-- धारदार प्रतिभा --
मोबाईल वाजला ... अनोळखी नंबर ...
"हॅलो."
"हॅलो ... तुमचा परवाचा त्या अमक्यातमक्या मासिकात छापून आलेला लेख वाचनात आला ... मला हे मान्य केलंच पाहिजे की तुमचा हा लेख साधारण बरा आहे" ...
"ओह थँक्यु ! ... सर आपलं काय नांव ?"
"काही काळजी करू नका ... माझं नांव मी सांगणारच आहे ... ओळख लपवून उगाच फोन करणाऱ्यांपैकी मी नाही ... तर मी काय सांगत होतो ? ... हो ... तुमचा लेख साधारण बरा आहे ... मी मुद्दामच अगदी उत्कृष्ट म्हणणार नाही ... कारण तुमच्या लिखाणात अजून सुधारणेला खूपच वाव आहे" ...
"मान्य आहे सर, पण प्लिज आपण कोण बोलताय सांगा ना !"
"अहो साहेब एवढे अधीर होऊ नका ... ठीक आहे नावावाचून अगदी अडलंच असेल तर सांगतो ... माझं नांव अमकंतमकं" ...
"ओके सर ... नमस्कार आणि थँक्यु सुद्धा" ... नकळत माझ्या आवाजात समारोपाचा सूर घरंगळला ... तो त्यांनी काकदृष्टीनी टिपला असावा ...
"ऐका हो साहेब ! ... मी मुद्दाम तुमचं कौतुक करण्यासाठी आवर्जून फोन केलाय ... यापूर्वीही मी सोशल मीडियावर तुमचं लिखाण वाचलंय ... प्रयत्न केलात तर तुम्ही खूप मान्यवर लेखक होऊ शकता" ...
आता कौतुक करण्यासाठी मी आवर्जून फोन केलाय असं ते म्हणत तर होते; पण लेखाला 'साधारण बरा' असंही म्हणत होते ... बोलण्यातला टोन तर तद्दन 'टीकाकार'सदृश जाणवत होता; त्यामुळे हे निखळ कौतुक नसून स्वतःचीही साहित्यविषयक तज्ञता दर्शवण्याचा प्रकार असावा, असा रास्त संशय मला आला ... बोलणं लवकर गुंडाळून टाकावं असं वाटलं; पण तरीही ... माझ्याकडे
वेळ होता, आणि बोलण्यात तरी मला आदर दाखवून माझ्याच लिखाणासंबंधी संवाद (?) होत होता त्यामुळे मी (निष्कारण) बोलणं चालू ठेवायच्या मोहात अडकलो ... शिवाय ते आता मला लेखक म्हणतातच आहेत तर, लेखकांनी नेहमी निरनिराळे अनुभव घ्यावेत, निरीक्षणशक्ती तरल ठेवावी, वगैरे वाचीव माहितीवर विसंबून राहून मी बोलणं चालूच ठेवलं ... हाच तो अफलातून अनुभव ...
"छे हो सर ! मान्यवर लेखक वगैरे कसलं ? वेळ असला आणि लिहावं अशी उर्मी आली की काहीतरी खरडत असतो झालं" ...
"हां हां साहेब ! ... इथेच तुमचा दृष्टिकोन साफ चुकतोय ... मी मूकपणे अवलोकन केलंय की या पूर्वीचं तुमचं लिखाण मी फक्त सोशल मीडियावरच वाचलंय, मग आता मासिकात छापील स्वरूपात तुमचा लेख कसा आला ?"
"अहो सर, त्या मासिकाच्या संपादक महोदयांनी सोशल मीडियावर वाचून, माझा नंबर शोधून, मला विचारणा केली आणि मीही 'जरूर छापा' म्हणून परवानगी दिली. नाहीतरी जुन्या काळच्या, दुर्मिळ रेकॉर्ड्सच्या कलेक्टर्स प्रमाणे माझा लेख मी माझ्याच कडीकुलुपात ठेवण्यासाठी थोडाच लिहिला होता !"
"म्हणजे बघा आता तुम्हीच ! ... झाकलं माणिक तसं लपून राहत नाही, ते प्रकाशमान होणारच ... मी योग्यपणे आणि नीटपणे असं निरीक्षण केलेलं आहे की लेखक म्हणून तुमच्यात एक अगदी सुप्त पण तितकीच सुस्पष्ट अशी प्रतिभा आहे ... आता परवाचाच लेख घ्या ... तुम्ही सहजपणे लिहून गेलाय की" ... असं म्हणत माझ्या लेखातली दोनतीन बरी वाक्य त्यांनी फोनवर मला ऐकवली ... असं करता करता माझा अख्खा लेख हा गृहस्थ फोनवर मलाच ऐकवतो की काय, या भयाने भंजाळून मी अभावितपणे घड्याळाकडे नजर टाकली ... त्यांचं चालूच होतं ... "या दोनतीन वाक्यांत तुमच्यातली प्रतिभा लक्षात येतेच ... फक्त त्या प्रतिभेचं संगोपन जाणीवपूर्वक व्हायला हवंय" ... इथेच माझ्यातल्या लेखकाच्या 'साफसफाई'ला सुरुवात झाल्याचं मला अगदी स्पष्टपणे जाणवलं ...
"अहो खरंच प्रतिभा वगैरे मोठे शब्द मला काहीही कळत नाहीत हो ! मी आपलं सुचतं आणि योग्य वाटतं ते लिहीत असतो झालं !"
"नाही नाही नाही ! ... अगदी त्रिवार नाही ... हा मुळी अस्सल साहित्यिकाचा दृष्टिकोन असूच शकत नाही ... आणि तुमच्यामध्ये प्रतिभा आहे की नाहीये हे ठरवण्याचा अधिकार तुमचा नाही; तो आमचा आहे ... त्यामुळे कृपा करून असा उथळ स्वरूपाचा विचार चुकूनसुद्धा करू नका ... याउलट तुम्हाला अगदी जाणीवपूर्वक सुस्पष्ट प्रयत्न करून तुमच्यातल्या लेखकाला आकार द्यावा लागेल ... स्वतःचं लिखाण स्वतःच परतपरत वाचून, आपल्याला अजून यात काय सुधारणा करता येईल, याचं आत्मपरीक्षण करत जावं" ...
ही काहीतरी वरकरणी स्तुतीसारखी दिसणारी हेटाळणी चाललीय की काय, असा विचार माझ्या मनाला नक्कीच चाटून गेला ... त्यामुळे कुठेतरी स्वतःहून पिंजऱ्यात अडकल्यासारखा ...
"ओके सर" ... माझा हताशोद्गार ...
"कृपया नुसतं ओके म्हणू नका ... उत्कृष्ट साहित्याविष्कारासाठी स्वप्रयत्न हे मुख्य आणि जरूर करायलाच हवेत ... जयवंत दळवींसारख्या विख्यात साहित्यिकाचं उदाहरण घ्या ... स्वतःचं लिखाण पुन्हापुन्हा वाचून त्यातल्या सुधारणेसाठी प्रयत्नशील राहून ते सतत आपल्या लेखनाच्या सुधारणेच्या विचारात गढलेले असत, असं त्यांनी स्वतःच लिहून ठेवलेलं आहे" ...
"अहो सर, जयवंत दळवी कित्ती मोठे साहित्यिक ! ... त्यांच्याशी माझ्यासारख्याची कसली तुलना करताय ?" ... दळवींच्या आदरापोटी माझ्या स्वरात नकळतपणे अजीजी आली ...
"अहो साहेब तुम्ही परतपरत तीच तीच चूक का करताय ?" त्यांचा आवाज त्रासलेला झाला ... "मी स्वतः अगदी छातीठोकपणे सांगतो - तुमच्या लिखाणामध्ये तस्साच प्रतिभेचा वावर जाणवतोच" ...
"अहो सर, माझी प्रतिभा वगैरे खरंच मला काहीही जाणवत वगैरे नाही हो ... मी आपला लिहीत जातो, बस्स !"
"साहेब, सुप्त प्रतिभेचं हेच तर वैशिष्ट्य आहे ... तुमच्या लिखाणात तुमची प्रतिभा दिसतांना तुमची परवानगी मागत नसते ... ती आपोआपच डोकावते ... तुम्ही लिहितांना अभावितपणे काहीकाही अगदी नितांत सुंदर उपमा देता तेव्हा ती प्रतिभा दृग्गोचर होते ... फक्त दुर्दैव एवढंच आहे की हे अभावितपणे घडतंय हे जाणवतंय ... तसं न होता ते प्रयत्नांती, जाणीवपूर्वक व्हायला हवंय ... तुम्हाला स्वतःलाच तुमच्या प्रतिभेला धार काढावी लागेल" ...
"अहो पण सर, तुमच्या म्हणण्याप्रमाणे ती प्रतिभा माझी परवानगीच न मागता आगंतुकपणे डोकवत्येय आणि मला समजतच नाहीये, असं असतांना मी त्या प्रतिभेला जाणीवपूर्वक धार कशी काढणार ?" ... शाळेत लास्ट बेंचवरचा ढ विद्यार्थी मास्तरांना अभ्यासातला प्रश्न विचारतांना काढेल, अगदी तस्सा माझा आवाज मलाच जाणवत होता ... गंभीर संवादातला माझा पेशन्स अगदीच रसातळाला गेला होता ... हा म्हणजे पोटभर जेवून तडस लागलेली असतांना यजमानीणबाईंनी आग्रहानी अजून चार जिलब्या जबरदस्तीनी पानात वाढाव्यात, तसा प्रकार झाला ... बापरे ! ... उपमा आली म्हणजे इथे ती शिंची प्रतिभा अभावितपणे डोकावलीय की काय ? ... नाही म्हटलं तरी मी काँशस झालोच ... तरी बरं ... हा सगळा संवाद चालू असतांना सौ.ची आत स्वयंपाकघरात कामं चालू होती, नाहीतर ... 'जळ्ळ मेलं ते लिखाण ... बाहेरची चार कामं करा म्हटलं तर ते नाही, घरातल्या दोन बारीकसारीक कामांत मला मदत करा म्हटलं तर ते नाही; आणि कॉम्प्युटरच्या कीबोर्डवर बोटं आपटत बसले काहीतरी खरडत ... रिकामपणचे उद्योग नाहीतर,' ... असं अगदी प्रत्यक्षात बोललं नाही तरी तसलाच काहीसा खत्रूड चेहरा करत, 'तिकडून पाय आपटत स्वयंपाकघरात जाणं झालं असतं' ...
"साहेब, महत्वाचं सांगायचंय ते हेच की प्रतिभेला जागं करण्याची ही प्रक्रिया तुमची तुम्हालाच उघड्या डोळ्यांनी शिकावी लागेल, घडवावी लागेल” ... तोकड्या आभऱ्यामध्ये मोठी उशी दाबून दाबून कोंबावी, त्याप्रमाणे माझ्यामध्ये प्रतिभेला कोंबण्याच्या या त्यांच्या उद्योगामुळे माझ्या मनःशांतीची शिवण मात्र नाहक उसवत होती. (निघाली वाटतं थोडीशी धार !) ... “तुमचं कौतुक करण्याबरोबरच याबाबतीत तुमचं शिक्षणही करावं या उदात्त हेतूनीच तर मी आवर्जून तुम्हाला हा फोन केलाय" ...
या नंतर मी सोमण म्हणजे कोण, कोकणातलाच ना, कुठल्या गावचा, वगैरे संवादांवर गाडं आलं आणि तिकडून समारोपाची वेळ ‘नजीक’ आलीय, हे मी ओळखलं ... शेवट करतांना मीही थोडा भावनोत्कट होऊन म्हटलं ...
"खूप खूप धन्यवाद सर ! तुम्ही आवर्जून माझं कौतुकही केलंत आणि तुमचा अगदी मूल्यवान वेळ खर्ची घालून मला उत्कृष्ट साहित्यिक कसं होता येईल, याबाबतीत माझं शिक्षण घेऊन मला बहुमोल असं मार्गदर्शन केलंत ... खरंच थँक्यु ... फक्त एकच विचार मनात येतोय सर, तुम्हाला ते अमकंतमकं आडनांव तितकंसं शोभत नाही. त्याऐवजी तुमचं आडनांव नाडकर्णी किंवा कुलकर्णी असतं तर किती छान झालं असतं, नाही !"
पटकन पलीकडून फोन कट झाला ...
आज आठवडा झाला या फोनला; पण त्यानंतर माझी रात्रीची झोप अत्यंत विस्कळीत झालीय ... म्हणजे तशी झोप लागते, पण स्वप्नात हमखास विळ्या-कात्र्यांना धार लावणारा धारवाला दिसतो, कानांत धार लावण्याच्या मशीनचा आवाज चिरचिरतो ... आणि मला दचकून जाग येते ... शेवटी नाइलाजानी आज ऑनलाईन कुठे धार लावण्याचं मशीन विकावु आहे का, याचा धांडोळा घेतला, पण दिसलं नाही ... तुमच्या ओळखीत आहे का कुणाकडे धार लावण्याचं विकावु मशीन ?
@प्रसन्न सोमण.
०६/११/२०१९.
फोटो - इंटरनेटच्या सौजन्याने.