Friday, 18 August 2017

-- गांजल्या रात्री अशा --

-- गांजल्या रात्री अशा --

     अगदी वर्षच मोजायला गेलो तर साधारण ४७/४८ वर्षांपूर्वीच्या या आठवणी असतील. 'दो या तीन बस'चा जमाना जेमतेम सुरु होत असला तरी तेव्हा तो अगदीच बाल्यावस्थेत होता. आमची ब्राह्मणी सभासदांची कॉलनी तेव्हा माणसांनी अगदी गजबजलेली होती. एकेका मजल्यावर बारा-बारा दोन खणी घरं. एका घरात, बाहेरची खोली १२ गुणिले १० चौरस फूट आणि स्वयंपाकघर १० गुणिले १० चौरस फूट यापेक्षा गुंजभरही अधिक जागा नव्हती. या व्यतिरिक्त प्रत्येक घरासमोर कॉमन गॅलरी १० बाय फुटांची. या एवढ्या क्षेत्रफळाच्या आमच्या मजल्यावरील बारा घरांमधली लोकसंख्या जवळ जवळ ५० होती. मात्र हा बारा कुटुंबांचा मजला म्हणजे एक एकत्र कुटुंबच होतं.

   श्रावण महिन्यासारखा सणांनी लगडलेला महिना आला की मजल्यावरील विशेषतः बायका आणि पोरीबाळींचा उत्साह अगदी ओसंडून वाहत असे. मजल्यावरील माहेरवाशिणी किंवा नवीन वहिन्या यापैकी कोणाची ना कोणाची मंगळागौर बहुदा दर मंगळवारी उपटत असे... आता तसं पाहिलं तर या मंगळागौरींशी शालेय मुलगा म्हणून माझा काय संबंध होता ? पण नाही.... तो आणला जायचा. एकतर या श्रावणात आम्हा मुलांना; मैदानात वाढलेल्या गवतावर फुलपाखरं, चतुर, सुया पकडणं किंवा चिखलामध्ये हुतूतू, फुटबॉल किंवा सळई-रुपवी सारखे खेळ खेळणं; यासारख्या महत्वाच्या गोष्टी करायच्या असत. पण ते सोडून आम्हा मुलांना, फक्त आमच्यासाठीच नव्हे तर शेजाऱ्यांसाठी सुद्धा, फुलं काढणं, पत्री गोळा करणं यासारखी कामं दिली जायची. पुढे भाद्रपद लागला की आम्हाला दुर्वा खुडाव्या लागत. बरं, घरातून सांगितल्या गेलेल्या कामांना 'नाही' म्हणण्याची तेव्हा आमची कुणाचीच प्राज्ञा नसे.

    मात्र या व्यतिरिक्त विशेषतः माझ्या डोक्यावर या मंगळागौरींच्या आणि हरितालिकेच्या रात्री एक विशेष जबाबदारी सोपवलेली असे.         

    माझी आई ही गायिका, पेटीवादक संगीत शिक्षिका होती आणि मी लहानपणापासूनच चांगल्यापैकी तबला वादक होतो. आमच्याकडे पेटी, तबला ही वाद्य होतीच. त्यामुळे या मंगळागौरींच्या हरितालिकेच्या रात्री आईची आणि माझी पेटी-तबला घेऊन घरोघरी वरात निघत असे. अशावेळी शाळकरी वयातल्या माझ्यावर, एक डिश साबुदाण्याची खिचडी आणि एक कप कॉफीच्या मोबदल्यात, संपूर्ण रात्र जागा राहून बायकांच्या मंगळागौरीच्या आणि हरितालिकेच्या 'भयंकर' गाण्यांना ठेका देत राहण्याची प्रेमळ सक्ती केली जात असे. साधारण याच काळात जेव्हा मी पु.लं.च्या 'बकरीकी एक टांग' वाजवत राहणाऱ्या टिल्लू उस्तादांचं दुःख वाचलं तेव्हा ते दुःख मला अगदी आतपर्यंत भिडलं... बरं, अगदीच शाळकरी वयात असलेल्या मला - बायकांत पुरुष लांबोडा असलो तरी - तशी काही 'विशेष नजर' वगैरे आलेली नव्हती. त्यामुळे मला या रात्री म्हणजे फारच मोठं संकट वाटायचं. शंभरएक चौरस फुटात साधारण वीसेक बायकांचे आवाज, हसणं-खिदळणं, गाणी म्हणणं (?), साग्रसंगीत नाव घेऊन आणि पकवा घालून ('पकवा' ना तो ?) घातलेल्या 'दणदणाटी' फुगड्या; एवढ्या डेसिबल्सच्या आवाजात सुद्धा रात्री दोन-एक वाजले की मला बसल्या जागी पेंग येत असे. पण मला सुखाने कुणी झोपू देत नसे. कोणती ना कोणती बाई मला ढुशी देऊन उठवायची आणि 'पिंगा पोरी पिंगा' किंवा 'हाटूश्य पान बाई हाटूश्य' किंवा 'खुंटण मिरची जाशील कैशी' अशासारख्या 'भारी' गाण्यांवर ठेका द्यायला लावायची. माझ्याजवळ असलेल्या कलेचा एवढा कंटाळा मला त्यानंतर कधीही आला नाही.

   तरी सुरुवातीला मंगळागौरीच्या गाण्यांवर ठेका देणं, हे म्हणजे माझं तबला वादनातलं फक्त बिगरीतलं शिक्षण होतं. पण पुढे उत्तर रात्री माझं 'उच्च शिक्षण' सुरु होई. भरपूर खेळून खेळून शरीरं दमवल्यानंतर बायकांकडून आवर्जून गाण्यांच्या भेंड्यांचा कार्यक्रम 'काढला' जाई. आस्ते आस्ते एकेका 'गायिके'कडून  बसल्या जागच्या बैठकीच्या गाण्यांचा 'रतीब' घातला जाई. निरनिराळ्या ''काराच्या बायका विनासंकोच बसल्या जागी '' लावून त्रिताल-आध्ध्या पासून ते तहत रूपक-झपताला पर्यंत कुठल्याही तालातली मन मानेल ती गाणी गायला 'काढत' असत. त्यातून तालामध्ये सम ही एका विशिष्ट ठिकाणीच असते या 'प्रतिगामी' सिद्धांतावर त्यांची श्रद्धा नसल्यामुळे प्रत्येकीच्या घराण्यातली सम द्यायची पद्धत खूपच भिन्न भिन्न असे. पायथॅगोरसचा सिद्धांत किंवा पाय इज इक्वल टू बावीस सप्तमांश, हे असले बिकट सिद्धांत; ही अशी कुठल्याही आड-बेआड जागी सम दिलेली गाणी ऐकूनच शोधून काढलेले असावेत, असं मला त्यावेळी इमानदारीने वाटे. खुद्द त्या गाण्याच्या संगीतकारानी हे गाणं ऐकलं असतं तर, आपण ही चाल नक्की कुठल्या तालात बांधली आहे, याचा त्यालाच प्रश्न पडावा; अशा स्वरूपाची ही गायकी असे. सुदैवानी कुठलाही संगीतकार ही गाणी ऐकावी लागण्याइतका दुर्दैवी निघाला नाही हा त्याचा एक भाग्ययोगच... पण माझं काय ? ... सदैव बुचकळ्यात पडल्याप्रमाणेच मला या गाण्यांना तबलासाथ करावी लागे. पुढच्या आयुष्यात मी नऊ, अकरा, तेरा असे विषम मात्रांचे किंवा साडेसात, साडेआठ असे अर्ध्या मात्रांचे ताल शिकलो त्यामागे माझी लहानपणीची हीच 'साधना' कारणीभूत झाली असावी असा मला दाट संशय आहे.

  त्या काळात जवळजवळ प्रत्येक घरात एक लोखंडी कपाट, एक लोखंडी कॉट आणि तीनचार फोल्डिंग खुर्च्या एवढंच सामान असे. पैकी लोखंडी कॉट आणि फोल्डिंग खुर्च्या दुसऱ्याकडे ठेवायला दिल्या की साधारण शंभर एक चौरस फूट मोकळी जागा मिळत असे. त्या जमान्यात मंगळागौर किंवा हरितालिका यासारख्या समारंभांसाठी हॉल वगैरे भाड्याने घेण्याची प्रथा किंवा ऐपत कुणाचीच नव्हती. त्यामुळे ज्या घरात हा सगळा दंगा चालू असायचा त्या घरातील 'कुटुंबप्रमुख' नक्की कुणाकडे आसरा घेत असे, हे एक माझ्यासाठी सदैव कोडंच असे. या 'मंगळागौरी' घराच्या खालच्या घरात तेव्हा राहत असलेल्या व्यक्तींबद्दल आजही माझ्या मनात एक करुणेचा झरा आहे. या घरातल्या माणसांनी भले दुसऱ्या दिवशी आमचा क्रिकेटचा बॉल जप्त करून कापला तरी त्या दिवसापुरता मला त्यांचा राग येत नसेबाकी, हे असलं लहान लहान पोट्ट्यांवर रागावणं, सूड उगवणं सोडलं तर एकुणात त्याकाळी माणसं बिचारी फारच सहनशील, सरळमार्गी आणि डेसिबल्स वगैरे भानगडी कळणारी असत.

  एक मात्र खरं, लहानपणी माझं, 'खूप छान तबला वाजवणारा मुलगा' म्हणून कौतुक व्हायचं... पण काय उपयोग ? पुढे वय वाढल्यानंतर 'खास बालमैत्रिणींपैकी' एकीनेही आयुष्यात कधी माझ्याकडे 'कौतुकाच्या' नजरेनं पाहिलंसुद्धा नाहीजाऊ दे. नाहीतरी आमच्यासारख्यांच्या आयुष्यात कौतुक वाटण्याच्या गोष्टींपेक्षा खंत बाळगण्याच्या गोष्टीच जास्त असतात. त्यामुळे आमची पिढी, जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत ही अशीच खाली मुंडी घालून जगत राहणार. त्याला इलाज नाही.

@प्रसन्न सोमण.

(फोटो इंटरनेटवरून साभार.)