Wednesday, 7 June 2017

- एके जागी कोमेजू दे सुख काय कमी झाले ? -

- एके जागी कोमेजू दे
सुख काय कमी झाले ? -

आजचा प्रसंग ....
सकाळी साडेसातच्या सुमारास अंधेरीच्या यारी रोड वर गुलाबच्या बिल्डिंग समोरच मी रिक्षा उभी केली. वास्तविक मला गुलाब सकाळी एवढ्या लवकर भेटीसाठी बोलावेल, असं मुळीच वाटलं नव्हतं. मी बेल वाजवली. बासष्ट-पासष्टीकडे आलेल्या एका बाईंनी दरवाजा उघडला आणि हसून त्या म्हणाल्या -
"आपण श्यामकाका वेलणकर ना ?"
"हो"
"बसा काका. तुमच्यासाठी पाणी, चहा-नाश्ता आणते तो इथे हॉलमध्येच बसून घ्या; आणि मग मी बाईंना निरोप देते. बाईंनीच मला तसं सांगून ठेवलंय."
"नको ! मला एवढ्या सकाळी नाश्ता नकोय. थोडं पाणी आणि अर्धा कप बिनसाखरेचा चहा तेवढा घेईन मी."
"आत्ता आणते" म्हणून  त्या बाई आत गेल्या. मी हॉलमध्ये उत्सुकतेनं नजर फिरवली. हॉल तसा साधासाच होता. अतिशय मन-लुभावन नक्षीकाम आणि चकचकीत पॉलीश असलेली तानपुऱ्यांची जोडी, फक्त तानपुऱ्यांसाठीच केलेल्या खणांमध्ये विराजमान होती. ते तानपुरे नुसते पाहूनसुद्धा माझं मन प्रसन्न झालं. त्याच वुडन पीसच्या मधल्या खणामध्ये ठेवलेली तबला डग्ग्याची जोडी, त्याच्या खालच्या खणामधली हार्मोनियम शोभून दिसत होती. हॉलच्या दुसऱ्या बाजूला एका छोट्या वुडन पीसमध्ये रेडिओग्रॅम आणि बाजूला आणि खाली खूप निगुतीने ठेवलेल्या रेकॉर्ड्स होत्या आणि त्याच पीसच्या टॉपवर, छान रिसिव्हर आणि नक्षीदार डायल असलेला फोन दिसत होता. बाकी मग, साधासा सोफासेट आणि खुर्च्या मांडलेल्या होत्या. एक लक्षणीय गोष्ट मात्र होती, ती म्हणजे बरेचसे पुष्पगुच्छ खाली ठेवलेले दिसत होते. त्यातही सर्वात मोठा पुष्पगुच्छ होता त्याखाली लेबल होते 'मुंबई पत्रकार संघाकडून.' म्हणजे काल इथे मोठी पत्रकार परिषद झडलेली दिसत होती.... एकीकडे हॉल पाहता पाहता शेजारच्या रियाझ हॉल मधून, आपल्याच तंद्रीत रियाझ करत असलेल्या गुलाबच्या निकोप सुरांचे लगाव कानांना तृप्त करता करता अधीर, अतृप्त सुद्धा ठेवत होते. असेच आणखी सूर हवे आहेत, आणखी सूर हवे आहेत, अशी मनाची मागणी चालूच होती. तेवढ्यात पाण्याचा ग्लास आणि चहाचा कप घेऊन त्या बाई आल्या.
"घ्या काका !" ट्रे समोर ठेवून बाई म्हणाल्या. मी पाणी आणि चहा संपवतोय तोवर त्या बाई परत मला म्हणाल्या "तुमचा चहा झाला ना ? आता शेजारच्या रियाझ हॉल मध्ये जाऊन बसा काका ! बाईंनी मला अगोदरच तसं सांगून ठेवलंय"
"ठीक आहे" म्हणत सोफ्यावरून उठता उठता माझ्या पायात एकदम चमक गेली आणि मी पटकन परत खाली बसलो.
"काय झालं काका ? तुमची तब्येत बरी नाही का ?"
"तसं काही नाही बाई ! आता अठ्ठ्यात्तरीला आलोय ना ? कधी कधी पटकन उठतांना तोल जातो" असं म्हणत मी परत सांभाळून उठलो आणि शेजारच्याच रियाझ हॉलचं दार लोटून मी आतल्या खुर्चीवर बसलो. -

'मालनिया गुंदेलाओ री !'                         

गुलाबचा भैरव-बहार या जोडरागातला बडा ख्याल आता आलाप, उपज, बोल-ताना करत करत घसीट तानांपर्यंत आला होता. सत्तरीच्या पुढे वय जाऊनही गुलाबच्या ढाल्या स्वरातल्या वजनदार तानांचा जोश जराही उणावलेला नव्हता. दाणेदार, पल्लेदार आणि अतिमुश्किल ताना, अक्षरशः वळीवाच्या सरीसारख्या अंगावर कोसळत होत्या. हे तुफान झेलता झेलता गुंगी आल्यासारखं मन भूतकाळात झेपावलं......

------------

पूर्वार्धातील आठवणी ....
गेल्या तीन पिढ्यांपासून आमचं वेलणकर कुटुंब कोकणातल्या देवगड तालुक्यातून गोव्यात म्हापशाला स्थायिक झालं होतं. गावच्या राम मंदिराच्या गल्लीच्या टोकाला आमचं घर होतं. संध्याकाळी गावातल्या शाळा सोबत्यांबरोबर भरपूर खेळणं, मस्ती करणं हे माझे उद्योग रोजच चालू असत. त्यावेळी शाळेतला माझ्याच वयाचा एक तरतरीत मुलगा बाजूला उभा राहून हे खेळ बघत असे. गोविंदा त्याचं नाव. याच गोविंदाला मी नंतर राम मंदिरात कीर्तन करतांना ऐकलं आणि त्याच्या गोड गळ्याने मी भारावून गेलो. त्याला कीर्तनात त्याची गुलाब नावाची छोटी बहीण साथ करत होती; तिचाही गळा अत्यंत गोड होता. ही दोघं बहीण भावंडं त्यांच्या आईसोबत त्यांच्या देवळाजवळच्या छोट्या घरात राहत असत. थोड्याच काळात गोविंदा माझा जवळचा मित्र झाला मग मी अनेकवेळा अभ्यासासाठी वा खेळण्यासाठी या म्हापसेकर कुटुंबाच्या घरी जात असे. गोविंदाला वडील नसल्यामुळे काकू दुसऱ्यांची घरकामं, मजुरी वगैरे करून घर कसंबसं चालवत होत्या. गोविंदा गुलाब दोघांचाही गाण्याचा नाद एकीकडे वाढत होता. दोघांनाही गाणं शिकण्याची खूप इच्छा होती, पण गोविंदासाठी शाळेचं शिक्षण सर्वात जास्त महत्वाचं असल्यामुळे आणि घरच्या परिस्थितीमुळेही काकूंना दोघांनाही गाण्याची शिकवणी वगैरे काही लावता येण्यासारखी नव्हती. मात्र घरीच गात बसलेल्या गुलाबच्या डोळ्यांमध्ये तेव्हाही एक प्रकारचा निग्रह जाणवायचा.

याच दरम्यान भिक्षुक असलेले माझे वडील हार्टच्या दुखण्याने आजारी पडून आठ दिवसात वारले. आईवर आकाश कोसळलं. आईला हा धक्का पेलवला नाही तीही क्षयाने आजारी पडली आणि माझं घरही एकदम बसल्यासारखं झालं. गावच्या एका वैदूचं औषधपाणी केलं पण फारसा उपयोग होता चारच महिन्यात माझी आईही वारली. झालं... चार महिन्यात होत्याचं नव्हतं झालं. मी अनाथ झालो. माझी एकच नातेवाईक म्हणजे विधवा मावस-मावशी शेजारच्या गावात होती. तीच सहाय्याला आली. मुंबईत शास्त्रीहॉल मध्ये तिचा सख्खा भाऊ, म्हणजे खरंतर माझा मावस-मामाच, राहत होता. तिथे माझी राहण्याची व्यवस्था करण्याचे तिने ठरवले. मावशी मला म्हणाली - "श्याम, वैऱ्यावरही येऊ नये असा प्रसंग तुझ्यावर आलेला आहे. आता पुढे मार्ग तुझा तूच काढायला हवास. तुझी मुंज झाली आहे. राहायची व्यवस्था शास्त्रीहॉल मध्ये होईल. ब्राह्मण आहेस तेव्हा तिथेच आजूबाजूला वार लावून जेवायची व्यवस्था कर, शिष्यवृत्या मिळवून शिक्षण करून मॅट्रिक हो आणि कमवायला लाग. आईचे दागिने वगैरे विकून सुरुवातीच्या पैशांची व्यवस्था मी करते." अशाच प्रकारे व्यवस्था लावून मी दहाव्या वर्षीच म्हापसा सोडून मुंबईला आलो स्वतःचीच जगण्याची लढाई लढायला लागलो.

------------

आजचा प्रसंग ....
गुलाबनी आता भैरव-बहारची द्रुत बंदिश सुरु केली होती -

कजरारे नैना गोरी तोरे
मन बसे मदभरे रंगीले                    
कजरारे नैना गोरी तोरे !!

धबधब्याच्या आवाजासारख्या, तीन-तीन आवर्तनं चालणाऱ्या अचाट दमसासाच्या ताना ऐकतांना सुद्धा माझी छाती भरून आल्यासारखी वाटत होती. सगळ्या वातावरणातच एक प्रकारची गती भरून राहिली होती. या गतीची अनुभूती घेता घेता त्याच गतीने माझ्या गत आठवणींचा पट उलगडू लागला ....

------------

उत्तरार्धातील आठवणी ....
शिष्यवृत्त्यांच्या बळावर एम..पर्यंत मजल मारून मी नोकरी करायला लागलो होतो. थोडाफार मित्रांच्यात रमत होतो. भाड्याची का होईना जागा घेऊन संसार थाटता येईल असा विश्वास वाटू लागल्यामुळे रोमँटिक भावनाही मनात येऊ लागलेल्या होत्या. मला स्थळंही सांगून येऊ लागली होती पण फोटो पसंत पडत नव्हते.

एके दिवशी संगीत वेड्या मित्राबरोबर मी एका उदयोन्मुख गायिकेच्या मैफिलीला गेलो. गायिका खूपच नवीन असल्यामुळे तिचं नाव मित्राच्याही लक्षात नव्हते. हॉलच्या बाहेर बोर्ड पाहतो तो काय ? ... गायिका कुमारी गुलाब म्हापसेकर... म्हणजे गुलाब छोट्या प्रमाणात मैफिली करू लागली होती तर ! ... हॉलमध्ये गेलो तोवर 'नंद'चा बडा ख्याल गुलाबनी सुरु केलेला होता - 'धुंडो बारी सैय्या.' ... त्यादिवशी अतिशय आत्मविश्वासाने गुलाब गायली. डोळ्यात आत्मविश्वास, निग्रह आणि जिद्दीचीही झलक दिसत होती. नुकतीच तारुण्यात प्रवेश केलेली गुलाब खूप मोहक दिसत होती. मैफिल संपल्यावर त्याचवेळी गुलाबला  भेटता, तिचा मुंबईतला पत्ता काढून सावकाशीने तिला भेटायचं, असं मी ठरवलं. त्याप्रमाणे दोन दिवसांनी संध्याकाळी मी गुलाबच्या घरी गेलो. समोरच लोखंडी कॉटवर वृद्ध झालेल्या आणि आजारपणानी खंगलेल्या काकू दिसल्या. गुलाब संगीत शिक्षणासाठी तिच्या गुरुजींकडे गेलेली होती. काकूंच्या शेजारी बसून मी काकूंना म्हापशातली ओळख दिली आणि विचारलं -
"कशा आहात तुम्ही काकू ?"
"मी काय बाबा आता पिकलं पान. लवकरच गळून पडणार !"
"असं नका म्हणू काकू ! तुम्ही लवकर बऱ्या होणार आहात. आणि हो ... गोविंदा कुठे आहे ?"
"काय सांगायचं बाबा श्याम तुला ? गोविंदा मॅट्रिकच्या वर्गात असतांनाच वारला रे !"
"काय सांगता काय काकू ? मला काहीच कळलं नव्हतं हे ! अरेरे .... कशाने गेला ?"
"आठ दहा दिवस ताप येत होता. त्याचंच निमित्त झालं म्हणायचं. म्हापशाला म्हणावे तसे औषधोपचार झाले नाहीत. त्यात माझी परिस्थितीची रड ! गेलं तसंच निघून लेकरू ! त्यानंतर मला मधुमेह निघाला आणि मी आजारी झाले. सगळीच कठीण परिस्थिती."  
"पण मग काकू इथं मुंबईला कशा आलात ?"
"गुलाब लहान, पण गुलाबनंच धीरानं घेतलं. त्यात तिचं गाण्याचं वेड... जयपूर अत्रौली घराण्याचे अझीम हुसेन खानसाहेब मुंबईत शिष्यांना शिकवतात असं गुलाबला कुठूनसं कळलं त्यांच्याचकडे शिकून भरपूर रियाझ करून मोठी गायिका होईन असा हट्ट धरून बसली. माझाही इलाज मुंबईत चांगला होईल म्हणाली. तिनंच पुढे होऊन म्हापशाचं घर विकलं, छोटा जमिनीचा तुकडा विकला, माझे थोडे डाग होते ते विकले आणि पैसा उभा झाल्यावर मुंबईत भाड्याचं घर घेऊन आम्ही राहू लागलो. आता गुलाब सकाळी थोडा वेळ बालमंदिरात गाणं शिकवून थोडे पैसेही मिळवते. हिमतीने सगळं बघत्येय ती ! त्यात तिचा रियाझ, खानसाहेबांकडची शिकवणी सगळीच गडबड चालू आहे. आता तिचीच काळजी ! तिचं लग्न लागलेलं बघितलं की मी डोळे मिटायला मोकळी !"
कसे कोण जाणे पण माझ्या तोंडातून शब्द निघून गेले - "काकू, जावई म्हणून मी तुम्हाला कसा वाटतो ?"
" ! अरे ब्राह्मण तुम्ही ! आमच्यासारख्या खालच्या लोकांशी का संबंध जोडायचे तुम्ही ?"
"काकू, मी तर असलं उच्च वगैरे काही मानत नाहीच पण तुम्हीही मानू नका. काळ पुष्कळ बदललाय आता ! तुम्ही मला बालपणापासून ओळखताच. मी एम..केलंय नोकरीही चांगली आहे. गुलाबला बऱ्यापैकी सुखात ठेवू शकेन."
"ठीक आहे ! तुम्हा दोघांनाही पटलं तर मला आनंदच आहे रे ! उद्या शनिवारच आहे. दुपारी गुलाब जरा मोकळी असेल. त्याचवेळी तू तिच्याशी बोलून घे."
"ठीक आहे काकू. काळजी घ्या. येतो मी." काकूंचा निरोप घेऊन मी निघालो.

दुसऱ्या दिवशी दुपारी मी गुलाबच्या घरी पोहोचलो. गुलाब घरीच होती. काकूही कॉटवरून आमचं संभाषण ऐकत होत्या. गुलाबनीच स्वागत केलं -
"या श्यामसाहेब !" तिच्या श्यामसाहेब या हाकेनं मी जरा चमकलोच.
"गुलाब, तुझी परवाची मैफिल ऐकली. दोन्ही राग, नंद आणि बसंतीकानडा खूप छान झाले. खरंच सुंदर गायलीस तू !"
"नाही हो श्यामसाहेब ! ही अगदीच सुरुवातीची सुरुवात आहे. केवढा मोठा गाण्याचा महासागर पसरलाय समोर ! मला गाण्यात खूपच मोठा पल्ला गाठायचाय."
"ते तू करशीलच पण गुलाब तू दिसतेसही खूपच सुंदर." - नकळतच गुलाबचे गालही गुलाबी झाले. तिनं चोरट्या नजरेनं माझ्याकडे पाहिलं.
"मी काकूंकडे काल बोललोय आणि आज तुला विचारतो - गुलाब तू माझ्याशी लग्न करशील ?" तिने परत माझ्याकडे पाहिले. तिच्या नजरेत प्रेमाचे गहिरे भाव तरळून गेल्याचं मला जाणवतंय ना जाणवतंय तोच तिची नजर लगेच खाली वळली.
"मला माफ करा पण ... नाही. माझा नकार आहे." एकदम तिच्या तोंडून शब्द आले आणि मी चमकलोच. आता परत ती माझ्याचकडे बघत होती: पण तिच्या नजरेतला निग्रह मला स्पष्ट वाचता येत होता.
"का ? मी उच्च कुलीन, ब्राह्मण म्हणून ?"
"छे छे !" गुलाब त्वेषाने म्हणाली, "या असल्या अनेक उच्च कुलीन नजरा अप्रत्यक्षपणे काय बोलत असतात, कसली मागणी करत असतात, हे चांगलंच ओळखू लागल्येय मी मुंबईत आल्यापासनं. माफ करा, तुमच्यासाठी हे बोलत नाहीये फक्त जाणवलेला अनुभव हे बोलतोय... मी नकार एवढ्यासाठी देत्येय की मला सध्यातरी आयुष्यात फक्त आणि फक्त गाण्याला महत्व द्यायचंय बाकी कशालाही नाही... आणि तुम्हाला इथेच एक इशाराही देऊन ठेवत्येय. यापुढे मला भेटायचा, माझ्याशी कुठल्याही प्रकारे संपर्क ठेवायचा प्रयत्न तुम्ही करू नये कारण ... तुमचा अपमान झाला तर ते मला सहन होणार नाही. मला परत एकदा माफ करा आणि या आता तुम्ही." आणि झटक्यात गुलाबनी हा प्रसंगच संपवला.

------------

आजचा प्रसंग ....
रियाझ संपवून गुलाबनी तानपुरा खाली ठेवला. समोर बसलेल्या तीन विद्यार्थिनींना आणि उजव्या बाजूला बसलेल्या तबलजीला तिनी मानेनीच जाण्याची खूण केली. विद्यार्थिनी आणि तबलजी नमस्कार करून, "येतो बाई," असं म्हणून निघून गेले. एवढा कसून रियाझ करूनही गुलाबचा चेहरा उत्साही दिसत होता. अगदी साधीशी पांढरी पाचवारी साडी गुलाब नेसली होती. आयुष्यात खूप काहीतरी मिळवल्याचं समाधान तिच्या चेहऱ्यावर विलसत होतं. प्रसन्न मुद्रेनं ती मला म्हणाली -
"कसा आहेस श्याम ?"
जवळ जवळ पन्नास वर्षांपूर्वीच्या भेटीत गुलाबनी मला 'अहो श्यामसाहेब' अशी परक्यासारखी हाक मारली होती तेव्हा मी चमकलो होतो; तसाच आता सुद्धा ही आपुलकीच्या भाषेतली एकेरी हाक ऐकून पुन्हा चमकलो.
मी छान, मस्त, मजेत आहे गुलाब. तू कशी आहेस ? ..... बाकी विचारायची गरजच नाही म्हणा. चारच दिवसांपूर्वी २६ जानेवारीला तुला जेष्ठ गायिका म्हणून पद्मश्री मिळालीय, तेव्हा तू खुशीत असणारच."
"हुं .... समजलं वाटतं तुला ! पण तू तर परदेशी होतास आणि दोनच दिवसांपूर्वी आलायस ना ? आणि हो ... अचानक परदेशी कसा काय निघून गेलास ?"
"गुलाब, पन्नास वर्षांपूर्वी मी तुला लग्नासाठी मागणी घातल्यानंतर तू मला नकार दिलास आणि काही काळ मी बेचैन होतो. कशीबशी नोकरी तेवढी करत होतो, पण मन उदास होतं. नेमक्या याच काळात मला माझा कॉलेज मधला जुना मित्र उमेश भेटला. त्याचे वडील वारल्यामुळे त्यांचा साऊथ आफ्रिकेत असलेला छोटासा बिझनेस उमेशच्या ताब्यात आला होता. उमेशनी मला पार्टनरशिपसाठी गळ घातली. नाहीतरी तुझ्या आठवणींनी मी उदास होतोच: त्यामुळे काही  काळ दूर जाऊन बिझनेस करून तरी बघूया, असा विचार करून मी उमेशसह साऊथ आफ्रिकेला गेलो. उमेशच्या माझ्या धडाडीने बिझनेस खूप वाढला. उमेशचा तरुण मुलगाही पुढे जॉईन झाला. आता जवळ जवळ पन्नास वर्षांनंतर वय वाढलं, मधुमेह निघाला, तेव्हा उमेशच्या मुलाच्या हाती सर्व सोपवून मी रिटायर्ड आयुष्य जगण्यासाठी मुंबईत यायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे आलो... तू बऱ्यापैकी मोठी गायिका झालेली आहेस, एवढं मला साऊथ आफ्रिकेत समजलं होतं. एकच सांगतो, बिझनेस मध्ये मी स्वतःला गुंतवलं होतं तरीही दिवसाकाठी मध्येच एखाद्या तीरासारखी तुझी आठवण यायचीच, त्यामुळे दुसऱ्या कुणाशी लग्न वगैरे करावं असं कधी वाटलंच नाही. मुंबईत आल्यावर सुद्धा, आता तरी तुझी भेट घ्यावी, अशी इच्छा होती पण तेव्हा मला नकार देतांनाचा तुझा इशारा आठवून खरंतर थोडा धास्तावलोच होतो. पण अचानक ध्यानीमनी नसतांना काल संध्याकाळी तुझा फोन आला आणि तूच मला बोलावलंस."
"खरंय श्याम. काल मीच तुला बोलावलं; पण त्यापूर्वीच्या पन्नास वर्षांत मात्र मी तुझी आठवण निर्धाराने विसरले होते."
"हे खोटं आहे गुलाब. जर माझी आठवण तू निर्धाराने विसरली होतीस तर मग मी परदेशात गेलो कधी, आलो कधी, या बित्तमबातम्या तू कशासाठी काढल्यास ? पन्नास वर्षांच्या गॅप नंतर दोनच  दिवसांपूर्वी मी मुंबईत आल्यानंतर माझा फोन नंबर मिळवून तू मला काल फोन करून का बोलावून घेतलंस ?" 
श्याम, समोरच्याला शब्दात पकडण्याच्या कलेत तू हुशार आहेस, हे खरं; पण तरीही माझं पहिलं प्रेम संगीत हे होतं, हेही तितकंच खरं. वेड लागल्यागत एकच ध्यास घेतल्याप्रमाणे मी फक्त गाण्याच्याच मागे लागले होते. कुठल्याही गायकाला आणि विशेषतः आमच्या जयपूर अत्रौली घराण्याच्या गायकाला एखाद्या अखंड यज्ञाप्रमाणे शिक्षण आणि रियाझ, शिक्षण आणि रियाझ चालू ठेवावाच लागतो. मुळातच या घराण्याचं गाणं अतिमुश्किल, त्यात घराण्याचे कायदे कानून सुद्धा अतिशय कडक. दुसऱ्या घराण्याचं गाणं गायलाच काय पण ऐकायलासुद्धा आत्ता आत्ता पर्यंत बंदी होती. पुढे थोडा काळ बदलला म्हणून मी इतर घराण्याच्या गायक गायिकांची गाणी ऐकली एवढंच. एवढी तपश्चर्या केली तेव्हा, आत्ता कुठे गाणं थोडं थोडं गवसलं. आज मात्र मी खरंच खूष आहे, कृतार्थ आहे. चार दिवसांपूर्वी मला पद्मश्री मिळाली, हे त्याचं कारण नाहीये. तर काल सकाळी एक वेगळाच चमत्कार घडला. पद्मश्री मिळाल्यानंतर इथल्या रवींद्र नाट्यमंदिरामध्ये परवा रात्री माझ्या गाण्याची मैफिल होती. मी दोन तास कसून शुद्ध नट आणि संपूर्ण मालकंस हे घराण्याचे खास राग गायले. त्या मैफिलीला अझीम हुसेन खान साहेबांचे चिरंजीव आणि माझे गुरु बंधू शमीम हुसेन खान साहेब आले होते. वास्तविक शमीम भैय्या आजारी होते तरीही त्यांनी माझं पूर्ण गाणं ऐकलं, पण नंतर मात्र मला भेटता निघून गेले. हेच शमीम भैय्या काल सकाळी पत्रकारांबरोबर माझ्या घरी आले. शमीम भैय्यांनी माझ्या गाण्याची खूप स्तुती तर केलीच, पण ते असंही म्हणाले की आज जर थोरले खान साहेब असते तर त्यांना कृतार्थ वाटलं असतं. शमीम भैय्या मला असंही म्हणाले की, "आज तुम्हारे गानेसे जयपूर अत्रौली घरानेको चार चाँद लग गए।  अब तुम्हारा गाना पूरी तरहसे पक गया है। अब तुम किसीभी घरनेका कोईभी गाना गा सकती हो।" शमीम भैय्यांचे हे बोल ऐकून मला खरंच जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटतंय श्याम." अतिशय आनंदी चेहेऱ्यानी गुलाब मला एकदम म्हणाली, "बडे गुलाम अली खान साहेबांची एक ठुमरी माझी अतिशय आवडती आहे. मी पहिल्यांदाच गावून बघते, तू ऐकून बघ कशी वाटते ती"  -

याद पियाकी आये
ये दुख सहा जाये, हाय राम
याद पियाकी आये !!
बाली उमरिया सूनी रे सजरिया
जौबन बीता जाये, हाय राम
याद पियाकी आये !!
बैरी कोयलिया कूक सुनावे
मुझ बिरहनका जियरा जलावे
हाँ पी बिन रैन जगाये, हाय राम
याद पियाकी आये !! 

भान हरपून गुलाब कुठल्याही साथीशिवाय ठुमरी गात होती. स्वरांच्या लगावामध्ये जयपूर अत्रौलीच्या स्वरलगावाचा वासही नव्हता. ठुमरीमधल्या विरहिणीचा भाव तिनी असा काही पकडला होता की आर्त स्वरसमूहांच्या लडी अगदी उलगडत उलगडत कानांवर पडत होत्या. ठुमरी गावून गुलाब थांबली. काहीतरी अलौकिक गवसल्याचा आनंद तिच्या मुखावर स्पष्ट दिसत होता. ती ठुमरी ऐकता ऐकता माझीही ब्रह्मानंदी टाळी लागली होती. आणि -
"श्याम, आजच्या आज माझ्याशी लग्न करशील ?"
उन्हाच्या काहिलीने हैराण झालेल्या, घामेजलेल्या शरीरावर पहिल्या पावसाची थंडगार सर पडल्यावर जी सुखाची लहर शरीरभर दौडत जाते तशी अनुभूती मला तो गुलाबचा प्रश्न ऐकून आली. बाकी गुलाब मुळीच बदललेली नव्हती. ज्या तडकाफडकी तिनी पन्नास वर्षांपूर्वी, मी विचारलेला हाच प्रश्न निकालात काढला होता, त्याच तडकाफडकी तिनीच, तोच प्रश्न अचानक उपस्थित केला होता. या प्रश्नाचं माझ्यापाशी एकच उत्तर होतं... पायातली चमक विसरून ताडकन मी बसलेल्या खुर्चीतून उठलो गुलाबपाशी जाऊन प्रेमभरानं तिला जवळ ओढलं... पूर्वी कधीतरी शाळेत शिकलेल्या कवितेच्या ओळी त्याच वेळी कानांवर पडल्याचा भास झाला -

मरणाच्या दारी झाल्या ओळखीच्या गाठीभेटी
धीर देती एकमेका सांगुनिया गुजगोष्टी
सहवासी फुलण्याचे भाग्य भाळी नाही आले
एके जागी कोमेजू दे, सुख काय कमी झाले ? !!

@प्रसन्न सोमण -