- चकवा -
सुमेध परचुरे. 'बस्स ! नामही काफी है,' कॅटॅगरीतला एकदम बडा माणूस. अतिशय नावाजलेल्या 'सुपर कन्स्ट्रक्शन कंपनी'चा चेअरमन. चेअरमन ही झाली ऑफिशिअल पोस्ट. ऍक्च्युअली 'सुपर कन्स्ट्रक्शन कंपनी'चा निर्माता आणि अक्षरशः सर्वेसर्वा सुद्धा. कुठलाही निर्णय पूर्णपणे स्वतःच्या आत्मविश्वासावर आणि स्वतःच्या हिमतीवर शांतपणे पण अत्यंत ठामपणे घेणारा. क्वचित निर्णय चुकला तरी त्याची संपूर्ण जबाबदारी स्वतःच घेणारा आणि त्या चुकीतून धडाही घेणारा. अर्थातच त्याच्या असंख्य निर्णयांचा आजवर कंपनीला लॉन्ग टर्ममध्ये अचाट फायदा झाला होता. अशी माणसे बहुदा एककल्ली आणि विरोधाला अजिबात न जुमानणारी असतात, तसाच सुमेधही होता. कंपनीमध्ये आजवर कधीच त्यानी विरोध जुमानला नव्हता. मुळात फक्त अगदी सुरुवातीला दोन-तीन विरोधाचे प्रसंग घडले होते तेव्हा त्यानी विरोध आणि विरोध करणाऱ्या व्यक्ती, दोघांनाही ठेचले होते. माणसं अक्षरशः वाचण्याची कला सुमेधकडे असल्यामुळे त्यानीच निवडलेल्या त्याच्या स्टाफचा वकूब आणि कामाचा अप्रोच या दोन्ही गोष्टी तो परफेक्टली ओळखून होता. त्यामुळे आपसूकच त्याचा स्टाफ कामसू पण 'युअर मोस्ट ओबिडियन्ट सर्व्हंट सर' या कॅटॅगरीतला होता.
आज सकाळीच कंपनीच्या प्रशस्त कॉन्फरन्स रूममध्ये, कंपनीचा नवीन प्रोजेक्ट लॉन्च करण्याच्या संदर्भातली कॉन्फरन्स चालू होती. डिस्कशन वगैरे अर्थात फारसं काही नव्हतंच. सुमेध स्वतःचं प्रेझेंटेशन दाखवून त्यानुसार त्या त्या ऑफिसर्सना कामाच्या इंस्ट्रक्शन्स आणि डेडलाईन्स डिक्टेट करत होता. शेवटची स्लाईड दाखवल्यानंतर आणि त्यासंबंधातली इंस्ट्रक्शन दिल्यानंतर सुमेध म्हणाला, "सो गाईज, ऑल ऑफ यु ... जस्ट मॅनेज युवर वर्क परफेक्टली इन द स्टीप्युलेटेड टाइम लिमिट अँड ऍज युज्वल मेक धिस प्रोजेक्ट अ ग्रँड सक्सेस. ओके ? थँक्स ! द कॉन्फरन्स इज ओव्हर."
"सर जस्ट अ मोमेन्ट ! कॅन आय सबमिट माय ओपिनियन प्लिज ?"
आश्चर्याने सुमेधची नजर तिच्याकडे गेली. सुनिधी साठे… अलिकडेच सुमेधनी या सी.ए., एम.बी.ए.केलेल्या मुलीला फायनान्स ऑफिसर म्हणून अपॉईंट केलं होतं. एवढ्या कमी कालावधीत आत्मविश्वासाने बोलून स्वतःचं ओपिनियन देऊ इच्छिणाऱ्या सुनिधीचं सुमेधला आश्चर्यमिश्रित कौतुक वाटलं, पण क्षणात नजर शांत ठेवून तो म्हणाला, "ओह ! शुअर ! बोल सुनिधी."
"सर या प्रोजेक्ट मधल्या काही गोष्टी फिनान्शियली चुकीच्या गृहीतकांवर फायनल केलेल्या आहेत आणि त्यामुळे तुम्ही आत्ताच दिलेल्या काही डिसिजन्समध्ये गफलत वाटत्येय सर. या गोष्टी तशाच इम्प्लिमेंट झाल्या तर आपल्या कंपनीला लॉस तर होईलच पण त्याहीपेक्षा कंपनीच्या रेप्युटेशनला फार मोठा तडा जाऊ शकतो सर."
"सुनिधी, जनरल स्टेटमेंट्स नकोयत. फॅक्च्युअल डिटेल्स देऊन प्रूव्ह करू शकतेस का तू ?" सुमेधनी शांतपणे विचारलं.
"शुअर ! आय विल एक्सप्लेन सर. कॅन आय युज युअर प्रेझेंटेशन सर ?"
"गो अहेड"
शांतपणे सुनिधी पुढे झाली आणि स्लाईड बाय स्लाईड एक्सप्लनेशन देऊ लागली, आपले पॉईंट्स मांडत गेली. तिनी अत्यंत आत्मविश्वासाने आपल्या सजेशन्स सुद्धा दिल्या आणि ती थांबली. सुमेधचा चेहरा अत्यंत विचारमग्न दिसत होता. काही क्षण बोचरी शांतता पसरली आणि अचानक सुमेधच्या चेहऱ्यावर थंड, कोरडा भाव आला. तो एकदम उभा राहिला. सर्व जण पटकन उभे राहिले, आणि सुमेधनी त्याचा डिसिजन दिला. "गाईज या पॉइंट्सवर विचार करायला मला एक दिवस लागेल. उद्या मी या संदर्भातला मेल पाठवीन." एवढं एक वाक्य बोलून सुमेध कॉन्फरन्स रूमच्या बाहेरही पडला. लगेचच इतर ऑफिसर्सही चेहऱ्यावर थोडीशी उत्सुकता आणि बरीचशी काळजी घेऊन कॉन्फरन्स रूमच्या बाहेर पडले. सुनिधीच्या चेहऱ्यावर मात्र मंद स्माईल आणि चालण्यामध्ये ठाम आविर्भाव होता.
कॉन्फरन्स रूम मधून, पी.ए.ला 'जाऊन येतो' अशी कल्पना देऊन, सुमेध बाहेर पडला तेव्हा मात्र त्याच्या चेहऱ्यावर एक गूढ, मंद स्माईल होते. डोक्यात 'तुम्हारी इतनी बडी जुर्रत ?' असा एक फिल्मी डायलॉग घुमल्यावर त्याला एकदम हसूच आले. तो स्वतःशीच हसला. गडी विचारात पडण्याऐवजी उलट खूषच दिसत होता. नाहीतरी फायनल डिसिजन उद्यावर गेलाच होता. तशी इतर प्रोजेक्टसची कामं रुटीन नुसार चालू होती, पण रुटीन असल्यामुळे इतर ऑफिसर्स ती हॅण्डल करत होते. सुनिधीच्या सजेशन्सचा विचार करून त्याचा फायनल डिसिजन घेण्यासाठी त्याला हार्डली तासभर पुरेसा होता. ऑफिस प्रिमाईसेसच्या बाहेर येऊन जणू आधीच ठरल्यासारखी त्याची पावलं जवळच्याच सी फेस कडे वळली. खास त्याच्या पसंतीची जागाही सुदैवाने रिकामीच होती. तिथे बसून त्याने आवडती फाईव्ह फाईव्ह फाईव्ह शिलगावली आणि धूम्रवलयं सोडत तो बघता बघता ट्रान्स मध्ये गेला. 'आपुला संवाद आपणासी' चालू झाला... मध्यमवर्गीय, बिझनेसचा काहीही संबंध नसलेल्या घरात वाढून, बी.कॉम.असं बेतास बात शिक्षण घेऊन, कसा कोण जाणे, पठ्ठया कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये हेल्पर म्हणून घुसला. थोड्याच काळात त्याने हुशारी आणि साहस यांचं कॉम्बिनेशन साधून स्वतःची कन्स्ट्रक्शन कंपनी काढली आणि अक्षरशः जी तोड मेहनत करून आणि आवश्यक तिथे, मुळात स्वतःमध्ये जागृत असणाऱ्या आर्थिक नीतिमत्तेकडे दुर्लक्ष करून, फक्त सात-आठ वर्षात अचाट प्रगति साधली. एज्युकेशनल क्वालिफिकेशन जेमतेम असलं तरी व्यावहारिक जगात तो खूप म्हणजे खूपच शिकला होता. स्वतःच्या बिझनेस मध्ये तो सर्वांगानी जागृत होता. स्वतःमधल्या क्वालिटीज सुद्धा तो परफेक्टली जाणून होता, थोडक्यात 'इक्वालिटी कॉम्प्लेक्स'चं तो मूर्तिमंत उदाहरण होता. अलीकडे दोन वर्ष बिझनेस स्टेबल झाल्यामुळे तो थोडासा निवांत झाला होता. त्या काळात, सवयीनुसार परफेक्ट प्लॅनिंग करून, त्याला स्वतःला योग्य वाटणाऱ्या अटी घालून, त्या सर्वतोपरी मान्य असणारी हुशार मुलगी शोधून, त्यानं स्वतःचं अरेंज्ड मॅरेज ही उरकून घेतलं होतं, हे फार कमी लोकांना माहीत होतं. आजच्या कॉन्फरन्स मधल्या सुनिधीच्या अप्रोचमुळे त्याला बऱयाच काळानंतर एक आव्हान मिळाल्यासारखं वाटलं होतं. एकांतात तासभर विचार करून सुमेध ऑफिसमध्ये परत आला. येतांना राउंडच्या निमित्ताने सुनिधीसकट सर्व ऑफिसर्सच्या टेबलांजवळ जाऊन एका दृष्टीक्षेपात त्याने त्यांच्या मनातील चलबिचल पाहून काही मेंटल नोट्स करून ठेवल्या व तो आपल्या केबिन मध्ये येऊन बसला. लॅपटॉप समोर घेऊन त्याने आपल्या पद्धतीने प्रोजेक्ट तपासून तासाभरात सेल्फ असेसमेंट करून घेतलं. मनाशी आपला निर्णय फायनल करून टाकला आणि तो दिवस संपवला.
दुसरा दिवस... सकाळीच सर्वांना मेल वाचायला मिळाला. A meeting will be held on 3.00 PM
today in the conference room for giving instructions regarding the current
project या एका वाक्याचा. आजवर conference for discussing current
project अश्या शब्दांचा मेल असायचा त्याऐवजी meeting for giving instructions असे शब्द आले होते. अर्थात काही अगदी मोजक्या ऑफिसर्सनी या बदललेल्या शब्दांची योग्य दखल घेतली. त्यात सुनिधी होती. तिच्या मनात विचारांचा कल्लोळ उठला होता...
भरलेली कॉन्फरन्स रूम... सुनिधीच्या चेहऱ्यावरचा कालचा आत्मविश्वास जाऊन त्याजागी आता चलबिचल आली होती ... सुमेधचं धीरगंभीर बोलणं सुरू झालं...
"गाईज, कालच्या कॉन्फरन्सच्या रेफरन्सनी करंट प्रोजेक्टबद्दलचा माझा निर्णय देण्यासाठी ही कॉन्फरन्स आहे. मी माझा निर्णय घेतलाय... कालच्या सुनिधीच्या सजेशन्स मला अयोग्य वाटतायंत... तेव्हा सुरुवातीला मी प्लॅन केलेल्या डायरेक्शन्स नुसारच हा प्रोजेक्ट आपल्याला पुढे न्यायचा आहे."
सुनिधी गोंधळली, पण तरी तिने बोलायला सुरुवात केली. "पण .. सर ..."
"नो सुनिधी... इनफ... नाऊ नो मोअर अर्ग्युमेंट्स प्लिज." सुमेधचा आवाज जरा चिडका झाल्यासारखा वाटला, पण क्षणात तो शांत होऊन पुढे बोलू लागला ...
"सुनिधी, आय मस्ट कन्फेस, यु आर ब्रिलियंट. माझं शिक्षण तुझ्या शिक्षणाच्या पासंगालाही पुरणार नाही, हे अगदी मान्य. मी खरंच तुझ्या शिक्षणाचा आणि हुशारीचा रिस्पेक्ट करतो. मात्र भविष्यात या तुझ्या हुशारीला तू विवेकाची जोड द्यावीस, असा अनाहूत सल्लाही देतो. कारण अविवेकी धाडसाला अर्थ नसतो आणि असं धाडस तू काल दाखवलंस. तुझी शैक्षणिक हुशारी निर्विवाद आहे, पण स्वतःच्या बिझनेससाठी लागणारी हुशारी ही फार वेगळी गोष्ट आहे. तुझ्या हुशारीच्या जोरावर फक्त उत्तमपणे 'नोकरी' करता येते आणि 'नोकरीच्या' काही लिमिट्स असतात. त्या तू काल ओलांडल्यास. तेव्हा इथून पुढे 'सुपर कन्स्ट्रक्शन कंपनी'ला तुझ्या सर्व्हिसेसची गरज नाही. तुला नोटीस देऊन, नोटीस पिरिअडनंतर तुला टर्मिनेट करणं मला भाग पडू नये यासाठी तूच, विथ इमिजिएट इफेक्ट रिझाईन करावंस, असं मी तुला सुचवतो. आणि तुला पुढच्या आयुष्यासाठी एक गोष्ट सांगतो ती कायमसाठी मनावर कोरून ठेव. Boss can not be wrong." सुमेधच्या बोलण्याने बर्फ झालेल्या ऑफिसर्सच्या कानांवर सुमेधचा शांत पण तरीही करारी आवाज पडत होता...
"बिझनेस मधले काही गुंतागुंतीचे बारकावे तुम्हाला कोणाला समजणं अशक्य आहे, पण तरी थोडक्यात सांगतो. सुनिधीनी आपल्या कुशाग्र बुद्धीने फाईंड आऊट केलेली प्रेझेन्टेशन मधली लूपहोल्स मी जाणीवपूर्वक तशीच ठेवलेली होती. ही लूपहोल्स म्हणजे प्रतिस्पर्धी कंपन्यांसाठी एक 'चकवा' आहे. त्यामुळे सुरुवातीला आपल्याला थोडा तोटा होईल; पण if I am not wrong पुढे जो फायदा होईल तो ट्रिमेंडस असेल & I am very sure that I am not wrong. तेव्हा ऑल ऑफ यु, माझ्या सूचना फक्त फॉलो करा आणि डेडलाईन नुसार सर्व कामं पार पाडा. यु मे लिव्ह नाऊ...."
------------
बेडरूम मध्ये सुमेधच्या बाहुपाशात विसावलेली सुनिधी सुमेधकडे अनिमिष नेत्रांनी पाहत होती...
"अशी काय पाहते आहेस माझ्याकडे ?" सुनिधीला जरा दूर करून वॅट सिक्सटी नाईनचा लार्ज बनवत सुमेधनी विचारलं.
"सुमेध, मला तरी नीटसं समजत नाहीये. लग्नानंतर थोड्याच दिवसात आपल्याच ऑफिस मधल्या माझ्या नोकरीचं हे नाटक तू का केलंस ?" सुनिधीनी विचारलं.
"डार्लिंग, फक्त मी सुचवलं पण काहीही आढेवेढे न घेता, काहीही खुलासा न विचारता तू हे नाटक का केलंस ? बिझनेस सांभाळून घर संसाराकडे लक्ष देणं मला शक्य नाही, असा विचार करून मी फक्त हाऊस वाइफ म्हणून राहायला तयार असणारी, पण शहरी बायको शोधत होतो. मला फार शिकलेल्या बायकोची अपेक्षा अजिबात नव्हती. पण तरीही सी.ए., एम.बी.ए.केलेली आणि नंतर पाच वर्ष करियर केलेली तू माझ्याशी लग्नाला तयार का झालीस ?"
"सुमेध, मी अभ्यासात हुशार होते म्हणून आणि इतर काही प्रलोभनं नव्हती म्हणून सी.ए., एम.बी.ए.केलं. सहजगत्या चालून आली म्हणून पाच वर्ष नोकरीही केली. पण खरंतर मला उत्तम हाऊस वाइफ असणं हेच आव्हान वाटतं. मला माझा आपुलकीचा आणि माझा फायनल से असणारा संसार हवा होता, म्हणून मी तुझ्याबरोबर लग्नाला तयार झाले."
"मग डार्लिंग तुला हेही कळायला हवं की काहीतरी साध्य करण्यासाठीच मी ही चाल खेळलो असेन ना ?"
"हो सुमेध ! पण तू नक्की काय साध्य केलंस ? तुझा स्वतःचा मोठेपणा तर जगजाहीर आहे."
"सांगतो डार्लिंग" सुमेध व्हिस्की सिप करत सांगू लागला. "बर्वे, गुप्ता आणि भटनागर असे माझ्या ऑफिस मधले तीन ऑफिसर्स जरा वाजवीपेक्षा जास्त हुशार, महत्वाकांक्षी होत आहेत, असं मी मार्क केलं. सक्सेसफुल बिझनेस ऑफिसच्या माझ्या संकल्पनेनुसार एकच हुशार, महत्वाकांक्षी सुपीरिअर आणि त्याच्या अंडर ओबिडियन्ट, एक्सट्रीमली एफिशिअंट अँड हार्ड वर्किंग स्टाफ अशी सिच्युएशन असायला हवी. No doubt, Barve, Gupta & Bhatnagar are very efficient
hard workers & I need them. त्यामुळे मी त्यांना डायरेक्टली सुनावून किंवा दम देऊन दुखावूही शकत नव्हतो आणि त्यांना जरब बसणंही आवश्यक होतं. तेवढंच फक्त मी तुझ्यामार्फत साध्य केलं .... म्हणजे अगदी पूर्णपणे 'लेकी बोले सुने लागे' या म्हणीप्रमाणे."
"हो पण मिस्टर, त्यासाठी तुम्ही मला, तुमच्या बायकोला, चार लोकात वाट्टेल ते सुनावलंत." सुनिधीनी तक्रार केली. "एवढंच नव्हे तर कायम मनावर कोरून घेण्यासाठी Boss can not be wrong, असं एक वचनही माझ्या तोंडावर फेकलंत. पण आता तुम्हीही एक वचन मनावर कोरून घ्या. Boss may not be wrong but husband always is."
"ओके डार्लिंग. मला माफ कर. I promise that I would love to be wrong here."
कथाबीज आणि ऋणनिर्देश - श्री.मंदार जोग.
@प्रसन्न सोमण.