Tuesday, 17 October 2017

-- पावसाळी दिवाळी --

--- पावसाळी दिवाळी ---

बापरे ! आठवण झाली तरी अजून अंगावर काटा येतो हो !! ... तुम्ही म्हणाल, काका डायरेक्ट प्रतिक्रिया काय सांगताय ? क्या हुवा क्या ? पहले कुछ हकीकत तो बयाँ करो। ... सांगता हूँ, सांगता हूँ !!

कालच संध्याकाळी जेव्हा पावसाची थोडीशी उघाडी होती तेव्हा आमची पेन्शनर्स मिटिंग रंगली होती. सध्या ताजा विषय कुठला असणारै ? ... तर, विषय हाच चालला होता की दिवाळी दोनच दिवसांवर आलीय आणि पाऊस तर थांबायचं नावच घेत नाहीये. दिवाळीची काय मजा येणारै ? पोराबाळांनी दिवाळी कशी साजरी करावी ? वगैरे वगैरे आणि वगैरे.

आमची शाळेत जाणारी नातवंडं आजी-आजोबांपासून जरा लांब, दुसऱ्या कॉलनीत राहतात. त्यामुळे मी घरी आल्यावर सौ.कडे सुद्धा, -- केवढा पाऊस आहे ? मकरंद आणि सौजन्या दिवाळी कशी एन्जॉय करणार ? -- याच विषयांवर बोलत होतो. सारांश, लांबलेला पाऊस आणि दोन दिवसांवर आलेली दिवाळी, हे विषय डोक्यात ठेवूनच मी झोपलो.

रात्री पडलेल्या स्वप्नात मला, पावसामध्ये पूर्ण भिजून दोन दिवसांपूर्वी होऊन गेलेली दिवाळी दिसली; आणि त्याच दिवशी मी माझ्या नातवाचामकरंदचा –  भयंकर ईमेल वाचला. तो ईमेल आठवून अजूनही माझ्या अंगावर काटा येतोय --          

स्वप्नात मी वाचलेला तो ईमेल, मी तुम्हाला जसाच्या तसा वाचायला देतोय --


ईमेल --

बॅकग्राऊंड - हाय आजोबा ! मी तुमचा मॅकी. बाय वे, मॅकी हा मकरंदचा शॉर्टफॉर्म आहे. या दिवाली व्हेकेशन साठी आमच्या मराठीच्यामिस’नी निबंधासाठी 'माझ्या कुटुंबाची दिवाळी' हा सब्जेक्ट दिलाय. कुटुंब मीन्स फॅमिली असं मला वाटत होतं, पण तरीही कन्फर्म करण्यासाठी मी डॅडाला विचारलं. डॅडानी मराठी इंटु इंग्लिश ऍप चेक करून कन्फर्म केलं की कुटुंब मीन्स फॅमिलीच. मग मी माझा माझा निबंध लिहिला आणि काही मिस्टेक्स असतील तर चेक करायला डॅडाकडे दिला. पण डॅडानी सांगितलं की आजोबांना मेल करून आजोबांकडून चेक करून घे. म्हणून मग मी तुम्हाला निबंध मेल करतोय. प्लिज मिस्टेक्स दुरुस्त करून मला रिसेन्ड करा. --

--- माझ्या कुटुंबाची दिवाळी ---

दिवाळीचा फर्स्ट डे मीन्स आय थिंक नर्क चतुर्थी - तर त्यादिवशी डॅडानी अर्ली मॉर्निंगला उठवलं. डॅडा अँड मम्मा दोघेही दिवाळीसाठी वन वीक लिव्ह वर होते. बाल्कनीतून बघतो तर बाहेर टू मच रेन होता. म्हणून मग डॅडानी एकदम ऑस्सम प्लॅन केला. रेनी सिझन असल्यामुळे वॉटर फॉल मध्ये फर्स्ट आंघोळ करायची. इन फॅक्ट डॅडा युज्ड वन वर्ड. आता मला रिमेम्बर होत नाहीये; पण लाईक 'अभंग नान' ऑर सोजाऊदे. लेट इट गो ... मग डॅडा, मम्मा, माय यंगर सिस्टर स्विटी आणि मी असे सगळे तयार झालो. डॅडा नवीन शॉर्ट्स मध्ये आणि मम्मा नवीन स्विमिंग सूटमध्ये एकदम क्युट दिसत होते. डॅडानी गाडी काढली आणि आम्ही बसईच्या नियर असलेल्या चिंचोटी वॉटर फॉल मध्ये फर्स्ट आंघोळ केली. त्यामुळे एकदम ऑस्सम फ्रेश वाटलं. घरी आलो तरी रेनिंग चालूच होतं. नंतर आम्ही लंचला मस्त पिझ्झा ऑर्डर केला अँड देन वुई हॅड रेस्ट. मग इव्हिनिंगला रेनिंग स्टॉप झाल्यामुळे मी फ्रेंड्स बरोबर चिखलातला फूटबॉल खेळलो.

दिवाळीचा सेकंड डे दॅट इज वेल्थ वर्शीपिंग मीन्स, आय गेस, लक्समी पूजा ऑर समथिंग लाईक दॅट - आय थिंक दिवाली फेस्टिव्हल मध्ये हा डे काही फार इम्पॉर्टन्ट नसतो. टुडे ऑल्सो रेनिंग चालूच होतं, सो ऑल मोस्ट ऑल डे मी स्विटी आणि दोन फ्रेंड्स सोबत व्हिडियो गेम्स खेळलो. इव्हिनिंगला यु ट्यूब वरून शिकून मम्मानी सारी घातली अँड डॅडा वोअर कलर्ड धोती. (ही सेड सम वर्ड, आय थिंक कद ऑर समथिंग लाईक दॅट.) मग इंटरनेट वर चेक करून डॅडानी आणि मम्मानी एका सिल्व्हर कॉईनची वर्शीप केली आणि मग आम्हाला काहीतरी प्रसाद दिला. इट टेस्टेड ऑड बट मम्मा सेड इट्स गूळ अँड धणे अँड वुई हॅव टु इट इट टुडे. सो वुई एट इट.

दिवाळीचा थर्ड डे म्हणजे पाडवा दॅट इज गुडी गुडी  पाडवा - हा हजबंड अँड वाइफचा डे असतो. त्यामुळे मला आणि स्विटीला यात काय फन ? सो आम्ही होल डे व्हिडियो गेम्स खेळलो आणि नूडल्स खाल्ले. तेवढीच आम्हाला फन. पण इव्हीनिंगमध्ये जरा मजा आली. मम्मानी डॅडाला खुर्चीत बसवलं. एका सिल्व्हर ताटलीत देवांच्या पुढची समई घेऊन पेटवली. डॅडाच्या फोरहेडवर काहीतरी रेड लावलं, त्यावर राईस लावले आणि हेअरमध्ये पण थोडे राईस टाकले आणि मग ती सिल्व्हर ताटली डॅडाच्या फेस भोवती खूपवेळा क्लॉकवाईज फिरवली. मग डॅडानी एक मोठा गिफ्ट पॅक त्या ताटलीला टच करून मम्माच्या हातात दिला. मम्मानी तो फोडल्यावर त्यात कलर्ड रेनी शूज निघाले. ऑर्नामेंट, कॉस्टली सारी, वगैरे असलं काही गिफ्ट आणता चीप गिफ्ट आणलं म्हणून मम्मा जाम भडकली अँड शी शाऊटेड ऍट डॅडा. पण मग डॅडानी मम्माला समजावलं - "अगं आता रेनी सिझन आहे ना, म्हणून तुला युजफूल गिफ्ट दिलंय. पुढे ड्राय सीझनमध्ये दिव्यांची अवस, नागपंचमी यासारखे मोठे फेस्टिवल्स असतात तेव्हा मी तुला एखादा ऑर्नामेंट घेईन." - देन ओन्ली मम्मा बिकेम हॅप्पी.

दिवाळीचा फोर्थ अँड फायनल डे म्हणजे भाऊबीज - इन फॅक्ट हा स्विटीचा आणि माझा डेसो, स्विटीच्या इंस्ट्रक्शन्स फॉलो करून लंचला डॅडानी सर्वांसाठी पिझ्झाज अँड बर्गर्स ऑर्डर केले. देन मायसेल्फ अँड स्विटी प्लेड डिफरंट डिफरंट व्हिडियो गेम्स अँड ऑल्सो हॅड रेस्ट. इव्हिनिंगमध्ये; काल सिल्व्हर ताटली घेऊन मम्मानी जसं डॅडाला केलं तसंच स्विटीचा हात धरून मम्मानी मला पण केलं. व्हेन आय आस्क्ड मम्मा टोल्ड की याला ओवाळणं म्हणतात. देन डॅडानी स्विटीसाठी आणलेला पिंक रेनकोट मी स्विटीला गिफ्ट केला आणि रिटर्न गिफ्टमध्ये स्विटीनी मला मम्मानी आणलेली शॉर्ट्स अँड टीशर्ट दिला. ऍक्च्युअली आय वॉन्टेड सलवार-कमीज बट डॅडा टोल्ड या रेनी सिझनला सलवार-कमीज घेण्यापेक्षा पुढच्या गोकुळाष्टमीला मी तुला सलवार-कमीज घेईन. देन आय सेड ओके.

सो ? ... अशाप्रकारे माझ्या कुटुंबानी दिवाली सेलिब्रेट केली.

-- एन्ड --

(आजोबा - प्लिज माझा निबंध करेक्ट करून करेक्टेड निबंध बाय टुमॉरो रिसेन्ड करा.)

युवर्स

मॅकी.

---------- XXXXX ----------


स्वप्नात मी हा ईमेल वाचला आणि माझा थरकाप उडाला. 'आता हा निबंध कसा करेक्ट करू,' या विचारानी माझ्या काळजानी ठाव सोडला आणि मी गुरासारखा वेडावाकडा ओरडतच जागा झालो.

हुश्श .... ते स्वप्नच होतं तर .... सुटलो ssss

@प्रसन्न सोमण.
१७/१०/२०१७.


--- मा प्त ---