या नजरेसमोर उगवशील काय ?

गुह्यार्थ - हे दयाघन परमेश्वरा, मजविषयीच्या उपेक्षेची जी निर्विकार भावना तुझ्या मनात आहे ती भावना मला अमावास्येच्या रात्रीसमान खिन्न मनःस्थितीतली भासत आहे ... या भावनेमुळे माझ्या अंतःकरणामध्ये नैराश्यरूपी काजळी भरून वाहत आहे ... माझ्याविषयी तुझ्या अंतःकरणात वसणाऱ्या या उपेक्षेच्या अंधारातून तू जागा होशील काय आणि तुझ्या कृपाकटाक्षाच्या रूपाने माझ्या नजरेसमोर अचानक एक प्रकाशमान चांदणी उगवेल काय ?

वणव्यातील ही परीक्षा सोबतीची मला प्रतीक्षा
पोळल्या मनावरी या मृग कधी बरसेल का !! २ !!

सरलार्थ - हे प्रिये, मजभोवताली, तुझ्या मनातील मजविषयीच्या अप्रितीचा जणू वणवाच पेटलेला आहे, जो मला जाळतो आहे. मात्र तरीही माझ्या मनातील आशेच्या अमर तंतूच्या जीवावर मी तुझ्या सोबतीची प्रतीक्षा करतो आहे. आजवर तुझ्या उपेक्षेमुळे जे माझं मन तप्त आणि पोळलेलं आहे त्यावर, तुझ्या मजविषयीच्या प्रेमाच्या वर्षावाच्या रूपाने जणू काही मृगाचीच बरसात होईल काय ?

गुह्यार्थ - हे दयाघन परमेश्वरा, तुझी कृपादृष्टी माझ्या दिशेने वळत नसल्याकारणाने जणू  माझ्या मनामध्ये पोरकेपणाचा, अनाथ असल्याचा वणवाच पेटलेला आहे परंतु तरीही अधीर होऊन मी तुझ्या कृपाकटाक्षाची अपेक्षा करतो आहे, वाट पाहतो आहे. तुझ्या कृपेअभावी तप्त होऊन तडफडत असलेल्या माझ्या मनावर तुझ्या कृपेच्या मृग नक्षत्राची बरसात होईल काय ?

एकरंगी ही विशाल पोकळी मज साहवेना
इंद्रधनू प्रीतीचे तुझ्यासवे सजेल का !! ३ !!

सरलार्थ - हे प्रिये, तुझ्या प्रीतीच्या अभावी माझ्या मनामध्ये भयंकर असं नैराश्य दाटून आलेलं आहे आणि प्रेमरूपी दृष्टीअभावी नैराश्याचा एकच काळा रंग मला दिसतो आहे आणि एकच निराश अशी पोकळी माझ्या मनामध्ये आहे, जी मला असह्य होते आहे ... माझ्या मनामधल्या या रखरखीत उन्हात तुझ्या प्रीतीच्या रूपाने मेघ बरसला तर मला दिव्य दृष्टी मिळून माझ्या नजरेसमोर इंद्रधनुष्य उमलेल ... या इंद्रधनुष्याचे अनेकरंगी मनोहारी दृश्य तुझ्या सोबतीने पहावयाचे स्वप्न मी बाळगू शकतो काय ?    
  
गुह्यार्थ - हे दयाघन परमेश्वरा, असं म्हटलं जातं की आकाशाच्या विशाल अशा पोकळीमध्ये तुझा वास आहे ... परंतु तुझ्या मनामध्ये माझ्याविषयी आजवर उपेक्षाच असल्याकारणाने नैराश्यामुळे ही एकाच उदास रंगाची पोकळी मला अत्यंत त्रासदायक वाटते आहे. मात्र तरीही तू जर मला तुझ्या कृपेचा प्रसाद देशील तर हीच उदास पोकळी मला आनंददायी वाटू शकेल; इतकेच नव्हे तर या एका रंगातून माझ्या नजरेला अनेकरंगी इंद्रधनुष्य भासमान होईल ... तुझ्या मनात माझ्याविषयीच्या अचानक उफाळून आलेल्या प्रीतीमुळे 'सदासर्वदा देव सन्निद्धआहे' या समर्थोक्तीनुसार मी तुझ्यासमवेतच या अनेकरंगी इंद्रधनुष्याचे मनोहारी रंग न्याहाळू शकेन. तरी अशा प्रकारचे स्वप्न मी पाहू शकतो काय ?


-------


ज्ञानेच्छू जनहो, आमच्या परीने आम्ही आमच्या काव्याचे सरलार्थ आणि गुह्यार्थ असे दोन्ही अर्थ आपणांस उलगडून दाखवून आपल्या ज्ञानात भर घातलेलीच आहे ... अर्थात आम्ही म्हणजे काही सर्वज्ञ नव्हे याची आम्हांस अत्यंत नम्र जाणीव आहे ... त्यासोबतच आम्हांस याचीही कल्पना आहे की, सुदैवाने आपल्या समाजात ज्ञानी माणसांची मुळीच कमतरता नाही. त्यामुळे याच ज्ञानाचा सदुपयोग करून याच कवितेचे आणखीही काही अर्थ निघणे शक्य आहे, हेही आम्ही जाणतो. तरी ज्यांना कोणाला आम्ही दिलेल्या अर्थांच्या व्यतिरिक्त आणखी काही अर्थाचे/अर्थांचे आकलन होत असेल त्यांना विनंती आहे की कृपया आमच्याशी व्यक्तिगत संपर्क साधून आम्हांस तो अर्थ कळवावा ... आमचा संचार समाजमाध्यमांवर सर्वत्र असतोच ...       

काव्यप्रेमी रसिकहो ! आमच्या विपुल काव्यसंपदेच्या रत्नहारामधील एक दुर्मिळ आणि अत्यंत दीप्तिमान असं रत्न आम्ही आज नमुना म्हणून आपल्यापुढे उलगडून दाखवलेलं आहे ... आमच्या विपुल व रम्य काव्यसंपदेचा संपूर्ण रत्नहार पाहण्याचे भाग्य आपणांस प्राप्त करून घ्यावयाचे असल्यास कृपया आमच्याशी व्यक्तिगत संपर्क साधावा ... आम्ही पुनरुच्चार करितो की, आमचा संचार समाजमाध्यमांवर सर्वत्र असतोच ...

आपल्या सुलभतेकरिता आम्ही आमच्या याच उपरिनिर्दिष्ट काव्यरचनेचे ध्वनिमुद्रणही यासोबत डकवित आहोत ... कृपया आस्वाद घ्यावा ... त्याचप्रमाणे आमच्या इतरही काही काव्यरचनांचा रसास्वाद घेण्यात आपणांस जर रस असेल तर, 'यु ट्युब' नामक संकेतस्थळावर आंग्लभाषेत prasannasoman असा शोध घेतल्यास आमची यु ट्युब वाहिनी उपलब्ध होऊन आपणांस रसास्वाद घेता येईल ... तसेच या वाहिनीसोबतची आंग्लभाषेतील subscribe नामक गुंडी आपण दाबल्यास आमच्या निवडक आगामी रचनांचा रसास्वादही आपणांस भविष्यात घेता येईल ...

जाणिजे .... इति लेखनसीमा ...


आपला कृपाभिलाषी,


@प्रसन्न सोमण.
दिनांक - ०२/०५/२०१९.


https://www.youtube.com/watch?v=GQ4hzCd-oU4