n लकवा –- १०.
शीर्षक - सुख ? ... नो ... नॉटॅठोम्ब .....
"युवर गुड नेम ?"
"आनंद रमा कांबळे"
"रमा ? .... मीन्स ? ....."
"माय मदर्स नेम सर ! ...."
"आईचंच नाव लावतोस ? ..... एनी स्पेसिफिक रिझन ? ......"
"मला माझ्या आईबद्दल खूपच प्रेम आणि रिस्पेक्ट आहे सर आणि तेवढीच माझ्या बापाबद्दल घृणा .... इज देअर एनी प्रॉब्लेम बिकॉज ऑफ माय नेम सर ? ...."
"नो नो ! .... तुझं नाव कसं लावायचं तूच ठरवू शकतोस." ..... इतर एकदोन प्रश्न विचारून आणि 'नंतर कॉल करू,' असं सांगून मी त्याचा प्रिलिमिनरी इंटरव्ह्यू संपवला .....
सर्व मुलांमध्ये इंटरव्ह्यू देण्यासाठी आलेला हा आनंद कांबळे मला खूपच भावला .... हुशार ... कॉन्फिडन्ट ... सी.ए. .... दॅट टू पास्ड आऊट इन फर्स्ट अटेम्प्ट .... मनातून तर मी त्याला सिलेक्ट केला होता, आणि उत्तम पॅकेज ऑफर करायचंही ठरवलं होतं; पण म्हटलं फॅमिली बॅकग्राउंड व इतर माहितीही घेऊया ....
----------
रमाताई ... तीनचार वर्षांनी मोठी म्हणून 'ताई' एवढंच पण खरंतर मैत्रीणच ... माझ्या लांबच्या आत्याची मुलगी ..... राहायला आमच्याच कॉलनीत, पण वेगळ्या बिल्डिंगमध्ये ..... खरंतर दोन खोल्यांच्या चाळीच आमच्या; मात्र पूर्ण ब्राह्मणी वस्ती ..... कॉलनीत मुलामुलांचं एकत्र खेळणं, दंगामस्ती, दुपारचे पत्ते, असं सगळं चालायचं.... रमाताई रमेशदादा बरोबर - तिच्या मोठ्या भावाबरोबर - एकदम उत्साहात, आणि दार उघडं असलं तरीही जोरात बेल वाजवत, "मामा SS मामी SS" असं ओरडत आमच्याकडे यायची ... रमेशदादा तसा अबोल पण रमाताई भारी उत्साही आणि अल्लडसुद्धा ... ती आमच्यात नेहमी खेळायला यायची... पत्ते तिला फारच आवडायचे आणि जमायचेसुद्धा .... विशेषतः 'नॉट ऍट होम' हा डाव तिचा भारी आवडता ... तिचं ते "नो ... नॉटॅठोम्ब ...," असं उत्साहाने ओरडणं अजूनही कानात आहे ... शिवाय ती भन्नाट म्हणजे भन्नाटच सिनेमाप्रेमी होती ... अर्थात आत्याचं पूर्ण घरच सिनेमाप्रेमी .... त्याकाळात वेड्यासारखे सिनेमे त्यांनी पहिले असतील ... त्यातही राजेश खन्ना रमाताईचा जीव की प्राण ... जितेंद्रचे सिनेमे सुद्धा तिच्या आवडीचे ... 'परिचय'मधलं 'सारे के सारे रमा को लेकर गाते चले' हे गाणं ती मस्त म्हणायची आणि 'रमा' या जया भादुरीच्या नावामुळे तीच खुश व्हायची ..... 'गुड्डी' जया भादुरीला तर ती पूर्णपणे स्वतःशी रिलेट करायची ... अशी एकदम खुशमिजाज रमाताई ... पण मोठी होऊन त्याकाळात तिनी एकदम आसमंतात ऍटमबॉम्ब टाकला ... एकदम खालच्या जातीतल्या तरुणाशी लग्न करायचं ठरवलं .... आत्या, आत्तोबा व रमेशदादानी, 'रमा कुटुंबासाठी मेली,' हा निर्णय घेतला व तिला हाकलून देऊन कायमसाठी आयुष्यातून डिलीट करून टाकलं ... कोणीही मध्ये पडलं नाही ... बस्स ! कॉलनीत एवढंच कळलं .... नाही म्हणायला त्या मुलाचं आडनाव 'कांबळे' आहे ही छोटीशी गोष्टही कळली होती .... पण कॉलनीसाठी 'खालच्या जातीतला' एवढंच काफी होतं आणि म्हणून रमाताई पूर्णपणे त्याज्य होती ... बाकी काय ? .... रमाताई सगळीकडून वजाच झाल्यामुळे पुढचं कळण्याचा प्रश्नच नव्हता ... आणि धावणाऱ्या काळामध्ये वेळ कुणाला होता ?
----------
"माझ्या आईचं माहेरचं नाव रमा सोहोनी" .... आनंदकडून फॅमिली बॅकग्राउंड ऐकता ऐकता हे ऐकलं आणि जिगसॉ पझल जोडलं जावं त्याप्रमाणे चित्र जोडलं गेलं .... पण अशा पद्धतीने चित्र जोडलं जाणं मला नको होतं ... कारण दुर्दैवाने हे चित्र अतिशय वाईट, भयानक होतं .... रमाताईचा नवरा बीकॉम होता ... प्रायव्हेटमध्ये बऱ्यापैकी नोकरीही होती, पण ...... वाईट संगत आणि दारू ..... सामान्यांचा उत्कर्ष मर्यादित असतो, पण अधःपाताला अंत नसतो .... रमाताईनी छानशा मुलाला जन्म दिला, पण बाकी चारेक वर्ष तिनी सगळ्याच बाजूनी अनन्वित छळ सोसला .... पुढे नवरा वारला ... चाळीतली - खरंतर झोपड्पट्टीतली - खोली आणि सासू-सासरे नामक राक्षस; यांचा तिनी स्वतःहून त्याग केला आणि कुठल्यातरी ओळखीच्या फळकुटाच्या आधारावर नाशिकजवळच्या एका गावात एक खोली घेतली. लोकांची कामं, स्वयंपाकपाणी, पडतील ते कष्ट करून आनंदला वाढवलं ... उत्तम शिकवलंही ...सध्या तिनंच आनंदला मुंबईला एका स्वस्त लॉज मध्ये पाठवलंय; तेही जुना कुठलाही दुवा जोडण्याचा प्रयत्नही न करता ...
खरंच हॅट्स ऑफ .... तीस-पस्तीस वर्ष उलटली होती ... मला रमाताईला भेटून यायची एकदम विलक्षण तहान लागली .... आनंदला मी ते बोलूनही दाखवलं, पण .....
"प्लिज नका भेटू सर ! ..... एकतर आई जुन्या काळाबद्दल पूर्णतः बधीर झालीय आणि दुसरं म्हणजे तिला आपुलकी दाखवणाऱ्यांचं, मदत करणाऱ्यांचं कधी भलं होत नाही सर .... गोष्टीतल्या 'शापित परी'सारखी आहे माझी आई .... तिला फक्त मीच दिलेली आपुलकी, सुख मानवेल; ... दुसऱ्या कुणी नाही .... आता माझ्या मनात फक्त तेवढाच ध्यास आहे."
----------
आनंदचं पॅकेज, अपॉइंटमेंट लेटर, सगळं होईस्तोवर आठदहा दिवस गेलेच .... त्याला कळवण्यासाठी कॉल केला .... कोणा भलत्याच माणसाने कॉल रिसिव्ह केला ....
"आनंद कांबळे ? ..... ही इज नो मोअर सर ! ... दहिसरजवळ लोकल ट्रेनची धडक बसून परवाच ऑन द स्पॉट तो गेला सर !!!"
@प्रसन्न सोमण.
२७/०४/२०१८.
स्पष्टीकरण --
१) लकवा म्हणजे --- ल = लघुत्तम, क = कथा आणि वा = वाङ्मय
२) लकवा मधील कथा ही शब्दसंख्येने लकवा मारल्याप्रमाणे आक्रसलेली असायला हवी; अर्थात कथेतली अभिव्यक्ती, कथेतला आशयही आक्रसलेला असायला हवा ..... (आशय आणि अभिव्यक्ती हे दोन प्रकार शिंचे कसे असतात कोण जाणे; पण असतात खरे ...)
३) कथेत शब्द शक्य तितके कमी असावेत; मात्र मध्ये मध्ये घातली जाणारी टिम्ब किती असावीत, यावर मर्यादा नाही ... (क्वचित शब्दांपेक्षा टिम्ब संख्या जास्त असू शकते.)
४) हल्लीच्या फास्ट ... इन्स्टंट ... झटपट जमान्यामुळे हा वाङ्मयप्रकार भारी लोकप्रिय होईल अशी उमेद आम्ही बाळगून आहोत; म्हणून हे स्पष्टीकरण (स्पष्टीकरण वाचलंच नाही तरी कथेचा 'आशय' कळू शकतो, ..... तेवढाच शॉर्टकट ..... तेवढंच आणखी झटपट.)