- एका अद्भुत पण मरणोन्मुख यंत्रास समर्पित -
(टेपरेकॉर्डर संबंधीच्या आणि तदनुषंगिक अशा या माझ्या आठवणी आहेत ... सिनियर मंडळींना यात भरपूर नॉस्टेल्जीया सापडेल; तर २४ तास चालणारा केबल टीव्ही, सीडीज आणि सीडी प्लेअर, कॉम्प्युटर आणि इंटरनेट, अमर्याद ऑडियो-व्हिडियो डाटा, वगैरेंच्या जमान्यात वाढलेल्या पिढीला कदाचित मनोरंजक इतिहास सापडेल.)
'देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा' .... 'बाल-आवाजी'त आणि एकाच हाताने हातवारे करत मी गात होतो. दुसऱ्या हातामध्ये तोंडाजवळ धरलेली आणि बारीक वायर लावलेली छोट्या काड्यापेटीसारखी मायक्रोफोन नावाची एक वस्तू होती. ही वस्तू; फिरत असलेली दोन गोल चक्र असणाऱ्या एका यंत्राला जोडलेली होती ... त्या अति-जुन्या स्पूल टेपरेकॉर्डर या यंत्राला ... कॉलनीत गुरुवारच्या भजनी मंडळामध्ये, किंचित कम्प असलेल्या पण भक्तिभाव असलेल्या आवाजात, भजनं सांगणाऱ्या गानप्रेमी लिमये काकांनी टेपरेकॉर्डर विकत घेतल्यावर बऱ्यापैकी गाणारा पोरगा म्हणून मला हौसेनी न्योता धाडला होता ... माझं गाणं रेकॉर्ड करून ऐकवायला ... माझं ‘देहाची तिजोरी’ संपल्यावर पटकन खटका दाबून काकांनी चक्र थांबवली व खोलीतली शांतता भंग झाली ... "आता ऐकुया हं !" ... असं काकांनी माझ्या आई बाबांसहित उपस्थित असलेल्या इतरही दहा बारा श्रोत्यांना सांगितलं ... चक्र मागे घेऊन पुन्हा सुरु केली आणि काय आश्चर्य ... माझं 'देहाची तिजोरी' छानपैकी ऐकायला यायला लागलं ... (आधीपासून मला खात्री होतीच की मी छान गातो
. असो.) ... तसा त्याही पूर्वी एकदा हा स्पूल टेपरेकॉर्डर ऐकला होता ... 'पडोसन' मधलं 'एक चतुर नार करके सिंगार' हे एकदम मजेशीर गाणं; शेजारच्या ओगल्यांच्या नातेवाईक असलेल्या मोरूमामा बेलसरेंनी आम्हा पोरासोरांना स्पूल टेपरेकॉर्डरवर दोनचार वेळा तरी ऐकवलं होतं ... मात्र 'देहाची तिजोरी'च्या वेळी टेपरेकॉर्डरवर स्वतःचं टेप केलेलं ऐकण्याची पहिलीच खेप होती. साधारण अंदाज बांधायचा तर ही १९७१-७२ मधली गोष्ट असावी ...
वर्ष जातच होती ... ३/४ वर्षात कॅसेट टेपरेकॉर्डर नावाची वस्तू बघायला मिळाली ... त्याचाही किस्सा तसा माझ्यासाठी खासच आहे ... माझा अविनाश नावाचा गिरगावातला आतेभाऊ एअर इंडियात होता ... त्यावेळी समाजात 'इंपोर्टेड' वस्तूंची विलक्षण क्रेझ असल्यामुळे तो दुबई, सिंगापूर, हॉंगकॉंग सारख्या ठिकाणी वारंवार जाऊन तिथून या वस्तू तो कोणाकोणाकरता आणत असे ... आमचं पार्ला, एअरपोर्टच्या जवळ पडत असल्यामुळे अविदादा मध्येच रात्री अपरात्री एअरपोर्टवरून थेट आमच्याकडे येत असे ... दुसऱ्या दिवशी आईला आणि मला तो तिकडची खरेदी दाखवत असे ... या खरेदीतच त्यानी एक नॅशनल पॅनासॉनिकचा मस्त कॅसेट टेपरेकॉर्डर दाखवला. त्यासोबत असलेली पॉप म्युझिकची डेमो कॅसेट वाजवून दाखवली ... हिरव्या गार रंगाच्या कव्हरवर सील असलेल्या सोनीच्या ब्लॅंक कॅसेट्स सुद्धा दाखवल्या ... ४५ मिनिटांची एक साईड आणि दोन बाजू मिळून दीड तास चालणारी एक कॅसेट असते, वगैरे माहितीही सांगितली .... माझी आई गायिका आणि पेटीवादक होती आणि मलाही संगीत श्रवणाच्या रोगाची लागण होऊ लागली होती ... त्यामुळे बाकी कशाहीपेक्षा तो टेपरेकॉर्डर बघून आणि ऐकून माझी आई हरखली आणि मी सुद्धा वेडापिसा झालो ...दोनचार दिवस तर टेपरेकॉर्डर शिवाय दुसरं काही सुचेना ... आईनं काळवेळ बघून हळूच बाबांकडे टेपरेकॉर्डरची गोष्ट काढली ...
"एवढ्या घाईनं तो टेपरेकॉर्डर कशाला हवाय ? रेडियो ऐकतोच आहोत ना आपण ? त्यातून प्रसन्नचं दहावीचं वर्ष येतं आहेच ... घाई नको ... सवडीनं अंदाज बांधून आपण टेपरेकॉर्डर घेऊ !" या दोन-तीन वाक्यात बाबांनी विषय संपवला ... त्याहीनंतर दीडेक वर्ष गेलं ... आईभवानीच्या आशीर्वादानं मी दहावीच्या संकटातनं फक्त हातीपायी धडपणे नव्हे तर यशस्वीरीत्या सुटलो. दरम्यान दोनतीन शेजाऱ्यांकडे नवीन टेपरेकॉर्डर्स आले ... मला आठवतंय की माझ्या शेजारी मित्राकडे टेपरेकॉर्डरवर त्यावेळी नवीनच गाजत असलेली 'हम किसीसे कम नही' मधली गाणी चिक्कार वेळा ऐकली ... विशेषतः कॉम्पिटिशन सॉंग वर तर आम्ही बेहद्द खुश होतो ... आजही मला ही गाणी आवडतातच ...
शेवटी १९७७ च्या दिवाळीपूर्वी बायको मुलांच्या आग्रहापोटी आपल्याला टेपरेकॉर्डर घ्यावा लागणारच याची बाबांना जाणीव झाली. टु इन वन घ्यायचं ठरलं आणि मग कोणता घ्यायचा हा विषय चर्चेला आला .... दादाचं आणि माझं 'नॅशनल पॅनासॉनिक'चाच घ्यावा असं नम्र सांगणं होतं ... अर्थात निर्णय घेणारी फायनल ऍथॉरिटी फिक्सडच होती .... त्याच दरम्यान 'बुश'चा भारतीय बनावटीचा आणि अर्थातच स्वस्त टु इन वन बाजारात आलेला होता ... साहजिकच १९७७ च्या दिवाळीच्या जरा आधी तो आमच्या घरात आला ... बुश तर बुश, पण कोरा टु इन वन घरात आला .... हें नाचों रे ... हें नाचों रे ! ... टु इन वन घरात म्हणजे स्वाभाविकपणे माझ्याच हातात आला ... कारण मातोश्रींना ते तंत्र जमण्यासारखं नव्हतं, बाबा आणि दादा नोकरीला ... मीच फक्त कॉलेजात म्हणजे जवळ जवळ घरातच ... टेपरेकॉर्डर बरोबरच बाबांनी दहा सोनीच्या ब्लॅंक कॅसेट्स आणल्या होत्या ... आधीच तबलजी आणि संगीतप्रेमी असा मी, त्यातही सोळावं वरीस; त्यामुळे उत्साह म्हणजे अगदी ओसंडून वाहत होता. अविदादानी सुद्धा आम्हाला, त्यावेळी कल्पनेच्या बाहेर गाजलेला किशोरी ताईंचा 'सहेला री'वाला भूपाली; प्रभाताईंचा 'जागु मै सारी रैना' वाला मारुबिहाग, कलावती; शिवकुमार-झाकीरची कॅसेट, बिस्मिल्लांच्या शहनाईची कॅसेट अशा काही कॅसेट्स आमच्या ब्लॅंक कॅसेट्स वर आम्हाला रेकॉर्ड करून दिल्या होत्या ... त्यानंतर माझा आणि मित्राचा टेपरेकॉर्डर आणि ‘ऑक्स-इन’ची ऑडियो वायर अशी सगळी सामग्री जमवून मी ओ.पी. ची गाणी; एस.डी.बर्मन ची 'गाईड' मधील गाणी; 'हम किसीसे कम नही' मधली गाणी, अशा काही कॅसेट्स रेकॉर्ड करून घेतल्या ...
टेपरेकॉर्डर यायच्या पूर्वी
घरात रेडियो चालू असायचाच ... आधी-आधी आई आणि थोडं नंतर दादा, चांगलं गाणं रेडियोवर
लागलं की धावत रेडियोजवळ येऊन रेडियोच्या फळीवर ठेवलेले कागद आणि पेन्सिल घ्यायचे आणि
गाणं घाईघाईत उतरवून घ्यायचे ... काही शब्द मिस झाले तर, परत तेच गाणं रेडियोवर कधी
लागेल, या वासावर असायचे ... पोरवयात मीही दोनचार गाणी उतरवली असतील पण लहान असल्यामुळे
माझ्या लिखाणात तेवढा स्पीड नसायचा ... पण टु इन वन आल्यावर त्याच पद्धतीने मीही दबा
धरून बसल्यासारखा वासावर असायचो व चांगली गाणी; अल्लारखा, तिरखवाँ, सामताप्रसाद, सारख्यांचा
सोलो तबला; भीमसेन, कुमार, सारख्यांचं शास्त्रीय संगीत; यातलं काहीही रेडियोवर लागल्या
लागल्या टेप करून घ्यायचो ... बाबांना संगीतशास्त्र कळलं नाही तरी संगीत ऐकण्याची आवड
होतीच ... त्यामुळे सुरुवातीला तरी काही काळ, थोडा हट्ट केल्यावर, ते २/४ ब्लॅंक कॅसेट्स
आणून देत असत ... पुढे दादा नोकरीला लागल्यावर व.पुं,च्या कथाकथनाच्या आणि पु.लं.च्या
कथाकथन व पेटीवादनाच्या कॅसेट्स दादानी घेतल्या आणि त्यांची पारायणं सुद्धा झाली
.... चिक्कार झिजत झिजत, ३/४ वर्ष साथ देऊन मग तो बुश चा टु इन वन बिघडला; पण परमेश्वरी
लीलाच अशी अगाध की तो टु इन वन बिघडला आणि (की म्हणूनच ?) मीही नोकरीला लागलो, कमावता
झालो ... स्वप्न हेच होतं की स्वतःच्या पैशानी साधा मोनो का असेना पण 'नॅशनल पॅनासॉनिक'चा टेपरेकॉर्डर घ्यायचा आणि
तो मी तीन-चार महिन्यातच घेतलाच ... तोवर स्टीरियोज आणि डबल कॅसेट रेकॉर्डर्स बाजारात
आलेले होते ... सावकाशीने कधीतरी ही उडी सुद्धा मारायचीच असं मनाशी ठरवून टाकलं होतं.
व.पुं.च्या व पु.लं.च्या कथाकथनाच्या
कॅसेट्सच्या निमित्ताने पुण्याची 'अलुरकर म्युझिक हाऊस' नावाची पाणपोई माहितीची झाली
... पुढे मीही कमावता झाल्यानंतर पुण्याच्या कुठल्याही फेरीत 'अलुरकर म्युझिक हाऊस'ची
फेरी आणि कॅसेट्स खरेदीसाठी शक्य तेवढी रक्कम बाजूला काढणं; हे अनिवार्य झालं ... नुसत्या
कॅसेट्स जमवून उपयोग नाही तर करेक्ट इंडेक्सिंग आवश्यक असल्यामुळे मी अंगभूत आळस बाजूला
ठेवून कॅसेट्सना नंबर्स देऊन इंडेक्सिंग करून डायरीत टिपून ठेवत असे ... माझ्या लहानपणी
सिनेमातल्या गाण्यांची चतकोराच्या आकाराची पांढरी पुस्तकं (?) दहा पैशाला एक या दराने
फुटपाथवर मिळायची. ही पुस्तकं कालबाह्य होऊन पुढे पुढे फुटपाथवर बार्गेनिंग करून दहा
रुपये दराने गाण्यांच्या वगैरे कॅसेट्स मिळायला लागल्या. त्यामधूनही काही नामांकित
दर्जाच्या आणि चांगल्या कॅसेट्स मला मिळालेल्या आहेत ... पुण्याच्या 'अलुरकर म्युझिक
हाऊस' प्रमाणे मुंबईत 'ऱ्हिदम हाऊस' हीही एक कॅसेट्सची पाणपोई (परवा-परवापर्यंत) होती
.... नात्यातल्या मंडळींकडून मला विचारणा होत असे की एवढ्या कॅसेट्स कशाला जमवतोस आणि
त्या ऐकतोस कधी ? ... पण मी खरंच जमेल तेवढा काळ कॅसेट्स ऐकायचो हे एक आणि दुसरं म्हणजे
दर्जेदार कॅसेट्स जमवण्याचा माझा जो एक कैफ होता त्या कैफात असले प्रश्न मला पडतही
नव्हते आणि पटतही नव्हते ... मी नोकरीला लागण्याच्या वर्षांपासून म्हणजे १९८० पासून
ते कॉम्प्युटर्स, सीडी प्लेयर्स आणि सीडीज घरोघरी होण्याच्या काळापर्यंत म्हणजे साधारण
२००१/२००२ पर्यंतच्या २१/२२ वर्षांच्या काळात माझे किमान चार पाच तरी टेंपरेकॉर्डर्स
आणि तेवढेच वॉकमन्स वापरून झाले .... व्यवस्थित इंडेक्सींग केलेल्या कॅसेट्सची संख्यासुद्धा
बरीच वाढली ....
साधारण २००२ व त्यानंतर कॉम्प्युटर्स
घरोघरी व्हायला लागले, सीडी प्लेयर्स व सीडीज चा जमाना जोरात आला .... टेंपरेकॉर्डर्स
व कॅसेट्सना साहजिकच उतरती कळा लागली .... दिसामासानी इंटरनेटवर अपलोड होणारा ऑडियो-व्हिडियोचा
डेटा बाळसं धरायला लागला. सर्वांच्या हातात छोटा कॉम्प्युटरच म्हणता येईल असा स्मार्ट
फोन आला ... आज हळूहळू माणूस ट्वेंटीफोर बाय सेवन ऑन लाईन राहायला लागलाय ... स्मार्ट
फोन्स, स्मार्ट टीव्हीज, ऍमेझॉन स्टिक्स, अँड्रॉइड मल्टिमीडिया बॉक्सेस, भरपूर स्टोरेज
कपॅसिटीच्या रिमूव्हेबल हार्ड डिस्कस, नवनवीन डिजिटल अप्लायन्सेस ... घोडदौड चालूच
आहे ... आज तर कॅसेट्सची बातच सोडा पण सीडीज सुद्धा हळूहळू अस्तंगत व्हायला लागल्यायत.
पूर्वी 'रेकॉर्ड कलेक्टर्स'
ही विशेषतः हिंदी चित्रपट संगीत प्रेमींमध्ये ही कुतूहलाची व थोडी जेलसीची बाब होती
... 'इसाक मुजावर,' 'शिरीष कणेकर' व अन्य काही हिंदी चित्रपटसंगीतावर लिहिणाऱ्या मंडळींनी
रेकॉर्ड कलेक्टर्सबद्दलच्या त्यांच्या कुतुहलाबद्दल थोडंफार लिहिलंय ... आज सुद्धा
इंटरनेटवर कुणीही अपलोड न केल्यामुळे दुर्मिळ असलेल्या रेकॉर्डस् किंवा संगीत थोडंफार
असेलच किंबहुना आहेच; पण तरीही इंटरनेटवरच्या उपलब्धतेच्या महासागरामुळे आज या रेकॉर्ड
कलेक्टर्सची रया जाऊन त्यांना संस्थानिकांची कळा आलेली असावी, असं वाटतंय .... इंटरनेटवरच्या
अनुपलब्धतेचा प्रश्न मला तरी बराचसा जुन्या मराठी गाण्यांबद्दल जाणवतो; बहुदा प्रादेशिक
गाण्यांबद्दल असं होत असावं ... पण विशेषतः हिंदी चित्रपटसंगीतात तरी फारच थोडी अनुपलब्धता
असावी, असं वाटतंय.
तशी माझी संगीत ऐकण्याची हाव
आजही बऱ्यापैकी तशीच आहे; पण बदलत्या जमान्याप्रमाणे प्रॉब्लेम बदलत चाललाय ... पूर्वी
दुरून काही चांगले स्वर कानावर पडले की धावत येऊन रेडियो लावून आधाशाप्रमाणे ते चांगलं
संगीत ऐकलं जायचं; तर आज प्रॉब्लेम आहे तो अति-उपलब्धतेचा ... त्यामुळे आता स्वर्गीय
संगीत सुद्धा ऐकतांना ... "हँ ! त्यात काय ? हे तर केव्हाही ऐकू शकतो
..." असा काहीसा अप्रोच झालाय (पूर्वी फक्त वर्षातून एकदा दिवाळीला मिळणाऱ्या
लाडू, चकल्या, चिवडा, अशा; तेव्हा आनंदाची पर्वणी वाटणाऱ्या; पदार्थांचंही काहीसं असंच
झालंय ... त्यांचं अप्रूपच नाहीसं झालंय) ..... घटत्या उपभोग्यतेचा सिद्धांत ? ...
असो !
तसा मी काही जुन्या जमान्यात
रमणारा नाहीये ... इंटरनेटसहीत सर्व नवीन उपकरणं मी भरपूर वापरतोच ... पण तरीही निवांतपणे
संगीत ऐकायचं म्हटलं की आजही आठवण होते ती 'टेपरेकॉर्डर व कॅसेट्स'वाल्या ‘त्या’ जमान्याची
...
@प्रसन्न सोमण
२८/०८/२०१८.