- शोध, एक आत्मशोध -
'धुंडण्यात सुद्धा एक मझा असतो यार !' पु.लं.चे काकाजी म्हणतात.
तर व.पु.असं म्हणतात की, 'जगात सर्वात जास्त मूर्ख कोण तर पत्ता शोधणारा माणूस.' असो...
इतर कुणी म्हटलेलंच परत म्हणण्यापेक्षा मी माझं स्वतःचं काय म्हणणं आहे ते म्हणतो.
केवळ आठवणीवर भरवसा ठेवून किंवा घरातल्या माणसांच्या व्यवस्थितपणावर भरवसा ठेवून
वस्तू शोधणारा माणूस नेहमीच गंडतो, याचा अनुभव मी परवाच्या रविवारीच घेतला. काही कामासाठी
मी घरातला स्टेपलर काढायला गेलो, पण तो त्याच्या ठराविक जागेवर नव्हता. माझ्या स्वतःच्याच
व्यवस्थितपणाबद्दल मला योग्य ती खात्री असल्यामुळे (?) मी आपला गपगुमान माझाच वावर
आणि वापर असणारे सगळे खण, सगळं कपाट, आजूबाजूची कपाटं, वॉर्डरोब्स उचकायला लागलो. सौ.ची
स्वयंपाकघरात खुडबुड चालू होती. शेवटी निम्म्या अधिक घरातल्या, जवळपास सगळ्या गोष्टी जमिनीवर
आणि पलंगावर आल्या, सोन्यासारखी रविवार सकाळ, दुपारकडे कलायला लागली. मग मात्र माझा
पेशन्स पूर्णपणे संपला. चिडचिडीची भाषा बोंबाबोंबीत परावर्तित व्हायला लागली आणि मुद्दा
सौ.पर्यंत पोहोचला... स्टेपलर मिळाला... स्वयंपाकघरातील साठवणीच्या हळदीच्या पुडीच्या
शेजारी. कारण दोनच दिवसांपूर्वी थोडी हळद नेहमीच्या डब्यात काढून मोठी पुडी स्टेपलर
मारून बंद करण्यात आली होती. अर्थात 'वाट्टेल तिथे स्टेपलर का ठेवला,' असं ओरडून मी
बायकोला मुळीच दोष दिला नाही, कारण अगदी थोड्याच वेळातसुद्धा परिस्थिती पूर्ण उलटी
होऊ शकते, याची मला जाणीव होती... अरे पण जमिनीवर आलेल्या सगळ्या वस्तूंचं काय ? सगळा
रविवार वाया गेला ना !
या माझ्या स्टेपलरच्या उदाहरणात निदान तो सापडला तरी. पण जेव्हा एखादी वस्तू
आपल्याकडे आहे याची खात्री असते आणि ती वस्तू लागली की ती सापडत नाही, अशा वेळी होणाऱ्या
चिडचिडीबद्दल काय बोलणार ? ... माणसाची सुद्धा खरंच एक गम्मतच आहे. केव्हा, कुठल्या
गोष्टीची, कशासाठी गरज लागेल याचा आधी अजिबातच अंदाज येत नाही. माझ्या परदेशातल्या
भाच्याला घरातल्या आजारपणांमुळे काश्याच्या वाटीची गरज लागली. आजोबांची एक वंशपरंपरागत
काश्याची वाटी माझ्या आई-बाबांकडे होती. अर्थात खूप जुन्या काळची असल्यामुळे ती खूपच
वजनदार आणि मस्त होती. आमच्या बालपणी घरात ताप वगैरे आजारपण आलं की ती हुकमी वापरली
जायची. आई-वडील वारले. काळाच्या ओघात घरं वेगळी झाली, खूप सारं बदललं... जेव्हा गरज
लागली, तेव्हा 'त्या' काश्याच्या वाटीबद्दल ताईने मला विचारलं. गम्मत अशी की ती काश्याची
वाटी माझ्याकडे व्यवस्थित असेल असं ताईला वाटत होतं आणि ताईकडे व्यवस्थित असेल असं
मला वाटत होतं. मला माझं घर आणि ताईला तिचं घर 'त्या' वाटीच्या शोधापायी उध्वस्त करून
परत रचावं लागलं. पण 'ती' कुठेही नाही ती नाहीच मिळाली. शेवटी आज रोजी बाजारात मिळणारी
'पिळपिळीत' काश्याची वाटीच ताईला परदेशात भाच्याकडे पाठवावी लागली. पैशाचा प्रश्न नाही,
पण क्वालिटीचं काय ? करोडो रुपयांची वडिलार्जित मिळकत 'तुला नाही मला नाही...,' या
पद्धतीने गेली; या विचारांनी मी आणि ताई कायम हळहळतो व हळहळणार... पण खरं सांगायचं
तर मला असंच वाटतंय की अति अति अति सामानाने वैतागलेल्या कुठल्यातरी क्षणी, 'आज काय
करायचंय हे,' अशा विचारांनी कुणालातरी देऊन टाकलेल्या जातं, पाटा-वरवंटा, खलबत्ता,
उखळ-मुसळ (हो. माझ्या आई-वडिलांच्या मृत्यूपर्यंत हे सगळं सामान आमच्याकडे होतं) या
सगळ्या सामनामधून 'ती' ही गेली असणार.
तर..., शोधणं हे वारंवार लागणारं एक अटळ स्टेशन आहे. वस्तू जेव्हा कमी असतात
तेव्हा ? ... आपण तरुण असतो. स्मरणशक्तीही झकास असते आणि वस्तूंची संख्याही स्मरणात
राहावी इतपत कमी असते... संगीतवेडा असल्यामुळे मी अर्थात कॅसेट्स वेडाही होतो आणि संग्रहात
आलेल्या कॅसेट्सचं इंडेक्सिंग सुद्धा न कंटाळता करत होतो. पण तरीही, कॅसेट्स जरा कमी
होत्या त्या काळात, बिस्मिल्लाचा मधुवंती म्हटलं की कॅसेट नं. १३, भीमसेनचा दरबारी
म्हटलं की कॅसेट नं. ४५, रविशंकरचा अहिरललीत म्हटलं की कॅसेट नं. ३९, किशोरीचा शुद्ध
नट म्हटलं की कॅसेट नं. २३, अशा सूचना माझा मेंदू हुकमी देत असे. पण कॅसेट्सची संख्या
शेकड्यात जायला लागली आणि वयही हळूहळू वाढायला लागलं तेव्हा लिखित इंडेक्स रेफर करायची
वेळ यायला लागली... आणि आज कॉम्प्युटरच्या आणि 'डिजिटल' जमान्यात ? ... संगीत, कॅसेट्स,
टेपरेकॉर्डर या शब्दांऐवजी डाटा, एमपी थ्री, फाईल्स, फोल्डर्स, पेन ड्राईव्ह्स, हार्ड
डिस्कस, डीव्हीडी प्लेयर्स, प्ले स्टोअर, असे अनेक शब्द आले.
हे बरंचसं झालं वैयक्तिक संग्रहाबद्दल, पण इंटरनेट मधून आपण जो शोध घेतो त्याबद्दल
काय ? त्यातही सर्च इंजिन्स असली तरीही कधी कधी वेगळीच मजा मजा होते राव. विशेषतः जुनी
दुर्मिळ मराठी गाणी शोधतांना. माझं असं ऑबझर्वेशन आहे की कितीही जुनी असली तरी हिंदी
चित्रपटातली गाणी थोड्याशा तपशिलानेही सहज मिळतात, पण जुन्या कितीतरी मराठी गाण्यांबद्दल
विशेषतः भाव किंवा भक्ती गीतांबद्दल बोलायचं तर, होतं असं की डोक्यात एखादं जुनं मराठी
गाणं आलं की चाल आठवते पण शब्द मुळीच आठवत नाहीत. काही थोडे शब्द आठवले किंवा मधलेच
शब्द आठवले आणि ते सर्च इंजिनला दिले की वेगवेगळी मजा होते. कधीकधी हा सर्च अजिबात
फेल जातो तर कधीकधी शेकडो गमतीदार पर्याय येतात, पण फक्त आपल्याला हवा असलेला पर्याय
सोडून.
त्यातून दिवसेंदिवस आपण सगळेच एवढे अधिक अधिक यंत्रावलंबी होत चाललो आहोत की
सगळ्यांच्याच स्मरणशक्तीची धार दिवसेंदिवस अधिक अधिक बोथट व्हायला लागलीय. लक्षात ठेवायची
आणि एक एक आकडा डायल करायची गरजच संपल्यामुळे अगदी आपल्या जोडीदाराचे किंवा मुलांचे
नंबर्स सुद्धा आपल्याला आता मुखोद्गत नाहीयेत.
असो. आयुष्यभर भरपूरच गोष्टी शोधल्या. अनेक
गोष्टी मिळाल्या आणि त्यातला आनंदही आकंठ
उपभोगला. काही गोष्टी मिळाल्या आणि त्यात
आनंद शोधत असतांनाच त्या गोष्टी कायमसाठी हरवल्या. तर काही
गोष्टी कधीही अजिबात सापडल्याच नाहीत... ठीक आहे... दॅट इज लाईफ... आता अलिकडे या उतार वयात
एकच गोष्ट शोधतोय ... कायमस्वरूपी सुख-समाधान.. पण काय करू दोस्तहो ! कुठल्याच सर्च इंजिनमध्ये सापडत नाहीये.
@प्रसन्न सोमण.
----- XXXXX -----