- नॉस्टॅल्जीक दिवाळी (पुन्हा प्रपंच) -
(दारावर
ठोकल्याचा आवाज. परत परत दार
वाजत राहते.)
प्रभाकर
- च्या मारी
... कोण एवढा
पेटलाय ? अगं
ए मीने
... दार उघड
ना लवकर.
मीना
- तुम्हीच उघडा हो. माझ्या फराळाच्या
चकल्यांचे घाणे संपत आलेत.
प्रभाकर
- अगं मी
इलेक्ट्रिकचं तोरण पेटवून बघतोय गं
... बरं ठीक
आहे ... मीच
बघतो (दार
उघडतो) ओहो
... टेकाडे तुम्ही !
टेकाडे
- मॅड ! अहो
पंत, रविवार
सक्काळी अगदी
दार बडवून
तुमच्याकडे येणारा दुसरा कोण आहे
?
प्रभाकर
- अहो टेकाडे
ते खरं
आहे हो,
पण मी
म्हटलं आज
दिवाळीच्या आधीचा रविवार. तुम्ही घरी
दिवाळीची कामं
काढली असतील.
तेव्हा आज
तुमची साप्ताहिक
फेरी चुकणार.
पण तुम्ही
उलट लवकरच
आलात.
टेकाडे
- अहो पंत
आपल्याला दिवाळीची
कुठली हो
कामं ? मॅड
! येऊन जाऊन
कंदील आणि
इलेक्ट्रिकचं तोरण आणायचं. ते दोन्ही
आणलं हो
कालच. मीनावहिनी
कुठे आहेत
?
प्रभाकर
- आत चकल्या
चालू आहेत.
टेकाडे
- अरे व्वा
! वहिनींच्या हातच्या चकल्या. खाल्ल्याच पाहिजेत.
उतारा म्हणून.
प्रभाकर
- आँ ! उतारा
! म्हणजे ?
टेकाडे
- अहो पंत
काय सांगू
कप्पाळ ! काल
संध्याकाळी आमच्या सौं च्या चकल्या
बनवून झाल्या.
मामला थोडा
कठीण झालाय
हो ! आज
सकाळी तिने
मला टेस्ट
साठी दिली.
पहिला तुकडा
जरा जोर
लावून तोडला
खरा, पण
उरलेली चकली
तिची नजर
चुकवत कशीतरी
संपवली. छान
झालीय असं
मी म्हटलं;
पण पुढे
'दातांची खोलवर
चौकशी झाल्यासारखं
वाटतंय' असंही
मॅड सारखं
बोलून गेलो.
झालं ... तिच्या
तोंडाची जलदगती
गोलंदाजी अशी
काही जोरदार
चालू झाली
की तिथून
कसाबसा पळ
काढून मी
इथं सटकलो.
अहो म्हणून
तर लवकर
आलो.
प्रभाकर
- पण बरं
झालं तुम्ही
लवकरच आलात.
आज मला
खूप अस्वस्थ,
कसंतरीच होतंय
हो ! कुठेतरी
खूप उदासी
आल्यासारखं वाटतंय.
टेकाडे
- का हो
? मीना वहिनींचा
कुठला बिघडलेला
पदार्थ खाल्लात
?
प्रभाकर
- तसं काही
नाहीये हो.
टेकाडे
- अरे मग
पंत, दोन
दिवसांवर दिवाळीसारखा आनंदाचा,
उत्साहाचा, झक्कास सण आलाय आणि
तुम्हाला निरुत्साही
का वाटतंय
?
प्रभाकर
- असं नीट
सांगता येणार
नाही हो
मला.
टेकाडे
- पंत, आपल्या
बालपणापासून गेली पन्नास एक वर्ष
आपण चाळीत
एका मजल्यावर
सहजीवनाच्या तत्वाने राहतो. मजल्यावरची बारा
घरं ही
एका कुटुंबासारखी
राहतात. आणि
तुम्ही मनातल्या
भावना माझ्यापासून
लपवून काय
ठेवताय ? काही
प्रॉब्लेम आहे का ?
प्रभाकर
- अहो तसा
मोठा प्रॉब्लेम
कुठलाच नाहीये
हो. पण
काल संध्याकाळी
मी कंदील
विकत घेतला
तेव्हापासूनच हा अस्वस्थपणा वाढलाय.
टेकाडे
- म्हणजे काय
? मॅड !!
प्रभाकर
- अहो टेकाडे,
मी कंदील
'विकत' घेतला
हो. दिवाळीचा
कंदील आणि
विकतचा ? आपल्या
बालपणीची दिवाळी
विसरलात का
टेकाडे ?
टेकाडे
- ओहो ! आता
कळलं. तुम्हाला
नॉस्टेल्जीयाचा सीव्हीयर अटॅक आलाय तर
!
प्रभाकर
- मग काय
तर ! आठवा
टेकाडे ! आपल्या
बारा घरचे
आपण पोरांनी
बनवलेले बारा
सारखे कंदील.
सात-आठ
दिवस आधी
डिझाईन ठरवायचं.
मग पुठ्ठा,
कागद यासाठी
मायदेव आजोबा
किंवा धारप
काकांकडून पैसे घ्यायचे आणि मग
गॅलरीत कंदील
करणं नामक
धुडगूस घालायला
सुरुवात. कंदील
करत असतांना
सोमण दादांकडून
टेपरेकॉर्डर व कॅसेट्स उसन्या घेऊन
त्याकाळी फेमस
झालेली पु.ल., व.पु., द.मा., शंकर
पाटील या
सगळ्यांची कथाकथनं कॅसेट्स झिजेपर्यंत ऐकणं
व्हायचं. कधी
कधी आपल्यात
तुफान भांडणं,
वादावाद्या, हमरीतुमरी व्हायची, मग कोणीतरी
बहुदा नामजोशी
आजी दटावायला
आणि भांडणं
सोडवायला यायच्या.
येतांना ताटात
थोडथोड्या चकल्या, करंज्या, चिवडा घेऊन
यायच्या. मग
काय विचारता
? आपण तुटून
पडायचो. कोणीतरी
नीलाताई किंवा
अनंताच्या आई किंवा नाना आजोबा
वसुबारसेला कंदील मिळाला पाहिजे म्हणून
सांगायचे; पण ते कधीही शक्य
झालं नाही.
गळ्यापर्यंत आल्यावर बारा कंदील हापसायला
धनत्रयोदशीची पूर्ण रात्र जागून नरक
चतुर्दशीच्या पहाटे तीन - साडे तीन
पर्यंत बाराही
घरात एकसारखे
कंदील लागायचे.
त्यानंतर आईने
घातलेलं अभ्यंग
स्नान.
टेकाडे
- आणि या
कारट्याला वर्षभर आई बाबांनी फोडून
काढलेलं असलं
तरी अभ्यंग
स्नानानंतर याच कारट्याला कारीट फोडायला
मिळायचं. आणि
मग फटाके... पंत आपल्याला
फटाके कसे
मिळायचे हो
?
प्रभाकर
- कसे मिळायचे
म्हणजे ?
टेकाडे
- मला आठवतंय,
पंधरा दिवस
आधी कष्ट
घेऊन सत्तर-ऐशी रुपयांच्या
फटाक्यांची यादी मी बनवली की
बाबांकडून त्याच्यात अर्धी अधिक काटछाट
होऊन मुश्किलीने
तीस चाळीस
रुपयांचे फटाके
सँक्शन व्हायचे.
पण ते
सुद्धा सगळ्यांबरोबर
वाजवतांना व्यवस्थित पुरायचे. खूप मजा
यायची. लक्ष्मी
पूजनाच्या रात्री सगळ्या बारा घरांनी
एकत्र येऊन
फराळ, कॉफीचा
आस्वाद घेता
घेता
गप्पांचा फड जमायचा तो रात्री
खूप उशिरापर्यंत.
प्रभाकर
- टेकाडे, आपण किल्ला सुद्धा काय
सॉलिड बनवायचो
ना ?
टेकाडे
- तर काय
! दिवसा किल्ल्यासाठी
दगड, चिखल,
माती, वेळप्रसंगी
कचरा सुद्धा
गोळा करून
किल्ल्याच्या मागे लागायचो, आणि दिवेलागणी
झाली की
कंदिलांच्या मागे लागायचो. माझ्या आईची
तर म्हणच
होती की
"काय रे सतत 'उठ पाय
घराबाहेर' असं चालू असतं तुझं
!" किंवा मग बाबांना सांगायची की
"त्याला जरा ओरडा हो ! हातावर
पाणी पडलं
की पाय
उंबऱ्याच्या बाहेर असतो माहुल्याचा." अर्थात हे ऐकून न
ऐकलंसं करण्याची
कला आपल्याला
चांगलीच अवगत
होती म्हणा
!
मीना
- (येता येता)
अहो आत्ता
सगळ्या चकल्या
आटोपल्या. अरे व्वा ! भावजी तुम्ही
कधी आलात
? चकल्यांच्या नादात काही कळलंच नाही.
टेकाडे
- झाला थोडा
वेळ ! वहिनी,
अहो चकल्या
कुठे आहेत.
येऊ द्या
की.
मीना
- अहो आत्ता
नैवैद्य दाखवून
झाला. थांबा
आणते हं
! (आत जाऊन
ताटलीत थोड्या
चकल्या आणते)
घ्या भावोजी.
कशा झाल्यायत
सांगा. तुम्हीही
घ्या हो.
प्रभाकर
- त्यांनाच पहिल्या दे मीने. अगं
टेकाडे वहिनींच्या
चकल्या बिघडल्यायत
असं त्यांनाच
सांगून बोलणी
खाऊन आलेत
ते.
टेकाडे
- ते नवीन
कुठाय हो
? जाऊद्या. (चकली खात) व्वा ! मीना
वहिनी, तुमची
चकली अगदी
तोंडात विरघळतेय
हो. झक्क्कास.
मीना
- (प्रभाकर पंतांना) अहो मला माळ्यावरून
रांगोळीची आणि रंगांची पिशवी काढून
द्या हो
आजच्या आज.
प्रभाकर
- हरे राम
! माळ्यावर चढू ? .... बरं बाई ठीक
आहे... काढीन.
पाहिलंत टेकाडे
आमची मीना
दिवाळीच्या परंपरा टिकवतेय.
मीना
- मग काय
! काय तासंतास
खपून रांगोळ्या
काढायचो आम्ही
मुली पूर्वी
!
प्रभाकर
- अगं मीने
आमचाही आत्ता
तोच विषय
चालला होता....
लहानपणीची दिवाळी... काय ते कंदील,
किल्ले, फटाके,
रांगोळ्या, सणानिमित्ताने घेतलेले नवीन कपडे...
अगं हो
त्यावरून आठवलं
.... टेकाडे हल्ली तुम्ही पेपरमधून दिवाळी
निमित्त येणाऱ्या
जाहिराती बघता
का हो
?
टेकाडे
- हो बघतो
ना. त्याचं
काय ?
प्रभाकर
- मग त्या
जाहिरातींमध्ये झालेला बदल तुमच्या लक्षात
नाही आला
?
टेकाडे
- मॅड !! कोणता
बदल हो
?
प्रभाकर
- अहो आपल्या
लहानपणी दिवाळीसारखा
सण जवळ
आला की
ज्वेलरीच्या जाहिराती आणि मुख्यतः
सुविधा, लाजरी यासारखी दादर मधली
कपड्यांची दुकानं, साड्यांची दुकानं यांच्या
जाहिराती किंवा
मफतलाल, विमल,
रेमंड्स या
कंपन्यांच्या पॅण्ट पिसेसच्या किंवा सुटिंग्जस
यांच्या जाहिराती
असायच्या. सध्या मी बघतो तर
मुख्यतः रियल
इस्टेट, एन.ए.प्लॉट्स,
सेकंड होम,
विकेंड होम,
फार्म हाउसेस,
या आणि
नवीन कार्स
याच जाहिराती
फार दिसतात.
त्याच्या जोडीला
फार तर
टु व्हिलर्स,
ज्वेलरी आणि
इलेक्ट्रॉनिक आयटम्स.
मीना
- हे अगदी
खरं आहे
हो भावजी.
सध्याच्या जाहिराती बघितल्या तर असं
वाटतं की
माणसं घरंच
विकत घेत
सुटली आहेत
की काय
? कपड्या बिपड्यांसारख्या
लहान-सहान
गोष्टी हल्ली
कुणाच्या खिजगणतीतही
नाहीयेत.
टेकाडे
- पंत, अजूनसुद्धा
एक मोठा
बदल झाल्यासारखा
वाटतोय मला.
प्रभाकर
- कोणता हो
?
टेकाडे
- अहो, दिवाळी
अंकांची आतुरतेने
वाट बघणं,
अंकांचा खप
आणि अंकाचं
वाचन खूपच
कमी झाल्यासारखं
वाटतंय.
प्रभाकर
- खरं आहे
टेकाडे. मुळात
या टी.व्ही., केबल,
मोबाईल, इंटरनेट,
असल्या साधनांमुळे
अगदी आपल्या
पिढीतल्या माणसांचंसुद्धा वाचनाचं वेड अगदीच
कमी झालंय.
त्यात ज्यांचं
लिखाण वाट
बघून आणि
अगदी उडी
मारून वाचावं,
असे लेखकही
उरलेले नाहीत.
हुं ... काय
सांगू टेकाडे
? अहो आपण
चर्चा केली
त्यातली कुठलीही
गोष्ट आता
घडतच नाही
आणि ज्या
गोष्टी घडतायत
त्यात मन
रमत नाही
अशी काहीतरी
विचित्र भावना
मनात निर्माण
झालीय. त्यामुळेच
ही सगळी
उदासी.
टेकाडे
- हॅ !! मॅड
!! खरंच पंत,
तुम्ही अगदीच
मॅड आहात
हो ! अहो
आता छपन्नाव्या
वर्षी तुम्ही
कसले कंदील,
किल्ले करताय
नि फटाके
वाजवताय ?
प्रभाकर
- काय टेकाडे
? अहो मॅड
तुम्हीच आहात.
अहो, या
गोष्टी आत्ता
'मला' करायच्या
नाहीयेत हो.
पण आपण
लहानपणी केलेल्या
कुठल्या गोष्टी
आजची लहान
मुलं करतायत
? अस्वस्थपणा या विचारामुळे आलाय हो.
मीना
- अहो तुम्हाला
मेला अस्वस्थपणा
कशाला हो
? आजची मुलं
त्यांच्या परीनं कित्तीतरी मजा करतच
असतात की
! मल्टिप्लेक्स मधले सिनेमे बघत असतात,
मित्र मैत्रिणींबरोबर
एन्जॉय करत
असतात. शिवाय
व्हाट्स ऍप,
ट्विटर, फेसबुक,
इंस्टाग्राम वापरून टचमध्ये राहत असतात.
त्यांना मानवणारी
सगळी मजा
ते करतातच.
टेकाडे
- मग काय
तर ! अगदी
करेक्ट आहे
हो वहिनी
! अहो पंत,
कुठल्यातरी वेडगळ विचारांमुळे उदासी कसली
आलीय हो
तुम्हाला ? तुम्हाला काय घड्याळाचे काटे
अनेक वर्ष
मागे फिरवायचेत
का ? असं
कसं होणार
? आणि आपण
आपल्या लहानपणी
जसे वागलो
तसंच आजची
मुलं कसं
वागतील ? पंत,
भाषाप्रभू
राम गणेश
गडकऱ्यांचं एक अतिशय सुंदर वाक्य
आहे ... 'दरोबस्त
बापाप्रमाणेच जर बेटा निपजला तर
इतिहासकारांना फक्त सनावळ्या बदलण्यापलीकडे दुसरं
काही कामच
उरणार नाही.'
... क्यो भाय
? मतलब क्या
है इसका
? अहो, बदल
हे होणारच.
आणि होतच
राहणार. त्यातच
आनंद आहे,
उत्साह आहे,
नवीन स्वप्ने
आहेत. तेव्हा
(गुणगुणतात) ... झटकून टाक जीवा दुबळेपणा
मनाचा, फुलला
पहा सभोती
आनंद जीवनाचा,
झटकून टाक
जीवा दुबळेपणा
मनाचा.
मीना
- व्वा भावजी.
काय गोड
गायलात तुम्ही.
थांबा एक
छान गोड
बेसनाचा लाडू
आणते तुमच्यासाठी.
(आत जाते.)
प्रभाकर
- खरंच टेकाडे.
अगदी जुन्या
नाटकातल्यासारखं भरतवाक्य म्हटलंत हो
तुम्ही.
मीना
- (येता येता)
घ्या लाडू
घ्या भावजी.
(लाडू देते.)
टेकाडे
- (लाडू टेस्ट
करून) व्वा
! झक्कास ! अन्नदाता सुखी भव. ही
दिवाळी आणि
नवीन वर्ष
तुम्हा सर्वांना
सुख समृद्धीचे
व उत्तम
आरोग्याचे जावो.
प्रभाकर
- टेकाडे तुम्हाला
आणि टेकाडे
वहिनींनाही ही दिवाळी व नवीन
वर्ष सुखाचे
आणि उत्तम
आरोग्याचे जावो आणि टेकाडे वहिनींचे
बाकी सर्व
पदार्थ उत्कृष्ट
आणि चवदार
होवोत.
टेकाडे
- आई आई
गं !! कशाला
खपली काढलीत
हो ? ... मॅड.
@प्रसन्न सोमण.
------- xxxx --------