-- आजारी संवादिनी --
{विशेष सूचना --- तशी ही संवादिनी सुराला सच्ची आहेच; मात्र ती 'आजारी' असल्यामुळे जरा 'मंद आंचेवर' अर्थात 'लाईट मूड'मध्येच ऐकावी आणि तरीही या ऐकण्याने कुणाच्या 'वैद्यकीय' भावना दुखावल्याच तर ते दुखणे एकतर 'अंगावर काढावे' किंवा त्या दुखण्यावर आपल्या आवडत्या 'पॅथी'नुसार योग्य ते उपचार करून घ्यावेत, ही नम्र विनंती.}
@@@@@@@@@@@
"खरं तर आत्तापर्यंत आयुष्य जगतांना खूप म्हणजे खूपच मजा आली रे ! खूप मस्त मजेत आनंदात जगलो. जरा गरीब, रादर कनिष्ठ मध्यमवर्गीय, असतांना सुद्धा; उच्च मध्यमवर्गीय असतांना सुद्धा आणि आता आज वेल टु डू झाल्यानंतर सुद्धा ! … फक्त एकच प्रॉब्लेम आहे रे आयुष्यात !"
"मित्रा, अरे चाळिशीतच मस्त पैसे साठवून आपली चाळ सोडलीस तू आणि पार्ल्यासारख्या ठिकाणी सुंदर ब्लॉक घेतलास. पुढे गाडी घेतलीस. एकाच मुलाचा संसार मांडून दिलास. आणि आता साठीपर्यंत आलास... दुरूनच का असेना, बघतोय तुला आणि खरंतर जळतोय सुद्धा तुझ्यावर ! ... कायमच मस्त रुबाबात आहेस की तू ! आता कसला प्रॉब्लेम वाटतोय तुला ?"
"खरं आहे तुझं ! ... पण सुखं भोगायला नशीब लागतं त्याहीपेक्षा ठणठणीत तब्येत ही लागतेच ना ? ... मला प्रॉब्लेम आहे तब्येतीचा ! ... म्हणजे माझ्याच असं नाही रे, सगळ्याच कुटुंबाच्या तब्येतीचा !!"
"का रे ? काय झालं काय असं ?"
"अरे लगेच इतकं गंभीर होऊन विचारावं असं काहीच नाही रे. पण जवळजवळ गेली दहा-पंधरा वर्ष डॉक्टरांच्या, पॅथॉलॉजिस्टसच्या आणि मधून मधून हॉस्पिटल्सच्या सुद्धा वाऱ्यांनी जाम कंटाळलोय रे !"
"हॉस्पिटल्सच्या वाऱ्या ? कुणासाठी रे ? मला तर काहीच कळलं नव्हतं !"
"हॉस्पिटल्स मुख्यतः आई बाबांसाठी रे ! उतारवयात बाबांना डायबिटीस, ब्लडप्रेशर तर होतंच. शिवाय दोन्ही डोळ्यांची मोतीबिंदूची ऑपरेशन्स झाली. त्यापाठोपाठ त्यांचा हार्नियाचं ऑपरेशन करावं लागलं. त्यानंतर मध्येच अचानक त्यांच्या नाकपुडीत मांस वाढलं त्याचंही ऑपरेशन करावं लागलं. त्यातूनच बायोप्सी झाल्यावर त्यांना - आयुष्यभर संपूर्णपणे निर्व्यसनी असूनही - नाकपुडीचा कॅन्सर डिटेक्ट झाला."
"माय गुडनेस ! काय सांगतोस काय ? काका कॅन्सरनी वारले ?"
"हो. त्यांना कॅन्सर निघाल्यावर हॉस्पिटलची वारी केली तर पूर्ण स्कँनिंग झाल्यावर त्या हॉस्पिटलमधल्या सर्जननी जरा भयानकच चित्र आमच्या डोळ्यांसमोर उभं केलं. त्यावेळी बाबा ऑलरेडी ७६ वर्षांचे होते. सर्जननी सांगितलं - 'उजव्या नाकपुडीकडून कॅन्सर उजवा गाल, उजवा डोळा, उजवा कान, या भागात पसरलाय. ऑपरेशन करून बराच भाग कट करावा लागेल. उजवा डोळा नक्कीच जाईल. उजव्या कानाची शक्ती बरीच कमी होईल. या वयात त्यांना किमोथेरपी, लाईट्स कसे झेपतात तेही पाहावं लागेल. खर्चही खूपच होईल.' - आता मला स्वतःचा बिझनेस असल्यामुळे वेळही काढता आला असता आणि खर्चही झेपला असता... पण आमच्या पिताजींनी कुठल्याही ऍलोपॅथिक ट्रीटमेंटला सपशेल आणि स्पष्ट नकार दिला."
"काय सांगतोस ?"
"हो. मला म्हणाले, - 'आता तू एवढा त्रास घेऊन, पैसे खर्च करून आणि मला इतकं सोसायला लावून असा किती वर्ष मला जगवणार आहेस ? ... ७६ व्या वर्षानंतर मला हा जीवघेणा रोग झालाय ना, ठीक आहे ! मी फक्त पोटात घेण्याजोगी आयुर्वेदिक औषधं तेवढी घेईन आणि जेवढं आयुष्य उरलेलं असेल तेवढं जगीन ... बस्स !' - ..."
"खरंच काकांना मानलं पाहिजे. कॅन्सरसारखा आजार होऊनही एवढा शांतपणे निर्णय घ्यायचा म्हणजे खायचं काम नाही."
"नक्कीच ! ... त्यानंतर त्यांनी चारेक वर्ष बऱ्यापैकी काढली आणि नंतर आठवडाभर जरा जास्त त्रास होऊन झोपेतच ते शांतपणे गेले."
"म्हणजे एकंदरीत खरंच बराच कठीण काळ काढलास म्हणायचा !"
"अरे एवढंच नाही. दरम्यान आईला ब्लडप्रेशर मधून पार्किन्सन्सचा आजार जडला. शरीराची थरथर एवढी वाढली की फक्त ठराविक गोळ्यांनी तिला काही तास थोडा उतार पडायचा, थरथर कमी व्हायची. मध्येच एकदा थरथरण्यामुळं पडली. हॉस्पिटलमध्ये नेऊन बॉडी स्कँनिंग झालं. नशीब काही फार मोठा त्रास किंवा फ्रॅक्चर झालं नव्हतं. पण तरीही एकूणच तिची चिडचिड सुद्धा थोडीफार वाढली. पार्किन्सन्स साठी तिच्या हट्टापायी तीनचार डॉक्टर्सच्या दवाखान्यांचे उम्बरे झिजवले... पण ... म्हातारपणातला दुर्धर रोगच तो ! सुधारणा फारशी नव्हतीच ! माझी बायकोही नोकरी करत होतीच; त्यामुळे बाबा आणि आई दोघांसाठी मिळून पाच-सहा वर्ष दिवसासाठी वेगळी आणि रात्रीसाठी वेगळी अशा दोन आया कम नर्सेस ठेवाव्याच लागल्या... मात्र जातांना आईसुद्धा शांतपणे आणि नेमकी रात्री झोपेतच गेली."
"माय गॉड !"
"याबद्दल मला खरंच काही प्रॉब्लेम नाही रे ! पंचाहत्तरी नंतर आई बाबांची आजारपणं आणि मृत्यू म्हणजे तसा फार मोठा धक्कादायक वगैरे नव्हताच. दोघंही चांगलं आयुष्य जगून शांतपणे सुटली, म्हणायचं !"
"खरं आहे."
"पण यानंतर तरी आजारपणं, तब्येतीच्या तक्रारी, त्यासाठी डॉक्टरांच्या वाऱ्या आणि शारीरिक आणि मानसिक ताप थांबतील असं वाटलं होतं. पण ... बाकी सगळं उत्तम असूनही ते ताप मात्र थांबत नाहीयेत."
"का रे ? असं का म्हणतोयस ?"
"अरे आजारपणं, तब्येतीच्या तक्रारी म्हणजे तसं गंभीर असं काही नाही रे, पण तरीही छोट्यामोठ्या तक्रारी असल्या तरी त्याचा त्रास केवढा होतो !"
"हे मात्र खरं. अगदी सर्दी-खोकला सुद्धा केवढाही जरी 'साधा' आणि 'नॉन-ग्लॅमरस' असला तरी तो स्वतःला झाला की चांगला सातआठ दिवस अक्षरशः रडवतो."
"अरे काहीही त्रास होत नसतांना पन्नाशीनंतर प्रौढावस्था म्हणून चेकिंग करून घेतलं तर मला सणसणीत डायबिटीस निघाला. पाठोपाठ थोडासा ब्लडप्रेशरचा त्रासही निघाला, आणि मस्त आनंदात दाबून खाण्यापिण्याची मला आवड असतांना नेमकी माझ्या खाण्यापिण्यावर आणि विशेषतः गोड खाण्यावर बंधनं आली... साला नेमकं असंच का होतं रे दोस्ता ?"
"चलता है यार ! नाइलाजको क्या इलाज ?"
"माझ्या बायकोच्या तब्येतीची रड सुद्धा चालूच आहे. आधी प्रौढ वयात बायकी तक्रारी, हार्मोनल चेंजेस व त्यावरची औषधं. मग थोडीशी थायरॉईडची लागण आणि त्यावरची औषधं. मग थोडाथोडा डोळ्यांचा प्रॉब्लेम म्हणून डोळ्यांचे डॉक्टर. पाठोपाठ तिला लागलेला चष्मा. चष्मा वापरायचा नाही म्हणून लगेच कॉन्टॅक्ट लेन्सेस .... अरे यादी संपतच नाही... या सगळ्यामध्ये आमचे तरुण, नौजवान असलेले चिरंजीव तरी दणकट, हट्टेकट्टे, निरोगी असावेत की नाही ? ... पण नाही ... अभ्यासात हुशार असला तरी त्यालाही बारावीतच लागलेला चष्मा, सी.ए.च्या मरणाच्या अभ्यासाच्या निमित्ताने लागलेली पाठदुखी, या गोष्टी आहेतच. शिवाय मध्येच एकदा कांजिण्या, नंतर कधीतरी टायफॉईड, अलीकडेच झालेला डेंग्यू ... तब्येतीची रडगाणी चालूच आहेत. शिवाय मला आणि बायकोला अधूनमधून व्हरायटी म्हणून डेंटिस्टच्या दवाखान्याची पायरीही चढावी लागते... आता बाsssस ! खरंच जबरदस्त कंटाळलो यार !"
"जाऊदे रे ! जस्ट फर्गेट इट !! ... तू फारच जास्त इमोशनल झालेला दिसतोयस. दोस्ता, अरे आता तू सांगितलेली स्टोरी थोड्याफार फरकाने माझ्या घरीही घडतेच आहे. आणि हा फक्त तुझ्यामाझ्या घरातला नाही तर हा फार मोठ्या प्रमाणात युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे रे. अरे आयुष्य फार फास्ट आणि कॉम्प्लेक्स झालंय ना ? मग त्याच प्रपोर्शन्समध्ये मेंटल स्ट्रेस आणि फिजिकल कॉम्प्लिकेशन्स वाढत जाणारच. त्याला काय करणार ?"
"हे अर्धसत्य वाटतं रे ! ... तितकंसं पटत नाही. हल्ली मेडिकल फिल्ड आणि सोशल मीडियामध्ये हे मेंटल स्ट्रेस नावाचं प्रस्थ जरा जास्तच वाढवल्यासारखं वाटतंय ... अरे, माणूस म्हटला की मानसिक ताण हा आलाच. आधीच्या पिढीतल्या किंवा गावातल्या माणसांना काय मानसिक ताण नव्हतेच ? केवढेतरी मोठे आर्थिक प्रश्न असतांनासुद्धा त्यांना मानसिक ताण नसतील कसे ? पण म्हणून या कारणानी लोकांच्या तब्येती एवढ्या मोठ्या प्रमाणावर बिघडाव्यात ? मग सो कॉल्ड मोठ्या मोठ्या सुधारणा झालेलं मेडिकल सायन्स काय कामाचं ?"
"माझ्या मते मेडिकल सायन्स लोकांना कायमस्वरूपी निरोगी बनवत नाही तर रोग झालेल्या लोकांचा लाईफ स्पॅन जास्त जास्त वाढवतं, एवढंच...आणि तू वैतागून मेडिकल सायन्सबद्दल कॉमेंट्स करत असलास तरीही तुझी तब्येत बिघडली की तू सुद्धा गुमान डॉक्टरांचे उंबरठे झिजवतोसच ना ? ..."
"हुं ... खरं आहे. मी डॉक्टरांकडे जातोच … पण तरीही माझ्या मनात एका मुद्द्याबद्दल गोंधळ आहे - असा विनोद आहे की सर्दीवर व्यवस्थित औषधोपचार घेतले की सर्दी आठ दिवसात बरी होते; पण दुर्लक्ष केलं तर मात्र सर्दी जायला आठवडा लागतो... हा 'विनोद' म्हणून सिरियसली घेतला नाही, तरीही मला पुष्कळ वेळा असं वाटतं की आपल्या शरीराची स्वतःची प्रतिकारशक्ती असतेच ना ? मग लहानसहान आजारांवर काही थोडे घरगुती उपचार करून, थोडंफार सोसलं की ते आजार आपलेआप बरे होणार नाहीत का ? ... लगेच पॅनिक होऊन आपण डॉक्टरकडे का धावत सुटतो ? आणि मेडिकल सायन्सचा आधार का घेतो ?
... बाय द वे, माझा एक खुशालचेंडू आणि तब्येतीत खाणारा आणि विशेषतः पिणारा मित्र आहे. त्याची मेडिकल सायन्सकडून एक मस्त एक्सपेक्टेशन आहे. तो म्हणतो - 'मेडिकल सायन्स सुधारलंय म्हणजे नक्की काय झालंय ? एवढ्या गोळ्या, टॅब्लेट्स, सिरप्स, इंजेक्शन्स, आयव्हीज, सलाईन्स, एक्सरेज, स्कँनिंग, मसणं नि जवरं निघालंय; पण अशी एखादी टॅबलेट निघालीय का, की जी माणसानं रोज घ्यावी आणि मग त्यानं कुठल्याही बंधनाशिवाय कितीही आणि काहीही खावं, प्यावं, व्यसनं करावीत किंवा कसंही वागावं, तरीही तो माणूस निदान सत्तरीपर्यंत ठणठणीतपणे आणि मस्तीत जिवंत राहील ? ... नाही ना ? मग कसली मेडिकल सायन्सनं बोडक्याची प्रगती केलीय ?' - ..."
"खरं म्हणजे हल्ली जिकडे तिकडे, विशेषतः सोशल मीडियावर, शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या माणसानं निरोगी आणि फिट राहण्यासाठी काय काय करावं, कसं कसं वागावं, याबद्दल भरपूर सल्ले दिलेले दिसतात."
"तरीही सगळ्या डिस्पेंसरीज आणि सगळी हॉस्पिटल्स ओसंडून वाहतायत. कारण, मला वाटतं, हे सगळे सल्ले फार म्हणजे फारच आदर्शवादी असतात आणि एवढा आदर्शवाद लोकांना झेपत नाही."
"म्हणजे काय ?"
"म्हणजे, ... बघ ! ... माणसानी अत्यंत नियमित व्यायाम करावा; योगासनं करावीत; पूर्णपणे निर्व्यसनी राहावं; पुरेशी झोप घ्यावी; गोड, चमचमीत, आंबट, तेलकट, तुपकट, तामसी, असा आहार न घेता नेहमी पथ्याचा आहार घ्यावा; मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करावा; सगळ्याच बाबतीतली आत्यंतिकता टाळावी; अशा 'आदर्श' सूचना जर माणसानी इमानदारीत पाळल्या तर माणूस नक्की निरोगीच राहील, हे सांगण्यासाठी तज्ज्ञ काय करायचाय ? ... पण हे सगळं इतक्या आदर्शपणे आणि तंतोतंत पाळणं सर्व माणसांना सामान्यतः शक्यच नाहीये."
" मी तर परमेश्वराकडे एक प्रार्थना नेहमीच करतो - एकवेळ जेवायला चार घास कमी मिळाले किंवा इतर चार सुखं कमी मिळाली तरी चालतील; पण सगळ्यांच्या तब्येती ठणठणीत राहू देत. - पण प्रार्थना कितीही मनापासून केली तरी परमेश्वर शेवटी ती आपल्या 'मूड' प्रमाणेच ऐकतो, त्याला काय करणार ?"
"आणि माझ्या मनात हल्ली असेच विचार असतात की, उगाच आजारपणाला घाबरून न राहता, आपल्या मनाला पटेल त्याप्रमाणे मस्त खावं, प्यावं, मजेत जगावं आणि आलंच आजारपण तर तेही सोसावं ... शेवटी तेही बरं होतंच. आणि जेव्हा आजारपण अगदी बरं होतच नाहीये, अशी वेळ येईल तेव्हा गपगुमान अनंताच्या प्रवासाला निघावं."
"नको रे ! … असलं काही बडबडू नकोस !
होपफुली अनंताचा प्रवास अजून बऱ्यापैकी दूर आहे…. मात्र घरच्या प्रवासाला आता उशीर झालाय, सो आपापल्या घरचा प्रवास मात्र करायलाच हवाय... निघुया... बाय अँड ऑल द बेस्ट फॉर बेस्ट हेल्थ."
"बाय अँड ऑल द बेस्ट टु यु टू."
@प्रसन्न सोमण.
०९/०३/२०१८.